स्मार्टफोनच्या स्मार्ट युगात ‘सेल्फी’ ची चांगलीच क्रेझ आली आहे….. भल्याभल्याना या ‘स्व प्रतिमे’ ने वेड लावलं आहे. प्रसंग आणि परिस्थिती कुठलीही असो अनेकाना फोटा काढण्याचा मोह आवरता येत नाही. तसं पाहायला गेल तर त्यात काही फारसं वावग नाही. स्वतःचा फोटो काढून पाहण्याची मानवाची मानसिकता फार जुनी आहे. जेव्हा कॅमेरा नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती तेंव्हाही राजे-महाराजे आपली प्रतिमा चित्रकाराकडून बनवून घेत असत. जसजसा काळ बदलत गेला तसतसे ‘फोटो’ काढण्याच्या पद्धतीही बदलत गेल्या. एखाद्या समारंभात किंव्हा स्टुडियो मध्ये जावून फोटो काढण्याचा ‘ट्रेंड’ काही काळ होता. परंतु नंतर स्मार्टफोनचे युग आले आणि सर्व सामान्यांसाठी दुर्मिळ असणारा कॅमेरा प्रत्येकाच्या खिशात जावून पोहचला. त्यामुळे फोटो काढणे अधिक सुलभ झाले आणि ‘सेल्फी’ हा शब्द आणखी प्रचलीत बनला. या सेल्फिला पोस्ट करण्यासाठी सोशल मिडीया नावाचं व्यासपीठ मिळाल्याने आपण कोणत्या ठिकाणी आहोत किंवा कोणत्या परिस्थितीत आहोत, याचं भानसुद्धा आपल्याला राहत नाही.
आपल्या चेह:यावरचे हाव-भाव काय आहेत, याचं कोणताही भान न ठेवता सेल्फी काढायचा आणि तो सोशल नेट्वर्किंग साईटवर टाकायचा.. असं नवीन फॅड सध्या आलं आहे. आणि हे ‘फॅड’ काही लोकांच्या डोक्यात एव्हड भिनल आहे कि सेल्फी काढताना त्याना वेळेचं आणि काळाचं कुठलच भान राहत नाही. सेल्फ़िच्या नादात आपण किती असुरक्षित झालोय हे सुद्धा त्याना उमगत नाही. एखादा अपघात झाला असेल तर जखमींना मदत करण्याआगोदर त्याच्या सोबत सेल्फी काढणारे आणि ते फोटो सोशल मिडीयावर अपलोड करणारे ही काही माहाभाग आहेत. तर काहींना या सेल्फ़िच्या नादात आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे. केवळ तरुणांमधेच नाही तर अबालवृद्धापर्यंत हे फॅड जावून पोहचलं आहे. अर्थात, काळनुरूप बदलून नव्या ट्रेंडचा भाग होणं ही एक चांगलीच गोष्ट म्हटली पाहिजे. त्यामुळे ‘सेल्फी’ प्रेमाला विरोध करण्याचं इथ काहीच औचित्य नाही. परंतु आपलं ‘सेल्फी’ प्रेम जोपासताना परिस्थितीचं तारतम्य, आणि जीवाची सुरक्षितता आपण ठेवली पाहिजे. ही रास्त अपेक्षा आहे.
सेल्फी काढण्याच्या नादात मुलगा व आई वडील पूर्णा नदीच्या पात्रात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसापूर्वी खिरोडा पुलावर घडली. जळगाव जामोद येथील चव्हाण कुटुंबीय शेगाव येथे दर्शनासाठी गेले होते. सायंकाळी जळगाव जामोदकडे परत जात असताना खिरोडा पुलावर राजेश चव्हाण यांनी आपली गाडी थांबविली. पूर्णा नदीला आलेल्या पुराच्या सोबत सेल्फी काढण्याचा मोह राजेश चव्हाण यांच्या १३ वर्षीय मुलाला झाला. सेल्फी काढत असताना श्रवणचा पाय घसरला आणि तो नदीपात्रात पडला. त्याला वाचविण्यासाठी आई सरिता धावली, मात्र त्यांचाही तोल जाऊन त्या नदीत पडल्या. नंतर पत्नी आणि मुलाला वाचविण्यासाठी राजेश चव्हाण यांनीही नदीत उडी घेतली. परंतु पुराच्या पाण्यात राजेश चव्हाण यांना स्वतःचाही बचाव करता आला नाही, आणि तिघेही जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. एका हसत्या खेळत्या कुटुंबाचे क्षणात होत्याचे नव्हते झाले.
एका सेल्फीने संपूर्ण कुटुंबाचा जीव घेतला. ही घटना जितकी दुर्दैवी तितकीच विचार करायला लावणारी आहे. आपल्यासोबत अशी काही घटना घडू शकेल, याचा विचार चव्हाण कुटुंबाने स्वप्नातही केला नसेल. सेल्फी काढण्याचा मुलाचा बालहट्ट पूर्ण करू, आणि मार्गस्त होऊ. या विचाराने चव्हाण दाम्पत्य पुलावर उतरले. पण हाच मोह त्यांना नडला. आवश्यक ती सुरक्षितता त्यांनी बाळगली असती किंव्हा नदीला पूर आला असताना त्याठिकाणी थांबण्याचा मोह चव्हाण दाम्पत्याने आवरला असता तर ही दुर्दैवी घटना रोखता आली असती. चव्हाण कुटुंब ज्या ठिकाणावरून वाहून गेले त्या ठिकाणचा तिघेही उभे असल्याचा एक फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याचा अर्थ त्याठिकाणी इतरही लोक उपस्थित होते. मग ते या कुटुंबाच्या मदतीला का धावले नाहीत? सेल्फी आणि स्मार्ट फोनच्या च्या नादात आपल्या संवेदना तर ‘सेल्फिश’ झाल्या नाहीत ना? हे सुद्धा यानिमित्ताने तपासून पाहण्याची गरज आहे.
सेल्फीच्या नादात दुर्घटना झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. राज्यभरात, देशभरात अशा अनेक घटना सातत्याने घडत आहेत. धोक्याच्या ठिकाणी जाऊन ‘स्वचित्र’ काढण्याच्या या मोहापायी अनेक युवक-युवतींचे बळी गेलेत. कधी उंच डोंगर कड्यावरून पडून तर कधी पुराच्या पाण्यात वाहून जाऊन. कधी रेल्वेच्या धडकेने तर कधी वाहन अपघाताने शेकडो जण मृत्यूच्या दाढेत ओढल्या गेलेत. पण, त्यापासून धडा आपण अद्यापही घेतलेला दिसत नाही. सेल्फी काढताना आजूबाजूचे भान सोडा आपण देह्भानही वसरून जातो. इतकी आत्ममग्नता आपल्याला कश्यामुळे आली, याचा शोध घेण्याची गरज आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकच. त्यामुळे सेल्फीची ‘चौकट’ जीवावर बेतू लागली असताना त्याचा त्याचा अतिरेक आणि मोह आपल्याला आवरावा लागणार आहे. आपला कोणताही शौक किंव्हा छंद पूर्ण करत असताना सुरक्षितेला प्राधान्य देण्याची गरज आहे. सेल्फी म्हणजे आता प्रत्येकाच्या आयुष्याचा दैनंदिन भाग बनला आहे. त्यात काही वाईटही नाही पण हा नाद जीवघेणा ठरणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे.
माणसाचे जीवन अनमोल आहे. त्यामुळे जीवघेणी सेल्फी काढून काहीतरी पराक्रमी विक्रम करण्याचा मोह आपण टाळला पाहिजे. आणि इतरांनाही त्यापासून परावृत्त केलं पाहिजे. कवडीमोलाच्या सेल्फीसाठी अनमोल अशा आयुष्याची माती करणे योग्य आहे का? सेल्फी कितीही काढता येतील, मात्र सेल्फीच्या नादात गमावलेला जीव मात्र वारंवार मिळत नाही. त्यामुळे सेल्फीच्या या जीवघेण्या चौकटीला किती महत्व द्यायचे, यावर सर्वानी गांभीर्य पूर्वक विचार करावा, एवढीच अपेक्षा..!!
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.