आयुष्यात आपल्यावर अनेक व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव पडत असतो अश्याच निवडक व्यक्तिमत्त्वांचा आदर्श आपण आपल्या समोर ठेवतो.
पण आपलं आयुष्य कोणाला तरी आदर्श वाटेल अशी उंची गाठायला आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते.
आई- वडील हे नेहमीच मुलांसाठी पहिले व्यक्तिमत्व असते ज्याचा प्रभाव त्यांच्या आयुष्यावर पडत असतो.
त्यामुळेच लहानपणी बाहेरच्या जगाची ओळख झालेली नसताना प्रत्येक मुल हे आपल्या आई वडिलांना आपलं आदर्श मानून पुढे वाटचाल करत असते.
आपण आपल्या मुलांपुढे कोणता आदर्श मांडत आहोत हा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपला खरा आरसा दाखवतात. अशीच एक गोष्ट जी अमेरिकेत घडली होती.
अमेरिकेच्या शिकागो राज्यात एक खूप मोठा वकील होता. वकीली मधला त्याचा अभ्यास खूप होता. कायद्यातील बारकावे, लूप होल्स त्याला चांगल्याच ठाऊक होत्या.
त्यामुळे साहजिक वाईट प्रवृत्ती, गुंडगिरी, ड्रग्स स्मगलिंग करणाऱ्या अनेक नामचीन गुंडाना कायद्याच्या कचाट्यामधून निसटण्यासाठी त्याची मदत लागत होती.
पैश्याचं आमिष आणि सुख उपभोगण्याची वृत्ती ह्यामुळे हा वकील नकळत ह्या वाईट लोकांचा तारणहार झाला. अनेकवेळा कायद्याच्या कचाट्यातून ह्या वाईट प्रवृत्तींना वाचवल्यावर त्यांची मर्जी ह्याच्यावर बसली.
आता त्याच्या हातात पैसा खेळू लागला. एका शहारा एवढी जागा, अनेक गाड्या इतकंच काय तर पूर्ण एक विमान त्याच्या सेवेला हजर झालं.
दारू, पार्ट्या आणि बायका अश्या सगळ्या चंगळवादी गोष्टी त्याच्या आयुष्याचा भाग होत्या.
श्रीमंत, सुखी माणसाची स्वप्न तो प्रत्यक्ष अनुभवत होता.
पण एक दिवस त्याला प्रश्न पडला की आपल्या मुलांसमोर आपण काय आदर्श ठेवतं आहोत. एक बाप जो खूप श्रीमंत आहे पण त्याच्या सुखाचे, श्रीमंतीचे इमले हे वाईट गोष्टी करून उभे केलेले आहेत.
समाजात गुंडगिरी करून अनेक निष्पाप लोकांचा बळी घेऊन हे पैसे कमवलेले आहेत. अनेक तरुण मुलांना ड्रग्सच्या नशेत अडकवून आपण मोठे झालो आहोत.
उद्या ह्याची सावली माझ्या मुलाच्या भविष्याला ग्रहण लावणार नाही कशावरून?
कुठेतरी ह्या प्रश्नाने त्याला अस्वस्थ केलं. ह्या दुष्टचक्रातून बाहेर पडून आपल्या मुलासमोर आदर्श ठेवण्याची त्याची इच्छा होती पण त्यासाठी मोजायला लागणारी किंमत मात्र खूप मोठी असेल ही कल्पना ही त्याला होती.
पण वाट्टेल ती किंमत मोजून त्याने आपला मार्ग बदलवला तो आपल्या मुलासमोर आदर्श उभा करण्यासाठी.
तो एफ.बी.आय. साठी माफीचा साक्षीदार बनला. त्याच्या जबानीमुळे तो गुंड गजाआड गेला. पण त्याच्या माणसांनी ह्याचा गेम केला. गाडीतून जात असताना त्याचा खून करण्यात आला. गोष्ट इकडे संपत नाही.
१९४२ चं वर्ष होतं.
अमेरिका दुसऱ्या महायुद्धाचा भाग होऊन युद्ध लढत होती. अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका यु.एस.एस. लेक्झीन्टन न्यु आर्यलँड च्या समुद्रात गस्त घालत होती.
शत्रूवर हल्ला करण्यासाठी ह्या युद्धनौकेवरून अनके लढाऊ विमानांनी उड्डाण भरलं.
थोडं अंतर गेल्यावर एका पायलट च्या लक्षात आलं की आपल्या विमानात इंधन भरलेलं नाही. हे लक्षात येताच तो पुन्हा माघारी फिरला.
परत येताना त्याच्या रडारवर जे दिसलं त्याने त्याला काय होणार ह्याचा अंदाज आला.
जपान ह्या शत्रू राष्ट्राची नऊ बॉम्बर विमान युद्धनौका यु.एस.एस. लेक्झीन्टन वर हल्ला करण्यासाठी येतं होती.
ह्या वरील लढाऊ विमानं आधीच दुसऱ्या लढाईसाठी गेली असल्याने त्या युद्धनौकेवर असलेल्या जवळपास २००० सैनिकांचं आयुष्य टांगणीला लागलं होतं.
एकतर युद्धनौका पूर्ण नष्ट होईल अथवा बॉम्बमुळे होणारी हानी खूप असेल हे त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.
कमी असलेलं इंधन, दारुगोळा आणि समोरून येणारी ९ लढाऊ विमानं…. आता निर्णायक क्षण होता.
पण त्याने मागचा पुढचा विचार न करता त्या ९ विमानांवर हल्ला केला.
त्वेषाने केलेला हा हल्ला जपानच्या विमानांसाठी अनपेक्षित होता. त्याच्या त्या त्वेषाने जपानी शत्रू पूर्ण गोंधळून गेले.
काय होते आहे हे लक्षात यायच्या आधी ह्या पायलट ने जपानच्या ५ लढाऊ विमानांना जलसमाधी दिली होती.
तोवर इतर विमाने मदतीला आली आणि त्यांनी बाकीच्या विमानांचा खात्मा केला.
स्वतःच्या विमानात इंधन नसताना, गोळ्या लागल्यावर ही ह्या पायलट ने आपल्या देशाच्या युद्धनौकेच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही.
ती ९ विमानं आणि युद्धनौका ह्या मध्ये हा एकमेव पायलट उभा राहिला.
त्याच्या ह्या अतुलनीय शौर्याबद्दल त्याला अमेरिकेच्या सर्वोच्च सैनिकी सन्मान “मेडल ऑफ ऑनर” ने सन्मानित करण्यात आलं.
हा सन्मान मिळवणारा अमेरिकन नेव्ही चा हा पहिला पायलट ठरला. त्या पायलट चं नाव होतं ‘एडवर्ड ओ’हारे’
एडवर्ड हा त्याच वकिलाचा मुलगा होता ज्याने आपल्या मुलांपुढे आदर्श ठेवण्यासाठी सगळ्या सुखांवर, श्रीमंतीला लाथ मारत आपल्या जीवाची पर्वा केली नव्हती.
त्या वकिलाचं नाव होतं ‘एडवर्ड जोसेफ ओ’हारे’ ज्याला ‘इझी एडी’ असंही म्हंटल जायचं.
आज शिकागो मधील आंतरराष्ट्रीय विमानतळ ओ’हारे विमानतळ म्हणून ओळखला जातो.
आपल्या वडिलांनी समाजातील वाईट लोकांविरुद्ध उचलेलं पाऊल एडवर्ड ज्युनिअर नी बघितलं होतं. आपल्या वडिलांनी ते पाऊल टाकताना आपल्या जिवाचं काही बरं वाईट होईल ह्याची कल्पना त्यांना होती पण तरीही त्यांनी योग्य तेच पाऊल टाकलं.
अनेक वर्षांनी एडवर्ड ज्युनिअर च्या समोर पण हाच निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा त्याने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा आदर्श समोर ठेवून आपल्या जिवापेक्षा आपल्या देशाला महत्व दिलं.
त्यामुळेच आज त्याचं नाव त्याच्या पश्चात पूर्ण जगात लोकांच्या ओठावर सन्मानाने घेतलं जाते.
आपण आपल्या मुलांसमोर काय आदर्श ठेवतो ह्याचा विचार प्रत्येक सुजाण आई वडिलांनी नक्कीच करावा. आपण टाकलेलं प्रत्येक पाऊल हे आपल्या मुलांचं उद्याचं भविष्य घडवत असतं.
मनाचेTalks च्या वाचकांचे अभिप्राय:
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Pl discuss about
Alkohol addiction
Pl discuss about
Alkohol addiction
There is one article about a person who recovered from alcohol addiction.