मित्र-मैत्रिणींनो, आजपासून आपण “चला वाचूया“ हे सदर सुरु करीत आहोत.
या सदरामध्ये आम्ही तुम्हाला निरनिराळ्या पुस्तकांचा तसेच लेखकांचा परिचय करून देणार आहोत.
वाचनाने माणूस समृद्ध होतो. पुस्तकांमधून निरनिराळ्या गोष्टी शिकायला मिळतात. नवनवीन विषयांचे ज्ञान प्राप्त होते. “वाचाल तर वाचाल” ही म्हण तर सर्वांना माहिती आहेच.
आज आपण ख्यातनाम लेखक श्री. रणजित देसाई यांनी लिहिलेल्या काही पुस्तकांचा परिचय करून घेणार आहोत. श्री. रणजित देसाई यांनी ऐतिहासिक कादंबरी आणि ललित लेखन असे विपुल प्रमाणात केले आहे.
ऐतिहासिक कादंबरी लिहिण्यामध्ये त्यांची हातोटी विलक्षण आहे. घडून गेलेले प्रसंग आपल्या डोळ्यासमोर तंतोतंत उभे करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. काही ऐतिहासिक पात्रे वेगळ्या दृष्टिकोनातून रंगवणे हे देखील त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे वाचकांचा त्या व्यक्तिरेखांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो.
१. “श्रीमान योगी”
लेखक – श्री. रणजीत देसाई
या पुस्तकात तुम्हाला काय वाचायला मिळेल:
केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे चरित्र सांगणारी ही भली मोठी कादंबरी. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे चरित्र सांगणे ही साधी गोष्ट नाही. परंतु उत्तमोत्तम नाट्यमय प्रसंगांची निर्मिती करून लेखकाने ते धनुष्य लीलया पेलले आहे.
शिवाजी महाराजांच्या जन्माआधीपासूनचा काळ या कादंबरीत रंगवला आहे. पुढे मोगलांचे अत्याचार, श्री शिवाजी महाराजांचा जन्म, त्यांच्यावर झालेले संस्कार, स्वराज्याबद्दलची त्यांची तळमळ, स्वराज्य उभे करणे, राज्याभिषेक अशा सर्व घटना अतिशय ताकदीने उभ्या केल्या आहेत.
शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्ती कादंबरीत देखील महत्वाचे स्थान भूषवतात. काही ठिकाणी मेलोड्रामाचा वापर केलेला देखील जाणवतो.
मनोरंजनात्मक पद्धतीने लिहिलेली ही कादंबरी वाचकांच्या मनाचा ठाव घेते. श्री शिवाजी महाराजांचा आदर आणि भक्ती करणाऱ्या प्रत्येकाने ही कादंबरी वाचलीच पाहिजे.
२. स्वामी
लेखक – श्री. रणजीत देसाई
या पुस्तकात तुम्हाला काय वाचायला मिळेल:
पेशवाई हे मराठ्यांच्या इतिहासातील एक सोनेरी पर्व आहे. पेशव्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि धडाडीने मराठी राज्य राखून छत्रपतींच्या गादीची सेवा केली आहे. या पेशव्यांपैकी अत्यंत कर्तृत्ववान असणारे माधवराव पेशवे यांच्यावर ही कादंबरी लिहिलेली आहे.
माधवराव पेशव्यांचे अतिशय लहान वयात पेशवा होणे, धडाडीने सर्व निर्णय घेऊन लढाया जिंकणे, अंतर्गत गृहकलहावर मोठ्या हुशारीने मात करणे असे प्रसंग कादंबरीत अतिशय रंजकतेने रंगवले आहे. माधवराव पेशव्यांचा न्यायनिष्ठुरपणा कादंबरीत ठळकपणे दिसून येतो.
त्यांनी घेतलेले काही कठोर परंतु अत्यावश्यक असे निर्णय वाचकांच्या भावनांना हात घालतात. माधवराव आणि रमाबाई पेशवे यांची आगळी प्रेम कहाणी कादंबरीत रंगवली आहे. दुर्धर अशा रोगाने माधवरावांचा लहान वयात झालेला मृत्यू आणि रमाबाई पेशव्यांचे त्यांच्यासमवेत सती जाणे हे देखील फार हृद्यपणे रंगवले आहे.
थेऊरच्या गणपतीचे यथार्थ वर्णन कादंबरीत येते. “ह्या तरुण पेशव्याचा अकाली अंत झाला नसता तर मराठ्यांचा इतिहास निराळा असला असता“ हे कादंबरीच्या पहिल्या पानावर असणारे वाक्य अगदी खरे आहे. माधवराव पेशवे यांच्या कर्तृत्वाचे यथार्थ वर्णन करणारे हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असावे असेच आहे.
३. राधेय
लेखक – श्री. रणजीत देसाई
या पुस्तकात तुम्हाला काय वाचायला मिळेल:
महाभारत हे भारतीय इतिहासातील मोठे पर्व आहे. महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखा आपापली वैशिष्ट्ये दाखवते. महाभारतातील कर्ण ह्या व्यक्तिरेखेबद्दल ही कादंबरी आहे. दुर्योधनाचा मित्र असल्यामुळे कर्णाला सहजपणे वाईट व्यक्ती समजले जाते. तो कोणी खलपुरुष असल्यासारखेच त्याचे वर्णन सगळीकडे सापडते.
परंतु या कादंबरीमध्ये लेखकाने कर्णाच्या व्यक्तिरेखेची चांगली बाजू उलगडून दाखवली आहे. अत्यंत दानशूर आणि पराक्रमी असणारा कर्ण “मित्र कसा असावा” याचेदेखील मूर्तिमंत उदाहरण आहे.
कर्णाचे दातृत्व, त्याची कवचकुंडले, कुंतीच्या पोटी त्याचा झालेला जन्म, अधिरथ आणि त्यांची पत्नी राधा यांनी त्याचा केलेला सांभाळ, पुढे दुर्योधनाशी कर्णाची झालेली घट्ट मैत्री यासंबंधीचे यथार्थ वर्णन कादंबरीमध्ये येते.
श्रीकृष्ण आणि कर्णाचा असणारा विशेष स्नेह इथे आपल्याला दिसतो. भीष्माचार्यांना आतून त्याच्याबद्दल वाटणारी मायादेखील आपल्यासमोर येते. आपल्या जन्माचे सत्य समजल्यावर सहजपणे आपल्या भावंडांना न मारण्याचे वचन कर्ण कुंतीला म्हणजेच त्याच्या आईला देतो.
कादंबरीचे “राधेय” म्हणजेच राधेचा पुत्र हे नाव कर्णाच्या आयुष्यातील अधिरथ आणि राधा ह्या त्याचा सांभाळ करणाऱ्या मातापित्यांचे महत्त्वाचे स्थान अधोरेखित करते.
खलपुरुष समजल्या गेलेल्या दानवीर कर्णाच्या स्वभावाची दुसरी बाजू सांगणारी ही कादंबरी प्रत्येकाने जरुर वाचावी.
अशी हि ‘तीन’ प्रत्येकाने वाचलीच पाहिजे अशी पुस्तके. अशा आणखी कोणत्या पुस्तकांची ओळख करून घ्यायला तुम्हाला आवडेल ते कमेंट्स मध्ये सांगा आणि आपल्या पुस्तकप्रेमी मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
“चला वाचूया“ हे सदर सुरु करून या सदरामध्ये निरनिराळ्या पुस्तकांचा तसेच लेखकांचा परिचय करून देणार आहात याबद्दल सर्वप्रथम आपले मनापासून अभिनंदन आणि या उपक्रमाला भरपूर शुभेच्छा.
आज आपण ख्यातनाम लेखक श्री. रणजित देसाई यांनी लिहिलेल्या श्रीमान योगी, स्वामी व राधेय या पुस्तकांचा अतिशय सुरेख पद्धतीने परिचय करून दिलेला आहे .
मनापासून धन्यवाद.
युगंधर, पानिपत, मृत्युजंय, झाडाझडती, बेयोंड द लास्ट ब्लू माउंटन या पुस्तकांचा परिचय, ओळख करून घ्यायला आवडेल.
नक्कीच नवनवीन पुस्तकांची ओळख करून देत राहू👍
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद