मागील भागात ओरायन तारकासमूह किंवा ज्याला मृग नक्षत्र म्हंटल जाते त्यातील प्रत्येक ताऱ्यांचा आपण अभ्यास केला. आधी सांगितलं त्या प्रमाणे ओरायन तारकासमूह हा फक्त त्याच्या ताऱ्यासाठी प्रसिद्ध नाही तर अजून एका वेगळ्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. ती गोष्ट म्हणजे ओरायन नेब्युला. ओरायन नेब्युला हा उघड्या डोळ्यांनी बघता येणारा पूर्ण विश्वातील एकमेव नेब्युला आहे. अगदी सहजपणे आपण त्याला ओरायन तारकासमुहात उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. पण त्याचं सौंदर्य बघायचं असेल तर त्याला टेलिस्कोप शिवाय पर्याय नाही.
ओरायन नेब्युला ला मेसियर ४२, एम ४२ किंवा एन.जी.सी. १९७६ असही म्हंटलं जातं. हा नेब्युला पृथ्वीपासून सुमारे १३४२ प्रकाशवर्ष लांब आहे. (एक प्रकाशवर्ष म्हणजे एका वर्षात प्रकाशाने ३ लाख किलोमीटर / सेकंद ह्या वेगाने कापलेले अंतर) हा नेब्युला जवळपास २४ प्रकाशवर्ष इतक्या प्रचंड अंतरावर अवकाशात पसरलेला आहे. (एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जायला प्रकाशाला २४ वर्ष लागतील इतके अंतर). ह्या ओरायन नेब्युलाचं वस्तुमान सूर्याच्या २००० पट आहे. हा नेब्युला म्हणजे ताऱ्यांना जन्म देणारी एक मोठी वसाहत आहे. इकडे आजही हजारो तारे जन्माला येत आहेत. ताऱ्यांची निर्मिती कशी होते? ते नेब्युला म्हणजे काय? हे आपल्याला समजून घ्यावं लागेल.
नेब्युला म्हणजे अवकाशातील धूळ, वायू ह्यांचा एक मोठा ढग असं सोप्या शब्दात म्हणता येईल. तर ह्या ढगातील धूळ, वायू खूप दूरवर पसरलेले असतात. ही अंतरं खूप प्रचंड आहेत. हळूहळू ह्यातील गुरुत्वाकर्षण ह्या सगळ्यांना जवळ जवळ आणत रहाते. ह्या वायू मध्ये मुख्यतः हायड्रोजन आणि हेलियम हे वायू असतात. जवळजवळ येऊन ह्या ढगाची व्याप्ती वाढत जाते. व्याप्ती वाढते तसं ह्याचं गुरुत्वाकर्षणही त्याच वेगाने वाढत जाते. एक वेळ अशी येते की हा ढग आपल्याच गुरुत्वाकर्षणावर तग धरू शकत नाही. त्याच्या रेट्यापुढे तो आतल्या आत कोलमडून जातो. असं कोलमडून गेल्यामुळे ह्या ढगाच्या आत असलेलं साहित्य प्रचंड गरम होते. हा आतला तापलेला भाग म्हणजेच एका ताऱ्याची निर्मिती सुरु होते. ओरायन नेब्युला अश्या ढगांची खाण आहे. ह्या खाणीतून आत्ताच्या क्षणाला सुद्धा अनेक ताऱ्यांची निर्मिती सुरु आहे.
ओरायन नेब्युला खाणीतून अनेक ताऱ्यांची निर्मिती सुरु असली तरी जो प्रकाश ओरायन नेब्युला ला मुख्यत्वे प्राप्त झाला आहे तो त्यात असलेल्या ट्रापेझीयम सिस्टीममुळे. ह्यातील तारे हे काही मिलियन वर्षापूर्वी तयार झालेले आहेत. ताऱ्यांच्या वयाच्या मानाने ते अजून बाळ आहेत. अश्या जवळपास पाच प्रकाशमान ताऱ्यांची मिळून ही सिस्टीम बनलेली आहे. ह्या सर्व ताऱ्यांचं वस्तुमान सूर्याच्या जवळपास १५-३० पट असून १.५ प्रकाशवर्ष अंतरावर हे सर्व तारे एकमेकांपासून लांब आहेत. ही सिस्टीम ओरायन नेब्युलाचा एक भाग आहे. ह्या ताऱ्यांचा एकत्रित प्रकाश ओरायन नेब्युलाला ह्या आकाशात उजळवून टाकतो.
ओरायन नेब्युला च्या ह्या खाणीत विश्वाच्या उत्पत्ती ची अनेक रहस्य लपलेली आहेत. आपला सूर्य, आपली सौरमाला ते ह्या विश्वात ताऱ्यांची उत्पत्ती ह्या सगळ्या बद्दल जाणून घ्यायची संधी ह्या ओरायन नेब्युलाने पूर्ण मानवजातीला उपलब्ध करून दिली आहे. ओरायन तारकासमूह हा नुसत्या ताऱ्यांचा समूह नाही तर ह्यातील प्रत्येक तारा आणि नेब्युला आपल्या सोबत विश्वाची अनेक रहस्य आपल्यासमोर उलगडत आहे. आकाशात बघताना प्रत्येक क्षण हा ओरायन तारकासमूह आपल्याशी अनेक गोष्टी बोलत आहे. गरज आहे ती त्या आकाशाकडे डोळसपणे बघण्याची.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Send me the information about orien nebula
खगोलशास्त्र एक फार मोठा आणि गंभीर विषय आहे, त्यामुळे या विषयावर खूप काही लिहिता येण्या सारखे आहे, माझा अत्यंत आवडता हा विषय आहे, ब्लॅक होल संबंधित माहिती वाचायला आवडेल