एखाद्या गोष्टीबाबत किंवा एखाद्या परिस्थितीत अवघड वाटू शकणारे निर्णय घेणं तुम्हाला जमत नाही का?
असे निर्णय घेण्यापेक्षा ती परिस्थिति टाळण्याकडे तुमचा कल असतो का?
किंवा घाईत अवघड निर्णय घेऊन नंतर त्याबद्दल पश्चाताप झालाय असं तुमच्या बाबतीत होतं का ?
आपण थोडा अधिक वेळ देऊन मग निर्णय घ्यायला हवा होता असं तुम्हाला वाटतं का?
सध्याच्या कोविड महामारीच्या काळात तर आपल्याला आपल्या कुठल्याही निर्णयाचे टेंशन येणे साहजिक आहे.
काहीही ठरवताना बदललेल्या परिस्थितीचा विचार करणं स्वाभाविक आहे.
आपले घेतलेले कोणतेही निर्णय चुकू नयेत ह्याची खबरदारी घेणं देखील अतिशय आवश्यक आहे.
खरंतर निर्णय कीती वेळ देऊन घेतला ह्यावर तो निर्णय योग्य की अयोग्य हे ठरत नाही तर अनेक अवघड निर्णय घेताना त्यामागचा विचार, निर्णय घेण्याची प्रोसेस आणि तो निर्णय यशस्वी ठरण्यासाठी काय मार्ग वापरले आहेत हे महत्वाचे ठरते.
योग्य पद्धतीने निर्णय घेतले तर त्या निर्णयांसाठी पश्चाताप करत बसण्याची वेळ येत नाही.
हिच योग्य पद्धत किंवा मार्ग कोणते ते आपण आज पाहणार आहोत.
अवघड निर्णय घेताना मनाचे ऐकावे का ?
वैयक्तिक असोत की व्यावसायिक, अनेक महत्वाचे निर्णय हे आयुष्याला कलाटणी देणारे असतात.
त्यामुळे असे निर्णय घेताना खरंतर खूप खबरदारी घेतली पाहिजे परंतु बरेचदा असे निर्णय लोक फार विचार न करता मनाला जे योग्य वाटेल ते करू अशा प्रकारे घेतात.
आणि मनाला योग्य वाटलेला, गट फिलिंग नी घेतलेला निर्णय योग्य असतो असा सर्वसाधारण समज आहे परंतु कोगनिटीव्ह न्यूरो सायन्स आणि बिहेवीयरल एकॉनॉमिक्सने केलेल्या रिसर्च मध्ये असं सिद्ध झालं आहे की योग्य विचार करून, योग्य पद्धतीने घेतलेले निर्णय हे गट फिलिंगच्या आधारे घेतलेल्या निर्णयापेक्षा जास्त योग्य ठरतात.
तर मग कोणते आहेत अवघड निर्णय घेण्याचे मार्ग. ते आपण आज विस्ताराने पाहूया
१. अवघड निर्णय घेण्याची गरज ओळखा
एखाद्या परिस्थितीमध्ये अवघड निर्णय घेण्याची खरंच गरज आहे का हे आधी तपासून पहा.
त्यासाठी संपूर्ण परिस्थितीचे अवलोकन करा.
स्वतःला त्या परिस्थितीशी निगडीत असे प्रश्न विचारा.
अशा वेळी मनावर भावनांचा परिणाम होऊ न देता प्रॅक्टिकल वागायचा प्रयत्न करा.
हे लक्षात घ्या की मोठे यशस्वी निर्णय घेतलेले लोक देखील अचानक निर्णय न घेता आधी परिस्थितीचा सांगोपांग विचार करतात.
एखादा अवघड निर्णय घेणे इथे आवश्यक आहे का ते पाहतात.
२. निर्णयाबाबतची सर्व माहिती मिळवा
एखादा निर्णय घेत असताना उद्भवलेल्या परिस्थितीची समोर असलेली माहिती तर तुम्ही अभ्यासालच.
परंतु त्या बाबतीतली इतरही सर्व माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा.
अशी माहिती तुम्हाला तुमचे मित्र, कलीग, वडीलधारे लोक किंवा काही वेळा त्या त्या क्षेत्रातील दिग्गज, पण अनोळखी लोक ह्यांच्याकडून मिळू शकते.
आपल्या निर्णयाबाबतच्या सर्व शक्याशक्यतांचा विचार करा.
दुसऱ्या बाजूने विचार करण्याचा प्रयत्न करा. ह्यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला मदत होईल.
३. तुमचे ध्येय ठरवा
एखादा अवघड निर्णय घेताना त्यामागे असणारे तुमचे ध्येय काय आहे त्याचा विचार करा.
असा निर्णय घेताना त्यातून तुम्हाला काय मिळवायचे आहे हे आधी निश्चित करा.
तसेच तुमच्या निर्णयाच्या मुळापर्यंत जाऊन काही चूक होत नाही ना हे आधी नक्की तपासून घ्या.
४. निर्णय घेण्याचे निकष ठरवून घ्या
जर तुम्हाला अवघड निर्णय घ्यायचे असतील तर ते निर्णय घेण्याआधीच ते निर्णय घेण्यासाठीचे निकष ठरवून घ्या.
निकष ठरवताना कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह मनात ठेवू नका त्याऐवजी निर्णयाच्या होणाऱ्या परिणामांचा आधी विचार करा.
जर आधी निकष ठरवले नाही तर भलतेच निर्णय घेतले जाण्याची शक्यता निर्माण होते.
५. सर्व पर्यायांचा विचार करा
एखादा अवघड निर्णय घेताना समोर असणाऱ्या सर्व पर्यायांचा विचार करा.
कमीतकमी ५ शक्य असणाऱ्या पर्यायांची यादी तयार करा.
तसेच पर्यायांचा विचार करताना अशक्य वाटणारे पर्याय देखील निवडा.
ही फक्त निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे. प्रत्यक्ष निर्णय घेण्यापूर्वी करण्याचा विचार आहे त्यामुळे आपण सर्व बाजूंचा विचार करून मग निर्णय घेऊ शकतो.
६. योग्य पर्याय निवडा
आपण केलेली पर्यायांची यादी नीट अभ्यासा.
पटकन सुचलेले पर्याय लगेच निवडायचे असं न करता सर्व पर्यायांचा सखोल अभ्यास करून योग्य वाटेल तो पर्याय निर्णय घेण्यासाठी निवडा.
तसेच निवडलेला पर्याय पूर्णपणे पारखून घ्या. केवळ मनाला वाटलं म्हणून काहीही ठरवू नका.
तर सर्व शक्यतांचा विचार करून पर्याय निवडा.
७. निवडलेला पर्याय आजमावून पहा
तुम्ही निर्णय घेण्यासाठी जो पर्याय निवडला आहे तो आधी आजमावून पहा.
म्हणजे असे समजा की तुम्ही घेतलेला निर्णय पूर्ण चुकला आहे आणि असं झालं तर काय काय होईल त्या सर्व शक्यतांचा विचार करा.
तसेच ह्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही काय कराल ह्याचा विचार करा.
आता ह्या पद्धतीची दुसरी बाजू, असे समजा की तुमचा निर्णय अगदी योग्य ठरला आहे आणि मग काय काय शक्यता आहेत ते तपासून पहा.
ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या निर्णयाचा आधीच सांगोपांग विचार करू शकाल आणि योग्य तोच निर्णय घेऊ शकाल.
८. निर्णयाची अमलबजावणी करा आणि त्यावर लक्ष ठेवा
ही आपल्या अवघड निर्णय घेण्याच्या पद्धतीची शेवटची स्टेप.
तुमच्या घेतलेल्या निर्णयाची अमलबजावणी करा. आणि मग त्याच्या होणाऱ्या परिणामांवर बारीक लक्ष ठेवा.
जर काही चुकीचे होत आहे असे वाटले तर पुन्हा वरील सर्व स्टेप्स वापरा आणि तुमचा निर्णय तपासून पहा.
तसेच निर्णय चुकला आणि तो बदलण्याची वेळ आली तरी खचून जाऊ नका.
त्या परिस्थितीचा पुन्हा नीट विचार करून निर्णय घ्या.
तर हे आहेत अवघड परिस्थितीत निर्णय घेण्याचे ८ मार्ग.
कोणत्याही प्रकारच्या गट फिलिंगला बळी न पडता अगदी प्रॅक्टिकल पद्धतीने विचार करून निर्णय घेणे हे केव्हाही जास्त उचित ठरते.
आयुष्य बदलणाऱ्या गोष्टी ठरवताना केवळ मनाचे न ऐकता व्यवस्थित स्टेप बाय स्टेप विचार करून निर्णय घ्या म्हणजे अवघड निर्णय घेणे सोपे होईल.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.