यश म्हणजे जीवन प्रभावीपणे जगणं.
यशस्वी माणसं शोधण्यासाठी साता समुद्रापार जाण्याची काय गरज! सगळ्या जगाने ज्यांचं कौतुक करावं असं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या मातीत जन्म घेतलेले, आपल्या सर्वांना आपलेसे वाटणारे, हवेहवेसे वाटणारे, तेजस्वी, महाप्रतापी शिवाजी महाराज!
आज चारशे वर्षानंतरही ज्यांचं नाव घेतलं की अभिमानाने छाती फुलुन येते. गर्वाने मान ताठ होते, असं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! वयाच्या चौदाव्या वर्षी जेमतेम एक हजार मावळ्यांपासुन सुरु केलेलं स्वराज्याचं, फक्त पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी दोन लाख सैन्य सज्ज असलेले बलाढ्य स्वराज्यात रुपांतर केलं.
वर्षाला तीन या वेगाने जिंकण्यास महाकठिण असे एकशे अकरा किल्ले बांधले, आणि ह्या बांधकामाचे क्षेत्रफळ जवळपास चीनच्या भिंतीएवढे आहे, जी बांधायला एकशे दहा वर्ष लागले होते. हे काम महाराजांनी अपुऱ्या साधनांसह अवघ्या पस्तीस वर्षात केले.
इतकी पोलादी फळी उभा केली की, महाराजांच्या मृत्युनंतरही शंभर वर्ष हे स्वराज्य टिकले.
महाराजांच्या जीवनावर, त्यांच्या रणनितीवर, त्यांच्या विचारपद्धतीवर काही लिहणं म्हणजे आंधळ्यांनी हत्तीचं वर्णन केल्यासारखंच आहे, पण महापुरुषांच्या आयूष्यात आपल्यासाठी प्रेरणा लपलेल्या असतात, म्हणुन त्यांच्या जीवनाचा अभ्यास करत राहीलं पाहिजे.
जसे ‘अष्टप्रधान मंडळ’ हे महाराजांनी निवडलेले, पारखुन घेतलेले आठ रत्नं होते, तशीच एक अष्टसुत्री, महाराजांनी, त्यांच्या आयुष्यात जोपासलेली दिसुन येते.
आता बघू ती अष्टसूत्री काय….
१) यश मिळवण्यासाठी त्यांच्या बुद्धीला प्रशिक्षण दिलं होतं!
यश म्हणजे काय? समस्यांचा पाढा वाचुन निराश न होता, समस्यांवर उत्तर बनणं, म्हणजे यश!
त्या काळात संपुर्ण भारतात पाच पाच सुलतान शस्त्रांच्या बळावर धुमाकुळ घालत होते. मराठे शुरवीर होतेच, पण गुलामगिरी करण्यात, धन्याची चाकरी करण्यात धन्यता मानत होते. आपण लढा देऊ शकतो, असा विश्वास, अशी कल्पनाही कोणी करु शकत नव्हतं, पण शिवाजी महाराज म्हणजे सळसळतं चैतन्य होतं!
त्यांची देवावर अगाध श्रद्धा होती. रोहीडेश्वराला केलेला रक्ताचा अभिषेक त्यांना प्रेरणा देत राहीला, म्हणुणच की काय, अफझलखान वध असो, पन्हाळगडाचा वेढा, आग्र्यातुन सुटका असो किंवा शाहिस्तेखानाची स्वारी असो, प्रत्येक अवघड वेळी देव त्यांच्या मदतीसाठी धावुन आला.
२) ते नेहमी यशस्वी का झाले?
शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वात जादु होती….. कितीही भलीवाईट परिस्थिती असो. कारण हसत हसत आनंदाने सामोरं जाण्याची कला त्यांनी आत्मसात केली होती.
जे लोक सर्वांवर मनापासुन प्रेम करतात, आपोआपच त्यांना सर्व लोक पसंत करु लागतात आणि असे लोक खुप आनंदी आयुष्य जगतात, आणि खुप जलद वेगाने लोकप्रियही होतात.
शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर, आपल्या रयतेवर जीवापाड प्रेम केलं. जातीपातीच्या भिंती तोडुन सर्वांना सन्मान दिला. प्रत्येक मोहीमेनंतर शिवाजी महाराज तलवारी मिरवणाऱ्या धारकऱ्यांना ‘मानकरी’ म्हणुन किताब द्यायचे.
भाला फेकणाऱ्या निष्णात सैनिकाचा ‘भालेराव’ अशी उपाधी देऊन गौरव करायचे. जीवावर उदार होवुन चढाई करणाऱ्या सैनिकांचा सोन्याचे कडे देऊन सन्मान करायचे. एखादा मावळा धारातिर्थी पडला की पर्वताहुन खंबीर आणि अविचल असलेल्या महाराजांच्या डोळ्यात पाणी जमा व्हायचं.
त्यांच्या अशा विशाल हृदया मुळेच लोक त्यांच्यासाठी, त्यांच्या एका शब्दासाठी मरायला, आणि मारायला तयार व्हायचे.
३) शिवाजी महारांजाना समृद्धीचा नियम माहित होता.
प्रचुरतेच्या, मुबलकतेच्या उसळलेल्या लाटा चहुबाजुने आपल्याकडे येत आहेत, असं माननं, हा समृद्धीचा नियम!
ज्यांना समृद्धीचा नियम माहीत असतो असे लोक भुतकाळाचा परिणाम भविष्यावर होवु देत नाहीत. योजनाबद्ध पद्धतीने, ते त्यांच्या ध्येयाच्या दिशेनं पावलं टाकत राहतात.
औरंगजेबाने गादी मिळण्यासाठी स्वतःच्या वडीलांना कैदेत टाकले, स्वतःच्या सख्ख्या भावाचा मुडदा पाडला. महाराजांनी अन्यायी लोकांना दयामाया न दाखवता, वेळप्रसंगी कठोर शासन केले, पण सर्वसामान्य जनतेला मात्र आयुष्यभर भरभरुन दिले. मराठा सैन्यांमध्ये स्वराज्याचे स्फुल्लिंग पेटवले. मुघल, आदिलशहा, निजामशहा, सिद्धी, इंग्रज, पोर्तगीज सर्वांवर जरब बसवली.
दोनदोनदा सुरत लुटुन कुबेराला लाजवील असा खजाना स्वराज्यात आणला, आणि मोगलांच्या सुरतेला ‘बदसुरत’ केले.
आपल्यापेक्षा प्रबळ शत्रुला ते कधीही घाबरले नाही, उलट प्रत्येक वेळी शत्रुला लुटुन त्याच्याच साधनांनी त्याला मात दिली, कारण त्यांना समृद्धीचा नियम माहित होता.
महाराजांनी प्रत्येक वेळी, जनतेच्या रक्षणासाठी, रयतेच्या सन्मानासाठी, आपल्या छातीची ढाल पुढे केली आणि वार झेलले.
४) भय हा शब्द महाराजांच्या डिक्शनरीत नव्हता.
महाराजांची कार्यपद्धती अशी होती. आधी मेंदु वापरा. नंतर मनःसामर्थ्य वापरा आणि शेवटी मनगट वापरा.
कुठल्याही मोहीमेवर जाण्याआधी ते मानसिक तयारी पुर्ण करायचे.
नव्वद टक्के काम मेंदुचे आहे. नियोजन करणे, माहिती गोळा करणे, जबाबदाऱ्या निश्चित करणे.
त्यानंतर मानसिकता तयार करुन खंबीर मनाने अंमलात आणण्यासाठी सहकाऱ्यांना मेन्टली प्रिपेअर करायचे. ९९ टक्के कार्य मानसिक स्थितीवर असते आणि एक टक्के कार्य प्रत्यक्षात लढायचे असते.
महाराज आग्र्यामध्ये असताना त्यांना नजरकैदेत ठेवण्यासठी दोन लाख साठ हजार मोगल सैन्य तैनात केलेलं असतं, पण आपल्या फक्त तीनशे लोकांसोबत महाराज निसटुन जातात. अशा वेळी भलीभली कणखर चिवट माणसं भितीनं खचली असती, हार्ट अटॅकने मेली असती, पण भय हा शब्द महाराजांच्या डिक्शनरीत नव्हता.
५) ते ताण घ्यायचे नाही, ते ‘ताण’ द्यायचे!
कोणत्याही संकटामुळे स्वराज्य खचले नाही, डिप्रेस झाले नाही, कारण मानसिक ताकद! हालअपेष्टा सहन करण्याची मावळ्यांच्या मनाची खंबीरता.
औरंगजेबाचा स्वभाव अत्यंत संशयी होता. तो कोणावरही विश्वास टाकायचा नाही, याच्या एकदम उलट महाराजांचं, महाराजांच्या गुप्तहेरांना सर्वात जास्त पगारी होत्या. त्यांच्या हेरखात्याला तोड नव्हती. विश्वासु माणसांच्या आहुतीवरच स्वराज्य रचलं होतं.
ग्राउंड रिएलीटी माहीत असल्यामुळे, कमी सैनिक असुनसुद्धा, प्रत्येक लढाई अगोदरच जिंकली जायची.
६) शिवाजी महाराज इतके लोकप्रिय का होते?
साधी राहणी – स्वारीला गेल्यावर शिवाजी महाराज साध्या तंबुत राहत होते. एवढे अधिकार, एवढे वैभव असुनही महाराज साधेपणाने वागायचे.
प्रति शिवाजी – त्यांनी आपल्यासारखेच कपडे देऊन चाळीसपेक्षा जास्त प्रतिशिवाजी तयार केले होते. त्यांना आपल्यासारखंच रुबाबात बोलायला, वागायला शिकवलं. प्रत्येक सैनिक शिवाजी महाराजांना ‘रोल मॉडेल’ म्हणजे आदर्श मानायचा.
प्रेमपुर्वक व्यवहार – महाराज संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रोत्साहन द्यायचे, त्यांचं मनोबल वाढवायचे. त्यांना प्रेरित करायचे. उत्साह वाढवायचे.
सतत दडपणाखाली आणि चिंतेत असलेले नेते कोणालाच आवडत नाहीत, आनंदाने उत्साहाने सळसळणारे लोक सर्वांनाच हवेहवेसे वाटतात.
७) त्यांनी प्रत्येक क्षणी सुरक्षितता अनुभवली.
महाराजांनी आपल्या सैन्याला त्यांच्या शरीरयष्टीप्रमाणे अनुकुल नवनवी शस्त्रे बनवुन दिले.
आपल्या प्राणप्रिय मावळ्यांसाठी महाराजांनी विटा नावाचे एक हत्यार बनवले. विटा म्हणजे काय तर पुन्हा पुन्हा वापरता येईल असा भाला. भाल्याला मागे एक कडी लावायची आणि वीस तीस फुट लांबीची पातळ पण अतिशय मजबुत अशी रस्सी बांधायची, भाला फेकायचा आणि रस्सीने ओढुन घ्यायचा. मग एकच भाला पाचपन्नास वेळा वापरता येई आणि लाईफटाईमहि वापरता येई.
हे हत्यार वापरुन फक्त तीनशे मावळ्यांनी एक प्रसंग आपल्या रक्ताने इतिहासात कोरुन ठेवला.
शिवाजी महाराज पन्हाळगडहुन विशाळगडावर जाताना सिद्दी जौहरचा पाठलाग करणाऱ्या पाच हजार सैनिकांना थोपवण्याची कामगिरी तीनशे मावळ्यांच्या शिरावर आली. सोळा किलोमीटर लांब असलेली गजापुरची खिंड लढवायला माणसं फक्त तीनशे, आणि गनिम पाच हजार. जगातली ही सर्वात विषम लढाई चौदा तास चालली.
८) महाराजांनी कमजोरीलाच ताकद बनवलं!
महाराजांच्या शत्रुजवळ अफाट पैसा आणि प्रचंड मनुष्यबळ होतं, महाराजांची कमजोरी काय तर कमी पैसे आणि कमी मनुष्यबळ.
गनिमी कावा – शत्रु जिथे मोठ्या संख्येने हजर असायचे, महाराज तिकडे फिरकायचेच नाहीत. मोगलांच्या सैन्याचा, त्यांच्या शक्तीचा, निर्णायक खरा उपयोग, चलाखीने, चतुराईने त्यांनी होवुच दिला नाही. मोगल सैन्य हल्ला करायला मराठ्यांच्या तळावर येण्याआधीच रातोरात मराठे गायब व्हायचे. मग शत्रु आपल्याला मारणार तरी कसा?
रात्री अपरात्री हेच मराठे मोगलांच्या तळावर छापा टाकुन पैसे, धान्य, हत्यारे अक्षरशः मोळ्या बांधुन घेऊन जात. पैशाच्या गोण्या त्यांच्याच घोड्यांवर लादुन पळवुन नेत आणि पाठलाग करायला गेल्यावर अंधारात कधीच सापडत नसत.
तरीही सात लाख सैन्य असलेला औरंगजेब महाराज असतानाच काय, त्यांच्या मृत्युनंतरही सत्तवीस वर्ष स्वराज्य बळकाऊ शकला नाही. शेवटी हाय खाऊन ह्याच मातीत मेला. कारण महाराजांनी उभा केलेली अभेद्य यंत्रणा.
९) डोंगरांच्या माथ्यावर उभा केलेले गड किल्ले.
आपल्या आयुष्यातील पन्नास पैकी सत्तावीस वर्ष महाराजांनी राजगडावर मुक्काम केला. राजगड बांधुन झाल्यावर तब्बल बारा वर्षांनी मिर्झा राजा जयसिंगानी त्याला वेढा घातला, पण राजगड जिंकता मात्र कोणालाही आला नाही.
त्यानंतर दोनच वर्षांनी महाराजांनी शत्रुला दुर्गम असा रायगड बांधायला घेतला. चार हजार फुट उंच असलेल्या रायगडाच्या आजुबाजुला घनदाट जंगले होती. गुरुत्वाकर्षणाचा नियम वापरुन शत्रुला नष्ट करण्याच्या अनेक सोप्या सोप्या योजना इथे होत्या.
महादरवाज्याला हत्तीने धडका देऊन तोडता येवु नये म्हणुन प्रत्येक किल्ल्याच्या वाटेवर चिंचोळ्या वाटा तयार केल्या.
त्यामुळे जसा देवगिरी पाडता आला, तसा रायगडाचा पाडाव शेवटपर्यंत कोणालाही करता आला नाही.
मित्रांनो, शिवाजी महाराजांनी शत्रुचे कच्चे दुवे हेरुन स्वतःच्या कमजोरीचं ताकतीत रुपांतर केलं होतं.
महाराजांच्या इंजिनीरींग टेक्निक समजण्यासाठी एकच उदाहरण पुरेसं आहे.
चाकणचा लंगोटीएवढा टीचभर किल्ला जिंकण्यासाठी, शाहिस्तेखानाला बावीस हजार फौज आणि छप्पन दिवस लागले, आणि तोच किल्ला लढता ठेवण्यासाठी फिरंगोजी नरसाळ्याला केवळ तीनशे मावळे पुरेसे होतात.
द ग्रेट शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवला आणि यश मिळवण्याच्या ह्या अष्टसुत्रीला आपण समजुन घेऊन आपल्या जीवनात उतरवली तर आपलंही जीवन राजाच्या थाटात जगता येईल, त्या ‘जाणता राजा’सारखं आपणही प्रभावशाली आयुष्य जगु, असा मला विश्वास आहे.
तुम्हालाही शिवाजी महाराजांच्या चरित्रातुन प्रेरणा मिळते का?
शिवाजी महाराजांवरची कोणकोणती पुस्तकं तुम्ही वाचली आहेत, त्यांचे कोणकोणते गुण तुम्हाला आवडतात, मला जाणुन घ्यायला आवडेल.
वाचण्यासारखे आणखी काही…
खगोल / अंतराळ
ललित
प्रेरणादायी/MOTIVATIONAL
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Hi
Gre8 post.