एकदा एका शेतकऱ्याचं एक म्हातारं झालेलं गाढव त्याच्या जुन्या विहिरीत पडतं. विहिरीत पडल्यामुळे गाढवाचा आक्रोश सुरु असतो… ते बघून शेतकरी सुद्धा व्याकुळ होऊन गाढवाला काढण्याचा प्रयत्न करतो.
पण गाढवाला बाहेर काढणं हे काही त्याच्याच्याने शक्य होत नाही. तेव्हा गाढवाचं ते व्याकुळ होऊन रडणं पाहून शेतकरी विचार करतो, कि गाढव सुद्धा म्हातारं झालंय आणि विहीर सुद्धा जुनी झाली. त्या विहिरीत कोणी पडून दुर्घटना होणं टाळायचं असेल तर आता हि विहीर माती टाकून बुजवणंच बरं राहील….
तेव्हा शेतकरी एक फावडे आणून आजूबाजूची माती विहिरीत टाकायला सुरुवात करतो.
सुरुवातीला अंगावर पडणाऱ्या मातीमुळे गाढव घाबरतं खरं, पण नंतर अंगावर पडणारी माती, सर्व शक्तीनिशी खाली झटकून त्याच मातीचा पायरीसारखा उपयोग करून ते म्हातारं गाढव हळूहळू वरती यायला लागतं….
गाढवाचा जीव वाचतो तो फक्त येवढ्यामुळे, कि ते प्रयत्न करणं सोडत नाही…
आपणा सर्वांचेच आयुष्यबद्दल काही स्वप्न असते. प्रत्येकाने आयुष्यात काहीतरी करायचे ठरवलेले असते. आयुष्य जगत असताना सगळेच आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात.
परंतु काही कारणाने आपल्याला त्यात निरनिराळ्या अडचणी येऊ लागतात. अशा वेळी उमेद न हारता सतत प्रयत्न करत राहण्यासाठी काय करावे हे आपण आज जाणून घेणार आहोत.
अनेकदा असे होते की अपेक्षित यश मिळत नसल्यामुळे तुम्ही नाउमेद होता, खचता… अशा वेळी पुढे काही प्रयत्न करायची इच्छा होत नाही.
माणूस परिस्थितीला शरण जाऊन हार पत्करून गप्प बसतो. पण मित्रांनो, एक सांगू असे न करता प्रयत्न करत राहा….
जेव्हा करण्यासाठी काहीही पर्याय शिल्लक नाही असे वाटायला लागेल… तेव्हा प्रयत्न करा… प्रयत्न करण्याचा पर्याय हा तर नेहमी शिल्लक असतोच. काय पटतंय ना!!
आता तुम्ही म्हणाल प्रयत्न करा म्हणणं सोपं असतं, पण ती काही सहजासहजी होणारी गोष्ट नाही.
पण प्रयत्न करणं हे सुद्धा काही गोष्टींच्या सरावाने हळू हळू जमायला लागू शकेल. अशाच काही पाच सवयी आज मी तुम्हाला सांगणार आहे. ज्याने ‘गिव्ह अप’ नकरता प्रयत्न करत राहणं हा तुमच्या स्वभावाचा भाग बनून जाईल.
१. स्वतःच्या भावनांचा आदर करा
जेव्हा तुम्ही एखादे काम हाती घेता तेव्हा त्या कामाबद्दल तुमच्या मनात जे विचार येतील त्या विचारांचा आदर करा. काम करत असताना तुम्हाला उत्साह वाटत आहे ना, वाटत नसेल तर तसे का होत आहे ह्याचा विचार करा.
एखादे काम जमत नसल्यामुळे जर तुम्हाला निराश वाटत असेल तर त्या भावनेचा देखील आदर करा. मुळात तुम्हाला जे काही वाटतं, ते वाटण्याबद्दल स्वतःला गिल्ट वाटून घेऊ नका.
आपल्याला हे काम जमणारच नाही असे वाटून जर तुम्ही प्रयत्न करणे सोडणार असाल तर, तसे विचार मनातून काढून टाका.
काही वेळा आपले विचार आपल्या सुप्त मनात असतात. वरवर जरी सर्व काही ठीक वाटत असले तरी अंतर्गत मनात तुम्ही अस्वस्थ असाल तर ते ओळखण्याचा प्रयत्न करा.
जर मनात नेगेटिव विचार असतील तर तुम्ही काम कधीच पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे हे वेळीच ओळखून त्यावर मात करण्याचा प्रयत्न करा.
२. पुढचा विचार करून मार्ग ठरवा
बरेचदा असे होते की पुढे काय करावे हे न समजल्यामुळे माणूस ते काम करणे सोडूनच देतो. पुढचा मार्ग सापडत नसल्यामुळे तो मार्ग शोधण्याचा आणि ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्नच करत नाही.
त्यासाठी न घाबरता, निराश न होता मला हे काम नक्की जमेल अशी स्वतःला खात्री द्या.
काम करण्याचे एक शेड्यूल ठरवून घ्या. आधी काय करायचे, नंतर काय करायचे ह्याचा सुरुवातीलाच विचार करा. छोटी छोटी उद्दीष्टये डोळ्यासमोर ठेवून काम सुरु करा आणि ती गाठण्याचा प्रयत्न करा.
लहान टार्गेट पूर्ण झाले की स्वतःला शाबासकी द्या. त्यामुळे पुढील मोठे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळेल. तसेच कोणत्याही टार्गेटचा मनावर ताण येऊ देऊ नका. नाहीतर त्या ताणामुळे हातातले काम पूर्ण करणे अवघड होईल.
काम पूर्ण करण्यासाठी नवीन स्किल्स शिकायचा प्रयत्न करा. त्यासाठी स्वतःला अपडेटेड ठेवा. आपल्या क्षेत्राशी निगडीत नवनवीन बाबी सतत शिकून घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे पुढे कसे काम करायचे हे वेळोवेळी तुम्हाला समजेल आणि काम सोडून द्यावे असे वाटणार नाही.
३. स्वतःला आपल्या ध्येयाची वारंवार आठवण करून द्या
बरेचदा असे होते की प्रयत्न करण्याच्या नादात माणूस आपले मूळ उद्दिष्ट विसरून जातो. आपण एखादे काम का करत आहोत, त्यामागे आपले काय ध्येय आहे हेच जर आपण विसरलो आणि निराळ्याच दिशेने आपले प्रयत्न सुरु ठेवले तर लवकरच आपल्याला त्या सगळ्याचा कंटाळा येऊन प्रयत्न करणे सोडून द्यावेसे वाटेल.
आपण काम सुरु करताना किती उत्साहात ते सुरु केले होते ह्याची स्वतःला वारंवार आठवण करून द्या. त्या वेळचा उत्साह, काम सुरु करण्याचा आनंद पुन्हा आठवल्यामुळे काम सुरु ठेवण्याची प्रेरणा मिळते.
आपले काम पूर्ण झाले की मिळणारे यश डोळ्यापुढे आणण्याचा प्रयत्न करा. पुढे जाऊन मिळू शकणारे यश नेहमीच आज काम करायला प्रेरणा देते. आपले काम सुरु ठेवण्यासाठी ही प्रेरणा आवश्यक ठरते.
काही कारणाने आपले काम नीट चालत नसेल तरीही प्रयत्न न सोडता चांगली परिस्थिति आठवा, आपले चांगले दिवस आठवले की माणूस आनंदी आणि आशावादी बनतो. भविष्यात देखील असे दिवस येतील अशी उमेद त्याला वाटू लागते.
आपले काम सुरु ठेवण्यासाठी नवी कारणे समोर आणा. नव्या कारणांच्या विचाराने देखील हुरूप येऊन काम करावेसे वाटते.
४. स्वतःशी प्रेमाने वागा
आपल्याला एखादी गोष्ट जमत नसेल तेव्हा आपण स्वतःवरच चिडतो. आपल्या स्वतःकडून असलेल्या अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हा आपण स्वतःवर नाखुश असतो आणि चिडचिड करतो. परंतु असे करणे योग्य नाही.
एखादे काम जमत नसेल तरीही स्वतःला दोष देऊ नका. त्याऐवजी प्रयत्न करत राहण्यासाठी स्वतःला प्रेरित करा. लहान लहान गोष्टी करता आल्या की स्वतःला शाबासकी द्या. छोटे यश असले तरी ते देखील सेलिब्रेट करा. त्यामुळे तुम्हाला पुढील कामासाठी उमेद वाटेल.
इतरांशी स्वतःची तुलना करणे टाळा. कोणालाही मिळालेल्या यशाचा हेवा करू नका. उलट मी देखील असेच यश मिळवेन अशी स्वतःला प्रेरणा द्या. आजवर तुम्ही किती काम केले आहे हे आठवून स्वतःचे कौतुक करा.
अति काम करू नका. कामातून छोटे ब्रेक घ्यायला शिका. कामातील एकसूरीपणामुळे कंटाळा येणे अगदी स्वाभाविक असते. त्यामुळे असे होऊ देऊ नका.
मध्ये मध्ये येणाऱ्या अडथळ्यांचा सकारात्मक दृष्टीने विचार करा. त्यासाठी स्वतःला दोष देत न बसता त्यावर मात कशी करता येईल ह्याचा विचार करा. तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकलात, तरच तुमच्या कामावर आणि तुमच्या आयुष्यावर प्रेम करू शकाल आणि यशस्वी होऊ शकाल.
या काही सवयी तुमच्यामध्ये असतील तर, कशीही परिस्थिती आली तरी ‘गिव्ह अप’ न करता तुमचे काम पुढे चालू ठेवण्याची प्रेरणा, उत्साह तुमच्यामध्ये टिकून राहील.
कामाचा कंटाळा येणे किंवा काम करू नये असे वाटणे ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर ही वेळ येतेच. परंतु आपल्या प्रयत्नांनी आपण त्यावर मात करू शकतो. तसे करण्याचा नक्की प्रयत्न करा. कामाचा कंटाळा न येऊ देता आपले काम नेटाने करत राहा.
निक व्युजेसिक – हात पाय नसून सुध्दा आयुष्याला कवेत घेणारा मोटिवेशनल स्पीकर
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.