‘पंढरीची वारी’ हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे. ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीचं असं अनोखं रूप जगात कोठेही पहावयास मिळत नाही.
‘ माझ्या जीविचि आवडी | पंढरपुरा नेइन गुढी ||’
ही माऊली ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा शेकडो वर्षापासून वारकरी पूर्ण करत आहेत. ग्रीष्म सरला की आभाळात ढग दाटुन येतात.. मेघांच्या गडगडाटात आणि विजेच्या लखलखाटात सरीवर सरी बरसू लागतात. पेरणी लावणीची कामं पूर्ण झाली की, हवेतील गारवा अन् माळराणावरील हिरवाई वारकरी भक्तानां विट्ठलाच्या दर्शनाची ओढ लावते.
‘भेटी लागी जिवा.. लागलीसे आस..!’
या भावात तल्लीन होऊन वारकरी गरजनाऱ्या बरसणाऱ्या पावसाची तमा न बाळगता, संसाराची सर्व चिंता सोडून विठ्ठल नामाचा महिमा वर्णन करीत…
‘ गायी नाची उड़े आपुलिया छंदे | मनाच्या आनंदे आवडीने ||’
अश्या देहभान हरवलेल्या अवस्थेत पंढरीच्या वाटेने मार्गस्थ होतात. कपाळी अष्टगंध, गळ्यात तुळशीची माळ, मुखात अखंड रामकृष्णहरी नामाचा जप व टाळ, मृदुंग, चिपल्याच्या निनादात हरिनामाचा गजर करीत, वैष्णवाचा हा मेळा अतिशय शिस्तीने विठूरायाच्या भेटीकरिता मार्गक्रमण करतो.
‘ होय होय वारकरी | पाहें पाहें रे पंढरी ||’
या तुकाराम महाराजांच्या उपदेशानुसार सर्व वारकरी, माळकरी या आनंदसोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या सुख सोहळ्यातील आनंद अवर्णनीय आहे. शेकडो मैल पायी चालणाऱ्या या वारकरयांना किंचितही थकवा येत नाही. उलट,
‘जाईन ग माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया||’
या ओढीने वारकरी एखाद्या सासुरवाशीनी सारखे आपल्या मायबापाला भेटायला जात असतात. कुठलाही बड़ेजाव नाही की, कोणताही गाजावाजा नाही. वारीतील दिंडीची आपली एक आचारसंहिता असते. सर्वात पुढे पताकाधारी त्याच्यामागे टाळकरी, पखवातवादक, दिंडीचे नेतृत्व करणारे विनेकरी आणि चार चार ओळीत चार वारकरी. अश्या शिस्तीत दिंडी चालते. दिंडीचे काही संकेत आणि दंडक ठरलेले असतात, त्याचे पालन सर्वांनाच करावे लागते. स्वयंशिस्त, सामाजिक समता आणि एकात्मतेचं ‘वारी’ हे एक सर्वोत्कृष्ठ उदाहरण म्हटलं पाहिजे. याठिकाणी कोणताही भेदाभेद पाळला जात नाही. एकत्र स्वयंपाक, एकत्र भोजन, सर्वांचं सामान श्रमदान असा वारकाऱ्यांचा आचारधर्म आहे.
‘ तुका म्हणे नाही जातिसवे काम | ज्या मुखी नाम तोची धन्य ||’
हे संतवचन आषाढ़ी वारीतिल सामाजिक समतेचं अधिष्ठान आहे. त्यामुळेच आज केवळ महाराष्टच नाही तर संपूर्ण देशाचं ‘तीर्थ विठ्ठल.. क्षेत्र विठ्ठल’ झालं आहे. भक्तिमार्गात चालणारा वारीतिल विशाल भक्तसागर बघितला की, ‘भुता परस्परे जड़ो..मैत्र घड़ो जीवांचे’ हे माउलींचं स्वप्न साकार झाल्याची अनुभूती येते.
वारी हे व्रत आहे, वारी ही उपासना आहे तसेच वारी म्हणजे वारकरी संप्रादायाचा आचारधर्म आहे. पंढरपुरकडे वाटचाल करत असताना रस्त्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. भजन, कीर्तन, प्रवचन, भारुड़, गौळणी आदी माध्यमातून वारकरी आपलं आणि समाजाचं प्रबोधन करत पुढे जातात. पालखी मार्गात पार पडणारा रिंगण सोहळा सर्वांचे लक्ष्य वेधुन घेतो. उभं आणि गोल असे या रिंगणाचे प्रकार, रिंगणाच्या मधोमध टाळकरी आणि मृदुंगवाले उभे राहतात. दिंडीतील अश्व हे रिंगण पूर्ण करतात. हा अनुपम्य सोहळा वारकरी याच डोळा याच देही अनुभवतात. जस् जसं पंढरपुर जवळ येवू लागत तस् तशी सर्वानाच ओढ़ लागते ती विठूरायांच्या दर्शनाची..
‘पंढरपुरच्या शिवेवरी कळस देखिला आपोआप | त्यामधे माझा मायबाप..||’
या धारणेने वारकरी कळसाच्या दर्शनानेही तृप्त होतात. आषाढ़ी निमित्त पंढरीत मोठी यात्रा भरते. वारकरी सांप्रदाय भक्तिमार्गाला जास्त महत्व देत असल्याने पूजा विधी यापेक्षा भजन कीर्तन आणि प्रवचनालाच जास्त महत्व दिले जाते. ‘ चंद्रभागे स्नान तुका म्हणे हेची दान ‘ या संतवचनानुसार चंद्रभागा स्नानालाही एक वेगळेच महत्व आहे. ‘पंढरीची वारी आहे माझ्या घरी | आणिक न करी तीर्थव्रत || असं वर्णन संत तुकाराम महराजांनी आपल्या अभंगातून केलयं.. ईश्वरप्राप्तीसाठी कोणतीही साधना किंवा तप करण्याची गरज नाही, तर केवळ वारकरी होऊन पंढरपुरला गेल्यानेही इश्वराची फलश्रुति मिळते असा उपदेश महाराज करतात.
चैत्र, माघी, आषाढ़ी आणि कार्तिकी अश्या चार वाऱ्या वारकऱ्यांनी कराव्यात असा संप्रादायात संकेत आहे. परंतु आषाढ़ी आणि कार्तिकिला अधिक महत्व देण्यात येते. कारण या दिवशी खुद्द परब्रह्म् परमात्मा पांडुरंग आपल्या भक्तांची वाट पाहत असतो. ‘आषाढ़ी कार्तिकी विसरु नका मज | सांगतसे गुण पांडुरंग || असं भावविभोर वर्णन संत नामदेव महाराज करतात. असा हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक, सामाजीक आणि पारमार्थिक महाउत्सव.. बदलत्या काळानुसार वारीतही अनेक बदल घडून येत आहे. मागील काही वर्षापासून वारीचं थेट प्रक्षेपण होऊ लागल्याने वारीही डिजिटल झाली आहे. ग्रामीण भागासोबत शहरी भागातील नागरिक आणि तरुणाई सुद्धा वारीत मोठ्या संख्येने सहभागी होतात. अर्थात वारीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या भाविक भक्तांना अनेक असुविधांचा सामना करावा लागतो. परंतु यामुळे वारीत येणाऱ्यांची संख्या घटत नाही तर उलट ती वाढतच आहे. कारण वारी म्हणजे महाराष्ट्राचं सांस्कृतिक लेणं आहे. आषाढ़ी एकादशीला उपवास करुण वारकरी द्वादशीला कीर्तनरस प्राशन करत सामूहिक प्रसादाने उपवास सोडतात आणि पोर्णिमेला काल्याचे कीर्तनाने वारीची सांगता होते. वारकरी परतीच्या प्रवासाला निघतात ते पुन्हा वारीला येण्याचा निर्धार करूनच…… सर्वांच्याच मनात विठुरायाच्या चरणी एकच प्रार्थना असते…
हेची व्हावी माझी आस |
जन्मोजन्मी तुझा दास ||
पंढरीचा वारकरी |
वारी चूको न दे हरी ||
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.