आज तो जरा घाईतच निघाला कॉलेजला जायला.. ‘आई निघतो गं!! यायला उशीर होईल.. आज पासून नवीन विषय होतोय चालू.. न्यूड्स’
आणि लगेच बाहेर पडला. त्याला माहित होतं आईने नाक मुरडल असणारे..
पण त्याला कसलीच पर्वा नव्हती. तो सरांच्या न्यूड पेंटिंग्ज वर फिदा होता. काय हात होता त्यांचा….
एकेक वळण, अंग प्रत्यय, उठाव असे सुंदर रेखतायचे की बस. आज तो त्यांना प्रत्यक्ष काढताना बघणार होता आणि त्यासाठी त्याला जमेल तेवढं पुढे बसायचं होतं. आणि अखेरीस त्याला हवी ती जागा त्याने मिळवली होतीच.. काही क्षणातच त्याचं दैवत त्याच्या समोर!! डोळ्यात प्राण आणून तो सगळे बघत होता.
सरांचे सोबती सगळी मांडणी करत होते.. तो कॅनव्हास, स्टँड, चारकोल आणि सर. पण सर सारखे घड्याळ बघत होते. वाट बघत होते कोणाची तरी. त्याला कळेना सगळी तयारी झालीय तर मग आता वेळ का घालवत आहेत?? तिकडे सर आणि इथे हा.. जरा वैतागले होते. तेवढ्यात कोणी तरी स्त्री आली धावत..
श्वास लागलेला तिला चांगलाच पण बसू सुध्दा दिलं नाही तिला. सगळ्यांच्या समोर खेकासले जोरात तिच्यावर सर “किती वर्ष काम करते माझ्या सोबत पण अजून वेळेचं महत्त्व नाही तुला?? नाटक नकोय रडायचं. जाऊन कपडे बदल आणि ये.. मोजून दोन मिनिटे देतोय”
ती तशीच आतल्या खोलीत धावली. आणि पावणेदोन मिनिटात बाहेर आली.. अंगावर शाल ओढून.. ती.. ती.. तीच होती.. त्यांचं मॉडेल!!
न्यूड पेंटिंग च मॉडेल!!!
तिची बैठक तयारच होती. ती तिथे जाऊन बसली. तिला स्वतःला कसं बसायचं ठरवायचा अधिकार नव्हताच. सगळे हक्क सर- स्वाधीन.
ते अजून घुश्श्यातच होते. शाल ओढून फेकून दिली त्यांनी आणि हात चेहरा त्यांना हवे तसे बळावू लागले.
मधेच केव्हा तरी हात किंचित पिरगळला गेला असावा चेहऱ्यावर एक सेकंद वेदना चमकुन गेली. पण ती शांत होती. चकार शब्द न काढता मूर्ती बनून बसली होती. वर्ग अगदी शांत झालेला.
आता सर रंगात आले होते. त्यांचा हात सरसर फिरत होता कॅनव्हास वर. बघता बघता एक सुरेख चित्र जन्माला आले. तब्बल चार तास… आणि तोवर ती तशीच.. पुतळा बनलेली.. पाणी सुध्दा न पिता..
सरांनी कुंचला खाली ठेवला आणि तिच्या अंगावर शाल फेकली.. पुन्हा एकदा तीच मग्रूरी.. हलकेच तिने ती गुंडाळून घेतली. आणि आत गेली आवरायला.
इथे एकच चर्चा रंगली होती. सारंच चित्र.. तेवढ्यात त्यांचा आवाज आला.. “उद्यापासून रोज एक विद्यार्थी स्केचेस काढेल. तुमचे तुम्ही दिवस ठरवा आणि तिला नावे द्या.” सगळे जाम खुश झाले. वाद नकोत म्हणून चिठ्ठ्या काढून दिवस ठरले.
याचा आला शेवटचा.. पण तरी दुःख नव्हतंच उलट तो बाकीच्यांची चित्रं आणि स्वतःच्या डोक्यातला विचार यांची सांगड घालून तिला पोझ देणार होता.
होता होता महिना संपला.. मुलं छान शिकत होती. काही वेळा थोडा वाह्यातपणा होत होता पण ती समजून होती. अर्धवट वय त्यात हा विषय.. होणारंच!!
याचं मात्र वेगळंच.. त्याने सरांना विचारलं “मी काही वेगळ्या प्रकारची चित्रं काढू का? मला न्यूड नकोय” खरंतर तोच विषय होता पण त्याच्यातला चित्रकार नक्की काय करू बघतोय.. जाणून घ्यायला सर पण हो म्हणाले.
उद्या त्याचा दिवस होता. आदल्या संध्याकाळी तिला फोन केला आणि म्हणाला उद्या प्लीज केस शाम्पू करून या. तिला वेगवेगळ्या निरोपाची सवय होती पण हा जरा वेगळाच.. असो..
ती त्याला हवी तशी शाम्पू करून गेली. नेहमीप्रमाणे कपडे बदलायला जाऊ लागली तशी त्याने थांबवलं. खिडकीजवळ नेलं आणि हातात मस्त गरम कॉफी दिली. तिला प्रचंड आश्चर्य वाटले. आणि तिथेच तो म्हणाला” अशाच बसा, आजिबात हलू नका”
त्याचा हात चालू लागला आणि बघता बघता एक छान तरुणी रेखाटली त्याने. भूर भूर उडणारे केस, बाहेर बघणारी तिची नजर, आणि लांबसडक बोटांनी धरलेला कॉफी मग…
एवढं सुरेख जमून आलेलं की तिचाच विश्वास बसेना.. मग थोडा वेळ इकडच्या तिकडच्या बोलण्यातून त्याने तिला वेगळ्या विषयाकडे नेलं. तिला स्कार्फ बांधायला सांगितला आणि डोळ्यांची स्केच काढली.. एका मागे एक… अविरत..
शेवटी पूर्ण वाही भरली आणि त्याला थांबाव लागलं. त्याने वाही दिली तिला बघायला. तिचे उठावदार अवयव माहित होते तिला.. पण आपले डोळे एवढे पाणीदार आहेत हे आजचं समजल..
एक एक चित्र बघताना तिचा चेहरा बदलत होता.. त्याला असं वाटलं पुन्हा रेखावं तिला.
वहीच्या मधल्या पानावर तर त्याने कमाल केलेली.. अर्धा चेहरा आणि एक डोळा आव्हान देणारा.. अगदी सेक्सी लुक आणि दुसरी बाजू.. पापणीच्या आड अश्रू दडवलेला.. पण तरी हसरा..
हे चित्र बघताना मात्र ती अक्षरशः रडवेली झाली. तिच्या हातून वाही गळून पडली आणि धावत बाहेर पडली.. आणि तो सुन्न होऊन बघत राहिला त्याला कळेना आपलं नक्की काय चुकलं..
आपण तिला कुठे तरी दुखावलं असावं बहुदा. या विचाराने तो अस्वस्थ झाला.. विलक्षण कावराबावरा.. तिला सॉरी म्हणायला त्याने फोन केला तर फोन देखील बंद. दिवसभरात शंभर फोन तरी केले असतील पण अखंड बंद..
उद्या कॉलेजमध्ये म्हणू सॉरी असं स्वतःचं स्वतःला सांगून झोपायचा प्रयत्न करत होता पण ते ही होईना. जरा लवकर बाहेर पडला बघून आई विचारत होती पण त्याचं लक्षच नव्हतं. “काय बिनसलं आता याचं देवच जाणे” आई पुटपुटली.
सुस्साट वेगात तो कॉलेजमध्ये पोचून तिची वाट पाहू लागला. रोजची वेळ टळून गेली. दिवस संपत आला. आता मात्र त्याचा धीर सुटला. तडक सरांकडे गेला आणि ती आली नाही पण काम उरलंय जरा असं म्हंटल तर सरांनी सांगितलं की ती येणार नाहीये. ताप आलाय बराच. हे ऐकल्यावर अजूनच नर्व्हस झाला तो.
चेहरा उतरला त्याचा एकदम. ते पाहून सर म्हणाले, “अरे ती आली की कर पूर्ण एवढं काय.. मी मार्कस नाही कापणार..”
त्यांना काय माहित काय झालंय.. तो आठवडा फार वाईट गेला त्याचा. कशात लक्ष नाही, नुसती चिडचिड तगमग..
आणि अचानक ती दिसली त्याला. थकलेली.. अशक्त.. आजारपणाने उठलेली.. चेहऱ्याचा तजेला गेलेला पूर्ण.. पण तशीच कॉलेजमध्ये आलेली..
नेहमीप्रमाणे ती स्तब्ध होऊन बसली होती आणि तो रेखाटत होता. अचानक सर आले अन् तिची अवस्था पाहून घरी जा म्हणाले. त्यालाच सोडायला जा म्हंटले तशी ती नको म्हणाली पण तो ऐकेचना. नाईलाजाने तिला सोबत जावं लागलं.
रस्त्यात सुद्धा ती अगदी गप्प अबोल.. त्याला कळतंच नव्हत कसा विषय काढावा. तिला बोलतं करायला हवं. नाहीतर गुंता सुटायचा नाही हे तीव्रतेने जाणवलं त्याला आणि त्याने सरळ कॉफी प्यायला नेलं तिला.
पण हा प्रयत्न देखील विफल झाला. आता मात्र त्याने सगळी शस्त्र म्यान केली. उरलेला रस्ता तसाच.. अबोल. फक्त इथून उजवीकडे, सरळ असे बोलणे व्हायचे तेच.
अखेरीस एका जुन्या चाळीसमोर ते थांबले. ती उतरली आणि घराकडे जाऊ लागली पण अचानक काय वाटले कोण जाणे.. एकदम वळून म्हणाली “मला त्या दुकानात मिळते तशी येत नाही कॉफी.. साधीच येते.. बघता का पिऊन?”
आता चकित व्हायची त्याची पाळी होती. एक अक्षर न बोलणारी बाई आपल्याला घरी बोलवते.. तो ही सोबत जायला लागला.. जाताना टिपिकल चाळ लूक आणि बोलणे कानावर आलेच त्यांच्या.. पण दुर्लक्ष हा एकमेव मार्ग आणि तोच त्यांनी अवलंबला.
एक अगदी लहानशी जुनाट पण अत्यंत स्वच्छ खोली.. थोडके सामान निगुतीने लावलेले.. एका पडद्याने त्या खोलीचे दोन भाग केलेले.
तिने तो सरकवला आणि कपडे बदलायला गेली. स्वतःच हसली.. दिवसभर यांच्या पुढे विवस्त्र असतो आणि आता मारे पडदा ओढते.. एक खिन्न हसू..
दूध गरम करायला ठेवून ती हातपाय धुवून आली. सांजवात केली. आणि कॉफी घेऊन त्याच्या समोर टेकली. तो नेहमी सारखा त्याच्या वहीत मग्न. पुन्हा एकदा डोळे.. पाणीदार, भाव विभोरं.. न राहवून तिने विचारलं त्याला “सगळ्यांना माझे न्यूड स्केच आवडतात काढायला पण तुम्ही माझ्या डोळ्याचे काढताय”
वर न बघताच तो पटकन म्हणाला “खूप बोलके डोळे आहेत तुझे, आर्त!! जेवढं त्यांना वाचतो तेवढं बोलतात ते माझ्याशी.. मला फार आवडत हे. तू किती ही लपव पण हे सांगतात”
“मी काय लपवलं? उगीच काही बोलू नका. कॉफी घेऊन निघा. उशीर होईल घरी जायला.” तिच्या परीने तिने विषय टाळला.
पण त्या रात्री पासून ते जरा मोकळेपणाने बोलायला लागले. तणाव जरा कमी झाला. एकदा बोलताना तो म्हणाला मी तुमच्या घराच्या पुढे राहतो. कशाला बसच्या खर्चात पडता? मी सोडेन तुम्हाला.”
त्यांची मैत्री चर्चेचा विषय झाली आणि हळू हळू सवयीची झाली.
हल्ली ते खूप बोलायचे एकमेकांशी. तो त्याची स्वप्न सांगायचा आणि ती अगदी मन लावून ऐकायची. मनापासून.. त्याला मोठं होताना बघायची. त्याची आवड निवड, खाणं पिणं त्याच्या नकळत जपायची.
एकदा असेच तिच्या घरी जाताना टोमणा ऐकला त्याने.. “हा कितवा आहे कोण जाणे.. किती पोरांचं आयुष्य बरबाद करणारे ही!!”
तसेच दुर्लक्ष करून दोघं घरी पोचले. सवयीप्रमाणे ती अवरून आली. पण त्याला तिचे डोळे लाल दिसले. “हे बघ, साबण गेलंय असं काही सांगू नकोस. काय झालं? का रडलीस? त्या दिवशी पण तू विषय बदलला होतास. आज मी ऐकणार नाहीये”
तिला त्याच्या आवाजातला निश्चय जाणवला. “ह्म्म” एवढंच उत्तर.
कॉफी झाली, गप्पा झाल्या पण तो हलायचं चिन्ह दिसेना. शेवटी तिने घरी वाट बघत असतील म्हंटल पण तरी तो ठाम.
शेवटी तिने खिचडी केली. जेवणे झाली. आणि शेवटी तिला बोलायला लागलेच.
“त्या दिवशी तू डोळे रेखाटले होतेस. तो अश्रू.. थोपवलेला.. तुला कसा जाणवला हे समजेना. खूप कष्टाने लपवलेला होता मी.. तू का वाचलास? मला भ्रमल्यासारखे झालेलं. एवढी की ताप चढला. लहापणापासूनच एकटी आहे. खूप वाईट अनुभव आणि नजरेनी मला वेळेआधी मोठं केलं.
एक एकटी मुलगी.. तरुण.. लोकं मदतीला तत्पर असतातच. अशीच एक मदत आलेली.. एका आईच्या वयाच्या बाईची.. खूप प्रेम दिलेलं तिने मला.
हे घर नावावर केलं माझ्या पण तिच्या घरच्यांनी हकलयचा प्रयत्न केला इथून.. नाही नाही ते आरोप केले, अत्याचार केले. तरी हे सगळे सहन करून मी शिकत होते.
तुझा विश्वास बसणार नाही पण मी एम. बी. ए. केलंय. याआधी चांगला ४० हजार पगार होता. पण ह्या लोकांनी फोटो शॉप करून माझ्या एवढ्या अश्लील क्लिप्स केल्या की मला नोकरी सोडावी लागली.
कित्येक महिने घरात बसून काढले. पैसे संपले पण या सगळ्यात नोकरी मिळेना. लोकांच्या बुभुक्षित नजरेनी मला माझ्या रेखीव शरीराची जाणीव करून दिली.
पण मला कोणत्याही परिस्थितीत वाईट मार्गाला जायचं नव्हतं. स्वाभिमानाने जगायचं होतं. मग हा पर्याय दिसला. देह प्रदर्शन तसे आणि असे..
पण इथे त्यातल्या त्यात मान होता. अनुभव तर वाईट इथे ही आले. हात चेहरा सोड पण उरोजाना हात लावायचा चान्स कोणीच सोडला नाही. अगदी तुझ्या लाडक्या सरांनी सुद्धा. पण मन मारून टाकले मी. इथे तर तारांगण झालेलं. पण तरी मी ठाम होते. माझ्यामुळे कोणाचं नुकसान तर नाही. मग हा मार्ग योग्य…
पण तुला माझ्या डोळ्यातली वेदना दिसली तेव्हा वाटलं की कोणी तरी आहे ज्याला शरीराशी नाही मनाशी जोडायला आवडत..
खरंच बरं वाटलेले पण मग वाटले की मी खरंच अडकवतेय का तुला. खेळते.. लोकं म्हणतात ते खरंच आहे का रे?? मी खरोखर तुला असं वागवते का??? “
बघता बघता ती ओक्सबोक्शी रडायला लागली. त्याने न बोलता तिला जवळ ओढलं आणि केसातून हात फिरवून शांत करायला लागला.
कशीतरी समजूत घातली तिची पण तिचे हुंदके थांबेना. शेवटी तिला झोपायला लावलं पण ते ही ऐकेना ती. अखेरीस त्याने तिला ओरडून बाबापुता करून मांडीवर डोकं ठेवायला लावले.
हळू हळू थोपटत राहिला. केसावरून हात फिरवत राहिला. तिचे हुंदके कमी होऊ लागले आणि अखेरीस शांत झोपली.. पण तरी तिने त्याचा हात घट्ट धरलेला होता. एकदा त्याने तिला सरळ झोपवयचा प्रयत्न केला पण ती जागी व्हायच्या भीतीने तसाच बसून राहिला.. रात्रभर..
तिला जाग आली.. प्रसन्न.. खूप वर्षांनी एवढी शांत झोप मिळालेली.. डोळे उघडले अजून हीचं डोकं अद्याप मांडीवर होते त्याच्या. घाईने ती उठली. आपल्यामुळे हा रात्रभर असा बसून आहे म्हंटल्यावर तर अजून खंतावली. “
काय रे हे? मला नीट झोपवयचं ना!! मला पण अक्कल नाही आजिबात. कशी वागले मी..”
पण तो मात्र नेहमीप्रमाणे मग्न होता तिचे डोळे रेखाटण्यात… तिचे हसरे बोलके आनंदी डोळे… जे फक्त त्याने पाहिलेले…
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.