दोघेही एकाच बोगीतून प्रवास करीत होते. पहिला शांत बसून एकटक बाहेरील दृश्य पाहत होता….. तर दुसरा सतत काहीतरी हालचाल करीत होता.
अखेर दुसऱ्याने मौन तोडले. “शी…..किती गरम होतेय. बोगीतील एसी काहीच कामाचा नाही. थोडा वाढवावा लागेल…..” असे बोलून पहिल्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरचे शांत भाव हाच होकार समजून त्याने अटेंडन्ट ला एसी वाढविण्यास सांगितले.
“खरोखर ….या भारतात राहायचे म्हणजे एक शिक्षाच आहे. सरकारला भरमसाठ कर द्यायचा पण त्याबदल्यात काही मिळत नाही ”
पहिला नुसता हसला. इतक्यात अटेंडन्ट परत जेवणाची ऑर्डर घ्यायला आला. दुसऱ्याने मेनू काय..??? असे विचारले. मेनू ऐकताच तोंड वाकडे केले. नाईलाज झाल्यासारखे नॉनव्हेजची ऑर्डर दिली. पहिल्याने मात्र काही न विचारता व्हेज सांगितले.
“ह्यांना धड जेवण ही ठेवता येत नाही चांगले… थोड्या वेळाने जेवण आले. दुसऱ्याची जेवणाबरोबर बडबड ही चालू होती. शेवटी कंटाळून त्याने अर्धे अन्न टाकून दिले. पहिला मात्र ताटात एकही कण न ठेवता जेवला. दुसऱ्याची बिसलरी पाण्याची ऑफर नाकारत स्वतःच्या बाटलीतील पाणी प्यायला. रात्री झोपताना दुसऱ्याने बेडवरील चादर बदलायला लावली. ब्लॅंकेट बदलून घेतले. पहिला मात्र तसाच बेडवर पसरला.
“आपण कुठे निघालात…. ??? दुसर्याने पहिल्याला प्रश्न केला.
“घरी …..” पहिल्याने मोजकेच शब्द उच्चारले.
“मी एक उद्योजक आहे…… भारतातील प्रमुख ठिकाणी माझी ऑफिसेस आहेत. त्यामुळे सतत प्रवास करत असतो. पण आम्ही कर भरूनही सरकार आम्हाला पुरेसा लाभ देत नाही म्हणून चिडतो. तुम्ही काय करता …..???” दुसर्याने विचारले.
“मी भारतीय सैन्यदलात एक सैनिक आहे”. पहिला अजूनही शांत होता.
“अरे वा …..सैनिक …..फारच छान……. खूप अभिमानाची गोष्ट आहे ही. संपूर्ण भारतभर नोकरी असते तुमची. देशाच्या रक्षणासाठी चोवीस तास डोळ्यात तेल घालून शत्रूवर लक्ष ठेवून असता”.. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता .” पण एक विचारू….?? खूपच अशक्त आणि अबोल वाटता तुम्ही. इथे जे काही चालते त्याविषयी काहीच बोलला नाहीत …???
“काय बोलायचे …..??? पहिल्याने शांतपणे विचारले. ह्या एसीबद्दल बोलू. राजस्थानमधील वाळवंटात ४६℃ हातात ऐ. के. ४७ घेऊन दोन दोन दिवस उभा राहिलोय मी… ह्यापेक्षा भीषण गर्मी तुम्ही अनुभवली आहे का…. ??? मी नुकताच सियाचेनमधून येतोय. तीन महिने सीमेच्या रक्षणासाठी होतो तिथे. उणे १५℃ वातावरण होते. चहूकडे बर्फच बर्फ. हरवून जाऊ नये म्हणून एकमेकांच्या कमरेला दोरी बांधून होतो. समुद्रसपाटीपासून दहा हजार फूट बर्फात उभे होतो. कसली करमणूक नाही. हवाबंद डब्यातील अन्न पुरवून पुरवून खायचे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब करावा लागायचा. खाली आलो तेव्हा वजन घटले होते. तिथे सर्व कामे आम्हालाच करावी लागायची. त्या तीन महिन्यात आम्हाला प्रत्येक गोष्टीचे महत्व कळले. आता इथे आल्यावर कळते तुम्ही किती सुखी आहात. तुम्हाला अन्नाची पर्वा नाही . तुम्हाला पाहिजे तसे वातावरण हवे. पाहिजे ते कपडे हवे. तुम्ही फार भाग्यवान आहात… करण तुम्ही कर भरता त्यामुळे मागण्याचा तुम्हाला हक्क अधिकार आहे.
“नाही हो तसे नाही…. माफ करा… पण इथे ती परिस्थिती नाही ना …?? आणि जे शक्य आहे ते मागण्याचा अधिकार नक्कीच आहे आम्हाला. आम्ही खूप तुमचा आदर करतो…..” दुसरा ओशाळवाणे हसत म्हणाला.
नाही हो मी तुम्हाला मुळीच दोष देत नाही. मला ज्या गोष्टीची सवय झालीय त्यातच मी राहतो तुम्ही ही तसेच राहता… पण दरवेळी या देशात काहीच होणार नाही असे बोलू नका…. तुम्हीही अप्रत्यक्षरीत्या हातभार लावू शकता. उदा. हे जे अन्न तुम्ही फेकून दिलेत त्या अन्नात अजून एक जण जेवला असता. खुपजणांची मेहनत त्या मागे आहे. तुम्हाला तर नेहमी गरम अन्न मिळते पण आमचे अन्न आधी विमानातून, मग गाडीतून मग घोड्यावरून नंतर काहीजणांच्या पाठीवरून आमच्यापर्यंत पोचते. त्यामुळे त्याचा वापर योग्यरितीने करावा लागतो..” पहिला हसत हसत म्हणाला.
“माफ करा सर ….यापुढे वागताना बोलताना योग्यती काळजी घेईन मी… दुसऱ्याने पहिल्याला नमस्कार करून डोक्यावरील दिवा बंद केला.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.