सध्या कुठल्याही क्षेत्रात ‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’ या संकल्पनेला फार महत्त्व आलेलं आहे.
त्यासाठी पैसे भरुन कोर्सही केले जातात. काही जणांना त्याचा निश्चित फायदा होतो.
काहींना वाटतं हे उगाच काहीतरी फँड आहे. या व्यक्तीमत्व विकासाची खरंच गरज आहे का?
नक्कीच आहे. कारण त्यामुळे फक्त व्यक्तीचा नाही, तर देशाचा फायदा होतो. ही गोष्ट पटवून दिली ‘स्वामी विवेकानंदांनी’….
सव्वाशे वर्षांपूर्वी व्यक्तिमत्त्व विकासाची संकल्पना त्यांनी मांडली.
आपल्या देशाला खऱ्या अर्थाने महासत्ता बनवायचं असेल तर आजच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या युगात व्यक्तीमत्व विकासाची ही भूमिका नीट समजून घ्यायला हवी.
एकीकडे सोशल मीडिया मध्ये गुंतुन माणूस दिवसेंदिवस आत्मकेंद्रित होत चालला आहे, दुसरीकडे स्वत:चं व्यक्तिमत्त्व घडवण्याचीही त्याची धडपड सुरू आहे. (हो पण सोशलमिडीयावरील मनाचेTalks मध्ये गुंतून मात्र तुमचा सर्वांगिण विकास होईल, एवढं नक्की!)
या कात्रीतून मार्ग काढण्यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार आज ही उपयोगी ठरतात.
कोणतीही व्यक्ती जितकी स्वतःच्याच विचारात गुरफटत जाते, स्वतःच्याच भल्याचाच विचार करते तितकी दुसऱ्यासाठी कार्य करण्याची, मदत करण्याची त्या व्यक्तीची शक्ती, इच्छा कमी होत जाते.
याचं उत्तम उदाहरण आपण सोशल मिडियावर सातत्यानं बघतो. एखाद्या प्रसंगी व्यक्तीला मदत करण्याऐवजी बरेच जण व्हिडीओ करण्यात गुंतून पडतात.
हा प्रकार भयंकर आहे. तो वेळीच थांबला पाहिजे.
यासाठीच विवेकानंदांनी सांगितलं देशाला खरी गरज आहे ती लोखंडी स्नायूंची, पोलादी मज्जातंतूंची आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची.
व्यक्तिमत्त्व सुधारण्यावर भर देताना विवेकानंद म्हणाले, ‘जगातील सगळी महान आणि अतिप्रचंड कामं ही सर्वसामान्य जनतेनं केलेली आहेत.
ज्यांच्याकडे काहीच नसते तीच माणसे प्रामाणिकपणे कामं करतात.
जर अन्याय होत असेल, तर त्याला प्राणपणाने विरोध करा.
हातपाय गाळून हार मानू नका, संघर्ष करा.
संकुचित वृत्ती सोडून मन विशाल करा. दुसऱ्यांच्या संघर्षात त्यांच्या मागे उभे रहा.
आपल्या सहकाऱ्यांबरोबर चांगले संबंध निर्माण व्हावेत याचा तुम्ही स्वतः प्रयत्न केलात तरंच तुमची “पर्सनॅलिटी डेव्हलप” होऊ शकते.
आयुष्यात यशस्वी व्हायचं तर उदासीनता, एकलकोंडेपणा, हे दुर्गुण जाणीवपूर्वक काढून टाकले पाहिजेत.
हाच खरा व्यक्तिमत्त्व विकास हीच खरी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट.
स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या जगातही महत्त्वाचे ठरतात. ते आऊट डेटेड होत नाहीत.
आज करीयर घडवताना काही वेळा एकटी पडणारी तरुणाई मनाविरुद्ध अँडजेस्टमेंट स्वीकारताना दिसते.
त्यांच्यासाठी विवेकानंदाचे विचार दिशादर्शक ठरतात.
विवेकानंद म्हणतात तुमचं व्यक्तिमत्त्व जर खरं, आणि निस्वार्थी असेल तर, संपूर्ण जग जरी तुमच्या विरोधात गेलं तरी तुम्ही त्याचा सामना करू शकता. आणि मित्रांनो याचं उदाहरण म्हणून महाराष्ट्राची माय ‘सिंधुताई सपकाळ’ यांची वेगळी आठवण करून द्यायची गरज नाही!!
त्यासाठी तुमचं कणखर व्यक्तिमत्त्व तुम्ही स्वतःच डेव्हलप करा.
मनातून भीतीचं रोपटं उपटून फेकून द्या.
स्वामी विवेकानंद यांच्या संदर्भात एक गोष्ट सांगितली जाते, मनातल्या भीतीला जिंकण्यासाठी आदर्श ठरेल अशी ही गोष्ट….
विवेकानंद होण्याअगोदरचे नरेंद्रनाथ दत्त एकदा टेकडीवर गेले होते तेंव्हा काही माकडं त्यांच्या मागे लागली.
घाबरून पळत असताना एका क्षणी त्यांच्या लक्षात आलं की आपण या संकटाला सामोरं गेलं पाहिजे.
ते मागं वळले आणि माकडांशी नजर मिळवून उभे राहिले. त्यांचा तो अवतार बघितल्यावर माकडं जंगलात पळून गेली.
तर स्वतःच्या मनातल्या भीतीवर आधी विजय मिळवा मग तुमच्या यशाचा मार्ग कुणी रोखू शकणार नाही.
इंग्रजी साहित्याचा अफाट अभ्यास केल्यानंतर नरेंद्रनाथ दत्तची भेट रामकृष्ण परमहंसांशी झाली.
आणि स्वामी विवेकानंदांचं व्यक्तीमत्व साकारलं…
रामकृष्ण यांच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करत कन्याकुमारीला पोहोचले.
तिथं त्यांनी समुद्रात उडी मारली. पोहत समुद्रातल्या एका दगडावर जाऊन पोचले तिथं त्यांनी ध्यान लावलं.
भारताच्या कल्याणासाठी, भारतीय जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करायचं आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनून झटायच हा दृढ संकल्प स्वामीजींनी केला.
भारतीय परंपरेतले अद्वैत वेदान्त विचार जगात पोचवायचे आणि माणसातल्या मनात लपलेलं माणूसपण जागं करायचं यासाठी त्यांनी पाश्चिमात्य देशात जाण्याचंही ठरवलं.
११ सप्टेंबर, १८९३ ला अमेरिकेतील शिकागो शहरात शिकागो – आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती.
त्या सभेला विवेकानंद गेले. तेथे त्यांनी “अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो” अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या 7 हजार लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, जो दोन मिनिटे अखंड चालू होता.
विवेकानंद यांच्या भाषणाचा, विचारा़ंचा तिथं मोठा प्रभाव पडला.
त्यांनी वेळोवेळी ज्या गोष्टी शिकवल्या, सांगितल्या त्या आजही रिलेट करता येतात.
उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.
हा विवेकानंद यांचा संदेश आजही महत्त्वाचा ठरतोच ना?
आयुष्यात काही करून दाखवायचं असेल तर तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा.
जर तुमचं मन इकडे तिकडे भटकत असेल, दुसऱ्यांसारखं वागायचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर अपयशच मिळणार.
आयुष्यात यशस्वी व्हायच़ असेल तर फक्त तुमच्या ध्येयावर, लक्ष केंद्रीत करा.
स्वामी विवेकानंद यांचा हा संदेश आजही तरुणाईसाठी परफेक्ट ठरतो.
व्यक्तीमत्व विकास म्हणजे फक्त तुमचा वैयक्तिक फायदा असा त्याचा अर्थ होत नाही.
तर तुमच्या बरोबर देशाच्या प्रगतीलाही फायदा झाला तरच खऱ्या अर्थाने ‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’ झाली असं म्हणता येईल.
विवेकानंद यांच्या मते कोणत्याही राष्ट्राला आणि व्यक्तीला मोठं होण्यासाठी तीन गोष्टींची गरज असते…
1) चांगुलपणावर विश्वास
2) मत्सर आणि संशय यांना आपल्यापासून दूर ठेवणे
3) चांगलं कार्य करणाऱ्या सर्वांना मदत करणे
व्यक्तीपासून समाज, समाजापासून राष्ट्र बनते आणि राष्ट्रापासून विश्वाची निर्मिती होते.
देशप्रेम आणि विश्वप्रेम साकार करण्यासाठी योग्य पद्धतीने पर्सनॅलिटी डेव्हलप केली पाहिजे हेच स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं.
विवेकानंद यांचे हे स्पष्ट आणि आयुष्य घडवणारे विचार आजच्या तरुणाईपर्यत पोचले तर ती स्वामी विवेकानंद यांच्या अवघ्या 39 वर्षाच्या अफाट कार्याला वाहिलेली आदरांजली ठरेल.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
अतिशय सुंदर, कणखर पणा आणि प्रचंड विश्वास इतरांपेक्षा स्वतःवर असलाच पाहिजे.. प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग स्वामी विवेकानंद यांनी सांगितला आहे…