“बिजनेसमध्ये थंड डोक्याने लढाई करावी लागते, तुम्ही एक काम करा, पुढचा माल पाठवताना वाढीव रेट लावा, आणि दहा बॉक्सची किंमत वसुल करा. पक्का सावकार आहे मी, घाट्याचा सौदा आपण करतचं नाही!”…मी मुलुख जिंकल्याचा आव आणत बढाई मारली.
आज सकाळी तणतणच दुकानात पोहचलो, गेल्या गेल्या पेमेंट वसुली करणार्या मॅनेजरला चांगलच फैलावर घेतलं, एकतर चॉकलेट-बिस्कीटांच्या होलसेलच्या धंद्यात पुर्वीसारखं प्रॉफीट राहीलेलं नाही, आणि त्यात जागेचं भाडं, महिन्याचे बिलं, रोजचे खर्च आर्थिक गणितं जुळवता जुळवता नाकी नऊ येत होती. जीएसटी रिटर्नच्या आणि नौकरांच्या पगाराच्या तारखा तेवढ्या पटापट पटापट यायच्या, फक्त मार्केट मधुन उधारी तेवढी हळुहळु यायची.
तेव्हा आज ठरवलं, स्वतःच उधारी वसुल करण्याच्या मोहीमेवर निघायचं. मॅनेजरला विचारलं, सहा महीन्यांच्या वर ड्यु डेट असलेल्या, आणि मोठ्ठं देणं असलेल्या पार्ट्या कोणत्या आहेत? त्याने तीन नावाची यादी दिली, पहीलंच नाव विपुल ट्रेडींगचं पाहुन आश्चर्य वाटलं, पिढ्यानापिढ्या चांदीचे चमचे तोंडात घेऊन जन्माला घेणारी शेठमंडळी, यांच्याकडे थकबाकी? कपाळावर आठ्या चढवुन, कारमध्ये बसुन आम्ही त्यांच्या दुकानाकडे रवाना झालो.
दुकान कसलं चकचकीत शोरुम होतं ते, गेल्या गेल्या विपुलशेठनी अदबीने, गोड शब्दात स्वागत केलं, त्यांच्या पाहुणचारामुळे का त्यांच्या ए.सी केबिनमुळे, थंड थंड वाटु लागले. उधारी न दिल्याचा राग क्षणार्धात, कुठल्या कुठे पळुन गेला. मॅनेजरने बिल पुढं करताच चाणाक्ष विपुलशेठनी कान टवकारले, सहा महीन्यांखालचं, तीनशे बॉक्स बिस्कीटांचं बिल कारण नसताना ठेवुन घेणारच नाही, दोन मिनीटात त्यांनी फायलीतुन कागदाच्या गुंडाळ्यातुन एक चिठ्ठी शोधुन काढली, त्यावर शेरा होता, पाच बॉक्स फुटलेले निघाले. मी आणि मॅनेजर एकमेकांकडे बघु लागलो, “आमच्या दुकानातुन पॅक केलेल्या बॉक्सचीच डिलीव्हरी केली जाते” मी सावधपणे किल्ला लढवण्यासाठी मैदानात उतरलो, “मग आम्ही इथं लिव्हले ते खोटे काय?” बुरुजावरुन तोफ कडाडली, तीन मिनीटांच्या चौफेर हल्ल्यानंतर आमचे उरलेसुरले अवसान गळाले, “ठिक आहे, पाच बॉक्सचे बिल वजा करुन पैसे देऊन टाका”, आम्ही तहाचे पांढरे निशान पुढे केले, विजयी हास्याने विपुलशेठने चेक लिहुन मॅनेजरला सुपुर्द केला, आणि आम्हाला खुश करण्यासाठी नजराणा पेश केल्याच्या थाटात पाचशे बॉक्स बिस्कीटे आणि शंभर जार चॉकलेटची ऑर्डरही आनंदाने दिली. आम्हाही आदराने ती स्वीकारली.
आम्ही पुढच्या मोहीमेसाठी आमच्या कारमध्ये आरुढ होवुन निघालो, मॅनेजर न राहवुन बोलला, एक नंबरचा लुच्चा माणुस आहे. “नेहमीचीच खोड आहे ह्याची, बॉक्स फुटलेले नव्हते,” मी मुत्सद्दी असल्याचा आव आणला आणि म्हणलं, “बिजनेसमध्ये थंड डोक्याने लढाई करावी लागते, तुम्ही एक काम करा, पुढचा माल पाठवताना वाढीव रेट लावा, आणि दहा बॉक्सची किंमत वसुल करा. पक्का सावकार आहे मी, घाट्याचा सौदा आपण करतचं नाही!”…मी मुलुख जिंकल्याचा आव आणत बढाई मारली.
लिस्ट मधले दुसरे नाव होते, प्रकाश प्रोव्हीजन, रक्कम पंधरा हजार, चार महीन्यांपासुन बिल दिले नाही. ट्रॅक रेकॉर्ड चांगले होते, ड्रायव्हर अरुंद गल्लीबोळातुन कार रेटत होता, रखडत रखडत एकदाचे पोहचलो. दुकानात एक मध्यम वयाची स्त्री बसलेली होती, आम्ही जाताच खडबडून उठली, दुकानात जेमतेम मालच शिल्लक आहे, हे आमच्या चाणाक्ष नजरेनं ओळखलं, मोकळं मैदान पाहताच मॅनेजरला वसुलीचा चेव चढला, “चार महीन्यांपासुन बिल थकलयं, पैसे देणं होत नाही तर माल कशाला घेता?”,माझा निष्ठावान सेनापती आवेशात गरजला, तितकाच थंड प्रतिसाद आला.
“……………….”
सांगा ना, काहीतरी बोला, नाहीतरी आमचे पैसे तरी मुकाट्याने देऊन टाका!…
“……………….”
काय अडचण आहे? मी सौम्य शब्दांत विचारले, आणि तात्काळ उत्तर आलं, गयावया करत ती म्हणाली, माझे मिस्टर दुकान चालवतात, दोन महीन्यांपासुन डेंग्युने दवाखान्यात एडमिट आहेत, हॉस्पीटलचं बिल द्यायलाही उसने पैसे घ्यावे लागतात, आज एवढे आठशे रुपये जमलेत, तेवढे घ्या, आम्ही तुमच्या बिलाचे पुर्ण पैसे देऊन टाकु, बस!, आम्हाला थोडी मुदत द्या.
डोळ्यातलं पाणी बांध फोडायच्या तयारीत होतं, त्या माऊलीने निकराने अश्रुंना वापस पाठवलं. तिचा केविलवाणा चेहरा पाहुन माझ्या मनात धस्स झालं, मी रुबाब झाडत बोललो, असु द्या, असु द्या!, मॅनेजर, ह्यांची पुढील मालाची ऑर्डर घ्या, आणि अजुन दोनतीन महीने ह्यांना बिल मागु नका.
तिच्या डोळ्यातले कृतज्ञतेचे भाव बघण्याआधीच मी झपकन वळलो आणि चालु लागलो, बाहेर येताच मॅनेजर चेष्टेने बोललाच, “घाट्याचा सौदा झाला की शेठ!”..म्हणजे माझ्यासारख्या व्यावहारीक माणसानं भावनांच्या भरात नुकसान करुन घेतलं असं त्याला म्हणायचं होतं तर!..
थोड्या पैशाचं नुकसान सहन करुन मी, कुठल्याही बाजारात विकत न भेटणारी, बहुमुल्य माणुसकी कमावली होती, ते त्या रुपयेपैशाची भाषा जाणणार्या, आणि हिशोबात चोख असणार्या त्या साध्या कारकुनाला कसे कळनार होते?…
तिसर्या दुकानदाराची बिलांची लिस्ट पाहीली आणि आपोआप माझी लाखोली सुरु झाली..”हरामखोर लोकं, माल घेताना गोड बोलतात, उधारी द्यायला जीवावर येते, रोज काही ना काही बहाणे सांगतात, आणि मी पण पक्का सावकार आहे, आणि घाट्याचा सौदा आपण करतचं नाय!, मी चेवाचेवाने स्वताःशीच बोललो.
मॅनेजर मात्र माझ्याकडे पाहुन गालातल्या गालात का हसत होता, मला कळेना!..
“मी खरचं घाट्याचा सौदा केला का?” असा विचार मी झटकुन दिला आणि लगबगीने तिसर्या दुकानाकडे वसुलीला निघालो!
वाचण्यासारखे आणखी काही…..
श्रीदेवी!! कॅमेऱ्या पलीकडची…….
साहित्य, संतांपासून आजच्या नेटकऱ्यांपर्यंत…..
नियतीला झुंज देणारा शास्त्रज्ञ: स्टीफन हॉकींग
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.