पैशाला आकर्षित कसे करावे?

Money is usually attracted, not pursued.
संपत्ती आकर्षित केल्याने मिळते, पाठलाग केल्याने नाही.

तुमचा एक छान मित्र आहे. जेव्हा केव्हा तुम्ही फोनवर बोलता तेव्हा तुम्ही त्याला खुप छान बोलता. गोड बोलता. घरी येण्याचे आमंत्रणही देता. एकदा तो मित्र तुम्हाला भेटण्यासाठी मोठ्या उत्साहाने तुमच्या घरी येतो. दाराची बेल वाजवतो. मात्र तुम्ही त्याला पाहून धाडकन दार बंद करुन घेता. त्याला हाकलून लावता.

अशाने तो मित्र पुन्हा कधी तुमच्या घरी येईल का? मुळीच येणार नाही. उलट तो इतर मित्रांनाही तुमच्या गैरवर्तनाबद्द्ल सांगेल आणि त्यांनाही तुमच्या घरी येण्यापासून परावृत्त करेल.

आता या मित्राच्या जागी कोणतीही व्यक्ती किंवा वस्तू ठेऊन बघा.

पत्नी, भाऊ बहिण, नातेवाईक, शेजारी, मित्र, गुरुजन किंवा पाहूणे.

ज्यांच्याशी आपण प्रेमाने वागतो, ज्यांना प्रेमाची वागणूक देतो तेव्हा लोकही आपल्याशी खूप प्रेमाने, आपूलकीने वागतात.

मात्र जेव्हा आपण लोकांचा मनोमन तिरस्कार करतो तेव्हा लोक त्यांच्या अपमानाची व्याजासकट परतफेड करतात. पैशाच्या बाबतीत सूद्धा ही गोष्ट तंतोतंत लागू होते.

आपल्या सर्वांनाच संपत्ती हवी आहे. आपल्याला सुखसमृद्धी आणि समाधानाचे जीवन हवे आहे. जीवनातील सर्वच नाही पण ऐंशी नव्वद टक्के समस्यांना पैशाच्या शक्तीने सोडवता येते आणि म्हणून पैशाला आकर्षित करण्याचे तंत्र आपण अवगत करुन घेतले पाहिजे.

आजच्या लेखात मी तुम्हाला अशा सोप्या सोप्या युक्त्या सांगणार आहे ज्यांना अंमलात आणल्यानंतर तुमच्यामध्ये संपत्तीला आकर्षित करुन घेण्याची क्षमता निर्माण होईल.

१. पैशाविषयी तक्रार करु नका.

जेव्हा केव्हा पैशाच्या अभावामूळे आपण दुःखी किंवा चिंताक्रांत होतो, नकळत आपण अशा नकारात्मक उर्जा आणि विचारतरंगांचे निर्मिती करतो जी आपल्याकडे येणाऱ्या संपत्तीला अडथळा निर्माण करते.

मन ठेवा रे प्रसन्न हीच सुख समाधान आणि समृद्धीची गुरूकिल्ली आहे. महागाई, भाववाढ आणि नुकसान हे जीवनाचे सत्य आहे. ते हसत खेळत आपण स्वीकारले पाहिजे.

दररोज काही ना काही घटना घडतात. एखादी वस्तू खराब होते. कधी अनपेक्षित लॉस होतो. कधी कोणीतरी आपल्याला फसवते.

कधी कोणी टोपी घालते. कधी आपल्या बरोबरीची माणसं अलिशान गाडी घेतात. कधी कोणी छानसं टुमदार घर बांधतं.

एखाद्या जोडप्याचे रम्य, सुंदर ठिकाणी गेलेल्या सहलींचे फोटो पाहून आपल्याला स्वतःच्या कंगालीबद्द्ल मनातून वाईट वाटते.

यांच्यापाशी इतका पैसा कसा येतो आणि आमच्यापाशी का येत नाही असा विचार करुन आपला जळफळाट होतो.

श्रीमंतांचा द्वेष करता करता आपण नकळत पैशाचांही द्वेष करायला लागतो. पैसा खराब आहे. पैसा विष आहे. पैशामूळे माणसाची बुद्धी भ्र्ष्ट होते. पैसा माणसाला राक्षस बनवतो, श्रीमंत लोक गरीबांचे रक्त पिऊन गब्बर होतात.

असा विचार करणारी माणसं आयुष्यात कधीही संपत्तीवान बनू शकत नाहीत. आपण आपल्या अंतर्मनात पैशाविषयी सकारात्मक भावना पेरल्या पाहिजेत.

पैसा ही एक प्रकारची उर्जा असते. संपत्ती ही शक्ती आहे. एखाद्या माणसाचा स्वभाव कमालीचा स्वार्थी आणि लोभी असेल तर श्रीमंत बनल्यानंतर तो पैशाची शक्ती वापरुन लोकांचे शोषण करतो.

ज्या व्यक्तीला दानधर्म करायला, इतरांची मदत करायला आवडते, अशी व्यक्ती पैसे आल्यानंतर हिरीरीने इतरांची मदत करु लागते. पैसा तुमच्या स्वभावाचा विस्तार करतो.

त्यामूळे कधीही पैशाची निंदा करु नये. आपले पैशाचे पाकीट कधीही अस्ताव्यस्त ठेऊ नये. त्यातली बिनकामाची कागदं काढून टाकावीत. नोटा कशाही न कोंबता व्यवस्थित ठेवाव्यात.

एखाद्याला पैसे देण्याचा वादा केला असेल तर त्याच दिवशी पैसे द्यावेत. आपली सगळी देणी वेळच्या वेळी चूकवावीत. त्यात चालढकलपणा करु नये. एखाद्याला पैसे देताना जीवावर आल्यासारखे न देता प्रसन्न मनाने द्यावेत.

२. पैशांवर प्रेम करा. पैशांविषयी कृतज्ञता बाळगा.

जेव्हा केव्हा पैशाला आकर्षित करण्याचे विचार तुमच्या मनात येतात तेव्हा पैशावर मनापासून प्रेम करण्याची कृती करा ज्या वस्तूवर आपण मनापासून प्रेम करु लागतो ती आपल्याकडे येतेच.

असलेल्या संपत्तीबद्द्ल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. भुतकाळात झालेल्या आर्थिक नूकसानांबद्द्ल अनावश्यक चर्चा करु नका. त्यातून जो अनुभव मिळाला तो लाखामोलाचा होता असे मानून त्या पैसे गमवलेल्या कडवट आठवणींना कायमचे डिलीट करा.

उर्जा एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहत असते तसे पैसासुद्धा एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे संचार करतो. रोजच्या दिवसाची सुरुवात करताना मनापासून तुमच्याकडे असलेल्या पैशाविषयी, संपत्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्याकडे पैसे असल्यामूळेच इतकी वर्ष तुम्हाला अन्न खायला मिळाले.

तुमच्या शरीराचे पालनपोषण झाले. त्याला मनापासून धन्यवाद द्या. पैसे असल्यामूळे तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण होत आहेत म्हणून पैशाचे आभार माना.

ध्यानात बसल्यानंतर पैशाचा पाऊस अनुभवा. तुमच्याकडे संपत्तीच्या राशी लागलेल्या आहेत अशी कल्पना करा.

कोट्यावधी रुपये मिळाल्यानंतर तुम्ही जितक्या आनंदाने जल्लोष केला असता तसा जल्लोष करा. डोळे बंद करुन ध्यानात बसलेले असताना तुमच्या डोक्याच्या पृष्ठभागावर आभाळातून सोनेरी रंगाचा प्रकाश पडतो आहे अशी कल्पना करा.

३. आपल्यापेक्षा श्रीमंत लोकांशी मैत्री करा.

मासे पकडायचे असतील तर शेतात जाऊन चालणार नाही. त्यासाठी नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये जाऊनच गळ लावून किंवा जाळ्या टाकून मासे पकडावे लागतील. त्याचप्रमाणे श्रीमंत व्हायचे असेल तर पैसेवाल्या, श्रीमंत आणि संपत्तीवान लोकांमध्येच उठबस करावी लागेल. उगीचच कोणीही श्रीमंत होत नाही. त्याने त्याच्या आयुष्यात काही ना काही धडपड केलेली असते म्हणून त्याच्याकडे संपत्ती चालत आलेली असते.

म्हणून श्रीमंत लोकांचा द्वेष करुन न्युनगंडाने त्रस्त होवून त्यांच्यापासून दुर पळण्यापेक्षा त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे. श्रीमंत लोकांची आत्मचरित्रे वाचा. श्रीमंत लोकांची भाषणे ऐका. त्यांच्या चेतनेला तुमच्या मनामध्ये प्रवाहित होवू दे. शंभर दुबळ्या लोकांपेक्षा एक क्षमतावान माणूस जास्त उपयोगाचा असतो. त्यामूळे नेहमी प्रभावी आणि वैभवशाली लोकांशी मैत्री जोडण्यासाठी आतूर रहा.

मी तुम्हाला आत्मसन्मानाशी तडजोड करुन लोचटपणे वागायला, श्रीमंताच्या मागे पुढे करुन लाळघोटेपणा करायला अजिबात सांगत नाहीये. आत्मसन्मान कायम ठेऊन संधी मिळेल तिथे श्रीमंत लोकांशी आपण संपर्क वाढवला पाहिजे.

मैत्री वाढली पाहिजे. श्रीमंत होण्याचं गुपित श्रीमंत लोकच शिकवू शकतात.

माणसाचा स्वभाव अनुकरणप्रिय असतो. आनंदी माणसांच्या सहवासात आपण आनंदी होतो. दुःखी, उदास आणि चिडचिड्या लोकांच्या वर्तुळात आपणही निराश आणि तक्रारखोर बनतो.

त्याचप्रमाणे श्रीमंत लोकांच्या सहवासात राहणारा माणूस लवकर श्रीमंत होतो. श्रीमंत लोकांकडून धाडस कसे करावे हे शिकता येते. श्रीमंत लोकांकडून गुंतवणूक कशी करावी याचे धडे घेता येतात. श्रीमंत माणसांकडून स्वयंशिस्त शिकता येते.

मनातल्या भीतीवर मात करण्याचे ट्रेनिंग एखादा श्रीमंत व्यावसायिक खूप चांगल्या पद्धतीन देऊ शकतो.

४. स्पष्टता, प्रतिबद्धता आणि कृती, मिळवून देईल श्रीमंती.

मला येत्या एका महिन्यात किती रक्कम हवी आहे ते ब्रम्हाडासमोर जाहीर करा. एका वर्षात किती पैसे हवे आहेत ते ओरडून सांगा. पाच वर्षांचे, दहा वर्षांचे आणि पंचवीस वर्षांचे टारगेट तुमच्या मनात स्पष्ट असू दे.

आता हे पैसे तुम्ही कोणकोणत्या मार्गाने आकर्षित करणार आहात याचा डिटेल आराखडा बनवा. स्वतःमधली सकारात्मक उर्जेची पातळी वाढवण्यासाठी सेल्फ हेल्प पुस्तके वाचा.

मी सुखात आहे हे इतरांना दाखवण्यासाठी आपण प्रत्येक जण काही ना काही भावनिक खर्च करत असतो. आवश्यकता नसतानाही केल्या जाणाऱ्या खर्चांना इमोशनल एक्सपेंसेस असे म्हणतात.

लग्नात तीस चाळीस लाख खर्च करणे. लोकांना दाखवण्यासाठी नवी कार घेणे. लोक नाव ठेवतात म्हणून घर विकत घेऊन आयुष्यभर त्याचे हप्ते भरणे. केवळ लोकांना इंप्रेस करण्यासाठी महागड्या ट्रिप काढणे.

मी मौजमजा करण्याच्या विरोधात नाही पण असे मोठे खर्च करण्यापुर्वी भक्कम मालमत्ता उभी करण्याला प्राधान्य द्या.

शेअर बाजार येत नसेल तर शिकून घ्या. नुसता भपका करणारा, मोठेपणाच्या आहारी गेलेला माणूस तरुणपणी आपली मोलाची कमाई निरर्थक गोष्टींमध्ये वाया घालवतो आणि वय झाल्यानंतर पश्चाताप व्यक्त करण्यात दिवस घालवतो.

म्हणून पैशाला आकर्षित करण्यासाठी दरमहा बचत आणि गुंतवणूक करण्यावर भर द्या.

आर्थिक स्वतंत्रता तुम्हाला आयुष्य जगण्याचे खरे स्वातंत्र देईल.

आभार आणि शुभेच्छा

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।