पहिली माळ ….रंग ????
ती नेहमीप्रमाणे लवकर उठून कॉलेजला निघाली होती. पेपरमधील आजचा रंग कोणता ते पाहून ड्रेस निवडला होता. हाफ पॅन्ट आणि टी शर्ट. कानात सेम कलरचे डुल आणि गळ्यात माळ. रस्त्यावरील लोकांच्या नजरा झेलत ती निघाली. सार्वजनिक नवरात्र मंडळात देवीचे दर्शन घेण्यासाठी थांबली. शांतचित्ताने देवीसमोर हातजोडून उभे असताना तिच्या कानावर कंमेंट्स पडल्या. स्वतःशी हसून ती त्या मुलांकडे वळली. कमरेवर हात ठेवून त्यांच्यावर आपली धारधार नजर रोखून म्हणाली “हिम्मत असेल तर समोर येऊन कंमेंट्स करा”. काही न बोलता त्या मुलांनी मान खाली घातली आणि मंडपातून निघून गेले. होय ती देवीचं आहे.
दुसरी माळ ….रंग???
खरे तर कोणी ठरवलेल्या रंगाचे ड्रेस घालून जायची कल्पनाच तिला पटत नव्हती. आणि त्या त्या रंगाच्या साड्या आणि ड्रेस तिच्याकडे असतीलच याची खात्री नव्हती. तरीही सर्वांचा आग्रह म्हणून आजच्या कलरचा ड्रेस तिने घातला होता. नशीब आजच पगार झाला, म्हणून खरेदीसाठी मार्केट मध्ये आली होती. उद्याचा कलर कोणता हे पाहून त्या रंगाचा टॉप तिने घेतला. अचानक शेजारच्या दुकानातील फुटबॉलकडे तिचे लक्ष गेले. छोटा भाऊ बरेच दिवस फुटबॉल मागत होता. आईबाबा लक्ष देत नव्हते तो बिचारा मिळेल त्या वस्तूवर लाथा मारीत फुटबॉल खेळत होता. न राहवून तिने तो टॉप परत केला आणि त्याच्यासाठी फुटबॉल विकत घेतला. उद्या टॉप घालून मिळणाऱ्या आनंदापेक्षा भावाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला नक्कीच आवडेल तिला. ती बहिणच आहे. ती देवीच आहे.
तिसरी माळ ….रंग ????
BSF च्या जवानांसाठी कुठले सण…..?? सतत सीमेवर रक्षणासाठी उभे…. ?? तरीही ती जमेल त्या पद्धतीने आपले सण साजरे करायची. आजच्या रंगाचे तर काहीच नव्हते तिच्याकडे.. तिच्याकडे फक्त त्या रंगाची यादी होती. रोज ती लिस्ट पाहून स्वतःचे समाधान करून घ्यायची.
शेवटी आज तिच्या एका सहकाऱ्याने आजच्या रंगाचा कपडा आणून दिला. तिनेही तो हौसेने आपल्या AK 47 ला प्रेमाने गुंडाळला. कारण ती रायफलच तिची साथीदार आणि अंगाचाच एक भाग होता.
रात्रीच्या अंधारात काही अतिरेकी सीमा पार करायच्या तयारीत आहेत याची सूचना तिला मिळाली. त्या अतिरेक्याना कोंडीत पकडल्यावर लक्ष्यात आले त्यात स्त्रियाही आहेत. पण त्यांच्यावर गोळ्या झाडताना तिचे हात थरथरते नाहीत. आजचा रंग तिच्या डोळ्यात उतरलेल्या रक्तासमोर फिका पडला होता. होय ती चण्डिका आहे. ती देवीच आहे.
चौथी माळ …रंग ????
तिच्याकडे आधीच सर्व रंगाचे ड्रेस तयार होते. बॉलीवूडमध्ये टिकायचे असेल तर अश्या गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात ना…. आजच्या रंगाचा लांब गाऊन वर त्याच रंगाची उबदार शाल अंगावर घेऊन ती पार्टीसाठी निघाली. सिग्नलला नेहमीची भिकारीण आपल्या लहान मुलाला कडेवर घेऊन तिच्या गाडीजवळ आली. आज त्या भिकरणीनेही त्याच रंगाची साडी नेसली होती तर मुलाचे टी शर्ट ही त्याच रंगाचे. त्यांना पैसे देताना तिला हसू आले. खरंच…! हौस सर्वांनाच असते.
पार्टी संपेपर्यंत पहाट झाली…परत येताना तिने त्या सिग्नलच्या एका कोपऱ्यात तिला पाहिले. आपल्या मुलाला कुशीत घेऊन थंडीने कुडकुडत होती पण मुलगा मात्र तिच्या उबदार कुशीत शांतपणे झोपला होता. ती गाडीतून उतरून त्यांच्या जवळ गेली. आपल्या अंगावरची शाल काढून तिने त्यांच्यावर पांघरली. आणि परत गाडीत बसून निघून गेली. होय….ती देवीच आहे.
पाचवी माळ …रंग ????
आता धंदा करायचा म्हणजे सगळ्या रंगाचे कपडे हवेच…….. खरे तर पूर्ण वर्षभर असे रंग ठरवले पाहिजे म्हणजे स्वतःच्या निवडीचा त्रास वाचेल…. अशीही स्वतःची आवड निवड राहिलीच नाही. जो येईल त्याला अंगावर घ्यायचे. आजच्या रंगाचे उत्तेजक कपडे घालून ती पिंजऱ्यात उभी होती. सगळ्यांच्या वासनेने भरलेल्या नजरा न्याहाळत….. खालून ती दोन तरुण मुले तिच्याकडेच पाहत होती. एकाच्या नजरेत बेफिकीरपणा तर दुसऱ्याच्या नजरेत कुतूहल. तिने इशारा केला आणि ते वर आले.
“बैठना है क्या…..?” दोघांनीही माना डोलावल्या. एक तरुण तिच्याबरोबर आत शिरला. त्याचे नवखेपण तिने ओळखले.
“नया है क्या …?? पहिली बार …??” तिने हसत विचारले. “हा….. त्याने मान खाली घालून उत्तर दिले. अचानक तिला त्याच्याबद्दल आपुलकी वाटू लागली. त्याचा निरागस चेहरा तिला भावला.
“क्यू आया है इस गंदगीमे …..?? अच्छे घर के दिखते हो …..??” त्याने मान डोलावली.
तिने हळू हळू आपले सर्व कपडे उतरविले .”देख ऎसी दिखती है नंगी औरत… ” त्याचे डोळे फिस्करले.
“चल अब भाग…वापस इस एरियामे कभी मत आना…??” असे बोलून तिने त्याला बाहेर काढले….. होय ती देवीच आहे .
सहावी माळ ….रंग ???
हॉस्पिटलमध्ये आजच्या रंगाचा ड्रेस घालून शिरताना तिला कसेतरीच वाटत होते. पण एक निरस वृत्तीची डॉक्टर हा शिक्का तिला पुसून काढायचा होता. आपले काम प्रामाणिकपणे करणारी डॉक्टर म्हणून तिचा नावलौकिक होता. सतत कामाच्या गडबडीत असल्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष झाले होते. पण हल्ली नवरात्रीत रोज रोज ठराविक रंगाचे कपडे घालून वावरणाऱ्या बायका पाहुन तिलाही आपण करावे असे वाटू लागले. मग त्या ड्रेसच्या रंगाचे मॅचिंग असे सगळेच घालावे लागले. हॉस्पिटलमध्ये शिरताच स्टाफच्या आश्चर्ययुक्त नजरा पाहून ती लाजून गेली. आज संपूर्ण हॉस्पिटलमध्ये हिचीच चर्चा होणार हे निश्चित. केबिनमध्ये बसून कॉफीचा पहिला घुटका घेतला आणि इमर्जन्सी आली. तशीच ती पळाली.
चार नंबर वार्डमधील पेशंटला अचानक प्रसूतीवेदना चालू झाल्या. असे कसे अचानक घडले….??? कुठे चुकलो आपण दिवस मोजायला….?? ती धावता धावता विचार करीत होती. घाईघाईने पेशंटकडे आली आणि पेशंटनेही त्याच रंगाचा गाऊन घातलेला पाहून त्यापरिस्थितही तिला हसू आले. पेशंट ही समजून गेली. पोटातल्या कळा दाबून ती म्हणाली “डॉक्टर तुम्ही सुद्धा…..”?? आणि गोड हसली. तिच्या हास्यानेच एक नवीन ऊर्जा निर्माण झाली. तिला ताबडतोब ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले. केस किचकट आहे हे तिच्या लक्षात आले. काहीही करून दोन्ही जीवाला वाचवायचे हाच निर्धार करून ती कामाला लागली. तीन तासांच्या अथक प्रयत्नाने पेशंट प्रसूत झाली. मुलगी झाली हो …….!! ती भान न राहवून ऑपरेशन थिएटरमध्येच ओरडली. बरोबरीचा स्टाफ ही आनंदाने तिच्याकडे पाहू लागला.
थोड्यावेळाने पेशंटच्या हाती आजच्या रंगाच्या मऊशार गोधडीत गुंडाळलेले तिचे बाळ देताना काहीतरी वेगळीच अनुभूती होत होती….. होय ती देवीच आहे.
सातवी माळ…..रंग???
तीन वर्षांपूर्वी ती जगातील सर्वात सुखी स्त्री होती. प्रत्येक सण हौसेने साजरा व्हायचा तिच्याकडे…. पण एके दिवशी पतीचा अपघाती मृत्यू झाला आणि सगळे संपले. मुलीच्या भविष्यकाळासाठी जगणे हेच आयुष्याचे ध्येय ठरले.
सणासुदीला सजलेल्या नटलेल्या बायका पाहून जीव तुटायचा तिचा. कपाटतर साड्यांनी भरले होते. पण कश्या नेसणार…… ?? आता नवरात्र उत्सव चालू झालेत. पेपरमध्ये आलेल्या सगळ्या रंगाच्या साड्या कपाटात आहेत. पण लोक काय म्हणतील ….?? वयात आलेली मुलगी काय म्हणेल….?? तिच्या मनाची घालमेल सुरू होती.
सकाळी उठून सर्व तयारी झाली. सवयीने पेपरमध्ये आजचा रंग पहिला. म्हणजे चुकून त्या रंगाची साडी नेसायला नको. वेगळ्याच रंगाची साडी बाहेर काढून ती आंघोळीला गेली. आंघोळ करून बाहेर येऊन बघते तर साडी गायब होती. असे कसे विचार करीत असतानाच मुलगी आत आली. तिच्या हातात आजच्या रंगाची साडी होती. काही न बोलता तिने तिच्या हाती दिली. “आज ही साडी नेसून जा….मी तुझ्या पाठीशी आहे……” असे बोलून मागे फिरली….. होय ती देवीच आहे.
आठवी माळ …..रंग ???
“अरे …!! हे काय …..?? तू पण रंगाच्या चक्रात अडकलीस का……??” आजच्या रंगाचा ड्रेस घालून आलेल्या मधूकडे पाहत मी कौतुकाने म्हटले.
आमची मधू म्हणजे टॉमबॉय. हे असले साड्या नेसणे…. ड्रेस घालणे ..तिला फार आवडत नव्हते. तशीही ती परदेशातच राहत होती. आता नवरात्रीला इथे आली होती.
“मी काय बाई नाही का ……?? माझ्या पाठीवर थाप मारून लटक्या रागाने बोलली. “खरे तर तुमच्यासोबत राहून राहून मी माझे बाईपण विसरूनच गेले होते आणि नंतर परदेशात गेले. तिथे कुठेरे हे सर्व करायला मिळते…. इथे संधी मिळतेय तर करून घेऊ हौसमौज” मधुचा हसत हसत रिप्लाय मिळाला.
इतक्यात बाजूच्या बिल्डिंगमधले अण्णा गेल्याची बातमी आली. म्हातारा म्हातारी दोघेच राहत होते. मुले बाहेरच असायची. चोवीस तास एक माणूस मदतीला ठेवला होता. आम्ही सर्व तेथे पोचलो. मधूही चांगलेच ओळखत होती त्यांना. तिथे गेल्यावर तीही आमच्याबरोबर कामाला लागली. नवरात्र आणि बऱ्याच घरी घट बसविले असल्यामुळे पुढे यायला फारसे कोणी तयार नव्हते. लांबच्या एक पुतण्याला सर्व काही करायचे अधिकार मुलांनी देऊन ठेवले होते. तोही हजर झाला. सर्व तयारी झाली आता खांदा कोण देणार ….??? आपल्या नात्यातला नाही म्हणून कोण पुढे यायला तयार नव्हते. शेवटी कसेबसे तीन नातेवाईक तयार झाले. कोणी पुढे आला नाही तर मी जाईन असे मनात ठरविले. इतक्यात मधू अनपेक्षितपणे पुढे झाली.
“मी देते खांदा …?? असे तिने म्हणताच आम्ही हादरलोच.
“हे बघ भाऊ…. कोण खांदा देते हे आता महत्वाचे नाही तर यांचे अंत्यसंस्कार होणे महत्वाचे आहे. माझ्या वडिलांच्या वेळीही अंत्यसंस्कार करायला तुम्ही मला पाठिंबा दिलात तसाच पाठिंबा द्या. काही दिवसांनी मी परत जाईन पण जाता जाता या परिस्थितीत अण्णा साठी काही करू शकले नाही ही चुटपुट नको” मी अभिमानाने माझ्या मैत्रिणीकडे पाहिले….. होय ती देवीचं आहे.
नववी माळ….. रंग ???
सकाळी उठून ती तयार झाली. आजच्या रंगाची साडी आणि मॅचिंग सर्व आधीच काढून ठेवले होते. स्वतःचे पटापट आवरून साडी नेसून तयार झाली. नेहमीप्रमाणे सासूबाईंचा वेगळा नाश्ता…. मुलांचा वेगळा …. नवऱ्याचा डबा तयार करून ती सासूबाईंना भरवायला गेली. गेले सहा महिने सासूबाई अंथरूणावरच पडून होत्या. त्यांना भरवून औषध देऊन त्यांची सर्व तयारी करून ती इतर कामाकडे वळली. सर्वांचे कपडे धुणे… पाणी भरणे यात वेळ गेला. मग स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. मध्ये मध्ये येणारे फोन तिलाच घ्यावे लागत होते.
दुपारी जेवण झाल्यावर तिने सासूबाईंना जेवण भरविले. सासूने नजरेनेच तिच्याकडे पाहून छान दिसतेस अशी खूण केली. तशी ती लाजली. अश्या अवस्थेतही सासूचे आपल्यावर लक्ष आहे हे पाहून ती सुखावली. नाहीतर इतरजण लक्षच देत नव्हते तिच्याकडे. दुपारी विजेचे बिल भरून आली. येता येता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करीतच आली…. मुलाने आज वेगळ्या डिशची फर्माईश केली होती. त्याचे मित्र घरी येणार होते. तर नवरा परस्पर बाहेर पार्टीला जाणार होता. मुलाचे मित्र घरी येणार म्हणून घर आवरायला घेतले. सकाळी सर्वांनी जाताना घरात पसारा करून ठेवला होता तो अजून आवरला नव्हताच.
बघता बघता संध्याकाळ झाली. सासूबाई सारख्या बेल वाजवत होत्या. त्यांच्या नाश्त्याची औषधाची वेळ झाली होती. बरेच दिवस हिचे गुढगे दुखत आहे. रोज डॉक्टरकडे जाईन म्हणते पण वेळच मिळत नाही. काहीना काही कामे निघातातच. पण तिलाही हल्ली स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ कुठे होता…?? सासूबाईना पुन्हा भरवून औषधे देऊन ती संध्याकाळच्या जेवणाकडे वळली. जेवण करता करता अचानक आठवले उद्या कोणता रंग आहे…? पेपर बघायलाही वेळ नव्हता म्हणून मैत्रिणीला फोन करून उद्याचा रंग विचारून घेतला.
“अरे देवा….!! या रंगाची साडीच नाही माझ्याकडे आणि ड्रेसही नाही. तिचा चेहरा पडला. हीच तर तिची हौसमौज होती. आता स्वयंपाकाकडे लक्ष लागेना. कसेबसे स्वयंपाक आटपला. आता बाहेर जाऊन ही काही फायदा नाही. लवकरच दुकाने बंद होतील. थोड्याच वेळाने मुलाचे मित्र आले आणि हसत खेळत गप्पा मारीत जेऊनही गेले.
सासूबाईंना भरविताना हिच्या डोक्यात उद्याचेच विचार चालू होते. सासूबाईंनी खुणेनेच विचारले “काय झाले …??? हिने भडाभडा आपली तळमळ तिच्यासमोर मांडली. त्याही स्थितीत सासू हसली. खुणेने आपल्या कपाटाकडे बोट दाखविले आणि उशीखालच्या चाव्या नजरेने खुणावल्या. तिने चकित होत कपाट उघडले. आतमध्ये काही साड्या व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या होत्या. अर्थात हेही काम तिचेच होते म्हणा…. त्यामध्ये उद्याच्या रंगाची साडी होती आणि मॅचिंग ब्लाउज ही. ते पाहूनच हीचा चेहरा खुलला. आज रात्री हाताने टाके मारून ब्लाउज व्यवस्थित करता येईल. तिने साडी बाहेर काढून लहान मुलीसारखे सासूबाईंकडे बघितले. तिच्या नजरेतील आनंद पाहून सासूबाईंच्या डोळ्यातुन अश्रू ओघळले. होय त्या दोघीही देवी आहेत.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.