कित्येकदा मनात असंख्य विचार असतात. काय करावं, सुचत नाही. नेमकं काय वाटतंय स्वतःलाही उलगडत नाही. जे घडायला नको आहे असे वाटते, तेच आपल्याबाबतीत घडते, त्याचे वाईट वाटत असते, राग आलेला असतो. एकूणच नकोसेपण मन व्यापून टाकते. आपण नेमके काय करायला हवे, समजत नाही.
परिस्थितीवर आपला काहीही कंट्रोल नाही, हे कधीतरी लक्षात येते. अगतिक, अस्वस्थ, अस्थीर वाटत असते. कोणाशी काहीही बोलावेसे वाटत नाही. एकटे रहावेसे वाटते आणि एकटेपणा मिळाला की तो असह्यही होतो. अनुभवतो ना असे काहीतरी आपणही?
मनात खोलवर जाणवणारी भावना नेमकी काय आहे, हे आपल्या लक्षात येईलच असे नाही. अशा वेळी मनात येणाऱ्या विचारांची फक्त दखल घ्या. ते विचार मनात येण्यासाठी काही कारण घडलेय का, आठवा. बरं प्रत्येकवेळी काही घडलेलेच असते, असे काही नाही, कधी ‘काही वाईट घडेल का’ या मनातल्या आशंकेमुळेसुद्धा मन अस्वस्थ झालेले असू शकते.
यावेळी एका गोष्टीची नक्की मदत होऊ शकते, ती म्हणजे एकांतात मनातले सगळे विचार एका कागदावर लिहून काढण्याची. जे काही आणि ज्या स्वरूपात मनात येते आहे, ते सगळे सरळ लिहून काढा. हे आपण इतर कोणासाठीही नाही फक्त स्वतःसाठीच लिहितो आहोत, म्हणून भाषा, अक्षर, शैली, कोणी बघेल का, वाचेल का, यापैकी कशाचाच विचार न करता फक्त लिहायला सुरवात करा.
कोणताही आडपडदा नाही, कोणाची रोकठोक नाही. लक्षात घ्या, हे स्वतःच स्वत:शी मोकळेपणानं बोलणं आहे. असे केल्याने आपले विचार नेमके काय आहेत याची आपल्यालाच कल्पना येते. मनाला कशाचं वाईट वाटलंय, त्रास होतोय, काय नकोय, काय हवंय यापाठीमागे नेमकी कोणती भावना जाणवते आहे, याचा उलगडा होण्याची शक्यता जास्त असते.
अनेकवेळा स्वतःला वाटणाऱ्या खऱ्या भावना वेगळ्याच असतात आणि त्या लपवून ठेऊन आपण वरवर दुसरंच काहीतरी ओढूनताणून वागत असतो. आपले खरे वाटणे इतर कोणाला समजले, तर ते आपल्याला काय म्हणतील? याची भीती वाटत असते. म्हणून अनेकवेळा आपण प्रत्यक्ष जसे आहोत तसे न वागता खोटं खोटं वागत असतो आणि सगळं काही कसं चांगलं चाललं आहे, असं इतरांना, स्वतःलाही भासवत असतो. यातली ओढाताण, ताण अस्वस्थता निर्माण करतो.
मनातले विचार लिहिण्याची मदत आपल्याला अनेक प्रकारे होऊ शकते. ज्या कोणत्या प्रसंगांबद्दल, त्यातल्या व्यक्ती आणि समस्यांबद्दल, स्वतःच्या भावनांबद्दल आपण विचार करत असतो, लिहिण्याने ती परिस्थिती अधिक नेमकेपणाने समजण्याची शक्यता असते.
नैराश्य आणि भीतीच्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांच्या केलेल्या मानसशात्रीय अभ्यासानुसार त्यांनी त्यांच्या विचार आणि भावना लिहून व्यक्त करणे हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते. लिहिण्यामुळे अव्यक्त नकारात्मक भावनांना व्यक्त करण्याची संधी मिळते. मनातली खळबळ कागदावर लिहून झाल्यावर तो कागद फाडून, अगदी बारीक बारीक तुकडे करून टाकून द्या, असे रुग्णांना सुचवले जाते. यातून त्यांच्या मनातली नकारात्मकता कमी होते, असा अनुभव आहे.
मनात येणारे विचार आणि त्यापाठीमागे जाणवणारी भावना समजल्यानंतर आपल्यासमोर असलेली परिस्थिती, प्रश्न सोडवण्यासाठी, त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांचा काही उपयोग होणार आहे की त्यामुळे त्रास आणखी वाढतो आहे, हे समजते. स्वतःच्या विचारांची, मतांची अधिक स्पष्टता येते. आपले किंवा आपल्याबाबतीत इतरांचे काही गैरसमज झालेले असतील तर लिहिण्याने ते लक्षात येऊ शकतात. त्यामागचे आपले, इतरांचे दृष्टीकोन काय आहेत, हे समजते.
आपल्याप्रमाणे इतरांनादेखील काय वाटत असेल, त्यांचे काय म्हणणे आहे, याचा अंदाज येऊ शकतो आणि आपण शांतपणे प्रसंगाचा विचार करण्याची शक्यता वाढते. आपले विचार तपासून बघू शकतो, त्यातल्या भावनेचा स्वीकार करून ती व्यक्त करण्याचा दुसरा काही पर्याय असू शकतो का याचाही विचार करू शकतो.
लिहितांना नकारात्मक विचारांचा, भावनांचा पहिला प्रवाह जोरात व्यक्त होऊन गेला की मनावरचा ताण कमी होतो आणि आपण ‘वाटण्यापासून’ सावरतो. मग बुद्धीतला विवेक, समज जागा होऊन मेंदूला अधिक तर्कसंगत, नवीन आणि वेगवेगळे पर्याय सुचण्याची शक्यता असते. कारण लिहितांना आपले मन, बुद्धी आणि शरीर लिहिण्याच्या कृतीतून एकमेकांशी जोडले जाते.
मनाला, शरीराला जाणवणाऱ्या भावनांची दखल आपली बुद्धी घेऊ शकते. हेच आहे स्वतःला समजून घेणे, स्वतःशी जोडले जाणे. आपल्या विचारांशी आणि भावनांशी असे जोडले जाणे म्हणजेच आलेल्या प्रसंगामाधल्या अनुभवांमधून स्वतःची मानसिक, भावनिक आणि वैचारिक वाढ करत माणूस म्हणून समृद्ध होत जाण्याचा प्रवास आहे.
लिहिण्यातून आपली स्वप्नं, आकांक्षा, अपेक्षा आणि महत्वाकांक्षा नेमक्या काय आहेत, हे लक्षात येते. त्यासाठी बाह्य परिस्थितीत काही अडथळे, आव्हाने आहेत का? असतील तर ते काय आहेत, याची स्पष्टता येते. त्यावर मात करण्यासाठी माझ्याकडे काय आहे? याचा शोध घेण्यासाठी मन तयार होते. माझ्या क्षमता आणि माझ्यात असलेल्या कमतरता, उणिवा काय आहेत, हेही लक्षात येते. आपल्या आपल्याला त्या अगदी नीट माहीत असतात.
योग्य प्रयत्नांनी आणि इच्छाशक्तीने आपण त्या बदलवूसुद्धा शकतो. पण हे मान्य करण्याऐवजी त्या टाळण्याकडे, नाकारण्याकडे, बहुतेकांची शक्ती खर्च होते. स्वतःला आपण आहोत तसे स्वीकारणे, भल्याभल्यांनादेखील जमत नाही. मग आपल्यात जे नाही ते दाखवण्याकडे, उगीचच आव आणण्याकडे आणि ज्ञानाचे, परिस्थितीचे, शहाणपणाचे ढोंग इतरांना दाखवण्यात आयुष्यातला वेळ निघून जातो. काहींच्या मनात असुरक्षितता, भीती असते म्हणून आत्मविश्वास कमी पडतो. त्या भीतीवर मात करण्याचे पर्याय आपल्याजवळ असतात. आपल्याकडे जे कमी असेल ते मिळवण्याचे मार्ग शोधले तर सापडतात. हाच असतो आपण स्वतःचा आपण जसे असू, तसा केलेला स्वीकार. (स्वतःचा आहे तसा स्वीकार करायचा, म्हणजे नेमके काय करायचे? या प्रश्नाचे उत्तर)
तो एकदा जमला की स्वतःकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळते. स्वप्नांकडे जातांना काय टाळायचे आणि कशाकडे लक्ष केंद्रित करायचे हेही समजते. आपली उर्जा योग्य दिशेने वळवता येते. आत्मविश्वास हळूहळू वाढतो. नातेसंबंध, परिस्थिती यांच्याकडे स्वीकाराच्या जाणत्या कोनातून बघता येते.
स्वतःसाठी लिहिण्यातून भूतकाळातील अनुभावांकडून आपण काय शिकलो, काय शिकायला हवे होते, हे समजते. वारंवार त्याच त्या चुका मग शक्यतो होत नाहीत. वर्तमानात येणाऱ्या अनुभवांकडे आपली दृष्टी शहाणी, समंजस होते. मानसिक, शारीरिक अभिव्यक्ती मोकळी, व्यापक आणि आरोग्यपूर्ण होऊ शकते.
त्रासदायक अनुभवांबद्दल लिहावे, हे जितके खरे तितकेच आपल्या आनंददायक अनुभवांबद्दलसुद्धा आपण लिहायला हवे. असे केल्याने सकारात्मक भावनांचासुद्धा योग्य आदर आणि स्वीकार आपल्या पूर्ण क्षमतेनुसार आपण करू शकतो.
अनुभव असा आहे की आपल्याला आयुष्यात येणाऱ्या त्रासदायक, दु:खदायक अनुभवांचा आपल्यावर होणारा मानसिक, भावनिक परिणाम हा जास्त तीव्र असतो. कोणाचे जिव्हारी लागलेले शब्द, केलेला अपमान, त्यातून झालेला मनस्ताप कितीही वर्षांपूर्वी आयुष्यात या गोष्टी घडलेल्या असतील तरी त्या अगदी काल घडल्या आहेत असे आपल्याला वाटावे, इतक्या ताज्या असतात मनात.
कारण असे प्रसंग एकदाच घडले तरी त्यानंतर ते आठवणींमधून सतत चघळत राहून आपणच ते वारंवार जगतो आणि त्यांची तीव्रता आणखी वाढवतो. आयुष्यातले आनंदाचे, सुखाचे, सकारात्मक भावनेचा अनुभव देणारे क्षण कितीतरी असतात पण ते मात्र आपण गृहीत धरतो आणि किती सहजपणे विसरून जातो. खरंतर त्या सुंदर आठवणींना वारंवार उजाळा द्यायला काय हरकत आहे? आपल्या प्रत्येकाकडे अशा जपून ठेवलेल्या सुखद अनमोल आठवणींचा खजिना नक्कीच आहे, तो जाणीवपूर्वक उघडला की आजही आपले मन प्रसन्नतेने न्हाऊन निघते. डोळ्यात वेगळीच चमक येते. मनात, शरीरात असलेली आनंदाची उर्जा आपल्याला जगण्याचे बळ देते. आयुष्य सुंदर आहे, असे नक्की वाटते.
कोणी दुसरा आपल्यासाठी काही चांगले करेल, याची वाट आपण का बघायची? आपल्याचकडे असलेल्या या सुंदर क्षणांकडे दुर्लक्ष करायचे आणि वेदनांचे, पराभवाचे, अपमानाचे, नकोश्या क्षणाचे दु:ख मात्र वारंवार ‘इंधन’ पुरवून मनात जागते ठेवायचे? आणखी दु:खी होत राहायचे? असे स्वतःच स्वतःचे शत्रू होऊन का जगतो आपण? लक्षात येतंय का तुमच्या? कोणी दुसरा काय वाईट करेल आपले? आपणच आपले वाईट करण्याचा चॉइस वेळोवेळी निवडतोय, त्याचे काय?
इथूनपुढे अशी शेखचिल्ली मानसिकता नकोच आपल्याला. आपण चांगल्या आठवणीना उजाळा देऊ, सुखाचे, समाधानाचे क्षण वेचू, आयुष्याबद्दल कृतज्ञ असू तर जगण्यातली अशी संजीवक शक्ती आपल्याला नक्की आनंदी, समाधानी बनवेल.
मनाचेTalks च्या वाचकांचे अभिप्राय:
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
very useful