नको नको त्यांच्या समोर आकड्यांचा असा उल्लेख करू नका…… माझ्याबद्दल बोलत होते माझ्या घरचे, म्हणजे आकडे माझ्या जीवनात गोंधळ निर्माण करतायत सध्या…. एक, दोन, तीन, चार…..
म्हणजे अचानक हे सुरु झालं दोन महिन्यांपूर्वी, म्हणजे माझ्या बायकोनी मला काहीतरी विकत आणायला सांगितलं आणि किंमत सांगितली, हजार रुपये, ती हजार इतकं बोलली आणि माझ्या जाणिवेत ते विचित्र प्रकार घडायला सुरवात झाले…… एक, दोन, तीन, चार….. हजार.
म्हणजे माझ्या जाणिवेत हजार हा आकडा आल्या आल्या मी एक पासून मोजायला लागलो, मी काय पुटपुटतोय हे हिला समजेनासं झालं…….
अहो अहो ही घाबरली, मी एकटक तिच्याकडे बघून पुटपुटत होतो, काय हो काय झालं, माझं लक्षच नव्हतं तिच्या बोलण्याकडे, एक तास झाला आणि मी कोसळलो अक्षरशः पलंगावर……
हिने माझ्या कपाळावर हात ठेऊन बघितला, काय झाले हो, कळवळून तिने विचारले, मला काहीच सुचत नव्हतं, दमल्यासारखे झाले होते, मला झोप कधी लागली समजलंच नाही, उठल्यावर हिने गरम चहा दिला मग बरे वाटले जरा, काय झालं हो मघाशी? काही प्रॉब्लेम आहे का?
माझ्या तोंडातून शब्दच फुटेना, मी काहीच बोललो नाही, सकाळी नेहमीप्रमाणे सर्व उरकून मी निघालो ऑफिसला, कानावर सारखे आकडे ऐकू येत होते आणि मी बसमध्ये कंडक्टरला तिकिटासाठी विचारले? दस रुपया ,मी मोजायला लागलो एक, दोन, तीन, चार….. दहा …
बस मध्ये आठ रुपये द्या कंडक्टर म्हणाला मी त्याच्याकडे बघत पुटपुटायला लागलो एक, दोन, तीन, चार….. आठ, माझ्याकडे विचित्र नजरेने बघत गेला पुढे………
बाप रे हे काय घडत्ये माझ्या जाणिवेत? मी घाम पुसला, काय चाललंय मिस्टर फळणीकर, असं बावचळल्यासारखं का झालय, आणि काय पुटपुटताय?
बॉस नी दहा हजाराचा चा आकडा उच्चारला होता, मी दिग्मूढ होऊन शुंभासारखा बॉस च्या तोंडाकडे बघत आकडे मोजत होतो, खूप दमल्यासारखं वाटत होतं, त्यांचा पारा सरकला, दोघे मला माझ्या टेबलवर घेऊन गेले…….
दोन तासांनी मी केबिन मध्ये गेलो सॉरी साहेब, सॉरी काय, काय झालंय तुम्हाला? डॉक्टरला दाखवा, खूपच रडवेला झालो मी, मिसेस देशपांडे माझ्याकडे सहानुभूतीने विचारपूस करायला लागल्या, सगळे कुजबुज करायला लागले माझ्याबद्धल, मी खूपच हताश, घरी आलो…….
ही धावतच आली माझ्याकडे, माझ्या अवताराकडे बघून तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले, काय होतंय हो तुम्हाला? दोन महिने बघत्ये मी, मी मोजायला लागलो एक आणि दोन बस झालं…….. अरे, मी खुश झालो म्हणजे एक ते दहा पर्यंत ठीक होतं मोजायला…..
अशी माझी जाणीव का बिघडली कोणास ठाऊक, लाख वगैरे माझ्यासमोर बोलणं म्हणजे माझं मरणच, मला कोसळून रडायला आलं, अगदी हताश निराश वाटायला लागलं, आकड्यांची भीती वाटायला लागली…….
डॉक्टरकडे गेलो, किती दिवस झाले, बाप रे दचकलोच, मोजायला सुरवात……. एक, दोन, तीन, चार … साठ ,एकसष्ठ …. बायको घाईघाईत म्हणाली दोन महिने पण त्या अगोदरच माझ्या मनात दोन महिन्याचा साठ आकडा आला होता……. बाप रे म्हणजे मानत सुद्धा आकडा येणं माझ्या जीवावरच होतं……
मानसोपचार तज्ज्ञही गोंधळले, नॉर्मल झोप येण्याच्या गोळ्या दिल्या, शांतता हवीये त्यांना……. आकड्यांनी त्यांच्या मनात गोंधळ निर्माण केलाय, खूप जपावं लागेल ह्यांना, ही धसकली……
हळू हळू जाणीव पूर्ववत येत्ये म्हणजे आता मनात आकडा आला तर नाही त्रास होत पण कोणी उच्चारला तर मात्र सर्व सिस्टीम कामाला लागते…… एक, दोन, तीन, चार पासून लाखोंपर्यंत…….
मला दमवणारे आकडे, मला गोंधळवणारे आकडे, मला नष्ट करू पाहणारे आकडे……
माझ्याशी बोलताना मला सांभाळून घ्या एक ते दहा इतपतच मला झेपेल हे लक्षात असू द्या……
एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा…..…
वाचण्यासारखे आणखी काही….
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.