“तमाम भारतीयांनी हाल अपेष्टा अणि त्यागातून मिळवलेल्या स्वातंत्र्याच्या या पवित्र क्षणी, आम्ही भारत व भारतवासीयांच्या सेवेसाठी स्वत:स अर्पित करत असून, प्राचीन परंपरा लाभलेल्या या पावन भूमीची प्रतिष्ठा व वैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी आपले योगदान देण्यास कटिबद्द आहे..”….. सात दशकांपूर्वी आजच्याच दिवशी ही शपथ घेवून स्वंतत्र भारताचा नवा अध्याय सुरु झाला होता… या प्रवासात आपण कोठुन कुठपर्यंत आलोय याच सिंहावलोकन करण्याचा हा छोटासा प्रयत्न..
नियतीशी करार..
१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री पारतंत्र्याच्या काळ्याकुट्ट पडद्याला बाजूला सारून स्वतंत्र्याचा सोहळा रंगमंचावर मांडण्यात आला. सूत्रसंचालकाची भूमिका पंतप्रधान पंडित नेहरू यांनी चोखपणे निभावली..”अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता..” या अजरामर आणि ऐतिहासिक भाषणातून नेहरूंनी देशाला स्वबळावर भरारी घेण्याचे स्वप्न दिले. मात्र हा प्रसंग साकार होण्यासाठी सहशत्रवधी स्वातंत्र्यसैनिकांना आपल्या आयुष्याचा होम करावा लागला..कित्येकांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागली, काहींना तोफेच्या तोंडी दिले गेले, अनेकांना अन्न पाण्याविना तडफडून मरावे लागले, तर काहींना ऐन तारुण्यात फासावर जावे लागले. जहाल आणि मवाळ अशा दोन्ही माध्यमांचा वापर करत, अनंत हालअपेष्टा सहन करून सुमारे दीडशे वर्षांच्या लढ्यानंतर भारतीयांनी ब्रिटिशाना देशातून हुसकावून लावले..अन तेंव्हा हे तिरंगी दृश्य साकार झाले.
मध्यरात्री १२ च्या ठोक्याला वर्षानुवर्षाच्या गुलामगिरीच्या शृंखला गळून पडल्या..भारताचे पारतंत्र्य संपले. बंदुकीच्या सलामीने जगाच्या इतिहासात एक नवे पर्व सुरु झाल्याची ग्वाही दिली. आणि यांनंतरच्या पुढील काळात स्वतंत्र भारत प्रगतीच्या विविध कक्षा पार करू लागला.
अनेक स्वातंत्रवीरांच्या बलिदानातून महत्प्रयासाने मिळालेले भारतीय स्वातंत्र आज ७० वर्षाचे झाले आहे. या काळात देशाने अनेक संघर्षातून, वादविवादातून, नैसर्गिक आपत्तीतून व शेजारी राष्ट्रांच्या वक्र दृष्टीतून मार्ग काढत लक्षणीय प्रगती केली. क्रिकेट, अर्थकारण, विज्ञान, तंत्रद्यान या क्षेत्रात भारताने घेतलेल्या भरारीने तर ब्रिटिशानाही भारताकडे ओशाळलेल्या नजरेने बघण्याची वेळ आणली आहे. विकासपथावर वेगाने मार्गक्रमण करत आपण आज महासत्ता होण्याचं स्वप्न पाहत आहोत निश्चितच येत्या काही वर्षात ते पूर्णत्वास जाईल! मात्र ज्या वेगाने देश प्रगती करतोय, त्याच्या दुप्पट वेगाने तो विविध समस्यांनी वेढला जात आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय विषमता, भ्रष्टाचार, दहशतवाद, अन्याय, अत्याचार, उपेक्षा, शोषण या समस्या आक्राळ-विक्राळ रूप धारण करू लागल्या आहेत. ‘भारत’ आणि ‘इंडिया’ मधील विषमतेची दरी वाढत चाललीय. अनेकांना आजही त्यांच्या प्राथमिक गरजांसाठी संघर्ष करावा लागतोय, त्यामुळे स्वातंत्र्याच्या सात दशकाच्या प्रवासात आपण कोठून कुठपर्यंत आलो याचं सिंहावलोकन करणं पुढील प्रवासासाठी उपयुक्त व दिशादर्शक ठरणार आहे.
लोकांनी, लोकांसाठी चालविलेल्या लोककल्याणकारी शासनपद्द्तीचा आपण स्वीकार केला आहे, जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देश्याकडे गौरवाने पाहले जाते. परंतु, सत्तर वर्ष उलटली तरी ‘लोक’ तंत्राने आणि ”लोकांच्या’ हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन हा देश चालवला जातोय..! असे म्हणायला मन धजावत नाही. ब्रिटिश गेले पण त्यांची प्रवृत्ती राज्यकर्त्यात जिवंत राहिली. काहींनी धनशक्तीच्या आणि दंडुकेशाहीच्या जोरावर सत्ता हाती घेत समतेची आणि स्वातंत्र्याची महनीय मुलतत्वे बंदिस्त करून ठेवली..
त्याचा प्रकाश सामान्यांपर्यंत पोहचूच दिला नाही. लोकशाहीचे पवित्र मंदिर संसद देखील शाबूत राहिलेली नाही.. चर्चा वादविवादाऐवजी तिथे गुंडगिरी व आरडाओरडच जास्त होतो. आज सामन्यांतून समोर येणारा असंतोष त्याचाच परिपाक म्हटला पाहिजे. अर्थात या सर्व परिस्थितीचा दोष केवळ व्यवस्थेलाच देता येणार नाही तर, काही अंशी आपण सगळेच यासाठी जबाबदार आहोत. कुठलाही स्वातंत्र्यालढा किंव्हा अन्य कोणतेही ओझे न वाहता स्वातंत्र आणि त्याची गोमटी फळे चवीने चाखणाऱ्या आजच्या पिढीने राष्ट्रीय राजकारणातून अंग काढून घेतले आहे. लोकशाही प्रक्रियेत लोकांचा सहभाग सर्वात महत्वाचा असतो, परंतु आपल्या देशात मात्र अधिकारांबाबत जागरूक असलेले बहुतांश नागरिक कर्तव्याच्या बाबतीत विचारही करताना दिसत नाही. घटनेने दिलेला मतदानाचा सर्वोच्च अधिकार बजावण्याबाबत समाजात कमालीची उदासीनता आहे, तर हे अमूल्य ‘दान’ विकणाऱ्या नतद्रष्ट औलादीही अनेक आहेत. प्रत्येक जण प्रथम आपल्या कुटुंबाचा नंतर जातीचा आणि उरलेच तर प्रांताचा विचार करताना दिसतो. ‘मी भारतीय आहे, आणि त्या नात्याने मला देशाचा विकास करायचा आहे’ अशी विचारधारा ठेवणारे फार कमी आहेत.
देशाला गुलामगिरीच्या जोखाडातून मुक्त करण्यासाठी आपल्या सर्वस्वाची होळी करून स्वातंत्र्यलढ्याच्या अग्निकुंडात समर्पित होणाऱ्या क्रांतीवीरांचा देदीप्यमान इतिहास याच मातीत घडला…पण आपण तो विसरलो.. आज आपल्याला देशभक्ती शिकवावी लागते.. त्यासाठी विविध कार्यक्रम राबवावे लागतात.. कारण आपली देशभक्ती आणि राष्ट्रभिमान फक्त सोशल मीडियावरच उतू जात असतो….. फार तर राष्ट्रीय सणाच्या दिवशी दुचाकी-चारचाकीला एखादा चिमुकला तिरंगा झेंडा लावायचा, सक्तीचे आहे म्हणून झेंडावंदनाला जायचे. आणि नंतर हॉलिडे एन्जॉय करायचा… ही मनाला चटका लावणारी मानसिकता समाजात रुजत असल्याचे खेदाने नमूद करावे लागत आहे.
मुळात आजच्या पिढीला स्वातंत्र्याचा अर्थच उमगला नाही, स्वातंत्र्याचा संकोच ते स्वातंत्र्याचा अतिरेक असा प्रवास आपण करतो आहोत. अधिकारांचे स्वतंत्र आपल्याला हवे आहे, मात्र स्वातंत्र्याला कर्तव्याच्या जबाबदारीची चौकट असते हे सोईस्करपणे विसरल्या जाते. मागील काही दिवसांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत असल्याचा देशभर दिंडोरा पिटण्यात आला होता.. ते याचेच एक उदाहरण. हा देश स्वतंत्र आहे, येथील नागरिकांना राज्य घटनेने अनेक अधिकार दिले आहेत….. सोबतच काही कर्तव्येही सांगितली आहे. अधिकार आणि कर्तव्याची योग्य सांगड घातली तरी स्वातंत्र्याचा परिपूर्ण आनंद घेता येऊ शकेल. नाहीतर स्वातंत्र्याला स्वैराचाराचे रूप येऊन आपण अधोगतीच्या मार्गाकडे जाऊ. ही बाब लक्ष्यात घेतली पाहिजे.
तद्वातच यंदाचा स्वातंत्रदिन साजरा करत असताना ‘जे स्वातंत्र आज आपण उपभोगत आहोत त्याचं मूल्य आपल्याला समजलं आहे का?’ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अनिबंर्धता का बोकाळू पाहत आहे? स्वातंत्र नावाच्या उदात्त तत्वचं गेल्या सत्तर वर्षात आपण काय केलं आहे? हे आत्मचिंतनपर प्रश्न निदान आजच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावे. अर्थात त्यासाठी ‘तुका म्हणे होय मनाशी सवांद.. आपलाही वाद आपणाशी..’ या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे खोलात जाण्याची गरज नाही.. अगदी स्वातंत्रदिनाचे झेंडावंदन करत असताना किंवा त्यानंतर आपण जो प्लॅन ठरविला आहे त्याचा आनंद घेत असतानाही या प्रश्नांवर अंतर्मुख होता येईल ! फक्त कविवर्य ग.दि मांडगूळकरांच्या या ओळी आठवा…
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे,
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे;
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे
येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच ‘सत्य’ आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे..!
” या देशाला पारतंत्र्याच्या बेडीतुन मुक्त करण्यासाठी ज्यांनी आयुष्याचा होम केला, तुरुंगवास भोगला, अनंत हालअपेष्टा सहन केल्या, प्राणांची आहुती दिली त्या लक्षावधी स्वातंत्र्यसैनिकांना आणि हुतात्म्यांना; स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या सीमांच्या व अखंडतेच्या रक्षणासाठी ज्या जवानांनी आपले प्राण दिले त्या सर्वाना विनम्र अभिवादन..!!
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.