मित्रांनो छोट्या-छोट्या गावांची हळूहळू शहर झाली.
आता शहरांची महानगरं व्हायला लागली.
अशा वेळेला मग इमारतींची अडचण होते, आणि काही वास्तू पाडून रस्ता रुंद केला जातो.
एखाद्या वास्तूत तिथल्या रहिवाशांचा मन गुंतलेलं असतं.
ती वास्तु पडताना पाहून मन हळहळतं. पण काळाच्या ओघात काही गोष्टी मागं पडतात. नव्या गोष्टी रूळतात.
पण काही ऐतिहासिक वास्तु असतात, ज्या कुण्या एका परिवाराची नाही तर शहराची शान असतात, ज्यांच्यात अनेकांचं मन, भावना गुंतलेल्या असतात.
आजच्या पुण्यात मेट्रो धावते आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर चालवलेला होता.
पेशवाई इथेच रुजली, बहरली आणि पेशवाईचा अस्तं ही इथं पुण्यातच, शनिवारवाडयात झाला.
मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, शूर योद्धा बाजीराव पेशवे यांनी हा शनिवारवाडा बांधला.
असं म्हणतात की बाजीराव पेशव्यांनी एकदा एका सशाला, एका शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना पाहिलं आणि त्याच जागी वाडा बांधायचं निश्चित केलं.
1732 ला शनिवार वाडा बांधून पूर्ण झाला. याची वास्तुशांत शनिवारी झाली, म्हणून हा शनिवारवाडा.
तर या शनिवारवाड्याला शहर स्वच्छ करण्याच्या योजनेअंतर्गत पाडण्याची शिफारस करण्यात आली होती….
वाचून धक्का बसला ना?
पुण्याची शान असलेला शनिवारवाडा पाडण्याचं कोणी धाडस कसं करू शकतं?
तर ही घटना घडली स्वातंत्र्यपूर्व काळात.
शनिवार वाड्याला शतक गाठायला अवघी 4 वर्षे बाकी होती.
त्यावेळेला शनिवार वाड्याला आग लागली. यापूर्वीसुद्धा तीनदा शनिवारवाडा आगीच्या कचाट्यात सापडला होता.
मात्र 1828 ला जी आग लागली त्यामुळे शनिवारवाड्याचे अपरिमित नुकसान झाले.
त्यापूर्वीच म्हणजे 1817 ला ब्रिटिश निशाण शनिवारवाड्यावरून झळकलं होतचं.
सगळीकडे इंग्रजांचा अंमल वाढत होता. 1863 ला ब्रिटिश अधिकारी डॉक्टर ए एच लिथ यांनी मुंबईच्या गव्हर्नरना एक अहवाल सादर केला.
त्यात पुणे शहराला मोकळा श्वास घेता यावा यासाठी रस्ता रुंद करण्यासाठी शनिवारवाड्याच्या भिंती पाडून टाकण्याची शिफारस होती.
वेळोवेळी लागलेल्या आगीमुळं शनिवार वाडा आतून पूर्ण पोखरलेला होता.
शनिवारवाड्याची एक आग तर इतकी भीषण होती की आठवडाभर शनिवारवाडा धुमसत होता.
पुण्याच्या नागरिकांना हे दृश्य पाहणं ही फारच क्लेशकारक होतं.
शनिवारवाड्याच्या संपत्तीची एवढी ख्याती होती की तयार झालेली राख जरक यांनी विकत घेतली, ती राख चाळून, त्यातून सोनं शोधण्यासाठी.
पेशवाईच्या अस्तानंतर 1817 ला पुण्याचा पहिला कलेक्टर ‘हेन्री डंडास रॉबर्टसन’ इथं राहत होता.
त्यानंतर ब्रिटिशांनी या विस्तीर्ण इमारतीचा उपयोग जिल्हाधिकारी कार्यालयासाठी केला.
त्यानंतर तळमजल्यावरती तुरुंग आणि वरच्या मजल्यावर वेड्यांचं हॉस्पिटल ब्रिटिशांनी तयार केलं होतं.
एकेकाळी गजबजलेला हा वाडा आता मात्र वाहतुकीसाठी अडचण वाटायला लागला.
एकेकाळी जिथं लढाईसाठी प्रचंड सैन्य त्या समोरच्या मैदानात जमा व्हायचं तिथं आता बाजार भरत होता.
एकूणच शनिवारवाडा चौकासाठी अडचणीचा ठरत होता. आणि म्हणूनच डॉक्टर लिथ यांनी शहरात काही बदल सुचवले होते.
सांडपाण्याची व्यवस्था, शुद्ध पाण्याची व्यवस्था या बरोबरच रस्ता रुंदीकरण यावरही भर होता.
आणि त्यासाठी आतून उध्वस्त झालेल्या, बाहेरची तटबंदी आणि बुरुज घेऊन उभा असलेल्या शनिवार वाड्या वरती हातोडा चालवण्यासही सुचवलेलं होतं.
तत्कालीन ब्रिटीश सरकारने लिथचा अहवाल पटकन पूर्णपणे स्वीकारलाही.
अधिकाऱ्यांना यावर तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेशही मिळाले.
इतकच काय तर इतर बदल आणि शनिवारवाडा पाडण्यासाठी निधीही मंजूर झाला.
सुदैवानं काही कारणामुळे शनिवारवाडा पाडण्यासंबंधी शिफारशी प्रत्यक्षात मात्र आल्या नाहीत, आणि इतिहासातल्या अनेक चित्तथरारक गोष्टींचा साक्षीदार असणारा शनिवारवाडा शाबूत राहिला….
पुढे 1919 ला शनिवारवाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर करण्यात आला.
शनिवार वाड्याची मूळ बिल्डिंग 21 फूट उंच होती, तर चारही बाजूने 950 फूट लांबीची तटबंदी होती.
ती तटबंदी आणि बुरुज आजही पाहायला मिळतात. शनिवार वाड्याला 5 मोठे दरवाजे आणि 9 बुरुज आहेत.
हा शनिवारवाडा मुठा नदी पासून जवळच आहे. आज शनिवारवाडा आतून भग्न झालेला आहे.
लाईट आणि साऊंड इफेक्टने इतिहास जिवंत ठेवण्याचाही प्रयत्न केलेला आहे.
“काका मला वाचवा” ही नारायणराव पेशव्यांची किंकाळी इथं रात्री अपरात्री ऐकायला मिळते असंही काहीजण सांगतात. त्यातल्या त्यात गम्मत अशी कि गुगल वर शनिवार वाड्याच्या माहितीबद्दल सर्च केलं, तर चक्क ‘मोस्ट हॉंटेड प्लेस इन इंडिया’ असा सुद्धा सर्च रिझल्ट येतो.
अनेक कथा, दंतकथांना जन्म देणारा हा शनिवारवाडा स्वातंत्र्य पूर्व काळात, रस्ता रुंदीकरणासाठी पाडण्यात आला नाही हे आपलं मोठं सुदैव.
ब्रिटिश अधिकारी लिथ यांचा अहवाल प्रत्यक्षात आला नाही आणि शनिवारवाडा दिमाखात उभाच राहीला.
या वाड्याच्या उरलेले अवशेष पाहूनही मराठेशाहीच्या साम्राज्याच्या अफाट संपत्तीची कल्पना येते.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.