‘वॉलमार्ट चा मालक सॅम वॉल्टन’ वाचा नक्कीच तुम्हाला समृद्धीचा मार्ग सापडेल

नमस्कार मित्रांनो, सर्वांना नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा!

तुम्हाला माहितीये, सध्या जगातल्या सर्वात श्रीमंत असलेल्या व्यक्तीचं नाव काय आहे? एमेझॉनचा मालक जेफ बेजोस!..

त्याआधी कित्येक वर्ष जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होती, जगाला ‘मायक्रोसॉफ्ट’ मय बनवणारा बिल गेट्स!

त्याआधी कोण होतं माहितीये?

१९८२ पासुन पुढे कित्येक वर्ष जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणवुन घेण्याचा मान होता, रिटेल मार्केटचा अनाभिषिक्त सम्राट, ‘सॅम वॉल्टन’ ह्यांना!

आपल्या निधनापर्यंत म्हणजे १९९२ पर्यंत ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. ते इतके श्रीमंत होवु शकले कारण त्यांनी जगाला एक नवी ‘दुकानदारी’ शिकवली, ‘वॉलमार्ट’ नावाची!…

आज तुफान लोकप्रिय असलेले बिगबजार, डीमार्ट, टोटल मॉल किंवा पतांजली ह्या सगळ्या वॉलमार्टच्याच भारतीय आवृत्या आहेत.

वॉलमार्ट आजही जगातली सर्वात जास्त नफा कमवणारी कंपनी आहे. २०१७ मध्ये वॉलमार्टने ४८७ बिलीयन डॉलर्स (तीन लाख चाळीस हजार कोटी रु फक्त) नफा कमावला होता, त्यापुढे एप्पल कंपनीचा नफा २५५ बिलीयन डॉलर्स म्हणजे एक लाख अष्ठ्याहत्तर कोटी रुपये इतका होता. आजच्या तारखेला वॉलमार्टचे जगभरात अकरा हजार दोनशे सत्त्याहत्तर स्टोअर्स आहेत.

ह्या कंपनीत २३ लाख लोकं काम करतायत, हाही एक विक्रमच आहे. जितकी कॅनडाची लोकसंख्या असेल, त्याहुन अधिक लोक एका दिवसात वॉलमार्टला भेट देतात, इतकं महाप्रचंड जाळं आहे वॉलमार्ट!

आजचा ऑनलाईनचा बादशाह, एमेझॉनचा सर्वोसर्वा जेफ बेझोसही सॅम वॉल्टनच्या ‘मेड इन अमेरीका’ नावाच्या आत्मचरित्रातुन प्रेरणा घेतल्याचे प्रांजळपणे कबुल करतो. आपल्या व्यवसायातील कित्येक सुत्रे त्यांनी वॉलमार्टचा अभ्यास करुनच रचली आणि यशस्वी केली, म्हणूनच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत तोही जगातला सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनु शकला.

चला, आज ह्या अजब गजब व्यक्तिमत्वाबद्द्ल थोडंसं जाणुन घेऊया.

वर्ष १९८५, जगप्रसिद्ध नियतकालीक फोर्ब्जने जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणुन सॅम वॉल्टन यांना घोषित केलं आणि सगळा मिडीया आश्चर्यचकित झाला, सगळे शोधु लागले, कोण हा सॅम वॉल्टन?

कारण तोपर्यंत, कोणीही त्यांचं नाव तितकसं ऐकलं नव्हतं. ना कधी त्यांना पाहिल होतं, ते नाव कुणालाच चिरपरिचित नव्हतं.

म्हणुन कित्येक रिपोर्टर ह्या अवलियाला भेटायला बेंटनव्हिले ला पोहचले, त्यांना अपेक्षा होती, हा जगातला सर्वात धनाढ्य व्यक्ती पैशाच्या राशीत लोळत असेल, महागड्या अलिशान महालात, सुंदर सुंदर ललनांसोबत बेहोश होवुन आपल्या वैभवाचं प्रदर्शन करत असेल!

पण त्यांचा भ्रमनिरास झाला, जेव्हा त्यांनी पाहिलं, की सॅम स्पोर्टकारमधुन नाही तर एका जुन्या ट्रकमधुन प्रवास करतात.

सॅम कुठल्या महागड्या सलुनमध्ये नाही तर घराजवळच्या गल्लीतल्या, साध्या सलुनमध्येच, सर्वसामान्य लोकांतलेच एक बनुन, केस कापायला जातात.

डिझाईनर फॅन्सी कपड्यांऐवजी सॅम आपल्याच स्टोअरमधले साधे, स्वस्त कपडे वापरतात.

म्हणजेच, तो एक साधी जीवनशैली जगणारा असामान्य श्रीमंत माणुस होता. ह्याचा अर्थ असा अजिबात नाही की तो कंजुष होता, ह्याचा अर्थ इतकाच की त्याला पैशाची किंमत माहित होती.

सॅमने आपल्या आयुष्यात अठरा प्लेन्स खरेदी केले, पण ते सारेच्या सारे सेकंडहॅंड होते. ते दिखाव्यासाठी प्लेन वापरायचे नाही तर वेळेची बचत व्हावी, ह्यासाठी विमानाचा वापर करायचे.

हे असे का?

श्रीमंत बनण्याचा धडा पहिला – पैशाची किंमत ओळखा!

सॅम वॉल्टनचा जन्म एका गरीब घरात झाला होता. त्यांचे आईवडील मोलमजुरी करायचे. लहानपणी पै पै साठी करावा लागणारा तीव्र संघर्ष त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता, अनुभवला होता आणि पैशाचा आदर करण्याचे संस्कार आपोआपच त्यांच्यावर झाले होते.

त्या काळात आजच्यासारखी ‘बालमजुरी’ वगैरे खुळं नसल्यामुळे छोटा सॅम लहानपणापासुनच पैसे कमवायचा आणि परिवाराच्या खर्चाला हातभार लावायचा. कधी वर्तमानपत्रे, मासिके विकुन तर कधी ससे आणि कबुतरे विकुन, घरोघर जावुन, विक्री करत छोट्या सॅमने व्यवसायाचे धडे गिरवले होते.

पैसे मिळवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात, हे लहानपणीच समजल्यामुळे सॅमने आयुष्यभर कधीही पैशाची उधळपट्टी केली नाही.

एखादं बेट विकत घेऊन, त्यावर हवी ती मौजमजा करत, ते एक चैनीचं, भोगविलासाचं आयुष्य जगु शकले असते, पण सॅमने तसे कधीही केले नाही, झालेल्या नफ्यातला बहुतांश भाग ते व्यवसाय वृद्धीसाठी वापरत राहीले, म्हणुनच ते इतकं मोठं साम्राज्य उभा करु शकले.

कित्येक लोकं रडगाणी गातात की व्यवसाय करायचाय, पण माझ्याकडे तर भांडवलच नाही, भांडवल तर सॅमकडे पण नव्हते, स्वतः कष्ट करुन, एकेक रुपया स्वतः कमवुन, जमवुन सॅमने व्यवसाय सुरु केला आणि अनोख्या उंचीवर नेऊन ठेवला.

कारण त्यांना पैशाची किंमत कळली होती, त्यांनी कुठेही तो व्यर्थ उधळला नाही.

श्रीमंत बनण्याचा धडा दुसरा – जे कराल त्यात ‘बेस्ट’ बना!

लहानपणापासुन सॅमच्या आईने त्याला सांगितले की, बाळा, जे पण करशील त्यात सर्वोत्कृष्ट हो, स्वतःसाठी उच्च ध्येयं निर्माण कर, आणि जीव तोडुन मेहनत कर, स्वतःला झोकुन दे, नेहमी महत्वकांक्षी रहा, म्हणुणच की काय, लहानपणापासुनच, सॅम प्रत्येक ठिकाणी आपला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचे.

एकदा मासिकं विकण्याची स्पर्धा होती, जो सर्वात जास्त मासिकं विकेल त्याला दहा डॉलर्सचे बक्षीस होते.

हो, ते बक्षीस सॅमनेच पटकावलं. लहानगा सॅम फुटबॉल, बेसबॉल, बास्केटबॉल खेळायला जायचा.

उन्हाळ्यात तो पोहायलाही जायचा, आणि ह्या प्रत्येक खेळात ते खुप पटाईत आणि निष्णात बनला.

नशीब म्हणा किंवा कसब, सॅम ज्या फुटबॉल मॅचमध्ये खेळायचा, त्यांची टीम नेहमी जिंकलेली असायची, आणि काही कारणामुळे सॅम खेळायला नसला की टीम सामना हरायची.

जे काही होतं, पण ह्या एका गोष्टीने सॅमच्या मनावर बिबंवलं की “जिंकणं, हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे.” त्यांचा हाच अफलातुन आत्मविश्वास त्याला आयुष्यात खुप पुढे घेऊन गेला.

सॅम खचितच नशीबवान नव्हता, तो प्रचंड मेहनती होता, कष्टाळु होता, पुढाकार घेऊन कृती करणं, हेच त्याच्या यशाचं रहस्य होतं. तो इतकी मेहनत घ्यायचा की फुटबॉल आणि बास्केटबॉल ह्या दोन्ही खेळात तो स्टेटलेव्हलचा खेळाडु बनला.

वॉलमार्टचा एक भागीदार चार्ली बुम म्हणतो, की जगात सर्वात श्रीमंत बनणं, किंवा अतोनात, अफाट पैसा कमवणं हे सॅमचं ध्येय कधीच नव्हतं, त्यांना तर एकच वेड होतं, आपल्या व्यवसायात टॉपवर पोहचणं!

श्रीमंत बनण्याचा धडा तिसरा – माणसं जोडा!

सॅम वॉल्टन हे जितके प्रभावी आणि प्रेरणादायी होते, तितकेच नम्र देखील होते.

एकदा युनिव्हर्सीटीच्या निवडणुकीला उभं राहील्यावर त्यांनी आपल्या जवळ येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःहुन बोलण्याची सुरुवात केली. प्रत्येकाला ते आपुलकीने नाव घेऊन बोलायचे. ओळख नसणाऱ्यांशीही बोलायचे.

ह्यामुळे अल्पावधीतच ते लोकप्रिय झाले, जो तो त्यांना आपला मित्र समजु लागला, आणि त्यांनी ती निवडणुक सहज जिंकली.

कंपनीतल्या सफाई कर्मचाऱ्यांपासुन ते मोठमोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला सॅम वैयक्तिक ओळखायचे, आणि जिव्हाळ्याने बोलायचे.

दुकानाच्या आत बसलेले असतानाही ते बाहेरुन जाणाऱ्यालोकांना नमस्कार करायचे, शुभेच्छा द्यायचे. त्यांच्या ह्याच मोकळ्या स्वभावामुळे ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित व्हायचा.

लोकांना ‘मी इम्पॉर्टन्ट आहे’ असं फिल करवुन त्यांना आनंदी बनवण्याची कला सॅमने अवगत केली होती. लहान वयातच सांघिक खेळ खेळलेले असल्यामुळे त्यांचे ‘टीमवर्क’ अप्रतिम होते,

ह्या सर्व गुणांचा वापर त्यांनी वॉलमार्टला एक महान कंपनी बनवण्यासाठी केला.

एका अत्यंत गरीब घरात जन्मलेल्या मुलाचा, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्यापर्यंतचा हा थक्क करुन टाकणारा प्रवास!

कशा प्रकारे त्यांनी आपले पहिले किरकोळ, फुटकळ वस्तु विकण्याचे दुकान उघडले?

कशा प्रकारे त्यांनी स्पर्धा हा शब्द्च आपल्या धंद्यातुन नाहीसा केला?

आणि मंदीच्या काळात, इतर दुकानदार माशा मारत बसलेले असताना, कशा प्रकारे सॅम वॉल्टननी लोकांना रांगा लावुन, आपल्या दुकानात माल विकत घेण्यासाठी मजबुर केलं?

श्रीमंत बनण्याचा धडा चौथा – शिकत रहा, प्रयोग करा, जिंकण्यावर लक्ष केंद्रित करा.

स्वतःच्या कमाईवरच, स्वतःचे शिक्षण पुर्ण करुन, सॅम एका दुकानात नौकरीला लागला, सॅमचे हस्ताक्षर खुप वाईट होते, इतके की ते दुकानमालकाही समजत नसे, त्यामुळे कित्येकदा त्याला ह्याचा त्रास व्हायचा,

पण त्याने सॅमला काढुन टाकण्याचा विचार कधीही केला नाही. कारण, सॅम एक अतिशय उत्कृष्ट सेल्समन होता, कोणालाही कोणतीही वस्तु विकण्यात त्याचा हातखंडा होता.

यशासाठी आसुसलेल्या आणि लहानपणापासुनच महत्वकांक्षी असलेल्या सॅमने, थोड्याच दिवसात आपल्या सासर्‍याकडुन वीस हजार डॉलर्स उसने घेतले आणि न्युपोर्ट ह्या शहरामध्ये, थाटामाटात स्वतःच्या मालकीचे नवे दुकान थाटले. ते दुकान म्हणजे बेन फ्रॅंकलीन नावाच्या कंपनीची फ्रॅंचाईजी होती.

लवकरच सॅमच्या लक्षात आले की ह्या व्यवहारात आपण फसवलो गेलो आहोत. ह्या जागेचे भाडे आजुबाजुच्या दुकानांच्या मानाने खुपच जास्त आहे, त्या मानाने ग्राहक नाहीत, आणि तितकी कमाईही नाही.

म्हणजे हा एकंदर आतबट्ट्याचा व्यवहारच आपण करुन बसलो आहोत. परिस्थिती निराशाजनकच होती, पण परिस्थितीला हार जाईल तो सॅम वॉल्टन कसला?

सॅमने आयुष्यात कधीही, कोणत्याही समस्येपुढे हार मानली नव्हती, चळवळ्या आणि धडपड्या सॅम टेंशन घेत बसला नाही, त्याने अभ्यास केला. त्या दुकानाची मागच्या वर्षाची विक्री बाहत्तर हजार डॉलर्स इतकी होती. ती दुप्पट करण्याचे लक्ष्य त्याने स्वतःपुढे ठेवले.

त्यासाठी सॅमने आजुबाजुच्या प्रत्येक दुकानात विकल्या जाणार्‍या वस्तुंची, बारकाईने माहिती गोळा केली. विक्रीक्षेत्राच्या अनेक सेमिनारांमध्ये भाग घेतला. नवनव्या गोष्टी शिकुन आपल्या स्टोअरमध्ये त्याने अनेक सुधारणा केल्या. ह्यासोबत विक्री वाढवण्यासाठी, तो अनेक नवनवीन प्रयोगही करायचा, जे इतर कोणीही केले नव्हते.

उदा. त्याने आपल्या दुकानासमोर पॉपकॉर्न आणि आईस्क्रिम असे दोन स्टॉल लावले, ज्यामुळे त्याला दोन फायदे झाले. एक म्हणजे नफा वाढला, दुसरे म्हणजे लोक त्याच्या दुकानाकडे आकर्षित होवु लागले.

हळुहळु सॅमचे दुकान लोकांमध्ये लोकप्रिय होवु लागले.

श्रीमंत बनण्याचा धडा पाचवा – चौकटी मोडा, नफा जोडा.

ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सॅम सतत नवनव्या क्लृप्त्या वापरायचा. मार्केटमध्ये एक डॉलरला उपलब्ध असणारी वस्तु तो ऐंशी सेंट्स ला विकायचा, त्याचा नफा कमी झाला तरी ग्राहकांची संख्या वाढायची.

वेळप्रसंगी तो नियमही मोडायचा. बेन फ्रॅंकलीन कंपनीचा नियम होता की दुकानातला पंच्याऐंशी टक्के माल त्यांच्या कंपनीचा असायला हवा, सॅम फक्त साठ सत्तर टक्के त्यांच्या माल ठेवायचा, बाकीच्या वस्तु स्वस्तात आणुन विकायचा.

पण इतरांच्या तुलनेत ग्राहकांची संख्या तिप्पट असल्यामुळे कंपनी त्याचे हट्ट चालवुन घ्यायची. ह्या बिजनेस मॉडेलमुळे सॅमचा नफा भरघोस वाढला.

वार्षिक बाहत्तर हजार डॉलर्स विक्री असलेल्या दुकानाला त्याने अवघ्या एक वर्षात अडीच लाख डॉलर्स किमतीच्या वस्तुंची विक्री केली.

माफक नफा ठेवुन ग्राहक संख्या प्रचंड वाढवण्याचा फॉर्मुला सॅमनेच सर्वप्रथम राबविला, रुजवला, यशस्वी केला. आज एमेझॉन, डिमार्ट सुद्धा हेच सुत्र वापरतात.

कष्ट आणि नाविन्यपुर्ण प्रयोग ह्या दोघांच्या अनोख्या मिश्रणाने सॅमचे दुकान त्या विभागातल्या अष्ट्याहत्तर दुकानांमध्ये सर्वात जास्त विक्री करणारे दुकान म्हणुन झळकु लागले.

हेच तर सॅम वॉल्टन चे स्वप्न होते.

लवकरच सॅम वॉल्टन वर एक आपत्ती कोसळली. सॅमच्या दुकानातल्या कमाईचे आकडे बघुन दुकान मालकाची नियत फिरली. एग्रीमेंट करताना सॅमने कंपनीसोबत भाड्याचा, लीजचा कालावधी निश्चित केलेला नव्हता, मुळ जागा मालकाने त्याचा फायदा घेऊन एकाएकी सॅमला तिथुन हटवले. दुकान वापस मागितले.

कारण दुकान प्रचंड लोकप्रिय झाले होते, त्या दुकानात ग्राहकांचा ओघ वाढला होता.

आतापर्यंत हाडाचे पाणी करुन उभा केलेले दुकान सोडुन देण्याची पाळी सॅमवर आली. कंपनीच्या कूटील डावपेचामुळे अचानक काही वर्षांची त्याची सगळी सगळी मेहनत मातीमोल झाली होती.

सॅम वॉल्टन म्हणतात, ही त्यांच्या आयुष्यातली सर्वात कठिण वेळ होती.

पण सॅम रडत बसला नाही, त्याने पुन्हा नवा श्रीगणेशा केला.

त्याचा पुढचा प्रवास पुढच्या भागात……

वाचण्यासारखे आणखी काही…

प्रेरणादायी लेख
कथा
ललित लेख


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।