भारताचे दोन भाग करण्याला कारणीभूत होता तो धर्म. आजही त्या धर्माचं भुत आपल्या मानगुटीवर बसलेलं आहे. कोण कोणत्या धर्माचा ह्यावरून आपण आपला बघण्याचा दृष्टीकोन बदलत असतो. भारत हा पूर्वी पासून विविधतेत एकता असणारा देश होता, आहे आणि राहील. पण कधी कधी आपण धर्माचे बुरखे इतके चढवतो की प्रत्येक माणसाला आपण त्याच्या धर्मावरून तोलतो. त्या बुरख्यांच्या खाली आपली बघण्याची आणि विचार करण्याची शक्ती गमावून बसतो. माणसाला माणूस न बघता धर्माच्या तराजूत आधी तोलतो आणि ह्या तराजूचं पारडं कधी दुसरीकडे पण झुकू शकते हा विचार पण आपल्या मनाला शिवत नाही. पण असं होतं. भारतीय सैन्यात असेच एक हिरो होऊन गेले ज्यांनी हे पारडं दुसऱ्या बाजूला झुकवलं. समोर सगळी सुखं असताना फक्त भारताच्या प्रेमापायी त्यांनी भारतीय सैन्याला आणि भारताला आपलसं केलं त्याच्या रक्षणासाठी आपल्या जिवाचं बलिदान दिलं पण शोकांतिका अशी की आज आपण ते बलिदान विसरून गेलो आहोत.
Brigadier Mohammad Usman
मुहम्मद उस्मान हे नाव ऐकताच अनेकांच्या भुवया उंचावतील कारण धर्माच्या दलदलीत रुतलेल्या विचारांना त्यातून बाहेर काढणं इतकं सोप्प नक्कीच नाही…. तर कोण होते हे मुहम्मद उस्मान. एका पोलीस ऑफिसर च्या घरी जन्म झालेले मुहम्मद उस्मान लहानपणा पासून अतिशय जिगरबाज होते. वयाच्या १२ व्या वर्षी विहरीत पडलेल्या एका मुलाचा जीव वाचवण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता त्यांनी विहरीत उडी घेतली होती व त्या मुलाचा जीव वाचवला होता. लहानपणापासून आपल्या नेतृत्वगुणांची मुहम्मद उस्मान ह्यांनी चुणूक दाखवली होती. त्यामुळे वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी त्यांची निवड रॉयल मिलिटरी एकेडमी इंग्लंड मध्ये झाली. वयाच्या २३ व्या वर्षी बलुच रेजिमेंट मध्ये पोस्टिंग झाल्यावर त्यांनी मेजर ह्या हुद्यापर्यंत प्रगती केली. १९४७ ला भारत आणि पाकिस्तान असे दोन देश अस्तित्वात आल्यावर मुसलमान म्हणून त्यांनी पाकिस्तानात यावं ह्यासाठी त्यावेळचं पाकिस्तानी नेतृत्व आग्रही होतं. अगदी पाकिस्तानी आर्मी चा सर्वसेवा बनवण्याचं आमिष ही त्यांना देण्यात आल. पण मुसलमान म्हणून मुहम्मद उस्मान ह्यांनी भारताशी दगाबाजी केली नाही. उलट त्यांनी भारतीय सैन्यात कार्यरत राहण्याचं ठरवलं. नुसतं ठरवलं नाही तर आपल्या मातीशी इमान पण शेवटच्या श्वासापर्यंत राखलं.
१९४८ साल उजाडलं पाकिस्तान ने भारताच्या नौशेरा सेक्टरमध्ये भारतावर आक्रमण केलं. ब्रिगेडियर मुहम्मद उस्मान ह्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला पाणी पाजलं. पाकिस्तान सैन्याच्या तुलनेत अतिशय कमी संख्याबळ असतांना ब्रिगेडीअर मुहम्मद उस्मान ह्यांच्या कुशल नेतृत्वगुण आणि पराक्रमी सहसापुढे पाकिस्तानी सैन्याने नांगी टाकली. ह्या युद्धात पाकिस्तान चे १००० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले तर १००० सैनिक जखमी झाले. भारताने फक्त ३३ सैनिक गमावले. हा आकडा बरचं काही सांगून जातो. ब्रिगेडीअर मुहम्मद उस्मान ह्यांच नेतृत्व किती उच्च कोटीच होतं हे ह्यातून दिसून येते. त्यांच्या ह्या पराक्रमाने त्यांना “लायन ऑफ नौशेरा” ही उपाधी मिळवून दिली. पाकिस्तान ला हा पराभव इतका जिव्हारी लागला की जो कोणी पाकिस्तानी ब्रिगेडीअर मुहम्मद उस्मान ह्याचं धड आणून देईल त्याला रुपये ५०,००० देण्याची घोषणा पाकिस्तान सरकारने केली होती. १९४८ च्या काळात रुपये ५०,००० ची किंमत कदाचित आजच्या पन्नास लाखा पेक्षा जास्ती असेल. वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी हा पराक्रम गाजवल्यामुळे ब्रिगेडीअर मुहम्मद उस्मान शत्रूच्या गोटात नंबर १ चे शत्रू बनले होते. त्याहीपेक्षा एक मुसलमान असून भारताच्या किंवा एका हिंदू राष्ट्राच्या देशप्रेमासाठी एक मुसलमान सैनिक जीवावर उदार होऊन एका मुसलमान राष्ट्राचे कंबरड मोडतो हेच कुठे पाकिस्तानच्या पचनी पडत नव्हतं.
३ जुलै १९४८ ला एका अयशस्वी चढाई नंतर पाकिस्तान ने पुन्हा जहांगर भागावर पुन्हा एकदा हमला केला. बॉम्ब आणि ग्रेनेड च्या ह्या हल्यात एक २५ पौंडाचा ग्रेनेड ब्रिगेडीअर मुहम्मद उस्मान ह्यांच्या बाजूला येऊन फुटला. ह्यात ते गंभीर जखमी झाले. त्याही अवस्थेत त्यांचे शेवटचे शब्द होते
“I am dying, but let not the territory we are fighting for…. fall”.
हे बोलून भारताच्या एका जाबांज हिरोने आपला जीव देशाच्या प्रती अर्पण केला. आजच्या क्षणापर्यंत ब्रिगेडीअर मुहम्मद उस्मान हे भारताच्या सैन्यातील सगळ्यात मोठ्या पदावरचे ऑफिसर आहेत ज्यांना युद्धात वीरमरण आलं. त्यांच्या ह्या अत्युच्य त्यागासाठी त्यांना मरणोत्तर महावीर चक्राने सन्मानित करण्यात आलं. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या मंत्रीमंडळा सोबत ह्या शूरवीर सैनिकाला शेवटची मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते. जहांगर इकडे ज्या दगडावर फुटून ग्रेनेड ने ब्रिगेडीअर मुहम्मद उस्मान ह्यांचा जीव घेतला त्याच दगडावर त्याचं मेमोरियल बनवण्यात आलं आहे.
जात, धर्म, रंग आपण भारतीय आणि आपला देशाभिमान ठरवत नाही. ते आत असावं लागते. पण धर्माच्या नावाखाली एकमेकांचा जीव घेण्यास आतुर असलेल्या भारतीयांना ब्रिगेडीअर मुहम्मद उस्मान ह्यांच भारतीयत्व कसं कळणार? कारण ते त्या पलीकडे होतं. आज किती जणांना ब्रिगेडीअर मुहम्मद उस्मान माहित आहेत? पदक जिंकल्यावर त्या खेळाडूची गुगल वर जात शोधणाऱ्या भारतीयांना ब्रिगेडीअर मुहम्मद उस्मान ह्यांची जात आधी दिसणार. वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी इतका अतुच्य पराक्रम आणि आपल्या नेतृत्वगुणांमुळे शत्रूच्या तोंडचे पाणी पळवणारा सैनिक आज सो कॉल्ड भारतीय म्हणवत भारताच्या प्रमाचे गोडवे गाणाऱ्या भारतीयांच्या मनातून कधीच विस्मृतीत गेला आहे. ब्रिगेडीअर मुहम्मद उस्मान ह्यांच्या पराक्रमापुढे मी नतमस्तक. सर तुमच्यासारखे सैनिक होते म्हणून भारताचा तिरंगा सगळ्याच रंगाचं प्रतिनिधित्व करू शकला. तुमच्या देशप्रेमाला माझा कडक सॅल्युट.
वाचण्यासारखे आणखी काही…..
वसुधा कोरडे-देशपांडे यांचा ब्लॉग
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.