सौंदर्य हा प्रत्येक स्त्रिच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यासाठी ती आपल्या परीने प्रयत्न करतही असते.
लहान मुलगी असो की कॉलेज तरुणी, किंवा अगदी एखादी आजीबाई जरी असली तरी तिला आपल्या रंगरुपाची सर्वांनी दखल घ्यावी, कौतुक करावं असं वाटतं.
पण कधीकधी कामाच्या गडबडीत स्वतःला वेळ देताच येत नाही. इतर सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना शरीराकडे नकळतपणे जरा दुर्लक्ष होतं.
सुंदर दिसण्यासाठी शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. नाहीतर अकाली वय वाढल्याच्या खुणा उमटू लागतात. रोज काही वेळ स्वतः साठी खर्च केला तर सुंदर दिसणं काही अवघड नाही !!!
केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत शरीराची जपणूक कशी करावी हे या लेखातून तुम्हाला समजेल.
मनाचेTalks तुमच्यासाठी घेऊन येत आहे सुप्रसिद्ध ब्युटी कॉस्मेटोलॉजिस्ट शहनाज हुसेन यांचे मार्गदर्शन !!!
महिलांच्या सौंदर्य विषयक प्रश्नांची उत्तरे या लेखातून दिलेली आहेत.
शहनाज हुसेन या सौंदर्य चिकित्सा अर्थात ब्युटी थेरपी या क्षेत्रात सुमारे पन्नास वर्षे कार्यरत आहेत.
सौंदर्याला शॉर्ट कट नाही
कोणतीही स्त्री असो, आपण सुंदर दिसावं अशी तिची स्वाभाविक इच्छा असते. त्यामुळे मेकअप या विषयाची स्त्रियांना मुळातच आवड असते. योग्य प्रकारे केलेला मेकअप सौंदर्यात भर घालतोच पण त्यामुळे आत्मविश्वास सुद्धा वाढतो. कामाच्या ठिकाणी किंवा एखाद्या पार्टी मध्ये आपण प्रेझेंटेबल दिसणे खूप महत्त्वाचे असते.
पण मेकअप बद्दल चुकीच्या कल्पनांमुळे किंवा या विषयाची योग्य माहिती नसल्याने स्त्रिया काही चुका करतात.
नैसर्गिकरीत्या सुंदर दिसण्यासाठी नियमितपणे स्वतःला वेळ देणे आवश्यक आहे. तसेच काही विशेष प्रयत्न करणे सुद्धा गरजेचे आहे.
तसं पाहिलं तर या अगदी साध्या, छोट्या सवयी आहेत पण यामुळे तुमचं शरीर अगदी ताजंतवानं रहातं.
सौंदर्याची जोपासना करणे ही सतत करण्याची गोष्ट आहे. कोणताही शॉर्टकट वापरून एका रात्रीत ब्युटी क्वीन होता येत नाही.
मग पाहूया तर स्वतःची काळजी कशी घ्यायची ते.
आपण बऱ्याच वेळा अज्ञानामुळे स्वतःचे नुकसान करुन घेत असतो. गोष्टी अगदी साध्या असतात, पण चुकीच्या पद्धतीने करत राहिल्यास त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो.
अशाच काही शंका आणि त्यावरचे उपाय आपण पहाणार आहोत.
प्रश्नोत्तराच्या स्वरूपातील हे शंकानिरसन आहे. यातून तुम्हाला खूप उपयोगी माहिती मिळेल.
महिलांना दैनंदिन जीवनात पडणारे प्रश्न, त्यांचे काही गैरसमज अगदी सोप्या पद्धतीने दूर केले आहेत.
त्वचेची काळजी घेण्यासाठी शहेनाज हुसेन यांनी सांगितलेल्या काही टिप्स.
१. चेहरा धुण्यासाठी साबण व पाणी वापरणे योग्य आहे का?
नाही, साबणाचा वापर करून आपण चेहऱ्यावरील धूळ आणि प्रदूषण पूर्णपणे स्वच्छ करु शकत नाही. तसेच बहुतेक साबण हे क्षारयुक्त असतात. त्यामुळे त्वचेची पीएच लेव्हल बिघडण्याची शक्यता असते. यामुळे त्वचा रुक्ष होऊ शकते.
२. ऑयली त्वचा वारंवार साबण व पाण्याचा वापर करून साफ करावी का?
नाही, साबण आणि पाण्याने तुम्ही दिवसातून जास्तीत जास्त दोन वेळा चेहरा धुवू शकता. यापेक्षा जास्त प्रमाणात साबण वापरला तर त्वचेवर दुष्परिणाम होतात.
पीएच लेव्हल बिघडल्याने त्वचेवर बॅक्टेरीया जमा होतात. आणि यामुळेच काळ्या रंगाचे पिंपल्स येतात.
३. फेशिअल मसाज सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे का?
फेशिअल मसाज साठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीमचा वापर केला जातो. पण तेलकट त्वचा असेल तर मात्र क्रीमचा वापर करु नये. त्यामुळे तैलग्रंथी अधिक प्रमाणात ऍक्टिवेट होऊ शकतात.
म्हणून ऑयली स्कीन साठी फेशिअल करताना क्लिन्जिंग, टोनिंग, मास्क व एक्सफोलिएशन यांचा उपयोग करावा.
४. चेहऱ्यावर रात्रभर क्रीम लावून ठेवावे का?
आपली त्वचा एका ठराविक लिमिट पर्यंतच क्रीम शोषून घेऊ शकते. त्यानंतर उरलेल्या क्रीमचा काही उपयोग होत नाही. खरंतर झोपताना त्वचेची छिद्रे मोकळी असली पाहिजेत.
पण जर का तुमची त्वचा खूपच कोरडी पडली असेल तर अधिक प्रमाणात चेहेऱ्यावर लावलेले क्रीम एका स्वच्छ, ओलसर कॉटनचा वापर करून पुसून घ्या.
त्यानंतर थोडेसे लिक्वीड मॉइश्चरायझर लावू शकता.
५. रात्री डोळ्यांभोवती क्रीम लावल्यास सुरकुत्या कमी होतात का?
नाही. हा एक गैरसमज आहे. खरंतर डोळ्यांच्या बाजूला असणारी त्वचा शरीराच्या इतर भागातील त्वचेपेक्षा पातळ व नाजूक असते. रात्री झोपण्यापूर्वी अंडर आय क्रीम डोळ्यांच्या बाजूला लावावे. दहा मिनिटे ठेवून नंतर स्वच्छ धुवून टाकावे. पण पूर्ण रात्रभर क्रीम लावून ठेवणे योग्य नाही.
६. नॉर्मल स्किन असल्यास त्वचेची जास्त काळजी न घेतल्यास चालते का?
नॉर्मल स्कीनला काही विशेष काळजी घेण्याची गरज नसते.
ही एक चुकीची समजूत आहे. कोणत्याही प्रकारची त्वचा असली तरीही नियमितपणे देखभाल करावीच लागते. तरच तुम्हाला निरोगी व नैसर्गिक सौंदर्य प्राप्त होऊ शकते.
७. काळे डाग व पिंपल्स म्हणजे त्वचेच्या छिद्रावर साठलेली घाण असते का?
नाही. आपल्या त्वचेखाली सिबम नावाचे एक नैसर्गिक तेल असते. काही वेळा हे सिबम घट्ट होते. आपल्या त्वचेवर सूक्ष्म छिद्रे असतात. त्यांचे मुख बाहेरच्या बाजूला असते. या ठिकाणी अडकलेल्या सिबमचे ऑक्सीकरण होऊन काळ्या रंगाचे डाग दिसतात.
८. लहान मुलांना येणारे पिंपल्स आपोआप निघून जातात का?
नाही, लहान मुलांना येणाऱ्या पिंपल्स वर उपचार करावे लागतात. अन्यथा ते संपूर्ण शरीरावर पसरत जाण्याची शक्यता असते.
नियमितपणे काळजी घेतल्यास यांचे प्रमाण कमी होते तसेच लहान मुलांना यापासून सुरक्षित ठेवणे सुद्धा शक्य आहे.
९. प्रेग्नंसीनंतर चेहऱ्यावर डाग किंवा खुणा येऊ शकतात.
अशा खुणा गर्भधारणेपूर्वी देखील येऊ शकतात. कोणत्याही कारणाने जर त्वचेची लवचिकता कमी झाली तर अशी समस्या येऊ शकते. वजन खूप वाढले असेल आणि जर वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले असतील तर त्या काळात असे डाग किंवा खुणा दिसू शकतात.
१०. थंडीत सनस्क्रीन लावावे की नाही?
हिवाळ्यातही सनस्क्रीन लावावे. जर का थंडीच्या दिवसात तुम्हाला बराच वेळ सूर्यप्रकाशात रहावे लागत असेल तर सनस्क्रीन लावणे फायद्याचे ठरते. यामुळे अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण मिळते.
११. जास्त प्रमाणात केसगळती असेल तर तेल मालीश केल्याने फायदा होतो का?
केस गळण्याचे मुख्य कारण म्हणजे केसांची मुळे कमजोर होणे. अशा परिस्थितीत जर मालीश केले तर त्यामुळे अधिक प्रमाणात केसगळती होऊ शकते.
जर मालिश करायचेच असेल तर केसांच्या मुळाशी तेल लावून हळूवारपणे बोटांनी गोलाकार दिशेने मसाज करावा.
यावरुन काय लक्षात ठेवाल?
त्वचेच्या समस्या कोणत्याही व्यक्तीला त्रास देऊ शकतात. पण जर याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली तर आपण लवकरच त्यापासून सुटका करून घेऊ शकतो. आणि जर का याकडे दुर्लक्ष केले तर अगदी थोड्या प्रमाणात असलेला हा प्रॉब्लेम गंभीर स्वरूप धारण करु शकतो.
त्वचेशी संबंधित कोणताही आजार जर वाढत असल्याचे लक्षात आले तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
या लेखातून आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. किंवा वरील टिप्स वाचून काही लहानसहान गैरसमज दूर होतील.
मैत्रिणींनो, आपले शरीर ही एक मौल्यवान देणगी आहे. त्याची योग्य रितीने काळजी घेणे, स्वतःसाठी वेळ काढणे आणि आपले सौंदर्य कसे टिकवून ठेवावे याची शास्त्रशुद्ध माहिती घेणे हे आपले कर्तव्यच आहे.
हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन आम्हाला सांगा. लेख आवडला तर लाईक व शेअर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.