सध्या सगळीकडे चांगलीच थंडी पडलेली आहे. उत्तरेकडून आलेली थंडीची लाट संपूर्ण भारतात पसरली आहे.
अशा वातावरणात सर्दी पडसे होणे, ताप येणे, खोकला हे आजार अगदी कॉमन आहेत. खरे तर हे सगळे आजार व्हायरसमुळे पसरणारे आहेत आणि थंड वातावरणात कोणताही व्हायरस जोमाने पसरतो.
त्यामुळे थंडी पडली की लोकांना हे विविध आजार होताना दिसून येतात. थंडीच्या दिवसात पडणारी कोरडी हवा देखील प्रतिकारशक्ती कमी करण्यासाठी कारणीभूत ठरते. हे देखील ह्या दिवसात आजार वाढण्याचे एक कारण असते.
त्यामुळे विविध आरोग्य तज्ञ थंडीच्या दिवसात सुयोग्य आहार घेण्याचा म्हणजेच योग्य पदार्थ खाण्याचा आग्रह धरतात.
जेणेकरून आपली प्रतिकारशक्ती चांगली राहून आपण आजारी पडणार नाही. वेगवेगळे आहार तज्ञ आणि डॉक्टर असे सांगतात की थंडीच्या दिवसात सुकामेवा, तुळस, आले, लसूण, काळी मिरी, हिरव्या पालेभाज्या, तीळ, गुळ अशा पदार्थांचे सेवन अवश्य करावे.
त्यामुळे शरीरातील उष्णता वाढते तसेच शरीराची रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते.
परंतु काय खावे याबरोबरच काय खाऊ नये हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. कारण काही पदार्थ थंडीच्या दिवसात आपल्या शरीरासाठी अपायकारक असतात आणि आपल्या पचनशक्तीबरोबरच आपली प्रतिकारशक्ती कमी करण्यास देखील ते कारणीभूत ठरू शकतात.
प्रतिकार शक्ती कमी झाल्यास संसर्गजन्य आजार होण्याचे प्रमाण वाढते. म्हणून असे पदार्थ थंडीच्या दिवसात खाऊ नयेत.
चला तर मग जाणून घेऊया थंडीच्या दिवसात कोणते पदार्थ खाऊ नयेत
१. दूध – दुधाला जरी एक परिपूर्ण आणि पौष्टिक आहार मानले गेले असले तरी दूध पिण्यामुळे कफ होण्याची शक्यता असते.
जर एखाद्या व्यक्तीला आधीपासूनच कफ झालेला असेल तर दूध पिण्यामुळे तो आणखी वाढू शकतो.
त्यामुळे थंडीच्या दिवसात शक्यतो दूध आणि दुधापासून बनवलेले चीज, क्रीम यासारख्या पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करावे.
२. दही – दह्यामध्ये अन्नपचन करणारे बॅक्टेरिया जरी चांगल्या प्रमाणात उपलब्ध असले तरी दही खाण्यामुळे देखील कफ होण्याची शक्यता असते.
थंडीच्या दिवसात दह्याचे सेवन केल्यास शरीरात कफ वाढून श्वासोच्छवासाचा त्रास होणे, दमा, खोकला असे आजार होऊ शकतात.
त्यामुळे थंडीच्या दिवसात दह्याचे सेवन कमी प्रमाणात करावे तसेच नेहमी ताज्या दह्याचे सेवन करावे. शिळे, फ्रीजमध्ये ठेवलेले दही जास्त अपायकारक असते.
३. केळे – थंडीच्या दिवसात जर तुम्हाला आधीपासूनच सर्दी-खोकला झालेला असेल तर केळे खाणे तुमच्या आरोग्यासाठी योग्य नाही.
केळे प्रकृतीने कफकारक असून पचायला जड देखील असते. तसेच केळ खाण्यामुळे कफ आणि सर्दी खोकला वाढू शकतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात आधीपासूनच आजारी असल्यास केळ्याचे सेवन करू नये परंतु जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार नसेल तर दिवसा केळ खाण्यास हरकत नाही. (रात्री खाऊ नये.)
४. थंड पदार्थ – थंडीच्या दिवसात कोल्ड्रिंक्स, थंड मिल्क शेक आणि आईस्क्रीम असे पदार्थ अर्थातच खाऊ नयेत.
असे पदार्थ खाल्ल्यामुळे घशामध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप जास्त वाढते. तसेच या पदार्थांच्या सेवनामुळे पाचनशक्ती वर देखील परिणाम होतो.
शिवाय गार पदार्थ पोटात गेल्यामुळे शरीराचे तापमान कमी होऊन थकवा येण्याची देखील शक्यता असते.
५. लाल मांस – मांसाहारी लोकांनी खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असणारे लाल मांस थंडीच्या दिवसात कमी प्रमाणात खावे.
असे मांस पचायला तर जड असतेच त्याशिवाय कफकारक देखील असू शकते. त्याऐवजी चिकन, मासे आणि अंडी असा मांसाहार करणे योग्य ठरेल.
६. कॅफिन असणारी पेये – थंडीच्या दिवसात गरमागरम कॉफी, हॉट चॉकलेट किंवा गरमागरम चहा पिण्याची मजा काही औरच.
परंतु थंडी आहे म्हणून असे गरम पदार्थ पिण्याचा अतिरेक करू नये. या पदार्थांमध्ये असणाऱ्या कॅफिन मुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन डीहायड्रेशन होऊ शकते.
अशा वेळी शरीरात आधीपासून साठलेला कफ अधिक घट्ट होऊन छातीत साठू शकतो. म्हणून थंडीच्या दिवसात चहा कॉफी सारखी पेये योग्य प्रमाणात प्यावी. तसेच गरम अथवा कोमट पाणी पिऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण चांगले राखावे.
७. तळलेले पदार्थ – थंडीच्या दिवसात गरम चहा कॉफी बरोबरच गरम गरम भजी, वडे. सामोसे खावेसे वाटणं अगदी सहाजिक आह. परंतू असे पदार्थ खाण्यामुळे शरीरातील फॅट्सचे प्रमाण अधिक वाढते तसेच शरीरात कोणत्याही प्रकारचे इन्फ्लमेशन होण्याची शक्यता वाढते.
थंडीत जेव्हा आपण आजारी पडू नये असे प्रयत्न करत असतो तेव्हा अशावेळी पचनशक्ती, घसा किंवा पोट यासंबंधीचे आजार देऊ शकणारे तळलेले पदार्थ आपण अगदी कमी प्रमाणात खावेत.
८. गोड पदार्थ – कोणत्याही पदार्थाचे सेवन योग्य प्रमाणात करणे आपल्या शरीराच्या दृष्टीने फायद्याचे असते मग ते पदार्थ गोड असोत अथवा तिखट चमचमीत.
त्यामुळे थंडीच्या दिवसात गोड पदार्थांच्या सेवनावर देखील आपण नियंत्रण ठेवले पाहिजे. जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराची पचनशक्ती आणि पर्यायाने प्रतिकारशक्ती यावर विपरीत परिणाम होताना दिसून येतो.
एका संशोधनाअंती असे सिद्ध झाले की ज्या लोकांनी जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ले होते त्यांना वायरल किंवा बॅक्टेरिअल इन्फेक्शन होण्याचे प्रमाण कमी गोड पदार्थ खाल्लेल्या लोकांपेक्षा जास्त होते. यावरून हेच लक्षात येते की गोडाचे सेवन माफक प्रमाणात करणे फायद्याचे असते.
तर मित्र-मैत्रिणींनो हे आहेत असे काही पदार्थ जे थंडीच्या दिवसात आरोग्यासाठी अपायकारक असू शकतात. आम्ही असे म्हणत नाही की हे पदार्थ तुम्ही थंडीच्या दिवसात मुळीच खाऊ नका परंतु हे मात्र नक्की की या सर्व पदार्थांचे योग्य प्रमाणातच सेवन करा.
या पदार्थांचा अतिरेक टाळा. असे करण्यामुळे थंडीच्या दिवसात उद्भवणाऱ्या ठराविक आजारांपासून तुम्ही सहजपणे स्वतःचे आणि आपल्या कुटुंबियांचे संरक्षण करू शकाल.
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख जरुर शेअर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.