नितळ त्वचा असणारा सुंदर चेहरा प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो.
आपल्या चेहेऱ्यावर मुरुम, पुटकुळ्या येऊ नयेत, त्यामुळे चेहऱ्यावर डाग पडू नयेत असं प्रत्येकालाच वाटते.
पण हल्लीच्या हवामानामुळे आणि जीवनशैलीमुळे चेहऱ्यावर मुरूम, फोड, पुटकुळ्या येणं अगदी कॉमन झालं आहे.
खरंतर ह्यावर उपाय म्हणून बाजारात असंख्य मलमे, औषधे आणि चेहरा नितळ बनवणारे पॅक मिळतात.
पण केमिकल्स असणारी ती औषधे वापरण्यापेक्षा आपण घरगुती आयुर्वेदिक उपाय केलेले केव्हाही चांगले.
आपली त्वचा सछिद्र असते हे आपण सर्व जाणतोच.
हाताचे व पायाचे तळवे सोडून आपली बाकीची सर्व त्वचा सछिद्र असते.
तेथे तैल ग्रंथी असतात ज्या एरवी त्वचेचे आरोग्य सांभाळायला मदत करतात, परंतु आपल्या शरीरात जर काही हारमोनल बदल झाले तर ह्या तैल ग्रंथींचे कार्य बिघडून तेथे मुरूम किंवा फोड आलेले दिसतात.
मुरूम/पिंपल्स म्हणजे नक्की काय
मुरूम किंवा पुटकुळ्या येणं हा त्वचेचा अगदी सामान्य असा आजार आहे.
चेहेऱ्यावर मुरूमाचे फोड येणं हे सहसा हार्मोनल बदलांमुळे किंवा काही चुकीचा आहार घेतल्यामुळे होतात.
काही पित्तकारक किंवा कफकारक पदार्थ खाण्यात आल्यामुळे चेहेऱ्यावर मुरूम येतात.
मुरूम येण्याचे प्रमाण हे चेहेऱ्यावर जास्त असले तरी त्याबरोबर पाठ, मान आणि खांद्यांवर देखील मुरूम येऊ शकतात.
हातापायचे तळवे मात्र ह्यापासून मुक्त असतात कारण तेथील त्वचा ही सछिद्र नसते.
साधारणपणे वयाच्या किशोरवस्थेत असल्यापासून म्हणजेच १३, १४ व्या वर्षांपासून ते ३० शी पर्यन्त ही समस्या उद्भवताना दिसते.
हे फोड येत असताना तर वेदनादायक असतातच परंतु हे बरे झाल्यावर देखील त्यांचे व्रण, डाग चेहेऱ्यावर राहतात.
मुरूम अनेक प्रकारचे असतात.
१. पेपूल्स किंवा पुळी (papules)
ह्या पुळया गुलाबी रंगाच्या, भरीव असतात आणि वेदना दायक असतात.
२. पूस्टूल्स (Pustules)
ह्या बारीक आकाराच्या पू झालेल्या पुळया असतात.
३. नोड्यूल्स (nodules)
ह्या आकाराने थोड्या मोठ्या असलेल्या पुळया असतात आणि ह्या देखील वेदना दायक असतात.
४. सिस्ट (cyst)
हे त्वचेच्या आतील भागातून येतात, गाठीसारखे असतात आणि दुखतात. बरे झाल्यावर सुद्धा सिस्ट चे डाग त्वचेवर राहू शकतात.
५. व्हाइट हेड
पांढरट रंगाचे अगदी बारीक डाग दिसतात त्यांना व्हाइट हेड असे म्हणतात.
६. ब्लॅक हेड
काळपट रंगाचे अगदी बारीक डाग दिसतात त्यांना ब्लॅक हेड म्हणतात.
मुरूम का येतात?
१. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे कफ किंवा पित्त दोषांमुळे मुरूम येण्यास सुरुवात होते.
२. मुरूम येणे हे आनुवंशिक देखील असू शकते.
३. शरीरात होणाऱ्या हारमोनल बदलांमुळे देखील मुरूम येतात.
महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेळी, गर्भवती अवस्थेत आणि रजोनिवृत्तीच्या काळात ह्याचे प्रमाण जास्त आढळून येते.
४. काही वेळा तणाव किंवा एखादी मानसिक समस्या देखील मुरूम येण्यास कारणीभूत ठरू शकते.
५. सौन्दर्य प्रसाधने (कॉस्मेटिक्स) चा प्रमाणापेक्षा जास्त वापर देखील मुरूम येण्यास कारणीभूत असतो.
६. प्रदूषण हे देखील चेहेऱ्यावर मुरूम, पुटकुळ्या आणण्यास कारणीभूत आहे.
त्यामुळे घराबाहेर पडताना चेहेऱ्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
७. बेकरीतील पदार्थ, जंक फूड, खूप गोड पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स ह्यांच्या अति सेवनाने देखील ही समस्या उद्भवते.
मुरूम/पिंपल्स येऊच नयेत म्हणून काय करावे
मुरूम/पिंपल्स येऊच नयेत किंवा त्यांचे प्रमाण कमी असावे ह्याची खबरदारी घेणे हे केव्हाही श्रेयस्कर असते.
त्यासाठी आपले राहणीमान चांगले ठेवणे, योग्य जीवनशैली अंगीकारणे आवश्यक आहे.
पिंपल्स येऊ नयेत म्हणून काय खावे
१. दररोज हिरव्या पालेभाज्या, काकडी, गाजर, ढोबळी मिरची जरूर खाव्यात.
२. ऋतुप्रमाणे मिळणारी फळे आपल्या आहारात रोज असावीत.
३. नियमित स्वरूपात दही खावे.
४. ग्रीन टी प्यावा.
५. काजू, अक्रोड आणि बेदाणे जरूर खावेत.
पिंपल्स येऊ नयेत म्हणून काय खाऊ नये
१. तळलेले पदार्थ खाऊ नयेत.
२. पिझ्झा, बर्गर, नूडल्स असे जंक फूड जास्त खाऊ नये.
३. प्रोसेस्ड फूड, ब्रेड इत्यादीपासून दूर राहावे.
दिनचर्या
१. आपला चेहरा रोज कमीतकमी २ वेळा स्वच्छ धुवावा.
२. दररोज १० ते १२ ग्लास पाणी प्यावे.
३. दररोज रात्री मेकअप काढूनच झोपावे.
४. आपला मेक अप ब्रश स्वच्छ ठेवावा.
५. पिंपल्स आले तर त्यांना दाबू नये.
६. पौष्टिक, संतुलित आहार घ्यावा.
७. चेहेऱ्यावर वाफ घ्यावी, ह्याने चेहेऱ्याचे रोम मोकळे होतात.
पिंपल्स वर करण्याचे घरगुती उपाय
१. बर्फ
बर्फाचा छोटा खडा एका स्वच्छ रुमालात घेऊन चेहेऱ्यावर रगडावा. अश्या पद्धतीने थोडा वेळ मसाज करावा. पिंपल्स कमी होण्यास मदत होते.
२. टुथपेस्ट
कापसावर थोडी टुथपेस्ट घेऊन ती पिंपल्स वर लावली असता त्यांचा आकार छोटा होतो.
परंतु हे लक्षात ठेवा की पांढरी टुथपेस्ट वापरायची आहे. रंगीत जेल टुथपेस्ट चालणार नाही.
३. मुलतानी माती
पिंपल्स कमी करण्यासाठी आणि त्यांचे डाग घालवण्यासाठी मुलतानी माती, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस एकत्र करून त्याचा पॅक चेहेऱ्यावर लावला असता खूप फायदा होतो.
४. कोरफडीचा रस
पिंपल्स वर कोरफडीचा रस किंवा जेल लावून ठेवून १५ मिनिटांनी साध्या पाण्याने चेहेरा धुवून टाकावा.
हा पिंपल्स वरचा सर्वात प्रभावी उपाय आहे.
५. लिंबाचा रस
लिंबाचा रस कापसाच्या सहाय्याने पिंपल्स वर रात्रभर लावून ठेवावा. बराच फरक पडतो.
६. टी ट्री ऑइल
टी ट्री ऑइल आणि एरंडेल तेल समप्रमाणात घेऊन ते पिंपल्स वर लावावे.
काही वेळाने चेहेरा साध्या पाण्याने धुवून टाकावा.
७. लसणाची पेस्ट
५ ते १० मिनिटांसाठी लसणाची पेस्ट पिंपल्स वर लावावी, नंतर साध्या पाण्याने चेहेरा धुवून टाकावा. ह्याचा पिंपल्स चे डाग घालवण्यास खूप उपयोग होतो.
८. मध
मध बोटांच्या सहाय्याने चेहेऱ्यावर लावून ठेवून चेहरा २५ मिनिटांनी धुवून टाकावा.
नियमित स्वरूपात हा उपाय केला असता नक्की फरक दिसतो.
तसेच मधात दालचीनी पावडर मिसळून लावली असता देखील फायदा होतो.
९. चंदन पावडर
चंदनाच्या पावडरमध्ये गुलाब पाणी मिसळून तो पॅक चेहेऱ्यावर लावला असता पिंपल्स चा त्रास कमी होतो.
१०. ग्रीन टी
ग्रीन टी चे नियमित सेवन पिंपल्स ना दूर ठेवण्यासाठी उपयोगी पडते.
तर हे आहेत पिंपल्स/मुरूम ह्या समस्येवरचे घरगुती उपाय.
त्यांचा जरूर लाभ घ्या आणि पिंपल्स च्या समस्येवर घरच्या घरी उपाय करून त्यापासून सुटका मिळवा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.