सध्या कोविड काळात माणसं वेगवेगळ्या तऱ्हेने त्रस्त झाली आहेत.
कोणाच्या घरात आजारपण, कोणाकडे वयस्क लोक, कोणाकडे लहान मुलं, अशातच घटलेलं आर्थिक उत्पन्न, कोणाची नोकरीच गेलेली.
ज्यांना या गोष्टीची फारशी झळ बसली नाही त्यांनी लॉकडाउन काळ थोडाफार एन्जॉय सुद्धा केला असेल.
पण बहुतेक जणांकडे परिस्थिती अशी झाली की कमावता एखादाच आणि खाणारी तोंडं चार.
अशात नैराश्य येणं स्वाभाविक आहे. परिस्थिती अशी होते की एक माणूस खचलं की घरात सगळेच खचायला लागतात.
अशावेळी निराश होणं, परिस्थितीचा नुसताच बरा वाईट विचार करत बसणं हा उपाय असू शकत नाही.
आहे ते स्वीकारून सकारात्मक काम करणं खूप गरजेचं असतं.
काय म्हणताय?? असं होऊ शकेल का??
असा प्रश्न पडला का तुम्हाला??
तर याच उत्तर ‘हो’ असंच आहे.
ऐकणारे, वाचणारे तोंडात बोट घालतील अशी कमाल कामं काही लोकांनी याच काळात केली.
काही जणांना शेतीमध्ये नवीन प्रयोग करता आले.
स्वयंपाकघराचा ताबा घेऊन कितीतरी वेगवेगळ्या पाककला लोकांसमोर आल्या.
Vocal for local म्हणत स्थानिक वस्तू खरेदीसाठी ग्राहकांना वळवण्यात काहीजण यशस्वी झाले.
हे सगळं करत असताना शिक्षण, वय अशा गोष्टींचा संबंधही आला नाही.
कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी पैसा महत्वाचा असतो हे खरं आहे.
तो मिळवण्यासाठी जिद्द आणि कष्ट दोन्हीची तयारी असावी लागते.
मग ती नोकरी असो, व्यवसाय असो किंवा उद्योग.
यातही चढ उतार येतात. पण म्हणून हुरळून न जाता किंवा खचून न जाता कामात सातत्य टिकवता आलं पाहिजे.
वेगळं काहीतरी करून यशस्वी होण्याचा आत्मविश्वास हवा.
या सगळ्याचं एक छान उदाहरण या लेखात पाहुया..
ही गोष्ट आहे एका आजी आणि नातीची.
या दोघींनी अगदी ठरवून स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
विशेष म्हणजे हे करताना आजीचं वय होतं चक्क ९२ वर्षे.
आजीचं नाव राजिंदर कौर आणि नातीच नाव अमृता छतवाल.
या दोघींनी ‘अम्मीजी’ या नावाने लोणची, पापड ,मसाले तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला.
या व्यवसायातले सगळे पदार्थ आजीच्या पद्धतीने तयार होतात.
१९४८ मध्ये राजिंदर कौर १८ वर्षाच्या असताना अमृतसरमध्ये त्यांच लग्न झालं.
सासरी आल्यावर कित्येक दिवस त्यांच्या मनासारखा चहा होईना.
म्हणून एक दिवस त्यांनी बाजारातून वेगवेगळे मसाले चहासाठी आणले.
जवळपास एक आठवडा वेगवेगळे मसाले वापरून चहा करून पाहिला.
पण हवा तसा होईना. शेवटी एक दिवस त्यांच्या मनासारखा चहा झाला.
त्यातून एक गोष्ट अशी झाली की तीच चहाची चव टिकवण्यासाठी तोच विशिष्ट मसाला कायम वापरण्याचा त्यांचा उत्साह वाढला.
गेल्या ७२ वर्षांपासून आजी हा त्यांचा खास चहा बनवत आहेत.
इतकंच काय त्या कुठे परगावी गेल्या तरी तो चहा मसाला कायम सोबत ठेवत.
अशा प्रकारे चहा मसाल्याचा ‘अम्मीजी’ नावाचा ब्रॅंड त्यांनी तयार केला.
पुढे हा चहा मसाल्याचा वारसा त्यांच्या लेकीकडे आणि नातीकडे आला.
या मसाल्यासंदर्भात नात अमृताने फेसबुक वर एक पोस्ट लिहिली.
त्या पोस्टला अनेक प्रतिक्रिया मिळाल्या.
त्यावरून अमृताला कल्पना सुचली की हा अम्मीजी नावाचा ब्रॅंड सोशल मीडिया मधून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला तर…
एप्रिल २०१८ पासून अम्मीजी नावाचा ब्रॅंड लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली.
तेव्हा तो फक्त चहाच्या मसाल्यापुरता मर्यादित होता.
सुरूवातीला सगळ्यांनाच उत्साह होता. पण नंतर आजींना शंका होती की चहाचा मसाला बाजारात किती खपेल??
लोकांकडून त्याला तेवढी मागणी मिळेल का??
मग आजी आणि नात गप्प बसल्या नाहीत.
पुढे दोन वर्षात एकेक करून त्यांनी ४० उत्पादनं या ब्रॅंडच्या नावाखाली आणली.
यात वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, लोणची, पापड या गोष्टी आल्या.
यातली काही खास उत्पादनं अमृतसरमध्ये आजींच्या देखरेखीखाली तयार होतात.
सुरूवातीला फायद्याचा विचार न करता गुंतवलेला पैसा मिळवता येतो आहे का याकडे लक्ष दिलं.
व्यवसाय म्हटल्यावर आधी ग्राहकांचा विचार करणं आवश्यक आहे.
ग्राहकांना नेमकं काय हवं आहे याचा अंदाज घेता आला पाहिजे.
उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहचल्यावर त्यांचा मिळणारा अभिप्राय सुद्धा महत्वाचा असतो.
ही व्यावसायिक गुपितं आजी आणि नातीने नेमकी हेरली.
उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचताना त्याबरोबर एक वैयक्तिक चिठ्ठी अमृता स्वतः लिहून देते.
ग्राहक या नात्याने घनिष्ठ संबंध तयार व्हावे हा यामागचा उद्देश असतो.
त्यामुळे व्यवसाय हा केवळ पैशापुरता मर्यादित न राहता त्याला एक नैतिक बळ मिळतं.
‘अम्मिजी’ ब्रॅंडच्या उत्पादनांना आता देशभरात मागणी आहे.
विशेषतः महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा. इतकच काय पण आसाम, नागालँड मध्येही ही उत्पादनं आता वितरीत होत आहेत.
अमृताच्या म्हणण्यानुसार सोशल मीडियामुळे ग्राहकांपर्यंत पोहोचणं जास्त सोपं आहे.
त्यामुळे उत्पादनात वाढ करून ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं शक्य झालं आहे.
ही काल्पनिक गोष्ट नाहीये. जे सामान्य माणूसही करू शकतो तेच यांनी केलं.
या आजी नातीकडे असं काय वेगळं होतं??? ज्यामुळे त्या इतक्या यशस्वी झाल्या. तर एकेक मुद्दा बघुया…
१. आवड :
कोणतही काम करण्यासाठी मुळात त्या कामाची एखाद्याला आवड असावी लागते.
तरच ते काम सातत्यानं आणि निगुतीनं करता येऊ शकतं.
लादलेलं काम करण्यापेक्षा आवडीचं काम करताना त्याचं ओझं वाटत नाही.
२. जिद्द :
आवडीचं काम पूर्ण करण्यासाठी काहीसा जिद्दी स्वभाव असावा लागतो.
अडीअडचणी आल्या तरी त्यावर मात करता आली पाहिजे.
३. आत्मविश्वास :
कोणतीही गोष्ट करण्यासाठी आधी आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे.
कोणतंही दडपण न घेता काम करता आलं पाहिजे.
कधी काही चुका झाल्याच तर वेळेवर सुधारणा करणं महत्वाचं.
४. संभाषण कौशल्य :
‘जो बोलतो त्याची मातीही विकली जाते, जो बोलत नाही त्याचं सोनंसुद्धा विकलं जात नाही ‘….
हे अगदी खरंय. तुम्ही जर एखादा व्यवसाय करत असाल तर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी चांगलं संभाषण कौशल्य असलंच पाहिजे.
आपलं उत्पादन नेमक्या शब्दात लोकांसमोर मांडता आलं पाहिजे.
ग्राहकांना ते घेण्यासाठी प्रवृत्त करता आलं पाहिजे.
५. समाज माध्यमांचा योग्य वापर :
आजकाल कोणत्याही उत्पादनाची जाहिरात आणि विक्री करण्यासाठी समाज माध्यम हा उत्तम पर्याय आहे. अशा तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं.
६. व्यावसायिक नैतिकता :
व्यवसाय करताना काही नैतिक जबाबदाऱ्या स्वीकारता आल्या पाहिजेत.
उत्पादनाची गुणवत्ता राखणं, योग्य मूल्य ठरवणं, ग्राहकांचा अभिप्राय मिळवणं, त्यानुसार सुधारणा करणं अशा काही गोष्टी जमल्या की व्यावसायिक सफलता मिळवता येतेच.
सध्या आपल्यापैकी अनेकजण नोकरी नसल्यामुळे बेरोजगार होत आहेत.
आपल्याकडेही असे काही गुण असतील तर इतरांकडून मिळणाऱ्या संधीची वाट पाहण्यापेक्षा स्वतः कामासाठी संधी तयार करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
लेख खूपच छान आहे…