कोणाचेही लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याची सप्तसुत्री: संभाषण कौशल्य

सेल्स आणि क्लायंट सर्व्हिसिंग मध्ये असताना, शिक्षकी पेशात असताना, कलाक्षेत्रात असताना इतकंच काय आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर इतरांचे लक्ष वेधून घेणे ज्याला जमते ती यशस्वी ठरतो. आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचे कसब कसे शिकावे? त्याच्या खास सात टिप्स वाचा ह्या लेखात.

कोणत्याही रोडसाईड बाजारात कधी शॉपिंग केलीये का? फार धमाल असते तिथे. गावाकडचा भाजीचा आठवडी बाजार बघाल तर तिथे भल्या भल्या एम. बी. ए. केलेल्यांना हरवतील असे एक्स्पर्ट भाजीवाले असतात..

एकेक मौजेची जाहिरात करणारे असतात.. आपल्याकडचीच भाजी कशी सगळ्यात भारी असे पटवून देणारे भाजीवाले विक्रेते सगळ्यात आधी आपली भाजी विकून आपली गाडी रिकामी करून घरी जातातही..

फॅशनच्या गल्लीतही आपल्याकडच्या वस्तू कशा वेगळ्या स्वस्त आणि टिकाऊ आहेत हे सांगणारे भन्नाट विक्रेते असतात.

काही काही दुकानाच्या खोपट्यावर इतकी गर्दी असते की इतकी गर्दी का आहे म्हणून मागे अजून गर्दी होते.

हा-हा म्हणता त्या दुकानदाराचा सगळा माल विकला जातो आणि तो कायमच गिर्हाईकांच्या पसंतीस उतरतो.

सगळ्या क्षेत्रात अशी वाकबगार माणसे आपल्याला दिसून येतात. ज्यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधून घ्यायचे कसब असते. जगात उत्तम शिक्षक, उत्तम वक्ते, उत्तम बॉस, उत्तम कीर्तनकार, उत्तम नेते कायम बाघायला मिळतात.

ज्यांच्यासमोर कायम श्रोत्यांची, लोकांची रेलचेल असते.

काही लहान मुले सुद्धा बघा, फार चतुर असतात सगळ्यांना असे ऍट्रॅक्ट करतात की जणू पोटातूनच शिकून आलेत. कोणालाही आपल्याकडे खेचून घेणे जमत असेल तर अशी व्यक्ती कायम सेंटर ऑफ ऍट्रॅक्शन असते. कायम हवीहवीशी असते.

तुम्हालाही जाणून घ्यायची आहे का ह्या मागची टेक्निक..??

ज्यांना उत्तम वक्ता व्हायचे असते किंवा चांगला बिझनेसमन व्हायचे असते अशांना दुसऱ्या व्यक्तीवर आपली छाप सोडता आली पाहिजे.

जे सेल्स आणि क्लायंट सर्व्हिसिंग मध्ये असतात त्यांनाही, लोकांना आपल्याकडे वेधून त्यांना आपले म्हणणे पटवून द्यायचे कसब आत्मसात करायला लागते.

शिक्षकी पेशात तर, जो ढिम्म असेल तो कधीच उत्तम शिक्षक होऊ शकणार नाही. त्यामुळे अट्रॅक्टीव्ह बोलणे, वागणे हे गरजेचे असते.

सगळ्यांमध्ये हे टॅलेंट असेलच असे नाही. पण ते शिकता जरूर येऊ शकते.

आज आपण अशाच टेक्निकस, टॅक्टिक्स बद्दल जाणून घेऊया जे तुम्हाला भवतालच्या लोकांचे लक्ष वेधून घेण्यास उपयुक्त ठरेल.

१. होकारार्थी उत्तर मिळवण्याचे टेक्निक:

हे टेक्निक सेल्स क्षेत्रातील सगळ्यांना खूपच उपयोगाचे आहे.. टेलिफॉनीक सेल्स असो, पॉलिसी विकणारे असो किंवा डोअर टू डोअर सेल्स.. सहसा ह्या लोकांना बरीच अपमानास्पद वागणूक मिळते.. त्यांना नकारार्थीच उत्तर मिळते.

पण त्यांनी हे टेक्निक वापरल्यास बऱ्यापैकी फायद्याचे ठरू शकेल. म्हणजे बघा हं..

जर तुम्ही एखाद्या क्लाईंटकडे सेल्स कॉल साठी गेलात आणि विचारले की अमुक अमुक नवीन पॉलिसी आली आहे तर तुम्ही घ्याल का? तर उत्तर सरळ ‘सध्या पॉलिसीची काही गरज नाही. तशी घ्यायची असल्यास कळवू?’ असे मिळू शकते. पॉलिसी किंवा आपले काहीही प्रॉडक्ट असो ते, विकण्याचा उत्साह एका क्षणात मावळूनही जाईल.

पण ह्युमन सायकॉलॉजी असे सांगते की एखाद्याला जर तुम्ही सुरुवातीपासून नकारात्मक उत्तर देण्यास प्रवृत्त केले तर तुम्हाला शेवटी नकारच मिळेल.

मात्र जर समोरच्याकडून पहिल्याच प्रयत्नात ‘होकारार्थी’ उत्तर मिळाले तर तुमचे काम होण्याची दाट शक्यता आहे.. सकारात्मकतेची तीच खासियत आहे.

मग तुम्ही तुमच्या प्रश्नांचा संच बदलून पहा जेणे करून तुम्हाला पाहिले होकारार्थी उत्तर मिळेल. म्हणजे जर तुम्ही तुमच्या संभाव्य ग्राहकाला विचारले की तुम्ही किंवा तुमच्या कडे कोणी कधी हॉस्पिटलला ऍडमिट झाले आहे का? उत्तर होकारार्थी मिळण्याची शक्यता वाढली.

हो उत्तर मिळाल्यावर, त्यांचा अनुभव विचारा. त्यांच्या कहाणी मध्ये कुठे तरी भरमसाठ बिलाचा उल्लेख होईलच.. मग तुमच्या पॉलिसिचा उलगडा करा.. म्हणजे तो ग्राहक सगळे ऐकून घेईल आणि शेवटी कदाचित तुमची पॉलिसी विकली जाईल. हा प्रयोग नक्की करून पहा..

असे होकारार्थी उत्तर मिळवण्याचे काम जर तुम्हाला करता आले, तर तुमच्या पुढील व्यवहाराकडे समोरच्या लोकांचे लक्ष नक्कीच वेधले जाते.

२. उत्कंठा वाढवणारे शब्द वापरणे (चेझिंग टेक्निक):

तुम्ही भाषण देताना किंवा शिकवताना तुमच्या अविर्भावाने लोकांना आकर्षित करता. मात्र हे जर रोजचे झाले तर पुन्हा तुमचा प्रेक्षक वर्ग कंटाळून जातो. त्यांना तुमच्या सगळ्या हावभावांची सवय होते. मग अशा ऑडियन्सला तुम्ही कसे टिकवून ठेवाल?

त्यासाठी एक उदाहरण लक्षात घ्या. तुम्ही जादूचे प्रयोग बघितलेच असतील. टोपीतून दर वेळी ससा किंवा कबुतर निघते हे तुम्हाला देखील कळले असेल.

मग एखाद्या नवख्या जादूगाराने त्यातून दुसरे काही काढायची ट्रिक केली असेल तरी लोकांना ती फारशी काही पसंत पडत नाही. हो ना?

मग त्या जादूगाराने उत्कंठा वाढवणारे शब्द वापरणे योग्य ठरेल. किंवा ऑडियन्सला ‘ओळखा पाहू’ चा खेळ खेळण्यास प्रवृत्त करावे.

टोपीतून काहीही निघो पण ते काढायच्या आधी जर एखादा जादूगार तुम्हाला शब्दांच्या जाळ्यात ओढून घेऊ शकत असेल तर त्याची जादू हिट ठरण्याची खूप शक्यता असते.

सीरिअल्स देखील आपल्याला पुढच्या भागात काय काय होईल ह्याची छोटीशी असंबद्ध क्लिप दाखवून दुसरा संपूर्ण दिवस गेसिंग मोड मध्ये ठेवतात. मग पुढे काय होणार ह्या उत्कंठेपोटी आपण ती सीरिअल बघायला बसतोच.

अशी उत्कंठा वाढवत नेणे ज्या वक्त्याला जमते त्याचा प्रेक्षक वर्ग कायम त्याच्या समोर ठाण मांडून बसलेला दिसेल हे नक्की..!!

३. प्रेक्षकांच्या आवडीनुसार आपला टोन सेट करणे:

कधी तुमच्या मुलांना टीव्हीवरच्या जाहिराती गुणगुणताना ऐकले आहे का? नक्कीच ऐकले असेल.

विचार करण्यासारखी गोष्ट अशी की शाळेतला अभ्यास पाठ होत नाही पण ह्या जाहिराती बऱ्या पाठ होतात..?? त्यामागे त्या जाहिरातीचा जो टोन सेट केला आहे तो कारणीभूत असतो.

म्हणजे मुलांना जे करायला आवडते, ज्या पद्धतीने शिकायला आवडते ती नस, हे जाहिरात वाले पकडतात. तशीच गोड जिंगल किंवा मजेदार डायलॉग लिहितात आणि मुले ती जाहिरात लगेच उचलतात.. बघा..!! आहे की नाही ह्यामध्ये जबरदस्त शक्ती..??

खरे तर शाळांमध्येही असे होणे गरजेचे आहे.. मुलांना आवडेल तो टोन शिक्षकांनी सेट केला पाहिजे. कर्कश्य, चिडचिड करणाऱ्या शिक्षकांच्या विषयातील रिझल्ट कायम इतर विषयांच्या तुलनेत खराब असतो. मात्र मधुर बोलणारी, मजेने शिकवणारी टीचर तर मुलांची लाडकी असतेच पण ती शिकवत असलेला विषय देखील सगळ्या विद्यार्थ्यांच्या अत्यंत आवडीचा ठरतो.

हे कुठेही लागू होऊ शकते. तुम्ही जर बॉस असाल तर तुमच्या एम्प्लॉईजना आवडणारा टोन सेट करून तर पहा. तुम्हाला हवे ते काम हव्या त्या वेळात जादू झाल्याप्रमाणे करून मिळेल..!!

एखादे प्रवचन किंवा कीर्तनाचे उदाहरण घ्या हवे तर. आपला भक्त वर्ग कोणत्या मानसिकतेचा आहे ते बघूनच महाराज आपले कीर्तन कसे करायचे ते ठरवतात.

उदाहरणे, लकबी, विनोद किंवा संदेश समोर बसलेल्या प्रेक्षकांच्या आवडीनुसारच असेल तर ते पुढील १० दिवस आवर्जून मोठ्या संख्येने हजेरी लावतात..

तुमचा मूड कसाही असो जर तुम्हाला समोरच्याचे लक्ष वेधून घ्यायचे असेल तर त्या व्यक्तीच्या आवडीला हात घाला.. मग श्रोता तुमचा फॅन होईल की नाही बघा..!

४. आकर्षित करून घेण्याची देहबोली (कायनेटिक टेक्निक- Kinetic Technique) :

जर तुम्ही लहान वयोगटातील विद्यार्थ्यांचे शिक्षक आहात आणि मुले तुमचे ऐकतच नाहीत अशी तुमची ख्याती असेल तर तुम्ही नक्कीच त्या मुलांना तुमच्या बरोबर गुंतवून ठेवायला कमी पडत आहात.

अश्या शिक्षकाकडे संभाषणाच्या ‘कायनेटिक टेक्निक’ असतील तर त्याचे काम खूपच सोपे होईल. ह्या टेक्निक मध्ये जो विषय शिकवायचा आहे त्यांचे संदर्भ देताना त्यातील चित्र, आकार, हालचाल ह्या सगळ्यांचे हातवारे, हावभाव त्या शिक्षकाला शिकून घेणे महत्वाचे.. हंप्टी-दम्प्टी ची कविता शिकवताना मुलांच्या डोळ्यासमोर सगळे चित्र उभे करता आले पाहिजे. जेव्हा मुले ती कविता आठवतात तेव्हा त्यांना शिक्षकांची देहबोली, हातवारे, ऍक्टिंंग द्वारे ती कविता, पाठ, किंवा कोणतेही दिलेले उदाहरण लक्षात राहायला मदत होते.

हे फक्त शिक्षकांसाठीच नव्हे तर दुकानातील विक्रेता, ऑफिसमधील प्रेझेन्टेशन देणारा, घरात काही समजावून सांगणारी आई किंवा अगदी देवळात कीर्तन प्रवचन देणारे गुरू सुद्धा ह्या टेक्निकचा अवलंब करू शकतात.. अशी काही उदाहरणे तुम्ही पाहिलीही असतील..

मख्ख चेहऱ्याने काही सांगणाऱ्या पेक्षा सुंदर अविर्भाव, हालचाल करणाऱ्याचे बोल कायम लक्षात राहतात. स्वानुभवावरून तुम्ही हे समजून घेऊ शकता. उत्तम स्टोरीटेलर तोच असतो जो शारीरिक / अंगिक अभिनयाने समोरच्यांना खिळवून ठेवतो.

५. श्रोत्याला बोलते करणे:

जेंव्हा एखादे भाषण किंवा कुठलीही चर्चा सुरू होते तेव्हा काही वेळाने समोरचा प्रेक्षक वर्ग किंवा ऐकणारे कंटाळतात.. प्रवचनात तर म्हातारी माणसे सहसा छान डुलक्या घेताना दिसून येतात. असे का होत असावे..??

जर वक्ता एकटाच सतत बोलत राहिला तर समोरच्याला ऐकण्याशिवाय काहीच काम नसते. मग हळू हळू त्याची ऐकण्याची इच्छाही कमी होते.

मग त्यांचे लक्ष विचलित व्हायला लागते. त्याला तंद्री लागायला लागते. आणि उठून जाता येत नसेल तर मग झोपण्याशिवाय काहीही काम उरत नाही.

विचार करा कसे वाटते हे वक्त्याला? जेव्हा तो काही महत्त्वाचे अगदी पोटतिडकीने सांगतोय आणि समोरची मंडळी आपल्याच नादात आहेत. शेवटी वक्त्याचाही गोंधळ उडतो आणि त्याचा हिरमोड होतो.

मग आपण फर्राटेदार वक्ता होऊन समोरच्याचे लक्ष कसे आकर्षित करायचे? तर समोरच्याला आपल्या संभाषणात सामील करून घ्यायचे. आपले भाषण हे भाषण न ठेवता त्याचे संभाषण करायचे..

ज्याची उत्तरे आपल्याला माहीत आहेत असे प्रश्न सगळ्यांना उद्देशून विचारायचे. म्हणजे श्रोत्यांच्या डोक्याला खुराक मिळतो. तो अचानक डोकं चालवायला लागतो. त्याची उत्तरे बनवतो व वक्त्यास सांगतो. नंतर वक्ता काय उद्बोधक भाषण करणार आहे ते अगदी लक्षपूर्वक ऐकायलला लागतो. अशा रीतीने आपण समोरच्याला आपल्या बरोबर बोलते केले तर आपले भाषण नक्कीच सक्सेसफुल होते.

शिक्षक वृंदाला तर हे टॅकटिक्स अतिशय उपयुक्त ठरते कारण त्यांचे शिकवण्याचे तास रटाळवणे न राहता धमाल मजा मस्तीत निघून जातात.. आणि विद्यार्थ्यांकडून अपेक्षित अशा प्रतिक्रियादेखील मिळतात..

६. आपल्या वक्तृत्वात नावीन्य ठेवणे:

आज बॉस समोर आला आणि त्याने नेहमी प्रमाणे अपरेझल्स अनाऊन्स केले तर सगळ्या काम करणाऱ्यांना माहीत असते की ४ ते ५ % पगार वाढेल. एखाद्याला प्रोमोशन मिळेल आणि बाकी येरे माझ्या मागल्या. अशा एम्प्लॉईज मध्ये बॉस कडे लक्ष देण्याचा आणि नंतर हिरीरीने काम करण्याचा फारसा उत्साह ही नसेल.

मग अशा वेळी बॉस ने काहीतरी नवीन क्लृप्त्या शोधून काढाव्यात.. ऑफिसात काही स्पर्धा किंवा नवीन तऱ्हेचे प्रोमोशन इन्ट्रोड्युस करावे. त्यासाठी काय काय करावे लागेल ते सुद्धा जरा कुतुहलाचे असावे. अशा रीतीने एम्प्लॉयी बॉसच्या बोलण्यात रस तर घेतलीच पण नंतर कामही उत्साहात सुरू करतील..

नावीन्य प्रत्येक वक्त्याकडे असावे मग तो सेल्समन असो, शिक्षक असो, नेता असो किंवा प्रवचनकार. जर समोरचा प्रेक्षक खिळवून ठेवायचा असेल तर त्याला जाणीव झाली पाहिजे की आज आपण काहीतरी भन्नाट आणि नवीन ऐकणार आहोत. असे तुम्ही करू शकलात तर बिशाद आहे कोणी अर्ध्यातून जांभई देईल किंवा उठून जाईल..!!

७. तुम्हाला मिळत असलेल्या अटेन्शनला प्रतिसाद द्या:

बॉसने आपल्या एम्प्लॉईजच्या प्रश्नांना किंवा विक्रेत्याने आपल्या ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे नाही दिली तर त्याचा परिणाम साहजिकच निगेटिव्ह होईल. आणि म्हणून अशा वेळी मिळत असलेल्या अटेन्शनला योग्य तसा प्रतिसाद देणे गरजेचे आहे.

तर मंडळी स्वतः चांगला वक्ता बनताना आपल्याहून उत्तम वक्त्यांनाही ऐकत चला. स्वतःचा अनुभव वाढवत चला. तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल तितके उत्तमरीत्या तुम्हाला स्वतःला लोकांसमोर प्रेझेन्ट करता येईल. तुमचे टेक्निक जितके चांगले तितकेच चांगले रिझल्ट तुम्हाला नक्की मिळतील. ह्याची खात्री बाळगा.

दोस्तांनो हे टेक्निक्स तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात वापरून पहा आणि तुम्हाला काय अनुभव येतात ते आम्हाला जरूर कळवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “कोणाचेही लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याची सप्तसुत्री: संभाषण कौशल्य”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।