भारतीय वंशाच्या अमेरिकन, पुलित्झर पुरस्कार (लघुकथा संग्रह इंटरप्रेटर ऑफ मैलडीज) विजेत्या लेखिका झुंप्पा लाहिरी यांची पहिली कादंबरी म्हणून ‘The Namesake’ ओळखली जाते. मराठी अनुवाद लेखिका उल्का राऊत यांनी केला आहे. काही काळापूर्वी अमेरिका या देशात जाऊन स्थायिक होणे, या गोष्टीला भारतात नको एव्हढी प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. कादंबरीत प्रामुख्याने स्थलांतरितांचे जीवन रेखाटले आहे. कादंबरी सुरुवातीपासूनच मनाची पकड घेते. संगीत आणि पुस्तकं कोणाला आवडत नाही? आणि हे दोन्ही एकत्रित तुमच्यासमोर उभे राहिले तर काय होइल? एक अनपेक्षित, हळुवार झंकार तुमच्या मनात उमटेल, नाही का? अगदी तंतोतंत अवस्था ही कादंबरी वाचतांना होते. झुंप्पा लाहिरी त्यांच्या लेखनातून अगदी सोपेपणाने, हळुवारपणे, प्रच्छन्न गुंतागुंतीतून, तुम्हाला इप्सित स्थळी घेऊन जातात. त्या घटनेचे जणू असे वर्णन करतात की, जणू ती घटना नादमाधुर्यासहित तुमच्यासमोर घडते आहे. कथा इतक्या सहजतेने पुढे जात असते, आणि अचानक….आणि आपण विचार करतो की आयुष्य असेच असते की. पात्र कोणत्या परिस्थितीत काय विचार करेल? किंवा त्याची त्या घटनेत काय प्रतिक्रिया असेल याचा इतका सूक्ष्म विचार आणि तोही एव्हढया सहजतेने झुंप्पा लाहीरीच करू शकतात.
अशोक गांगुली हा बंगाली कुटुंबातील पुस्तक वाचण्याची आवड असणारा तरुण असतो. एकदा नातेवाईकांकडे जात असतांना रेल्वेला अपघात होतो, पण त्यावेळी अशोक रशियन लेखक निकोलाय गोगोल यांचे पुस्तक वाचत असतो. आणि त्या पुस्तकामुळेच त्या भयंकर अपघातातून वाचतो. पुढे काही वर्षातच अपघाताच्या थोड्या वेळ अगोदर ओळख झालेल्या घोष यांच्या सांगण्यानुसार अशोक अमेरिका गाठतो. नंतर काही दिवसातच (बंगालमध्ये जाऊन) अशोकचा अशिमाबरोबर ठरवून प्रेमविवाह होतो. आणि नन्तर ते अमेरिकेतच जातात.. बाळाला जन्म देण्यासाठी अशिमा गांगुली दवाखान्यात दाखल झालेली असते. यावेळी ते दोघेच दवाखान्यात हजर असतात, त्यावेळी बंगालमध्ये असतो तर…..ही तिच्या मनातील उलघाल अतिशय भावस्पर्शी आहे. बाळाचे नाव आजी ठरवणार होती, तसे दोन्ही (मुलगा/मुलगी) प्रकारचे नाव पत्रात आजीने पाठवली होती. पत्र अजून आले नव्हते. पण जन्मदाखला देताना नाव तर ठेवावेच लागणार असे दवाखाण्यात सांगितल्यानंतर अशोक आणि अशिमा यांनी गोगोल या नावावर तात्पुरते शिक्कामोर्तब केले. तर गोगोल हे या कादंबरीतील मुख्य पात्र आहे.
अशोक आणि अशिमा अमेरिकेत राहून, आपलं मूळ, बंगाली परंपरा न विसरणारे, आणि म्हणूनच कधिही तिथले न होणारे…तर गोगोल आणि त्याची बहीण सोनिया अमेरिकीतच लहानाचे मोठे झाल्यामुळे तिथल्या संस्कृतीत मिसळून गेल्याने, बंगालच्या रूढी परंपरा नकोसे वाटणारे ….या सर्व परिस्थितीत प्रामुख्याने गोगोलची चाललेली धडपड, नावावरून होणारा मानसिक त्रास , गोंधळ,गोगोलचे प्रेमप्रकरण, लग्न, अशोकचे अकाली जाणे, त्यानंतरची गोगोलची मानसिक स्थिती, अशिमाचा दृष्टिकोन या सर्वाभोवती कादंबरी पुढे जात राहते.
एका अनंताच्या प्रवासात जाता जाता ते (अशोक) गोगोलला म्हणतात, “कायम लक्षात ठेव हा दिवस… कधीही विसरायचा नाही. फक्त तू आणि मी. दोघांनीच हा सुंदर प्रवास केला. अश्या जागी की पुढे जायला मार्गच शिल्लक नव्हता. ही गोष्ट सदैव स्मरणात ठेवशील ना गोगोल. (वडील या जगात नसतांना, गोगोल ला हे आठवत असते, असा प्रसंग आहे, माझा सर्वात आवडता)
‘नेमसेक’ वाचतांना तुम्ही फक्त एका कुटुंबाची कथा वाचत नसता. त्या पात्रांबरोबर तुम्ही एव्हढे मग्न होतात की त्यांचे सुख तुमचे असते, त्यांच्या दुःखात तुमचे डोळे ओलसर होतात, कठीण प्रसंगी नकळत तुम्ही त्यांना सहानुभूती देत असतात.
‘नेमसेक’ ही प्रच्छन्न गुंतागुंत आहे……तुम्ही त्यात गुंतायलाच हवे.
द नेमसेक (मराठी) – लेखिका : उल्का राऊत
The Namesake – Author : Jhumpa Lahiri
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.