“भाऊ …..! हा बघ …जगातील सर्वात भाग्यवान माणूस. ज्याने एका दिवसात जास्तीतजास्त स्रियांच्या विविध अंगाला स्पर्श करण्याचा रेकॉर्ड केला आणि एकाही स्त्रीने त्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार केली नाही….धन्य आहेस रे तू बाबा….” असे म्हणत विक्रमने समोरच्या टीव्हीला हात जोडले.
मीही चमकून टीव्हीकडे पाहिले. तर समोरच श्रीबागेतील गणपतीच्या दर्शनाचे दृश्य चालू होते. गणपतीच्या पायाजवळ उभा असलेला एक कार्यकर्ता अगदी मन लावून येणाऱ्या प्रत्येक भाविकाला पकडून बाहेर लोटत होता. अर्थात त्या पकडीत त्याचे हात कुठे कुठे फिरत होते ते दिसतच होते. स्त्रियांवर तर त्याचा जास्त राग दिसत होता. कारण प्रत्येक स्त्रीला तो अंगावर जाऊन बाहेर ढकलत होता. खरे तर मला जास्त आश्चर्य वाटले त्या स्त्रियांचे. इतरवेळी कोणी नुसती नजर दिली तर वाघिणीसारख्या चवताळून उठणाऱ्या. भर रस्त्यात धक्के मारणाऱ्या पुरुषांच्या सात पिढ्यांचा उद्धार करणाऱ्या स्रिया अश्या वेळी चुपचाप त्याचा कुठेही फिरणारा स्पर्श सहन करीत होत्या.
“चार ते पाच तास रांगेत उभे राहून… गणपतीच्या समोर गेल्यावर चार सेकंद ही समोर उभे राहू शकत नाही. डोळे भरून त्याला पाहू शकत नाही. उलट धक्के खाऊन बाहेर पडावे लागते. त्या देवाचे दर्शन घेण्यात काय अर्थ आहे…..? मी हा प्रश्न विक्रमला विचारला. तर त्याने “तुझे काय जाते रे भाऊ ….?? देवाचे दर्शन घेणे ही तुझी संकल्पना वेगळी आहे तशीच प्रत्येकाची असावी का…. ?? काहींना आवडते असे गर्दीतून धक्के खात दोन सेकंदासाठी का होईना त्याचे दर्शन घ्यायला मग त्यांचा दिवस काय…वर्ष ही छान जात असेल. खरोखर काही जणांच्या नवसाला पावत असेल म्हणून हजारो लोक त्याच्या दर्शनासाठी येतात. ही प्रत्येकाची श्रद्धा आहे ती आपण बदलू शकत नाही. ज्याने त्याने स्वतः ठरवावी.
मीही त्याचे विचार मान्य केले. खरेच आहे… लोकांची श्रद्धा आपण बदलू शकत नाही. एरवी सदा घाईत असणारे मुंबईकर आवडत्या देवाला हवा तेवढा वेळ देतात. रात्ररात्र भर त्याच्या दर्शनाला रांगेत उभे राहतील. रांगेत उभे राहून सर्व सिस्टीमला दोष देत राहतील पण दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतरचा त्याचा चेहरा आनंदाने फुलून गेलेला असतो. रस्त्यावरच्या भिकाऱ्याला हाड हाड करतील पण देवाच्या दानपेटीत पैसे प्रेमाने टाकतील. आणि मुलामुलींना रात्रभर याच श्रध्येपोटी बाहेर फिरायला मिळतेय.
” मग विकी यावर उपाय काय……”?? मी हसून विचारले. “काही उपाय नाही. जे चालले आहे ते चालू दे. कारण दरवर्षी अश्या भक्तांची संख्या वाढते आहे. काहीजण स्टेटस साठी येतात. तर काही पिकनिक म्हणून. तर काही गर्दीत स्पर्शसुख अनुभवण्यासाठी येतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. सध्या त्या कार्यकर्त्याची किती मजा होत असेल याचाच विचार मी करतोय.” असे बोलून परत टीव्ही पाहू लागला.
वाचण्यासारखे आणखी काही….
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.