काही दिवसांपूर्वी नासा / युरोपियन स्पेस एजन्सी चे वैज्ञानिक हबल टेलिस्कोप ने आकाश धुंडाळत होते. त्यांचा मुख्य उद्देश होता तो बटू तारे किंवा ड्वार्फ स्टार हे एन.जी.सी. ६७२ ह्या तारकासमूहातून शोधून त्याचा अभ्यास करणे. ह्या ताऱ्यांचा अभ्यास करून ह्या तारकासमूहाचं वय त्यांना निश्चित करायचं होतं. हे करत असताना अचानक एक ताऱ्यांचा समूह त्यांच्या नजरेस पडला. त्यांचा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की हे तारे त्या तारका समूहाचा भाग नाहीतच ज्याचा ते अभ्यास करत होते. प्रत्यक्षात ते एका आकाशगंगेचा भाग आहेत अन् आपल्या आकाशगंगेपासून म्हणजे ‘मिल्की वे’ पासून ३० मिलियन प्रकाशवर्ष लांब आहेत. अजून जास्त अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की हे तारे म्हणजे एक छोटी आकाशगंगा असून साधारण ती ३००० प्रकाशवर्ष लांबीवर आहे. आपल्याला वाचताना हे मोठं अंतर वाटेल पण अवकाशाच्या दृष्टीने ही आकाशगंगा खूपच छोटी आहे. वैज्ञानिकांनी त्याला नाव दिलं बेडीन १.
बेडीन १ च्या शोधाने वैज्ञानिकांच्या आनंदाला उधाण आलं. ह्याचं कारण समजून घ्यायला आपल्याला विश्वातील ‘बटू आकाशगंगा’ म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व समजून घ्यावं लागेल. बटू आकाशगंगा ह्या आकाराने अतिशय लहान असून त्यांच्यामध्ये असलेल्या ताऱ्यांची संख्या मर्यादित असते. त्यामुळे त्यांच्यातून निघणारा प्रकाश ही तितकाच अंधुक असतो. त्यामुळे विश्वात त्याचं अस्तित्व शोधणं हे तितकचं कठीण आहे. मिल्की वे सारख्या आकाशगंगा कशा बनतात हे समजून घेतलं तर ह्या बटू आकाशगंगा महत्त्वाच्या का आहेत ते समजून येईल.
आपला सूर्य हा एक तारा असून त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे आपल्या सौरमालेतील सगळे ग्रह एका कक्षेत त्याच्या भोवती फिरतात. ग्रहांच्या फिरण्यामुळे निर्माण होणारा सेंट्रिफ्युगल फोर्स आणि सुर्याचं गुरुत्वाकर्षण ही बले एकमेकांच्या विरुद्ध काम करतात. त्यामुळे ग्रह एका निर्धारित कक्षेतून एका निर्धारित वेळात सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात. ग्रह जितका जवळ तितकं त्याच्यावर काम करणारं गुरुत्वाकर्षण जास्त त्यामुळे त्याला तितक्याच वेगात प्रदक्षिणा पूर्ण करावी लागते. ह्यामुळे बुध सगळ्यात लवकर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो तर हाच काळ पुढे पुढे सगळ्या ग्रहांसाठी वाढत जातो. आकाशगंगेत पण सगळे तारे आकाशगंगेच्या मध्याभोवती फिरत असतात. आकाशगंगेचं वस्तुमान आणि तिचं गुरुत्वाकर्षण हे असं करण्यास भाग पाडते. म्हणजे आकाशगंगेत पण जवळचे तारे हे खूप वेगाने फिरायला हवेत आणि लांब असणारे तारे हे हळू फिरायला हवेत. पण जेव्हा वैज्ञानिकांनी ह्याचा अभ्यास केला तेव्हा असं आढळून आलं की आकाशगंगेच्या अगदी टोकावर असणारे तारे पण त्याच वेगाने फिरत आहेत. हे नुसतं आपल्या आकाशगंगेत नाही तर विश्वातील सगळ्याच आकाशगंगेत दिसून आलं.
आकाशगंगेच्या टोकावर असणाऱ्या ताऱ्यांच्या वेगाने वैज्ञानिकांना बुचकळ्यात टाकलं की हा वेग असायला तितकचं मोठं गुरुत्वाकर्षण आकाशगंगेच्या टोकावर पण असायला हवं तेव्हाच हे तारे इतका वेग घेऊ शकतात. आकाशगंगेच्या सर्व ताऱ्यांचं वस्तुमान एकत्र केलं तरी हे गणित जुळून येत नाही. तेव्हाच वैज्ञानिकांनी निश्चित केलं की अदृश्य असणारं पण त्याचवेळी प्रचंड वस्तुमान असणारं काहीतरी आहे. त्यालाच त्यांनी नाव दिलं गडद पदार्थ (Dark Matter). आपण विश्वात तारे, आकाशगंगा बघू शकतो कारण त्यांच्यापासून निघणारा प्रकाश आपल्यापर्यंत येतो किंवा परावर्तित होतो. पण प्रकाश आरपार जाऊ शकेल आणि प्रकाश निर्माण न करणारं पण त्याच वेळी प्रचंड वस्तुमान असणारं असं काही आहे हे जेव्हा आपण गृहीत धरतो तेव्हा आकाशगंगेच्या टोकावर असणाऱ्या ताऱ्यांचं वेगाचं गणित तंतोतंत जुळून येतं. किंबहुना आकाशगंगा बनल्या कशा, विश्व प्रसरण का होते आहे अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपल्याला गडद पदार्थ म्हणजे Dark Matter ने होते.
अवकाश शास्त्रज्ञ ‘वेरा रुबिन’ ने पहिल्यांदा गडद पदार्थाची थिअरी मांडली आणि आज तीच विश्वात ग्राह्य धरली जाते. बटू आकाशगंगेत असणाऱ्या ताऱ्यांचं वस्तुमान आणि त्यांचा वेग ह्याचं गणित जुळून येत नाही. बटू आकाशगंगा एखाद्या मोठ्या आकाशगंगेच्या भोवती उपग्रहासारखं वर्तुळाकार अथवा अंडाकृती मार्गाने फिरत असतात. आपल्या आकाशगंगेचा ग्रुप ज्याला ‘वर्गो सुपर क्लस्टर’ असं म्हटलं जातं, त्यात ३८ बटू आकाशगंगा आपण आजवर शोधल्या आहेत. त्यातल्या जवळपास २२ बटू आकाशगंगा आपल्या मिल्की वे शी संलग्न आहेत. ह्यातल्या ६ बटू आकाशगंगेचं १% वस्तुमान हे ताऱ्यांचं आहे तर उरलेलं ९९% वस्तुमान हे गडद पदार्थाचं (डार्क मॅटरचं) आहे. म्हणजे आपल्याला जर गडद पदार्थ (Dark Matter) म्हणजे नक्की काय हे समजून घ्यायचं असेल तर बटू आकाशगंगा आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.
‘बेडीन १’ चा शोध हा खूप मोठा मानला जात आहे. ह्याला अजून एक कारण आहे ते म्हणजे ह्या बटू आकाशगंगेचं वय आहे १३ बिलियन वर्ष. म्हणजे विश्वनिर्मितीच्या प्राथमिक अवस्थेत ह्या बटू आकाशगंगेची निर्मिती झाली आहे. आज आपण १३ बिलियन वर्ष मागे तयार झालेल्या कलाकृतीला बघत आहोत. ही आकाशगंगा बाकीच्या आकाशापासून खूप अलिप्त आहे. आपल्या आकाशगंगे पासून साधारण ३० मिलियन प्रकाशवर्ष लांब तर हिच्या मोठ्या वडीलधारी आकाशगंगा एन.जी.सी. ६७४४ पासून २ मिलियन प्रकाशवर्ष लांब आहे. खूप अंधुक असून सुद्धा हबल ने घेतलेला तिचा वेध हे हबलचं यश आहे तर १३ बिलियन वर्षापूर्वी निर्माण झालेल्या या खजिन्याचा शोध अवकाश वैज्ञानिकांसाठी एक प्रचंड यश मानलं जात आहे. विश्व निर्मितीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यात आणि गडद पदार्थ (Dark Matter) ला समजून घेण्यात येत्या काळात ‘बेडीन १’ महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.