५ विद्यार्थिनींपासून पुण्यात SNDT विद्यापीठाची स्थापना होण्याचा रोमहर्षक प्रवास

स्त्री शिक्षणासाठी भारतातील पहिलं महिला विद्यापीठ स्थापन कोणी स्थापन केलं? त्या वेळी पाच विद्यार्थिनींपासून हि सुरुवात करताना, ‘याने इतका मोठा काय फरक पडणार?’ हा विचार जर कोणी केला असता तर आज स्त्री शिक्षणाचा इतका मोठा टप्पा पार झाला असता का?

पुण्यातले गणिताचे प्राध्यापक, धोंडो केशव कर्वे हे भारतातील स्त्रियांच्या हक्कांसाठी, शिक्षणासाठी लढणाऱ्या समाजसुधारकांपैकी सुरुवातीच्या काळातले चिवट लढवय्यै होते.

विस्मरणात गेलेली त्यांची अफाट कहाणी आज पुन्हा जाणून घेऊया.

मुंबईच्या खेतवाडी परिसरातील गजबजलेल्या रस्त्यांपैकी एका रस्त्यावर, एक वारसा जपणारी वास्तू, म्हणजेच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (SNDT) विद्यापीठ, कला महाविद्यालयाच्या ललित कलांच्या कार्यक्रमांसाठी एक समृद्ध संस्थान म्हणून काम करतं आहे.

२०१५ मध्ये SNDT युनिव्हर्सिटीचा — जिंदाल सेंटर फॉर द आर्ट्स म्हणून नूतनीकरण करण्यात आलं.

SNDT युनिव्हर्सिटी, ही भारतातील महिलांसाठीचं पहिलं विद्यापीठ.

या विद्यापीठानं २०१६ मध्ये शताब्दी साजरी केली.

स्त्रियांच्या शिक्षणाकडे फारसे लक्ष दिलं जात नव्हतं अशा काळात ही ऐतिहासिक संस्था स्थापन करणाऱ्या अग्रगण्य नेत्याबद्दल, या महर्षी बद्दल फार कमी भारतीयांना माहिती आहे.

धोंडो केशव कर्वे, समर्पित समाजसुधारक, उत्तुंग शिक्षणतज्ज्ञ आणि भारतातील स्त्रियांच्या हक्कांसाठी सुरुवातीच्या काळात लढणारा एक लढवैय्या.

१८ एप्रिल १८५८ ला मुरुड जिल्हा रत्नागिरी इथं जन्मलेल्या कर्वेंचं बालपण त्यांच्या जन्म गावातच गेलं.

त्यांचे वडील केशब कर्वे यांना एका छोट्या इस्टेटचे व्यवस्थापक म्हणून तुटपुंजा पगार मिळत होता.

मॅट्रिकच्या परीक्षेत चांगले गुण मिळाल्यामुळे महर्षी कर्वे मुंबईतल्या प्रतिष्ठित एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकले.

तिथून त्यांनी बी.ए.ची परीक्षा १८८४ मध्ये यशस्वी रित्या दिली.

गणित हा त्यांचा अतिशय आवडता विषय होता.

त्यामुळे पदवीनंतर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली.

राजा राम मोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, पंडिता रमाबाई आणि ज्योतिराव फुले यांच्यासारख्या प्रेरणादायी लोकांमुळे भारताच्या समाजव्यवस्थेत त्यावेळी क्रांतिकारक बदल घडत होता.

स्त्री स्वातंत्र्याच्या मार्गात चांगले उपक्रम राबवले जात होते आणि चांगल्या सुधारणा घडण्याचा तो काळ होता.

महिलांच्या शिक्षणाची गरज यावर महर्षी कर्वेंनी बुलंद आवाज उठवला.

भारतात सुरु असणा-या सुधारणा चळवळी आणि त्यांचे नेतृत्व करणार्‍या लोकांचा खोलवर प्रभाव पडल्यामुळेच महर्षी कर्वे यांनी देशातल्या स्त्रियांना विशेषत: विधवांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला.

महर्षी कर्वे यांचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांच्या बालपणातल्या अनुभवांनी आकाराला आला होता.

महर्षी कर्वे यांनी १८९३ मध्ये विधवा पुनर्विवाह संघाची स्थापना केली.

महर्षी कर्वेंचं वयाच्या अवघ्या १४ वर्षी लग्न झालं होतं. त्यांची पहिली पत्नी राधाबाईंचं १८९४ मध्ये बाळंतपणात निधन झालं.

तेव्हा, त्यांनी स्वतः वयाच्या ८ व्या वर्षीच पती गमावलेल्या विधवा गोदुबाईशी लग्न करून समाजासमोर एक आदर्श ठेवला.

महर्षी कर्वेंनी अस्पृश्यतेसारख्या प्रथांविरुद्धही बंड पुकारलं.

त्या काळात विधवांना केस पुर्ण कापावे लागायचे.

साधी पांढरी साडी नेसून जीवन कंठावं लागत होतं.

या कठोर सीमांच्या बाहेर जाऊन महर्षी कर्वेंनी आपलं काम केलं त्यामुळे ब-याच लोकांनी त्यांच्या वर निशाणा साधला, त्यांना विरोध केला.

समाजाने बहिष्कृत करूनही महर्षी कर्वे यांनी या अन्यायकारक भेदभावाविरुद्ध आवाज उठवणं कधीच थांबवलं नाही.

१८९५ मध्ये, महर्षी कर्वेंनी ‘हिंदू विधवा होम’ असोसिएशनची स्थापना केली, ज्यातून त्यांनी विधवांना आसरा दिला त्यांना स्वयंपूर्ण व्हायला मदत केली.

एका वर्षानंतर, पुण्याजवळ हिंगणे गावात विधवांसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली.

महर्षी कर्वे यांच्या विधवा वहिनी, पार्वतीबाई आठवले या शाळेच्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या.

यानंतर महिला विद्यालयाची स्थापना, आणि मुलींसाठी निवासी शाळ ही सुरू केली जिथं महिलांना नोकरीसाठी प्रशिक्षण दिलं जाई.

त्याचबरोबर मुलींसाठी मॅट्रिकचा समांतर अभ्यासक्रमही विकसित केला.

त्यानंतर बरीच वर्षे, महर्षी कर्वे हिंगणे ते पुणे हे अंतर पायी चालत जात.

महिलांच्या शिक्षणासाठी निधी उभा करायचा तर आपल्या मिळकतीत काटकसर करुन बचत करायची हे त्यांनी मनाशी पक्कं ठरवलं होतं.

त्यांच्या कार्याला विरोध करत समाजातील सनातनी व्यक्तींनी त्यांचा पदोपदी अपमान केला.

त्याकडं संपूर्ण दुर्लक्ष करत महर्षी कर्वे जनजागृती करतच राहिले.

पुरोगामी समर्थकांकडून देणग्या गोळा करण्यासाठी महर्षी कर्वे वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या व्यक्तींना भेटत.

महर्षी कर्वे यांच्या कार्यामुळे इतकी खळबळ माजली होती की दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्या पर्यंत ही बातमी पोचली.

त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत असलेले गांधी, त्यांच्या “इंडियन ओपिनियन” या साप्ताहिक प्रकाशनात त्याबद्दल कौतुकानं लिहायचे.

१९१४ ला फर्ग्युसनमधून निवृत्त झाल्यानंतर, अण्णासाहेब, महर्षी कर्वेंना त्यांचे आप्तस्वकीय प्रेमानं अण्णासाहेब म्हणत, तर त्यांनी त्यांचा वेळ सर्वात मोठं स्वप्न साध्य करण्यासाठी समर्पित केला.

टोकियोच्या महिला विद्यापीठापासून प्रेरणा घेऊन महर्षी कर्वे यांना भारतातील महिलांसाठी पहिले विद्यापीठ स्थापन करायचं होतं.

आर्थिक संकटामुळे हे स्वप्न अपूर्ण राहण्याची भीती असतानाच चिंताग्रस्त महर्षी कर्वेंनी मदतीसाठी विठ्ठलदास ठाकरसी यांच्याशी संपर्क साधला.

मुंबईतले उद्योगपती आणि परोपकारी व्यक्तीमत्व ठाकरसी यांनी या प्रकल्पासाठी १५ लाख रुपये देण्याचं मान्य केलं आणि नवीन विद्यापीठाला त्यांच्या आईचं नाव देण्याची विनंती केली.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठानं ( SNDT) १९१६ साली पुण्यात पहिल्या वर्षात फक्त पाच विद्यार्थिनीसह आपली सुरुवात केली.

आज, SNDT विद्यापीठात कला, व्यवस्थापन, तंत्रज्ञान, गृहविज्ञान आणि मानवता यासह २६ महाविद्यालये, मुलींसाठी ३ माध्यमिक शाळा आणि ३८ विद्यापीठ विभागांमध्ये ७०,०००पेक्षा जास्त विद्यार्थिनी शिकत आहेत!

महर्षी कर्वेंनी पुढे त्यांच्या सामाजिक सुधारणांच्या प्रयत्नांमध्ये प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी प्रशिक्षण महाविद्यालय, आणि गावातील प्राथमिक शिक्षणासाठी सोसायट्या स्थापन केल्या.

भारतातील पहिले महिला विद्यापीठ

त्यांनी १९२९ साली संपूर्ण अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि दक्षिण आशिया, जपान अशा सुधारित देशांना भेटी देऊन शिक्षण विषयक सम्मेलनांमध्ये भारतेचे प्रतिनिधित्व केले.

१९२९ साली आईन्स्टाईन बरोबर महर्षी धोंडो केशव कर्वे
१९२९ साली आईन्स्टाईन बरोबर महर्षी धोंडो केशव कर्वे

महर्षी कर्वेंनी जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठीही बरेच श्रम घेतले. जनजागृती करण्यासाठी अनेक गावांचा दौरा केला.

१९४४ मध्ये, त्यांनी मानवी समानतेच्या संवर्धनासाठी समता संघाची स्थापना केली आणि जन्माला येणारा प्रत्येक मानव समान आहे असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

१९५५ साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं.

SNDT मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेली महिलांची पहिली बॅच
SNDT मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेली महिलांची पहिली बॅच

१९५८ साली त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, “भारतरत्न” बहाल केला गेला आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून त्यांची प्रतिमा असलेलं टपाल तिकिट प्रसिद्ध केलं.

या थोर समाजसुधारकाच्या गौरवशाली जीवनाला आदरांजली वाहण्यासाठी दक्षिण मुंबईतील एका रस्त्याला महर्षी कर्वे मार्ग असे नाव देण्यात आलं होतं.

त्यांच्या निःस्वार्थ कार्याच्या सन्मानार्थ त्यांना ‘महर्षी’ ही उपाधी देण्यात आली.

धोंडो केशव कर्वे अनेकदा म्हणायचे की नुसता शाप देण्यापेक्षा अंधारात दिवा लावणं चांगलं.

नुसतं म्हणून महर्षी कर्वे थांबले नाहीत, तर स्वतः त्यांनी ते करून दाखवलं.

म्हणूनच, तर श्रीमती. ना. दा. ठाकरसी विद्यापीठ गीतात “हम दिशाए और ये दिनकर हमारा है” असा त्यांचा कृतज्ञता पुर्वक उल्लेख होतो.

१०४ वर्षाचं अर्थपूर्ण आयुष्य जगलेल्या या महर्षीने ९ नोव्हेंबर १९६२ ला आपला देह ठेवला.

या महा ऋषीनं स्वतः खस्ता खात, आपलं संपूर्ण आयुष्य अनेक मुली आणि विधवांचे जीवन उजळून टाकण्यासाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन समर्पित केलं.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।