शेतकरी बांधवानो संपावर जातांना थोडा विचार करा.

दररोज आम्ही वर्तमानपत्र वाचत असतो. सकाळी वर्तमानपत्र आलं नाही आम्हाला तो दिवस गोड वाटत नाही. दररोज एक ना एक घटना…… जीव अगदी कासाविस होतो. त्यातच शेतक-याच्या आत्महत्येची बातमी असेल तर…. तर मन अगदी सुन्न होतं. वाटतं की याला जबाबदार कोण?

पुर्वी काँग्रेस सरकार सत्तेवर होतं. तरीही आत्महत्या होतच होत्या. ह्या आत्महत्या संपवु म्हणणारी भाजपा आज सत्तेत आहे. तरी आत्महत्या संपायला तयार नाहीत. उलट त्यात वाढ झालेली आहे. आत्महत्या संपविण्याची गरज आहे. पण ठोस पावले पडतांना दिसत नाही. याला कारणीभुत कोण? तर सरकारच याला कारणीभुत आहे.

आम्ही कर भरतो. सर्व वस्तुवर कर. आता जी एस टी आला. मग आम्ही जमा करतो पैसा….कशासाठी? तर देश चालावा, तोही व्यवस्थीत चालावा. आमचं अस्तित्व टिकावं. तसंच देशाचंही अस्तित्व टिकावं म्हणुन कराच्या रुपात आम्ही आमच्या मेहनतीचा पैसा भरतो. या आमच्या पैशाने देश चालविण्याऐवजी नेतेच आपले घर चालवितांना दिसतात. कोणी निवडुन आल्याबरोबर मोठमोठे बंगले बनवितात. वर हेलिपँडही. व्हि. आय. पी. बंगला. अन् ज्याच्या भरवश्यावर आपण खातो तो मात्र उपाशी. त्याच्या आत्महत्येला कोणतीच किंमत नाही. आमच्या नेत्यांनी आपले वेतन दुप्पट तिप्पट वाढवुन घेतले. अन् आमचा शेतकरी उपासात…. एवढंच नाही तर त्या संसदेतील कँन्टीनमध्ये जेवण २८ रुपये. पण आमच्या शेतक-यांना खळगी भरायला साधे पाच रुपयेही एका वेळेला कधीकधी मिळत नाही.

हा देश किसान आणि कामगारावर आधारला आहे असे जरी आपण म्हणत असलो तरी याच शेतकरी आणि कामगारांच्या मेहनतीला काही किंमत नाही. नेते काय पाच वर्षासाठी असे आपण म्हणतो. पण हेच नेते पाच वर्षात किती कमवुन जातात. हे कोणी विचारुच नये. यांना भावनाही नसतात. मेलेल्या असतात सा-या नेत्यांच्या भावना. म्हणुनच शेतकरी मरो की कामगार मरो, निर्भया मरो की आसिफा मरो, नव्हे तर अख्खा देश का नाही मरत आमच्या भावनांचे केवळ मुडदे बनलेले आहे असे ते वागत असतात. अर्थात देशही त्याच भावनेने चालवत असतात.

वरवर म्हणतात की आम्हाला जनहो सेवेची संधी द्या. आम्ही त्या संधीचे सोने करु. पण त्या संधीचे सोने करण्याऐवजी केवळ नंदी बनवुन सोडतात. म्हणुनच शेतकरी बांधवानो, तुम्ही संप करण्याची गरज नाही. जिथे भावनाच मेलेल्या आहेत. जिथे भावनांचेच मुडदे झालेले आहे. तिथे संप करुन तरी काय उपयोग? तुम्ही जरी या देशासाठी महत्वाचे घटक असाल तरी तुमची या देशात इज्जत नाही. ती कवडीमोल झाली आहे. तुम्ही फक्त या देशाचे पोट भरण्यासाठी चालता. तुमचा बेभाव माल यांना चालतो. तुमचा शेतसारा या देशासाठी चालतो. मात्र तुम्ही या देशासाठी चालत नाही. तुमच्या मालाला जास्त भाव देणे या देशाला चालत नाही. मात्र तुमच्या मालावर आपले पोट भरणारे व्यापारी, दलाल या देशाला चालतात. ते जास्त मेहनत न करता आपले पोट सहज भरु शकतात. अन् स्वतःचं जीवन चांगल्या पद्धतीनं जगु शकतात. पण या देशाला तुमच्यासारखा मेहनत करणारा शेतकरी चालत नाही.

बांधवानो त्या कर्मचा-यांना तरी सुखाचे दिवस आले आहेत. नव्हे तर त्यांच्यासाठी सुगीचे दिवस आले आहेत. आज त्यांना वेतन किती मिळते हे सांगण्याची गरज नाही. ते ओरडले किंवा संपावर गेले की पटकन त्यांच्या मागण्या पुर्ण केल्या जातात. कारण त्यांनी काम जर केलं नाही. तर सरकारची सारी कामं अडतात. वेळेवर काम करणारे तंत्रज्ञ आयात करता येत नाही. त्यामुळं अडतं सारं काम. पण तुमच्या संपावर जाण्यानं काही अडत नाही. थोडा त्रास नक्की होईल. पण सर्वच वस्तु आयात करता येतील. दुश्मन पाकिस्तानलाही बाप बनवुन साखर आयात करता येईल. दुध पाउडर का बनविता येईल. सा-याच गरजा निभवता येईल. नाही पिकलं देशात तरी दुष्काळ पडत नाही. सारं आयात करता येतं. थोडी महागाई जरुर वाढेल. पण त्याची झळ फक्त सामान्यांना. त्या नेत्यांना व सरकारी कर्मचा-यांना महागाईचं काय? अहो महागाई त्यांच्यासाठी नाही. त्यांना तर महागाई भत्ताही मिळतो. पेन्शन सारख्या योजनादेखील. पण तुम्हाला……तुम्हाला यातलं काहीच मिळत नाही. पेन्शन तर नाहीच नाही.

तुम्ही संपावर गेलात बरे झाले. पण स्वतःच्या मेहनतीनं पिकविलेला भाजीपाला रस्त्यावर फेकला! स्वतःच्या हातानं काढलेलं दुध रस्त्यावर फेकलं. अहो,हा स्वतः मेहनत करुन उत्पन्न केलेला भाजीपाला तुमच्या लेकरासारखा नाही का? अहो आई जसे लेकराला गर्भात जपते रोगापासुन तसेच सर्व गोष्टीपासुन. जन्माला घातल्यानंतरही आईवडील लेकराला जसं जपतात. तसंच हे धनधान्य भाजीपाला तुमचेच लेकरु. त्यांनाही तुम्हीच लेकरालारखं जपलं ना. रोगापासुन त्यांचं संरक्षण केलंय ना. मग स्वतःचं लेकरु फेकतो का रस्त्यावर. नाही ना. मग भाजीपाला कशाला फेकता? हं राग येतोय सरकारचा? रोष आहे सरकारवर? तर त्याचा विरोध करा. त्यांना कर देणे बंद करा. गावात मतदानाचे वेळी येवुन सांत्वन करणा-या नेत्यांना गावात शिरुच देवु नका. शिवाय येणा-या नेत्यांसमोर आधीच आपल्या समस्या ठेवा. त्या किती दिवसात पुर्ण कराल याची शाश्वती घ्या. पुर्ण करीत नसतील तर त्याचं जीणं हराम करा. त्याच्या बंगल्याभोवती आंदोलन करा. आळीपाळीनं…… बेमुदत…..जेणेकरुन नेते व्यवहार करायलाही किंवा कोणत्याही गोष्टी करायला बाहेर जावु शकणारच नाहीत. तुमचा उत्कर्ष नेत्यांवरच अवलंबून आहे. नेतेच तुम्हाला न्याय मिळवुन देवु शकतात. कारण आमचा देश नेत्यावरच अवलंबून असुन आमचा देश नेतेच चालवतात. पण ह्या कृती सामुदायिक असाव्यात.

यांना सरकारी कर्मचारी वर्गाचे वेतन वाढविणे कसे जमते? यांना स्वतःचे वेतन वाढवणे कसे कळते? स्वतःला पेन्शन लागु राहावी ते कसे कळते? मग शेतक-यांच्याच पिकाला भाव देणे कळत नाही! पण यांच्या भावनांचे मुडदे झाल्याने या कोणत्याही गोष्टी कळुनही वळत नसल्याने केवळ ढोंग करणा-या ढोंगी सरकारपुढं संप करण्याची गरज नाही. जागा दाखविण्याची गरज आहे. स्वतःचा भाजीपाला फेकण्याची गरज नाही तर जाब विचारण्याची गरज आहे. तुम्ही संप कराल. चांगली गोष्ट आहे. पण त्यात तुमचे जे नुकसान होईल ते कोणीच भरुन देणार नाही. म्हणुनच संप करतांना थोडातरी विचार करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।