“अलख निरंजन !!! माई संन्याशाला भिक्षा वाढ, देव तुझं भलं करेल ”
पांडूने बाहेरून आलेली ही आरोळी ऐकली आणि त्याच्या डोक्यात सणक गेली. सकाळपासून कुणाकडे काम मिळतं का बघायला गेलेला पांडू कंटाळून नुकताच घरात आला होता. त्याला बऱ्याच दिवसात कुठे काम मिळालं नव्हतं त्यामुळे घरात दोनवेळच्या जेवणाची सुद्धा मारामार होती. जे काही शिल्लक होतं ते सुद्धा आता संपत आलं होतं. तो एकवेळ उपाशी राहू शकत होता पण त्याचा दोन वर्षाचा मुलगा होता, त्याचीच पांडूला काळजी वाटत होती. त्याची बायको मागच्या दारी भांडी घासत होती त्यामुळे तिला त्या संन्याशाचा आवाज ऐकू आला नाही. “ अलख निरंजन ” आता अजुन जोरात आरोळी ऐकू आली.
“फटकेचो वाखो इलो ह्या गोसावड्यार, कित्या आरड मारता बगतंय, हय आमका दोन वेळच्या जेवणाचे वांदे झालेहत, ह्याका खयसून दिव आता जेवाण”…….. वैतागून पांडू बाहेर गेला.
“संन्याशाला भिक्षा वाढा बंधू, देव तुमच भलं करेल”………. पांडूला बघून तो संन्याशी बोलला.
“आमकाच आता उपाशी रवाची पाळी आसा उद्यापासून, तुका खयना दिव रे बाबा, खय गुप्त धन बिन असात तर ता सांग मग दितंय तुका मी जेवण”……… पांडू त्याची फिरकी घेत बोलला.
“बंधू, गुप्त धनाची माहिती तर आहे पण त्याचा मोह चांगला नसतो, गुप्तधन हे शापित असतं.”……. आता पांडूला उत्सुकता वाटायला लागली
“आणि काय वायट जातला माझा, सांग तू माका गुप्तधनाची जागा, मी तुका दितंय भिक्षा”…… पांडूने आत जाऊन डब्याच्या तळाशी असलेले दोन पेले तांदूळ बाहेर आणले आणि संन्याशाच्या झोळीत टाकले.
“बघ माझ्या पोराच्या तोंड्चो घास मी तुका दितंय, सांग माका गुप्तधन खय आसा ता”……. तो संन्याशी झोळी बाजूला ठेऊन खाली बसला.
“हे बघ बंधू तुझा आग्रह आहे म्हणून मी तुला हे सांगतोय. आधी सगळं नीट ऐकून घे. कोणतही गुप्तधन हे शापितच असतं पण त्याला कोणता शाप आहे हे जोपर्यंत आपण ते धन घरात आणत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. जेव्हा ते आपल्या घरात येईल त्याला असलेला शाप सुद्धा आपल्या घरात येईल आणि आपल्याला लागू होईल. आहे तयारी तुझी तरीही गुप्तधन घरात आणण्याची?”…… पांडूला हे ऐकून थोडी भीती वाटली मात्र आपल्या घरच्यांसाठी तो कोणताही धोका घेऊ शकत होता.
“होय माझा कायय झाला तरी चालत माका, पण माझे घरातले सुखी जावक व्हये, सांगा महाराज माका काय ता तुमी”…….. संन्याशाने डोळे मिटले, गंभीर आवाजात तो बोलला.
“तुझा हट्टच असेल तर ऐक. या अमवास्येच्या रात्री घराच्या उत्तर दिशेला जा, गावाच्या सिमेबाहेरचं एक पडकं घर दिसेल. त्या घराच्या उंबऱ्याच्या आत जा आणि मी जो मंत्र देईन तो मोठ्याने म्हण ते धन तुझ्याबरोबर येईल. ते तुझ्या घराचा उंबरा ओलांडून आलं की ते तुझं होईल पण एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा ते तुझ्या घराचा उंबरा ओलांडेल तेव्हा त्याला असलेला शाप सुद्धा तुझा होईल, त्यामुळे जे करशील विचार करून कर आणि ही गोष्ट कोणालाही सांगितलीस तर ह्या मंत्राचा प्रभाव नष्ट होईल हेही लक्षात ठेव. देव तुझ कल्याण करो, अलख निरंजन ”…….. त्या संन्याशाने पांडूच्या कानात मंत्र सांगितला आणि तो निघून गेला.
जे झालं ते एवढ्या झटपट झालं की पांडूला विचार सुद्धा करता आला नाही. तो घरात बसून आता विचार करू लागला. तसंही त्याला काय काम मिळत नव्हतं, घरची परिस्थिती बेताचीच होती. दोन वर्षांनी मुलाला शाळेत घालायचा होता त्यासाठी पैसे हवेच होते. या सगळ्याचा विचार करून तो शापाचा धोका घ्यायला तयार झाला.
ती अमावस्येची रात्र होती. पांडूने हळूच डोळे उघडून बघितले त्याची बायको मुलाला जवळ घेऊन गाढ झोपली होती. त्याने उशाला असलेला कंदील घेतला आणि दबक्या पावलांनी तो बाहेर आला. आवाज न होता त्याने दाराची कडी काढली आणि बाहेर येऊन परत दार बंद केले. खिशातल्या माचीसने कंदील पेटवून तो गावाबाहेर जाणाऱ्या वाटेने चालू लागला. पूर्ण गाव शांत झोपलेलं होतं. मधूनच एखादं बेवारस कुत्रं भेसूर रडायला सुरु करायचं आणि मग बाकी सगळी त्याला साथ द्यायची. नाहीतर रातकिड्यांचा किरर्र किरर्र आवाजच त्याच्या साथीला होता. पांडू आता गावाच्या बाहेर आला. ते पडकं घर त्याला माहित होतं. त्याच्या आईने त्याला लहानपणी त्या घराबद्दल सांगितल होतं की तिकडच्या कर्त्या पुरुषाचा अचानक मृत्यू झाला आणि त्याची बायको कित्येक वर्ष वेडी होऊन गावात फिरत होती, नंतर तीही दिसेनाशी झाली. कंदिलाच्या प्रकाशात पांडूला मधेच एखादा साप सळसळत जाताना दिसायचा तर कधी एखादा ससा उड्या मारत जाताना दिसायचा पण त्याचं कशाकडेच लक्ष नव्हतं. त्याच्या डोक्यात फक्त मिळणाऱ्या धनाचाच विचार होता.
पांडू आता त्या घरासमोर पोहोचला. त्याच्या छातीत धडधड होत होती. त्या थंडीच्या दिवसातही त्याला घाम फुटला होता. त्याने कंदील खाली ठेवला आणि त्या पडक्या घरच्या उंबऱ्याच्या आत पाय ठेवला. डोळे बंद करून हात जोडून तो त्याला दिलेला मंत्र म्हणू लागला.
“येऊ का ?”…… एक गंभीर आवाज ऐकू आला. पांडूने डोळे उघडले, तिकडे कोणीही नव्हतं. त्याच्या सर्वांगाला घाम फुटला, घसा कोरडा पडला तेवढ्यात परत जमिनीच्या आतून तोच आवाज आला.
“ येऊ का? ”…… पांडूने सगळा धीर गोळा करून “ये” असं उत्तर दिलं आणि त्याला जमिनीच्या खाली कसलीतरी हालचाल जाणवली. जमिनीच्या खालून काहीतरी त्याच्याकडे आलं होतं. पांडू घराच्या बाहेर आला ती हालचाल त्याला जाणवत होती. काहीतरी जमिनीखालून त्याच्या मागे येत होतं. तो झपझप पावलं टाकत घराकडे निघाला. ती जमिनीखालची सळसळ त्याला घाबरवत होती. त्याने अंगात घातलेला शर्ट घामाने पूर्ण भिजला होता, हातपाय कापत होते. एक वेगळी गोष्ट त्याला जाणवली. तो जाताना ऐकू येत असलेलं कुत्र्याचं रडणं, रातकिड्यांचं ओरडणं सगळं बंद झालं होतं, जणू काही त्या जमिनीखालच्या गोष्टीला घाबरून सगळे शांत झाले होते. एक भयाण शांतता पसरली होती चालताना पांडूच्या पायाचा होणारा आवाज सुद्धा त्याला खूप मोठा वाटत होता. त्याच्या मागून जमिनीखालून येणारं जे काही होतं ते त्याला स्पष्टपणे जाणवत होतं.
पांडू आपल्या घरासमोर पोहोचला. कंदील विझवून त्याने खाली ठेवला. दार हळू आवाज न करता उघडले तेवढ्यात परत आवाज आला…….. “घरात येऊ का?”
पांडूच्या अंगावर सरसरून काटा आला. एकदा का हे घरात आलं की त्याच्याबरोबर त्याचा शाप सुद्धा घरात येणार होता. भीतीची एक लाट पांडूच्या मनात चमकून गेली. पण घरातल्या माणसांसाठी तो हे करत होता. परत तोच आवाज आला……. “घरात येऊ का?”
पांडूने मनाचा निर्धार केला आणि म्हणाला, “ये घरात ये”……
आणि त्याने उंबऱ्याच्या आत पाय टाकला. जमिनीखालून सळसळ करीत ते ही उंबऱ्याच्या आत आलं. पांडू मागे वळून दरवाजा बंद करायला गेला तर त्याच्या छातीत एक जोरदार कळ आली. ती वेदना त्याला सहनच झाली नाही. छातीवर हात दाबून तो अस्पष्टसा ओरडला. हात पाय झाडत असताना त्याला परत संन्याशाचे शब्द आठवले….
“त्याच्या बरोबर त्याचा शापसुद्धा घरात येईल”…… आणि नंतर त्याच्या आईने सांगितलेलं त्याला आठवलं.
“त्या घरातलो माणूस एकाएकी अचानक छातीत कळ येऊन मेलो”
पांडूची बायको आवाज ऐकून बाहेर आली पण तोपर्यंत पांडूची प्राणज्योत मालवली होती. त्या जमिनीखालच्या शिकाऱ्याने आपले पुढचे सावज टिपले होते. पांडूच्या बायकोने फोडलेला हंबरडा गावाबाहेरच्या धर्मशाळेत झोपलेल्या त्या संन्याशाने ऐकला. काहीतरी पुटपुटत त्याने कूस बदलली आणि तो परत घोरायला लागला.
या गोष्टीला आता बरीच वर्ष झाली. पांडूची बायको काही दिवसातच आपल्या मुलाला घेऊन माहेरी गेली. त्या घराच्या भिंती आता पडल्या होत्या, छप्पर लोकांनी चोरून नेलं होतं. मात्र त्या घराचा उंबरा अजूनही शिल्लक आहे आणि त्याच्या आत तो जमिनीखाली दडून बसलेला शिकारी…… आपल्या पुढच्या सावजाची वाट पाहणारा!!!
लेखन: सचिन अनिल मणेरीकर
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.