रस्त्यावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायची गरज नसते. पण हे बंड्याला सांगेल कोण …. ?? त्यातही कोण वर गेलेला असला की हा पुढे ….
आता मयत झाले ते नाक्यावरच्या एक सोसायटीत. हा मॉलमध्ये गेलेला… येतायेता ती परिचित शांतता दिसली तेव्हा याला काही राहवले नाही. गेला त्या गर्दीत. बाजूला उभा राहून तयारी पाहू लागला आणि सहजच शेजारच्या म्हाताऱ्याला नेहमीप्रमाणे दबक्या आवाजात विचारले “कोण गेला….”??
“चौथ्या मजल्यावरचे एक वृद्ध गृहस्थ ” शेजारच्या वृद्धाने शांतपणे उत्तर दिले.
“अरे रे …. वाईट झाले. सुटले बिचारे …’. बंड्याचे टिपिकल उत्तर.
“खरेच सुटले .. कारण आता कोणाच्या डोळ्यातून पाण्याचा टिपूसही येत नाही. म्हणजे सर्वच सुटले असे दिसतंय. म्हातारा दारू खूप पियाचा आणि घरच्यांना नेहमी शिवीगाळ. कर्जही भरपूर करून ठेवलय. ही काही माणसे दिसतायत ना…. ती सर्व आपले पैसे कोण देणार ते पाहायला आलेत. तो म्हातारा बंड्याला सांगू लागला.
“म्हणजे आता घरच्यांना ताप सुरू झाला तर ..”?? बंड्या सहानुभूतीने म्हणाला.
“कसला ताप ..?? घरच्यांनी काय कमी ताप दिला नाही त्याला. रिटायर्ड झाल्यावर त्याची सर्व सर्व्हिस मुलांनी, जावयानी खाल्ली. बायकोबरोबर भारत फिरू ही त्याची इच्छा. पण नातवंडांना सांभाळायची जबाबदारी खांदयावर पडली. आयुष्यभर फक्त जबाबदारीच घ्यायची का?? अडकले परत मुलांच्या मोहपाशात. ह्याला कधी कधी दारू पियाची सवय. पण तीही नशिबात नाही. बायकोला नवीन चित्रपट पहायची सवय पण त्यासाठी ही वेळ नाही. खर्चाला पैसे पाहिजे त्यासाठी मुलांपुढे हात पसरावे लागले. साले पेन्शन पण त्यांच्या घशात जाऊ लागले. त्यात तुमच्या माधुरीची बकेट लिस्ट मोठी आहे यांची फक्त एकच इच्छा… सुखाने आनंदाने जगू द्या.
दोन वर्षांपूर्वी बायको गेली हा अजून एकटा पडला. आता तर गप्पा मारायला ही कोण उरले नाही. तरीही संध्याकाळी बाहेर गार्डनमध्ये बसून चार मित्र जमवले. त्यांचीही हीच व्यथा. शेवटी ठरले आपल्या पद्धतीने थोडावेळ जगू. जुने कॉन्टॅक्ट वापरून एका सावकाराकडून कर्ज काढले. माझे काही बरेवाईट झाले तर मुले फेडतील असे लिहून दिले. त्या चार म्हाताऱ्यांना बरोबर घेतले आणि तीन महिने भारत फिरून आलो. मध्ये मध्ये दारू ही पिऊन घेतली . केली आमचीही बकेट लिस्ट पूर्ण .. आज संध्याकाळी फिरून आले आणि येऊन झोपले ते झोपलेच. तो सावकार बघ आलाय चार लोक घेऊन. बोलेल आता घरच्यांशी. बसुदे त्यांना धक्का. त्यांची धक्का बसलेली तोंडं पहायची आहेत म्हणून उभा आहे मी” म्हातारा पोटतिडकीने बंड्याशी बोलत होता.
काही वेळाने मयत खाली आले. मुलांबरोबर सावकारही होता. सर्वांचे चेहरे गंभीर होते. पायाशी उभे राहून मुलांनी त्यांच्यासमोर हात जोडले. “माफ करा बाबा …मुले असूनही आम्ही तुमच्या ह्या सध्या इच्छा पूर्ण करू शकलो नाही. आम्ही आमच्या संसारात गुरफटून गेलो. पण तुम्ही घेतलेला निर्णय योग्य होता. तुमचे सगळे कर्ज आम्ही फेडू हे वचन देतो तुम्हाला ….??.
च्यायला …..ते ऐकुन म्हाताऱ्याला बसलेला धक्का पाहून बंड्याला हसू आवरले नाही.
“ओ काका … हे काय ….?? मुले तर खूप चांगली आहेत की… ?? म्हाताऱ्याच्याच मनात काही गैरसमज झालेले होते” बंड्या हसून म्हणाला.
त्या म्हाताऱ्याने मान खाली घातली.
“मुले चांगली आहेत हे आता लक्षात येऊन कांय उपयोग पण… ?? म्हातारा गेला वर. त्याला कसे कळणार ….?? बंड्या आता थांबणार नव्हता.
“कळेल कळेल त्याला नक्की कळेल ….?? आता त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर स्मित आले.
“कसे कळेल ..? तुम्ही जाताय निरोप द्यायला..” बंड्या छद्मीपणे म्हणाला.
“त्याची काही गरज नाही. तो म्हातारा मीच आहे ..” असे म्हणून त्याने समोरच्या प्रेताकडे बोट दाखविले.
बंड्याने नजर फिस्कारून समोर पाहिले तेव्हा बाजूचा म्हातारा समोरच्या तिरडीवर शांतपणे निजला होता.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.