सर्वसाधारण कल्पना पण कमालीचं नियोजन करून करोडोंची मालकी मिळवणारे हे उद्योगपती…
एका सध्या दुकानापासून ‘रिटेल चेन’ बनवण्याचा, स्टॉक मार्केट मध्ये जागा निर्माण करण्याचा प्रवास हि काही अशक्य वाटणारी गोष्ट नाही, हे पटवून घेण्यासाठी आजची हि गोष्ट वाचा.
आघाडीचे भारतीय उद्योजक कोण असा कोणी प्रश्न विचारला तर आपसूकच टाटा, बिर्ला, अंबानी अशी ठराविक नावं कोणीही सांगेल.
पण वास्तविक भारतात असे अनेक उद्योजक आहेत ज्यांचं कर्तृत्व खूप वेगळ्या उंचीवर पोहोचलेलं आहे.
ठराविक उद्योजक सोडले तर अशा कोट्यधीश अब्जाधीश उद्योजकांची आपल्याला काहीच माहिती नाही. असेच कित्येकजण भारतात आहेत ज्यांनी काही ना काही वेगळा विचार करून, वेगळ्या पद्धती वापरून आपला व्यवसाय उभा केला.
टाटा, बिर्ला यांच्या उद्योग समूहांनी लोकोपयोगी वेगवेगळी उत्पादनं बाजारात आणली. रिटेलिंग बिझनेसचं भारतात वातावरण तयार केलं.
रिटेलिंग बिझनेसमधेच आपलं स्वतःचं वेगळं स्थान काही उद्योगपतींनी निर्माण केलं. या लेखात आपण अशाच एका उद्योगपतीची कहाणी पाहुया, ज्यांनी शून्यापासून सुरूवात करून रिटेलिंग बिझनेसमधे स्वतः कोट्यावधी कमावलेच, पण प्रसिद्धीपासून दूर राहून आपल्या कर्मचाऱ्यांनाही आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवलं.
इतकच नाही तर टाटा बिर्ला यांसारख्या उद्योगसमूहांनाही रिटेलिंग क्षेत्रात मागे टाकलं.
सध्याचं बहुचर्चित आणि सुप्रसिद्ध ‘डि मार्ट’ स्टोअर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे.
एकाच छताखाली विविध उत्पादनं सहज मिळण्याचं हे ठिकाण आणि तेही एम आर पी पेक्षा कमी किंमतीत वस्तू मिळणारं ठिकाण अशी लोकांमध्ये असलेली याची ओळख. असं लोकप्रिय स्टोअर सुरू करणारे हे उद्योजक.
या उद्योजकांचं नाव आहे श्री. राधाकृष्ण दमाणी, म्हणजेच एवेन्यू सुपरमार्ट लिमिटेडचे मालक.
आज यांचं नाव भारतातल्या सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत गणलं जातं. यांनी आपल्या करिअरची सुरुवात वडिलांच्या बिझनेसमध्ये सहभागी होऊन केली.
पण वडिलांच्या निधनानंतर हा बिझनेस बंद पडला. अशा वेळी त्यांचे भाऊ राजेंद्र दमाणींनी त्यांना मदत केली.
दोन्ही भावांनी मिळून स्टॉक ब्रोकिंगचा बिझनेस सुरू केला. सुरूवातीला या व्यवसायातल्या खाचाखोचा त्यांना काहीच माहीत नव्हत्या.
अनुभवी व्यक्तींचे सल्ले घेऊन, शिकून त्यांनी भरपूर नफा कमावला. व्यवसायातली समज आणि दूरदृष्टी या आधारावर ते कोट्यधीश झाले.
दमाणींना सुरूवातीपासूनच स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. पण पुरेसं आर्थिक पाठबळ नसल्याने अडचणी येत होत्या. स्टॉक मार्केट मध्ये भरपूर नफा कमावल्यावर २००० साली त्यांनी रिटेल मार्केटमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा चंग बांधला.
छोटे व्यावसायिक, दुकानदार यांच्या भेटी घेऊन, लहान शहरांवर लक्ष केंद्रित करून ‘डि मार्ट’ या नावाने रिटेलिंग बिझनेस सुरू केला.
सध्या भारतात ४५ शहरांमध्ये डि मार्टच्या ११८ शाखा आहेत.
विशेष म्हणजे कोणतीही शाखा सुरू करताना या कंपनीने भाडोत्री जागा घेतली नाही. मिळणाऱ्या नफ्यातील रक्कम जागेचं भाडं भरण्यात जाण्यापेक्षा स्वतःची जागा असावी हा यामागचा विचार होता.
भाडं देण्यासाठी जाणारे पैसे वाचवून त्या किंमतीत ग्राहकांना डिस्काउंट देऊन उत्पादनं उपलब्ध करून द्यायची, असं वेगळं नियोजन त्यांनी केलं आणि त्यात ते यशस्वी झाले.
या योजनेतून त्यांच्या कंपनीला इतका नफा मिळाला की, रिटेल क्षेत्रात त्यांनी रिलायन्स रिटेल, फ्युचर रिटेल अशा बलाढ्य कंपन्यांनाही मागे टाकलं.
अलिकडेच या कंपनीने आपला IPO २९९ रूपयांच्या किमतीने बाजारात आणला आणि या IPO ची ६४१ रूपये अशा चढ्या किमतीने स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग झाली.
यात केवळ दमाणींचाच फायदा झाला असं नाही तर त्यांच्या कंपनीत काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी देखील कोट्यधीश, लक्षाधीश झाले.
डि मार्टचे उच्च पदस्थ अधिकारी नेविल नरोना यांनी घेतलेल्या शेअर्सची किंमत ९०० करोड रुपये इतकी झाली.
काही वर्षांपूर्वी नरोना यांनी हिंदुस्थान युनिलीवर कंपनी सोडून दमाणींच्या व्यवसायात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या वित्तीय सल्लागारांनादेखील २०० कोटींचा फायदा झाला. कंपनीतल्या इतर कर्मचाऱ्यांनाही लाखोंचा फायदा मिळाला. सध्या कंपनीची किंमतही ४० हजार करोडोंपेक्षा जास्त आहे.
दमाणींच्या मते, व्यवसाय वाढवायचा म्हणजे सरसकट सगळीकडे शाखा सुरू करायच्या असं नव्हे तर ज्या ठिकाणी कमतरता असेल तेथील नेमकी गरज ओळखून व्यवसाय सुरू करायचा. हे धोरण अवलंबलं तर नक्कीच फायदा होतो.
मित्रांनो, दमाणींचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून दूरदृष्टीने विचार करण्याची सवय आपणही लावून घेऊ शकतो.
एक एक टप्पा ठरवून आपण आपलं काम सुरू करायला काहीच हरकत नाही. लक्षाधीश, कोट्यधीश होणं हे केवळ हिशेब झाले. समाधानकारक फायदा मिळवणं, हे खरं यश म्हणता येईल.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.