नियतीने वारंवार नामोहरण हताश, नाउमेद करण्याचे प्रयत्न करावेत… जगण्याचे सर्व बळ हळूहळू संपुष्टात आणावे.
सामन्य जीवन जगण्यासाठी लागणारे शरीर पंगुत्वाने पार कमजोर करून टाकावे, तरी देखील एखाद्याने जगण्याची इच्छा न सोडता त्या अपंग शरीरावरच नव्हे, तर आपले भविष्य गिळू पाहणाऱ्या नियतीवरच मात करावी, याचे उदाहरण म्हणजे आधुनिक युगातील थोर शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग (Stephen Hawking)
अनेक संकटे आल्यावर देखील कोलमडून न पडता आयुष्याशी दोन हात कसे करावे हे जर शिकायचे असेल तर आपण यांचे चरीत्र अभ्यासावे.
तुम्ही जास्तीत जास्त दोन अडीच वर्ष जगू शकणार असे डॉक्टरांनी सांगितले, शरीराचे एक एक अवयव निरुपयोगी होत होते, परंतू यांची जगण्याची इच्छाशक्ती मात्र दिवसेंदिवस अधिकाधीक प्रबळ होत होती.
दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रचंड आशावाद, काळाशी झुंजणे इत्यादी शब्दसमूहांसाठी कोणी एकच शब्द सुचवायला सांगितले तर स्टीफन हॉकींग यांचे नाव घ्यावे लागेल.
आज त्यांची पुण्यतिथी…
स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ या दिवशी ऑक्सफर्ड, इंग्लंड येथे झाला.
त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. त्यांची आई इझाबेल ऑक्सफर्डची पदवीधर होती.
त्यांना फिलिपा आणि मेरी या दोन बहिणी आणि एडवर्ड हा दत्तक भाऊ अशी भावंडे होती.
घरची परिस्थिती बेताचीच होती, परंतु यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. त्यांनी १९५९ साली वयाच्या १७ व्या वर्षी विश्वशास्त्र (कॉसमॉलॉजी) हा विषय निवडून ऑक्सफर्ड मध्ये प्रवेश घेतला, त्यासाठी त्यांना स्कॉलरशिप देखील मिळाली होती.
१९६२ मध्ये येथून पदवी संपादन केल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी केम्ब्रिज विद्यापीठात दखल झाले.
त्यांना भौतिकशास्त्र, गणित इत्यादी विज्ञान विषयाची आवड लहानपणापासूनच होती. केम्ब्रिज विद्यापीठातील शिक्षण अंतिम टप्यात असतांना काळाने त्याच्या शरीरावर झडप घातली व एका असाध्य रोगाने त्यांच्या शरीरात ठाण मांडले.
या रोगामुळे शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण संपून जाते. याच्या सुरूवातीच्या काळात अशक्तपणा जाणवतो मग अडख़ळत बोलणे, अन्न गिळतांना त्रास होणे, हळूहळू चालणे फिरणे आणि बोलणे बंद होत जाते.
सामान्य जीवन जगणे जवळजवळ अशक्य करणारा हा आजार म्हणजेच मोटर न्यूरॉन डिसीज (MND) होय. यालाच अमायो ट्रॉपिक लॅटरल स्क्लोरोसिस (A.L.S.) असे देखील म्हणतात.
हा असाध्य आजार झाल्यावर स्टीफन जवळ जवळ ५५ वर्ष जगले. ते निव्वळ जगलेच नाहीत तर यशाचे एक एक शिखर पादाक्रांत करत गेले.
त्यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हील चेअरचा आधार घ्यावा लागला. मग या व्हील चेअरलाच एक संगणक जोडण्यात आला.
फक्त एक बोट वापरून ते या संगणकावर हवे ते काम करू लागले. १९८५ साली त्यांच्यावर श्वास नलिकेला छिद्र करून एक शस्त्रक्रिया करण्यात आली पण त्यामुळे हॉकिंग यांचा आवाज कायमचा गेला.
नंतर संगणकतज्ज्ञ डेव्हिड मेसन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्या संगणकासाठी एक नवी आज्ञावली (प्रोग्राम) लिहून ती त्या संगणकात कार्यरत करून दिली. यामुळे संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून हॉकिंग बोलू लागले, मार्गदर्शन करू लागले.
स्टीफन हॉकिंग यांनी अभ्यास करून संपूर्ण विश्वाचाही तार्याप्रमाणेच अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला, या प्रबंधावर स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरेट मिळाली.
याच प्रबंधाचा पुढचा भाग “Singularities and the geometry of spacetime” हा प्रबंध स्टीफन यांनी लिहिला. या प्रबंधासाठी १९६६ सालचे “ऍडम्स प्राईझ” त्यांना मिळाले होते.
स्टीफन हॉकिंग यांनी नंतर कृष्णविवर (ब्लॅक होल) या विषयाकडे आपले लक्ष वळविले. यावर आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाची (थेअरी ऑफ रेलॅटिव्हिटी) जोड देऊन गृहिते मांडणे सुरू केले.
त्यावेळी हॉकिंग आपल्या शरीराची हालचाल करू शकण्यास असमर्थ होत गेले. एवढी अवघड गणिते त्यांनी केवळ मनातल्या मनात सोडविली.
१९७४ साली हॉकिंग यांनी पहिल्यांदा पुंज यामिक (क्वांटम मेकॅनिक्स) आणि सापेक्षतावादाची (थेअरी ऑफ रेलॅटिव्हिटी) सांगड घालून दोन सिद्धांतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला.
स्टीफन हॉकिंग यांच्या या प्रबंधाला आधी जोरदार विरोध झाला पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणार्या किरणोत्सर्जनाला “हॉकिंग उत्सर्जन” असे नाव देण्यात आले.
पुढे स्टीफन हॉकिंग यांचा कृष्णविवर या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या नेचर या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला व त्यांची रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवड झाली.
त्यांनी १९८८ साली लिहलेल्या “ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम” या पुस्तकाने अनेक नव नवे विक्रम प्रस्थापित केले. या पुस्तकाचे जगभरातील सुमारे चाळीस भाषेत भाषांतर झाले असून, ते बेस्ट सेलर म्हणून नोंदल्या गेले आहे. मराठी भाषांतरित पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
या पुस्तकात त्यांनी कॉस्मॉलॉजी अर्थात विश्वाचा आरंभ व विकास, आकाशातील कृष्णविवरे नेमकी कशी तयार होतात यांचा अभ्यास केला असून, कॉस्मॉलॉजी या क्षेत्रात हे पुस्तक अतिशय महत्वाचे ठरले.
सन २००९ मध्ये त्यांना प्रेसिडेन्शीअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेले. केंब्रिज मध्ये ३० वर्षे त्यांनी अध्यापन केले आहे.
ते वयाच्या ३५ व्या वर्षी केंब्रिज विद्यापीठात लुकाशियन प्रोफेसर बनले व एकेकाळी आयजॅक न्यूटन ज्या खुर्चीवर बसायचे त्या खुर्चीवर बसू लागले.
त्यांच्या विज्ञान क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ऑक्सफर्ड विद्यापीठ, प्रिन्स्टन विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ, लँकेस्टर विद्यापीठ या प्रतिष्ठित विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे.
विज्ञान विषयात काम करीत असतांनाच हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी, त्यांच्या सोयींसाठी आणि त्यांच्यावरील अन्यायासाठी लढा दिला. यासाठी हॉकिंग यांना १९७९ ला “रॉयल् असोसीयेशन फोर डीसअबीलीटी अन्ड रीहाबिलीटेशन” या संस्थेकडून ‘मॅन ऑफ दि इयर’ हा किताब देण्यात आला होता.
त्यांच्या जीवनावर आधारित “थेअरी ऑफ एव्हरीथिंग” हा चित्रपट लोकप्रिय आहे. त्याना खाजगी आयुष्यात देखील अनेक उतार चढाव बघावे लागले.
त्याची पहिली पत्नी जेन आणि स्टीफन यांना तीन मुलं झाली. २५ वर्षं संसार केल्यानंतर दोघे वेगळी झाली. त्यानंतर हॉकिंग यांनी त्यांची नर्स एलियन मेसनसोबत लग्न केलं. ११ वर्षं नंतर ते देखील वेगळे झाले.
जेवढे त्यांचे शरीर कमजोर होत होते तेवढा त्यांचा मेंदू सशक्त होत होता. त्यांनी जे अफाट संशोधन केले त्यासाठी त्यांनी जणू मृत्यलाच ५५ वर्ष थोपवून ठेवले हॊते.
दिवसेंदिवस शरीर तर झिजत होते पण त्यांचे मन मात्र नवनिर्मितीच्या, विश्वाच्या मांडणीची उकल करण्याच्या ध्यासाने झपाटलेले होते. अशा या वादळाचे शरीर आज निर्जीव झाले असले तरी त्यांच्या या कामातून प्रेरणा घेऊन उद्या नवनवीन संशोधक तयार होतील.
खाली दिलेली पुस्तके ऑनलाईन खरेदी करण्यासाठी पुस्तकाच्या नावावर क्लिक करा
स्टीफन हॉकींग यांच्या आयुष्यावर पुस्तक… मराठी
स्टीफन हॉकिंग यांचे आत्मचरित्र
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
khup chan..
धन्यवाद
1 नंबर
1 नंबर व्वा
Thanks !
Very nice