गोष्ट सोपी असो किंवा अवघड तिचा परिणाम तुमच्यावर कसा होतो हे, तुम्ही क्रियेला प्रतिक्रिया कशी देता, भावनांना प्रतिक्रिया कशी देता यावर अवलंबून असतो. या लेखात वाचा, प्रतिक्रियेतून अवघड गोष्ट सोपी कशी करायची याचे तीन मूलमंत्र.
आपल्याला आयुष्यात काय पाहिजे या प्रश्नाची अनेक उत्तरे असतात.
कोणाला पैसा हवा असतो, कोणाला नोकरीच्या ठिकाणी बढती, कोणाला अमुक गाडी, कोणाला नवीन घर, कोणाला नवीन फर्निचर आणि असेच काय काय.
पण या सगळ्या गोष्टींचा विचार एक मिनीटासाठी बाजूला ठेवला आणि परत हाच प्रश्न विचारला की आपल्याला आयुष्यात नक्की काय पाहिजे?
तर त्याचे उत्तर ‘आनंद’ असेच असेल. वर सांगितलेल्या गोष्टी केवळ आपल्याला आनंदापर्यंत पोहोचवण्याच्या वाटा आहेत असे म्हटले तर ते चूक ठरणार नाही.
तर आयुष्यात आपल्याला खरेतर आनंदी व्हायचे असते. आणि आपण आनंदी तेव्हाच होतो जेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी, आपल्या मनाप्रमाणे होत असते. पण इतके साधे, सरळ आणि सोपे असेल तर ते आयुष्य कसले?
आपल्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी घडत असतात. एखाद्या गोष्टीचे व्यवस्थित नियोजन करावे आणि प्रत्यक्षात आपण ठरवल्याप्रमाणे काहीच घडू नये असेही बऱ्याचदा होते आणि या सगळ्यात आपण फारसा हस्तक्षेप करू शकत नसतो.
घडणाऱ्या घटनांवर आपण आपला ताबा ठेऊ शकत नाही पण या एका गोष्टीवर मात्र आपण आपला पूर्ण ताबा ठेऊ शकतो..
ती गोष्ट म्हणजे घडणाऱ्या गोष्टींवरची आपली प्रतिक्रिया!
आयुष्याची वाटचाल करताना काही अवघड वळणे, काही खडतर वाटा या येणारच आहेत.
यांच्यापासून सुटका करून घेणे अशक्यच आहे. प्रत्येकाच्या वाट्याला असा अवघड काळ येतोच, अशावेळेला आपल्या हातात केवळ एकच गोष्ट उरते ती म्हणजे धीर.
अशा अवघड काळामुळे खचून जायचे की त्यातून तावून सुलाखून जाऊन पुन्हा नव्याने उभारी घ्यायची हे फक्त आणि फक्त आपल्याच हातात असते.
आजच्या या लेखात आपण हे बघणार आहोत की अशा अवघड प्रसंगाला आपल्या मनाचा तोल न ढळू देता कसे सामोरी जायचे.
१. आपण स्वतःला काय सांगतो याकडे लक्ष द्या.
आपण आपल्या नकळत खूप वेळा स्वतःला उगाचच नकारात्मक गोष्टी सांगत असतो.
सारखा विचार करून करून मनात नकारात्मक विचारांना थारा देतो की एखाद्या सकारात्मक विचाराला जागाच उरत नाही.
असे विचार करून आपण परिस्थितीला ती आहे त्यापेक्षा जास्त गंभीर करत असतो.
असे केल्याने आपल्या मनावर भीतीचे सावट तर उमटतेच, पण आहे त्या समस्येवर मात करण्यासाठी तोडगा काढायचे बळ ही अशावेळेला आपल्याला राहत नाही.
कधीकधी परिस्थिती खरेच वाईट असेल किंवा कधीकधी आपल्याला जितकी वाटते, तितकी परिस्थिती वाईट नसेलही पण काहीही असले तरी आपल्या हातात त्यावर उपाय शोधणे व आपले मनोबल खचू न देणे इतकेच असते आणि ते करायला आपल्याला सतत स्वतःशी सकारात्मक पद्धतीने संवाद साधणे गरजेचे आहे.
उदाहरणार्थ, हा आत्ताचा लॉकडाउनचा काळ घेऊया. या काळात खूप लोकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे पगार अर्धे झाले त्यात महागाई वाढली आणि अजून वाढत जाईल अशी भीती सुद्धा आहे.
सगळ्यांसाठीच अवघड आहे. पण अशावेळेला आपल्या समस्या आठवून कुढत बसण्यापेक्षा आपण स्वतःला असे सांगितले, की हा काळ नवीन काहीतरी करून बघण्यासाठी आहे, एखादा छोटा व्यवसाय किंवा दुसरी नोकरी शोधण्यासाठी आहे तर?
काही गोष्टी ऐकायला सोप्या वाटतात, करायला नाही पण आता पैसे नाहीत या पेक्षा आता बचत करायचे वेगळे उपाय शोधावे लागतील असे स्वतःला सांगितले तर आहे त्या समस्येवर तोडगा काढायला जास्त सोपे जाऊ शकेल.
शिवाय नवीन ठरवलेले टास्क समोर असल्याने पुन्हा एक नवी ऊर्जा तुमच्यात संचारेल… सोप्या शब्दात सांगायचं तर प्लॅन ‘A’ फेल झाला तर हात पाय गाळून रडत न बसता प्लॅन ‘B’ चा विचार करायला घ्या.
२. अपेक्षा आणि समाधान याचा बॅलन्स समजून घ्या!!
खूपदा आपण अति विचार करून परिस्थितीला ती आहे त्यापेक्षा बिकट रूप देत असतो.
आपल्या मनात सतत एकप्रकारची भीती असते, आपली आवडती व्यक्ती, वस्तू आपल्यापासून दूर गेली तर?
मित्रांनो, यात आपली चूक नाही. माणसाची विचार करायची पद्धतच तशी आहे. आपल्याकडे जे आहे ते नाहीसे झाले तर काय ही भीती सतत आपल्याला घेरून असते.
आपले घर, गाडी, नोकरी, दागिने, पैसे हे आज आहेत पण उद्याचे काय?
वास्तविक या प्रश्नाचे उत्तर कोणीच देऊ शकणार नसते. साहजिकच आपली अशी अपेक्षा असते की आपली परिस्थिती सुधारली जरी नाही तरी ती आहे त्यापेक्षा खालावू तरी नये.
याच भीतीमुळे आहे तो क्षण मजेत घालवण्यापेक्षा आपण सतत उद्याची काळजी करत बसतो.
उद्याबद्दलच्या आपल्या अपेक्षांचे अशामुळे आपल्यावरच ओझे होते आणि त्याचा परिणाम आपल्या आज आणि आत्तावर होतो.
अशावेळेला जर आपण आपले लक्ष आपल्या अपेक्षांवरून विचलित करून आपल्याकडे काय आहे यावर केंद्रित केले तर?
आपण जर असा विचार केला की हो, उद्या कदाचित माझी नोकरी जाऊ शकते पण माझ्याजवळ महिना दोन महिने जातील इतके सेविंग तर आहेच, शिवाय माझ्या शिक्षणाचा आणि अनुभवाचा आधार सुद्धा आहे.
म्हणजे नोकरी शाबूत राहावी ही अपेक्षा बाळगून राहण्यापेक्षा आपल्या शिक्षणाबद्दल आणि अनुभवाबद्दल समाधान बाळगून आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेऊ शकतो.
असे केल्याने जे घडणार आहे त्यात काही बदल होणार नसतोच फक्त त्या घटनेकडे बघायचा आणि त्याला सामोरे जायचा आपला दृष्टिकोन बदलणार असतो.
३. स्वतःच्या आयुष्याचा ताबा घ्या
आपल्या आयुष्यात जे होते ते चांगल्यासाठीच असते. या वाक्यावर आपण दृढ विश्वास ठेवला पाहिजे.
आपल्याला खुश राहण्यापासून फक्त एकच व्यक्ती थांबवू शकते आणि ती म्हणजे आपण स्वतः… आपले विचार, आपले वागणे…
यावरच आपला मूड अवलंबून असतो, त्यामुळे एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली तरीही जे होते ते चांगल्यासाठीच असे म्हणून पुढे पुढे चालत राहिले पाहिजे.
जेव्हा आपल्यावर एखादी कठीण परिस्थिती येते तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आत्तापर्यंत आपल्या आयुष्यात आपण अनेक अवघड प्रसंगांना तोंड दिलेले आहे आणि त्यातून वेगवेगळे धडे घेऊन बाहेर पडलो आहोत त्याचप्रमाणे यातून सुद्धा आपण बाहेर पडणार आहोत.
तुम्हाला खुश राहायचे आहे? मग ते तुमच्याच हातात आहे.
तुमच्या मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी तुमच्या हातात नसतात पण त्या गोष्टींचा तुमच्यावर परिणाम न होऊ देता खुश राहणे हे तुमच्याच हातात असते.
आपणच आपल्या मनावर ताबा मिळवला पाहिजे, प्रत्येक वेळेस हळवे न होता सारासार विचार करून वागायला शिकले पाहिजे.
असे झाले तरच आपण आपली विचार करायची पद्धत बदलून परिस्थितीशी दोन हात करायला शिकू शकू.
लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा 👍
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.