टीकेला सामोरं कसं जायचं हि कला शिकली तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ती तुम्हाला कामाला येईल.
म्हणूनच हे पाच मुद्दे समजून घेऊन ते आपल्या वागण्यात आणले तर फेकला गेलेला दगड फुलासारखा कसा झेलायचा याचं कसब तुम्हाला जमलंच समजा.
तुमच्यावर कोणी टीका केली तर तुमची रिऍक्शन काय असते?
टीकेचं उत्तर तुम्ही दोन प्रकारे देतात. एकतर रागावता किंवा बचावात्मक पवित्रा घेता. याशिवाय तिसरी मूक प्रतिक्रिया सुद्धा असते. ती अशी कि तुम्ही डिमोटिव्हेट होऊन जाता आणि स्वतःलाच दोषी ठरवून कोशात जाता, नाराज होता आणि पुढे काहीही करण्याआधी आपल्याला हे जमेल का?
इथपासून सुरुवात होते. खूप कमी लोक असतात जे टीकेला दिलदारपणाने सामोरे जाऊ शकतात.
का बरं हे टीकास्त्र पचवण्यासाठी इतकं जड जातं?
कोणी तुमच्यावर टीका करून मर्मावर घाव घातला तर तुम्ही अस्वस्थ होता. लाजेची भावना मनात येते, दुसरे तुम्हाला काय म्हणतील याची चिंता तुम्हाला वाटायला लागते. या सगळ्यामुळे तोल ढळून टोकाचा निर्णय तरी घेतला जातो. किंवा नाहीतर तुम्ही तुमचा मूड खराब करून घेता.
आणि म्हणूनच आज या लेखात मी तुम्हाला टीकांना आणि टीकाकारांना सामोरे जाण्याचे पाच प्रभावी मार्ग सांगणार आहे. या पद्धती वापरल्या तर तुम्ही एक बॅलन्सड आणि कणखर व्यक्ती म्हणून तुम्ही तुमची ओळख निर्माण करू शकाल यात शंकाच नाही.
टीकाकारांना सामोरे जाण्याचे पाच मार्ग:
१) स्वतःला अलिप्त करून घ्या:
बरेच ठिकाणी सांगतलं जातं कि टीकेला पर्सनली घेऊ नका. मान्यये कि ते काही सोपं नाही. कोणी तुम्हाला काहीही बोलून गेलं तर तुम्ही अस्वस्थ होणारच.
अशा परिस्थिती मार्ग फक्त एवढाच उरतो कि या परिस्थितीपासून स्वतःला अलिप्त करून घ्यायचं. तुम्हाला वाटेल अलिप्त करून घेणं काही सोपं काम आहे का? आपण काही संत महंत नाही कि परिस्थितीपासून अलिप्त होता येईल.
आधी हे समजून घ्या कि समोरच्या व्यक्तीचं टीका करणारं स्टेटमेंट म्हणजे तुमच्याबद्दलचं, तुम्हाला डिफाइन करणारं, तुम्ही काय आहे ते ठरवणारं अंतिम आणि अचूक मत नाहीये. ते फक्त एखाद्याचं मत आहे आणि त्यावर फोकस किती करायचा, लक्ष किती द्यायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे.
शिवाय तुम्ही एक गोष्ट मनोमन समजून घेतली पाहिजे कि प्रत्येकाला खुश ठेवणं तुम्हाला शक्य नाही. ठीकये जर एखाद्याचं मत तुमच्याबद्दल वेगळं आहे. एखाद्याची विचार करण्याची क्षमता जशी आहे तसा विचार ती व्यक्ती करणार.
२) तिरस्कार आणि टीका यातलं अंतर समजून घ्या:
टीका हि नेहमीच एखाद्याने त्याच मत मांडायचं म्हणून किंवा विधायक चर्चेचा भाग म्हणून केलेली नसते. काही लोकांना जाणून बुजून द्वेष पसरवण्यासाठी चर्चेच्या रूपात टीका करायची खोड असते. हो इथे मला काही हेटर्स बद्दल बोलायचंय.
काही खरे टीकाकार हे बरेचदा विधायक चर्चेतून टीका करणारे असतात. त्यातून तुम्ही ठरवलं तर तुम्हाला तुमच्या चुका सुधारणं सुद्धा शक्य होईल. तुम्हाला सुद्धा समजतंच असेल कि काही टीकाकार तुम्हाला चांगलं काही सुचवण्यासाठी टीका करतात.
तर दुसरीकडे द्वेष करणारे लोक तुमची टीका करतात कारण त्यांना तेवढंच जमतं. बरेचदा त्यांनी केलेली टीका हि त्यांच्या स्वतःची एखाद्या प्रॉब्लेममुळे त्यांना आलेलं फ्रस्ट्रेशन सुद्धा असतं. आणि यामुळे तुम्हाला काहीही फरक पडणार नसतो.
म्हणून द्वेष आणि टीका यातला मुख्य फरक समजून घेतला तर त्या टीकेकडे कसं पाहायचं हे ठरवणं सोपं जाईल.
३) प्रतिक्रिया न देता फक्त प्रतिसाद द्या, रिऍक्ट न करता फक्त रीस्पॉन्ड करा:
समजा ऑफिसमध्ये एखाद्या प्रोजेक्टवर तुम्ही खूप मन लावून काम केलंय आणि तुमच्या बॉसने तुमच्या कामावर टीका करून त्यात आणखी जास्त कामाची गरज असल्याचं सांगितलं.
अशा वेळेस जर तुम्ही तुमचं संतुलन बिघडू देऊन केलेल्या कामाला जस्टीफाय करण्यात काही अर्थ राहत नाही. इथं तुम्ही रिऍक्ट झालात तर त्याचा त्रास फक्त तुम्हाला आणि तुम्हालाच होणार.
तर अशी वेळ आली तर थोडं मागे होऊन स्वतःला थोडा वेळ द्या. स्वतःला प्रश्न विचारून समजून घ्या टीका नक्की कशासाठी होती. जर ती मान्य असेल तर शांतपणे सुधारणा करून त्यातून धडा घ्या.
आणि जर खरंच तुम्हाला तुमचं काम ‘अप टू डेट’ वाटत असेल तर बॉसला ते ग्रेसफुली आणि आत्मविश्वासाने पटवून द्या. तुमचं मत पटवून द्या आणि डिफेन्सिव्ह न होता स्वतःच्या बाजूने भक्कमपणे उभे राहा. थोडक्यात म्हणजे शांत राहून ऑब्जेक्टिव्हली चर्चा करा. प्रश्न आपोआप सुटेल.
४) स्वतःमध्ये न्यूनगंड ठेऊ नका:
जर तुमच्यात स्वाभिमान नसेल न्यूनगंड असेल तर कुठलीही टीका तुमच्यातला आत्मविश्वास संपवायला पुरे पडेल. आणि तुम्ही स्वतःवरच नाखूष राहाल.
तुमचा स्वाभिमान तुमच्याकडे सहीसलामत ठेवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करा. अकारण केल्या जाणाऱ्या टीकेचा तुम्हाला त्रास होणार नाही यासाठी तुमच्यातला ‘स्ट्रॉंग सेन्स ऑफ सेल्फ’ जाणीवपूर्वक जागा करा.
खरंच चूक सुधारली गेली पाहिजे अशी असेल तर मोठ्या मनाने ती सुधारा. त्याने डिमोटिव्हेट, डिफेन्सिव्ह होण्याचे काहीही कारण नाही हे मनाशी पक्के ठरवून घ्या.
आता पुन्हा अशी टीका झेलावी लागली तर स्वतःला समजावून सांगा कि हा फक्त फीडबॅक होता. आणि तो योग्य वेळी, योग्य पद्धतीने, डिफेन्सिव्ह न होता सुधारण्याची तयारी ठेवा.
५) ग्रोथ माइण्डसेट ठेवा
ग्रोथ माइण्डसेट म्हणजे मला असं म्हणायचं कि येणाऱ्या फीडबॅक मधून तुम्ही यीग्य ती सुधारण केली तर तुम्हाला स्वतःमधलं चांगलं व्हर्जन विकसित करायला सहज जमेल. आणि ‘दाग भी अच्छे होते है’ सारखंच टीका सुद्धा चांगली असते हे पटेल. स्वतःच्या ग्रोथकडे फोकस केला तर टीकेला चांगल्यासाठी उपयोगात आणता येईल.
टीकेला सामोरं कसं जायचं हि कला शिकली तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ती तुम्हाला कामाला येईल. म्हणूनच हे पाच मुद्धे समजून घेऊन ते आपल्या वागण्यात आणले तर फेकला गेलेला दगड फुलासारखा कसा झेलायचा याचं कसब तुम्हाला जमलंच समजा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
निंदकाचे घर असावे शेजारी ।
Very important for our Happy life