ए चल.. उठ, पळ ट्रेन मिस होईल.. स्टेशनबाहेरील चहाच्या टपरीवर उभ्या असणाऱ्या त्याने अमेयला आवाज दिला. अमेय नाराजीच्या स्वरात रिकाम्या चाहाच्या ग्लासकडे एकटक पाहत होता. ‘तुम्ही निघा, तुमची ट्रेन मिस होईल. मला माझी ट्रेन आताच सापडलीय. तुम्ही जा, मी इथेच राहीन मिळेल ते काम करेन पण पुन्हा गावी जाणार नाही. अमेयने शांतपणे मित्राला सांगितले. ते सगळे निघून गेले. अमेय मात्र तिथेच होता. मनात असंख्य प्रश्नाचा धुमाकूळ सुरु होता. त्याने बॅग उचलली आणि तो चालू लागला.
जवळच असणाऱ्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन तो बसला. तिन्हीसांज व्हायची वेळ झालेली. सूर्य हळू-हळू अस्ताला जात होता. तो त्याकडे एकटक पाहत होता. थोडासा हताश होता पण त्याने अपेक्षा सोडली नव्हती. किनाऱ्यावर फेसाळणाऱ्या लाटा, मावळतीचा सूर्य आणि तांबूस किरणे हे वातावरण खरं तर आल्हाददायक पण अमेयला मात्र या कशातही रस नव्हता, त्याच्या मनात सुरु असलेला गोंधळ काही केल्या थांबत नव्हता.
‘मी मुलाखत तर अगदी व्यवस्थित दिली होती. त्यांना हव्या असणाऱ्या सर्व बाबी मी पूर्ण करण्याची क्षमता माझ्यात आहे. मग असं का? त्यांनी मला संधी का दिली नाही. कदाचित माझ्यातच काहीतरी कमी आहे’ असे तो बडबडत होता. थोडावेळाने शांत झाला आणि हात वाळूत फिरवून खेळू लागला. वाळूत तो त्याच्या नशिबाचा लेखा-जोखाच मांडू लागला. बराच वेळ तो तसाच बसला. काही वेळाने तो भानावर आला तेव्हा त्या समजलं की गेली २ तास तो एकटाच या किनाऱ्यावर बसलाय. मग स्वत:शीच हसला आणि वाळूतच पाय मोकळे करून आडवा झाला.
समोर पसरलेला अथांग सागर त्याला दिसेनासा झाला. आता त्याच्या डोळ्यासमोर होता तो असंख्य ताऱ्यांनी भरलेला विशाल समुद्र. नजर जाईल तिथे केवळ अंधार आणि मध्येच लुकलुकणारे तारे त्याला दिसत होते. तितक्यात त्याचा फोन वाजला. त्याने तो घेतला. त्यावेळी त्याला सांगण्यात आले की, आज त्याने दिलेल्या मुलाखतीत त्याचे सिलेक्शन झाले आहे. तसेच, दुपारी आलेला नकाराचा फोन हा अमेय जोशीसाठी नाही तर अमेय लिमयेसाठी होता. अमेय १० मिनिट बोलला आणि फोन कट केला. फोन ठेवल्यावर उठून उभा राहिला आणि जोरात किंचाळला. “Yes I did it”….. इतकावेळ त्याच्याकडे विचीत्र नजरेने पाहणारे लोक आता त्याच्याकडे ‘याला वेड लागलय का?’ अशा अविर्भावात बघत होते, पण, अमेयला आता त्या लोकांची पर्वा नव्हती. त्याने पटकन मित्राला फोन केला आणि नोकरी मिळाली असल्याचे सांगितले.
अमेयने फोन कट केला आणि कंपनीत झालेल्या घोळावर तो हसू लागला. त्याचा मुंबईत राहण्याचा निर्णय योग्यच होता. ट्रेनची वाट पाहताना घेतलेल्या प्रत्येक चहाचा घोट त्याला मुंबईत राहण्यास खुणावत होता. मुंबईत तो केवळ एक दिवस राहिला होता मात्र मुंबईने त्याला आपलं मानलं. म्हणूनच तो २५ वर्ष ज्या गावी राहिला त्या गावी जायला त्याचं मन तयार नव्हतं. आजच्या मुलाखतीत त्याने घेतलेली मेहनत. आईचा आशीर्वाद आणि स्वत:च्या क्षमतेवर त्याला ठाम विश्वास होता. म्हणूनच कोणतीही संधी नसताना त्याने मुंबईत थांबण्याचा विचार केला. चौपाटीवर फिरून मग त्याने चहा घेतला. मघाशी त्याच्या हातात रिकामा ग्लास होता. मात्र आता त्याच्या हातात एक नवा कोरा भरलेला चहाचा ग्लास होता. त्याच्या हातात आलेल्या संधीसारखा भरलेला…
मित्रांनो ही तर होती अमेयची गोष्ट. पण, असं म्हणतात की नशीब संधी एकदाच देतं ती स्वीकारून त्याचं सोनं करायचं असतं. पण, मी असं म्हणेन की तुम्हाला अनेक संधी मिळतील ती संधी स्वीकारून स्वत:ला हिऱ्याप्रमाणे लखलखीत करा. फक्त लखलखू नका तर जीवनात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संधी द्या की ते तुम्हाला पैलू पाडू शकतील.
एखाद्या स्पर्धेत भाग घेतल्यावर ‘करो या मरो’ची भूमिका घेत तुमचे १०० टक्के प्रयत्न करा. ती स्पर्धा तुम्ही हरलात तरीही तुम्हाला याच दु:ख होणार नाही की, अरे आपण आपले १०० टक्के देऊ शकलो नाही. सकारात्मक रहा आणि प्रयत्न करा यश तुमचेच आहे..
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.