मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वतःची मदत स्वतः करण्यासाठी, आत्मनिर्भर बनण्यासाठी आणि आयुष्यात यश संपादन करण्यासाठी स्वतःला कसं समजून घ्यायचं, त्याचा फायदा काय? पुढे ते आमलात कसं आणायचं? वाचा या लेखात.
लेख मोठा आहे, पण पूर्ण वाचा आणि असं स्वतःला ओळखणं शक्य आहे का? खरंच त्याचा फायदा होईल का हे कमेंट्स मध्ये सांगा.
“तुला मी चांगलीच /चांगलाच ओळखून आहे..” हे सगळ्यांचे अघोषित ब्रीदवाक्य असते.. बरोबर ना!!
आपण ज्यांच्या संगतीत राहतो त्यांना कालांतराने चांगले ओळखायला लागतो..
आई तर आपल्या मुलांना जन्मापासूनच समजून घेत असते.. वडील देखील हळू हळू मुलांच्या आवडीनिवडी, सवयी, गुण, दोष आणि स्वभाव ओळखायला लागतात.
नवरा बायको, नातेवाईक, मित्रमंडळी ह्यांच्या सोबतच्या सहवासामुळे आपण एकमेकांना समजून घेऊ लागतो..
समोरच्याच्या स्वभावाप्रमाणे आपण आपला स्वभाव ऍडजस्ट करतो आणि आपली वर्तणूक कशी ठेवायची ते ठरवतो.
जेणे करून आपल्याला ज्यांच्या सोबत राहायचे आहे त्यांच्या बरोबर आपले जीवन, आपले जगणे सुकर होईल..
मग असेच जर आपण स्वतःला जाणून घेतले तर..?? आपण भवतालच्या सगळ्यांना नीट ओळखून घेतो.. मात्र स्वतःला ओळखायला कमी पडतो.
कधी आपला स्वतःशीच संघर्ष होतो. आपण इतरांच्या तुलनेत बऱ्याच गोष्टीत मागे राहतो. आपल्या कामात यशस्वी होत नाही. स्वतःची प्रगती करून घ्यायलाही कधी कधी कमी पडतो.. असे का होत असावे बरे?
ह्याचा कधी विचार केला आहे का..?? ह्याचे एकच कारण आहे ते म्हणजे आपण स्वतःला नीट समजून घेत नाही.
स्वतःला का समजून घ्यायला पाहिजे..? जर स्वतःमधले गुण दोष माहिती असतील तर कोणत्याही अवघड प्रसंगातून लखलखत्या सोन्याप्रमाणे उजळून निघायला आपल्याला मदत होईल..
तसेच आपण एखादे नवीन काम हाती घेणार असू तर आपल्या कोणत्या कमजोरी मुळे ते काम बाद होऊ शकते किंवा कोणत्या गुणांमुळे त्याला सहजपणे आपल्याला करता येईल हे जाणून घ्यायला आपल्याला आत्मपरीक्षण करणे फारच गरजेचे आहे.
स्वतःला कसे समजून घ्यायचे आणि त्यानंतर आपले काय काय फायदे होऊ शकतील ते जरा जाणून घेऊया का..?? त्यासाठी एक कागद आणि पेन घेऊनच बसा हं.
प्रथम स्वतःला जाणून घ्यायची काही ‘परिमाणं’ पाहू:
१. आपल्यातील गुण किंवा जमेच्या बाजू जाणून घ्या:
आपल्याकडे कशाकशाचे ज्ञान आहे? आपले शिक्षण कशात आहे? आपल्याकडे असे कोणते कलागुण आहेत जे आपल्याला इतरांपेक्षा वेगळे ठरवतात? हे आपल्याला नोंद करून ठेवावे लागेल.
आपण भले सॉफ्टवेअर इंजिनिअर असू, पण रोजच्या ९ ते ६ च्या कामाला कंटाळले असू तर ते काम आपल्याला प्रगतीपथाकडे कधीच नेत नाही…
किंबहुना आपण ते रोजचे कंटाळवाणे आयुष्य फक्त ढकलत राहतो. अशा वेळी आपल्यातले गुण शोधा.
उदाहरणार्थ: आपल्याकडे जर उत्तम आवाज (voice over artist quality चा) असेल तर त्याचा आपल्याला कसा उपयोग होऊ शकेल ह्यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे.
नोकरी सांभाळताना आपल्या आवाजाचा उपयोग जाहिराती, कार्टून किंवा तत्सम क्षेत्रात करायला माहिती मिळवली पाहिजे. हळू हळू त्यात जम बसवता आला की मनासारखे काम आपल्या हातात असेल जे आपण खुशीने करू आणि त्यात स्वतःची उत्तोरोत्तर प्रगतीही होईल.
मित्रांनो, या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत, असं काही समजू नका… हे मी स्वतः केलेले आहे आणि हा फॉर्म्युला नीट आमलात आणला तर १०० टक्के यशस्वी होईल याची खात्री असू द्या…
स्वतःच्या जमेच्या बाजू जाणून घेतल्यास, त्या आपल्याला एक आश्वासक भविष्य देण्याच्या कामाला नक्की येतात हे लक्षात ठेवा.
२. स्वतःची कमजोरी जाणून घ्या:
आपल्याला आपली कमजोरी माहिती असली पाहिजे. म्हणजे ती माहीत झाल्यास काम टाकून, मैदान सोडून पळून जाणे असे होत नाही, तर आपण संभाव्य धोके काय असू शकतात ह्याची चाचपणी करू शकतो…!!
मग त्यासाठी स्वतःमधील वाईट सवयी नोंद करून ठेवा. असे कोणते विचार आहेत ज्या मुळे आपण मागे राहतो त्या बद्दल स्वतःची छाननी करा. अशा कोणत्या सवयी आहेत ज्यामुळे इतरांच्या तुलनेत आपण कच्चे आहोत त्याबद्दल जाणून घ्या.
एकदा कमजोरी माहिती झाली की तिच्या निवारणाकडे लक्ष द्यायला पाहिजे. जे जमत नाही ते शिकून घ्या. ज्याबद्दल माहिती नाही त्याची माहिती घ्या. आपल्यातले दुर्गुण बाजूला करण्यावर भर द्या..
किंवा काही गोष्टी अशाही असतील, जो तुमचा स्थायीभाव असेल आणि त्या तुम्ही बदलू शकणार नसाल तर त्या तुमच्या कामाला पूरक कशा ठरू शकतील यावर थोडा विचार करून पहा.
३. आपल्यासाठी संभाव्य संधी काय असू शकतील त्या जाणून घ्या:
आपण करत असलेल्या नोकरी मध्ये आपले प्रोमोशन कोणत्या मुद्द्यांवर होऊ शकेल? किंवा आपण करत असलेल्या कामाचे कोणते कठीण कंगोरे गुळगुळीत करण्यात आपण वाकबगार आहोत आणि जे आपल्याला पुढच्या यशाची कवाडे खुली करून देऊ शकतील अशा संधी शोधून पहा..
कंपनी मध्ये असे कोणते पद आहे ज्यावर पोहोचल्यावर आपल्याला आपला स्किल्ससेट वापरता येतील…?
असे कोणते काम आहे जे फक्त आणि फक्त मीच करू शकेन? एखादी अशी संधी आहे का जी मला कमी खर्चात, कमी कष्टात यश मिळवून देईल.? अशा सगळ्या बाजूने येऊ शकणाऱ्या संधींचा विचार करा.
४. आपल्या कामात असलेले धोके ध्यानात ठेवा:
आपल्याला येत असलेल्या कामात आपल्या पुढे कोण जाऊ शकते ह्याची नोंद ठेवा. आपल्या स्पर्धकांवर लक्ष ठेवा. ते कधी आणि कसे आपल्याला मात देऊन पुढे जाऊ शकतात ह्याचा आढावा घेत राहा.
असा कोणता धोका आहे किंवा नवीन टेक्नॉलॉजी येऊ शकते जी आपल्याला आपल्या यशापासून दूर उडवून लावू शकतो? जी आपल्याला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकते? ह्याचा सर्वांगाने विचार करा.
जर कधी आर्थिक मंदी चा धोका आलाच तर आपण कुठे असू किंवा कसे पुन्हा उभे राहू ह्यावर ब्रेनस्टॉर्म करून ठेवा.
अशा ४ परिमाणांवर काम केल्यास आपल्या स्वतःचा अभ्यास पूर्ण होऊ शकतो. अशी स्वतःची ओळख स्वतःला असली ना, कि मग नोकरी गेली, पगार कपात झाली, धंद्यात मंदी आली असं काहीही झालं तरी तुम्ही गोंधळून जाणार नाही.
आता ह्या अभ्यासाचा, आत्मपरिक्षणाचा उपयोग काय असू शकेल?
चला ह्याचे फायदे काय काय असू शकतील ते पाहूया:
१. तुम्हाला एक दिशा आणि फुल-प्रूफ प्लॅन मिळेल:
स्वतःच्या गुणदोषांचा अभ्यास केल्यास मिळणारा मोठा फायदा म्हणजे आपल्याला पुढील कार्य करण्यास उत्तम दिशा मिळते. तसेच ऍक्शन प्लॅन देखील तयार असतो.
आपल्याला संधी आणि धोके आधीच माहीत असल्याने एखाद्या नवीन प्रोजेक्टवर कसे काम करायचे हे आपल्याला आधीच अवगत असते. त्यात येणाऱ्या अडचणींवर तुम्ही सहज मात करू शकता.
योग्य निर्णय घेणे आणि त्याप्रमाणे ऍक्शन घेणे ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आत्मपरिक्षणामुळे झटकन करण्यास मदत होते..
२. हे आत्मपरीक्षण आपल्यातील सुप्त गुणांना वाव देते:
जे समोर आहे तेवढेच दिसणे म्हणजे अगदीच सर्वसाधारण दृष्टी असणे..
पण स्वतःचा अभ्यास केला किंवा स्वतःला जाणून घेतले तर आपल्या समोर असलेल्या टास्क, अडचणी किंवा संधी ह्यातील बारीक कंगोरे सुद्धा आपल्याला दिसून येतात. त्यांच्यातील लपलेल्या मोठ्या संधी आपण शोधून काढू शकतो.
एखाद्या नवीन कामाचे ‘बिग पिक्चर’ आपल्याला दिसू शकते आणि मग त्यावर आपल्यातील संपूर्ण कार्यक्षमतेने आपण काम करण्यास उद्युक्त होतो.
आणि आपण योग्य पथावरून चाललो आहे की नाही ह्याचीही सतत आपल्याला जाणीव राहते..
३. जे अशक्य वाटायचे ते शक्य वाटायला लागते:
काही गोष्टी आपल्याला कायम स्वप्नवत वाटतात. आणि त्या साध्य करणे आपल्याला अशक्य वाटते.
मात्र स्वतःचा पूर्ण अंदाज घेतलात तर कित्येक गोष्टी आपण आरामात करू शकतो ह्याची जाणीव होते. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होऊन जातात..
आपल्यातील गुण आणि संधी किंवा अडचणी शोधण्याचे कसब जाणून घेतल्याने आपण येणाऱ्या कोणत्याही कामाला अपूर्ण सोडत नाही आणि असे करताना आपल्या स्वतःमध्ये सुद्धा आमूलाग्र सकारात्मक बदल घडवत असतो.
४ आपल्या हातून घडणाऱ्या कामांमधले अपयश कमी होते:
आपल्याला स्वतःला ओळखता येत असल्याने आपण हाती घेतलेले काम कशा पद्धतीने करू शकू याचा आपल्याला अंदाज येतो.
स्वतःतील दोष सांभाळून, त्यावर मात करत, हाती असलेल्या कामांवर आपण लक्ष केंद्रित करण्यास शिकतो.
आपल्यातील गुणांच्या, स्किलच्या आधारे कोणतेही काम करताना, अभ्यासू वृत्तीने केले गेल्यास आपल्याला अपयशाचा सामना करावा लागत नाही.. एकेक माईलस्टोन आपण सहज पार करत जातो.
सतत आपले आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. जेव्हा आयुष्यात नवीन संधीशी सामना करायचा असतो तेव्हा असा स्वतःचा अभ्यास नक्की करावा.
त्यामुळे नवीन चालून आलेल्या संधींवर आपण एखाद्या एक्स्पर्ट प्रमाणे काम करू शकतो. स्वतःतील कला, स्किल्स माहिती असतील तर आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरे जाऊ शकतो.
तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वतःची मदत स्वतः करण्यासाठी, आत्मनिर्भर बनण्यासाठी आणि आयुष्यात यश संपादन करण्यासाठी स्वतःला ओळखा..!
ह्या सगळ्या प्रयत्नांचा निष्कर्ष हाच की ‘आत्मपरीक्षण सुद्धा यशाची गुरुकिल्ली आहे ..’
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
सुंदर …..