स्थळ : कॉलेज कॅन्टीन , वेळ : सकाळी १० ची
समर एकटाच नाश्ता करत बसला होता. एरवी विष्णू असायचा त्याच्यासोबत पण आज विष्णू काही फोन उचलण्याच्या स्थितीत नसावा बहुतेक. वेळेच्या अर्धा तास अगोदर येऊन बसणारा विष्णू आज एवढा उशीर का करत असेल? जाऊदेत कामात व्यस्त असेल कुठल्यातरी येईल. असे समजून समर मस्त टाईमपास करत बसला.
इतक्यात जोरात खुर्च्या सरकवून धडाम असा आवाज करत विष्णू महाशय स्थानापन्न जाहले.
चेहरा रागाने लालबुंद झालेला, डोळे मोठाले करून उजवा हात टेबलावर आपटत, दात ओठ खाऊन काहीतरी पुटपुटणाऱ्या विष्णूला पाहून समर विचारात पडला की झाले काय नक्की??
समर : काय झालं शेठ ? हे तांडव कशासाठी?
विष्णू : समजते कोण ती स्वतःला ?
समर : भावा काय झालंय ? सांगशील का?
विष्णू : अरे ती नेहा यार !!
समर : आता तिचं काय? काय केलं तिनं?
विष्णू : मी तिला एवढं म्हणलो की माझं तुझ्यावर प्रेम आहे. तर डायरेक्ट माझी लायकी काढली तिने.
समर : नक्की एवढंच झालं होतं का?
विष्णू : मी तिचा हात धरला आणि म्हणालो की थांब जरा यार प्लिज बोल ना काय अडचण आहे तर मला कानफटात देऊन “नामर्द साल्या” सोड माझा हात म्हणून मोठ्या तोऱ्यात निघून गेली.
समर : वाह!! शाब्बास अरे जर नकार पचवता येत नाही तर जाता कशाला भिडायला? आणि नाही म्हंटल्यावर हात धरायची काय गरज होती? जसा तुला माहीतच नव्हतं की ती त्या सागरच्या प्रेमात आहे आणि तुझ्याशी फक्त वर्गमित्र या नात्याने वागते. मग कशाला ही उठाठेव करायची ?
विष्णू : तुला काय कळणार रे प्रेम? तू आहेसच रुक्ष. तुला ना समजणारच नाय आपला प्रॉब्लेम! सोड मला काय तुझं करायचय?
पण त्या नेहाला आपण नाय सोडणार. मला “नामर्द” म्हणते काय !….आता तिला दाखवतोच असली मर्द कोण आहे ते? साली फालतू **
समर : आता हा कोण नवीन असली मर्द?
विष्णू : आबे यार मीच आहे ना “मर्द”! असली मर्द!
समर : तू ? तू आहे ना “मर्द” नाहीयेस भावा! “नामर्द” आहेस तू “नामर्द”!
विष्णू : सम्या लय होतंय हा भावा! त्या फालतू पोरीसाठी तू…..
तेवढ्यात एक सणसणीत चपराक विष्णूच्या गालावर बसली!……सगळी माणसे समरकडे पाहू लागली.
विष्णू : सम्या!! बस झालं तुझं!!
समर : गप ओरडू नकोस रताळ्या! काय तर म्हणे मर्दानगी दाखवतो तिला. तू मर्द नाही रे नामर्द आहेस नामर्द!! तुझ्यासारख्या कित्येकांना सांगायचं तुमच्या अश्या वागण्याने पुरुष जातीलाच बदनाम करताय तुम्ही! या गोष्टीची जाणीव तर नसेलच तुला? हे आर्टिकल वाचून दाखवतो तुला आपल्याच एका बहिणीने लिहिलंय आपल्या So Called मर्द जातीसाठी! कदाचित होईल तुला जाणीव.
आणि समर वाचू लागतो…..
मी तुझी ताई बोलतीये रे दादा एक विचारू का तुला खूप मोठा प्रश्न पडला आहे रे खरं सांग ना….तूच आहेस ना……….
कवडी कमविण्याची अक्कल नसणारा, बापाच्या जीवावर ऐटीत जीवन जगणारा, तूच आहेस ” ना? मर्द” !
वंशाच्या दिव्याच्या आशेने पालकांना स्त्रीभ्रूणहत्येस प्रवृत्त करणारा, परंतु भविष्यात त्यांनाच दिवे दाखवून रडकुंडीस आणणारा, तूच आहेस ” ना?मर्द” !
स्वतःच्या सुखसोयींसाठी आईबापांना कष्टी करून सोडणारा, पण भविष्यात त्यांचीच वृद्धाश्रमात उचलबांगडी करणारा, तूच आहेस ” ना?मर्द” !
शाळेतील प्रतिज्ञेच्यावेळी भारत माझा देश आहे असे मोठ्याने म्हणणारा, पण दुसऱ्याच वाक्याला म्हणजे सारे भारतीय माझे बांधव (मुली सोडून) आहेत म्हणून प्रतिज्ञेचंच (पर्यायाने आमचंही) वस्त्रहरण करणारा,
तूच आहेस ” ना?मर्द” !
स्वतः असे का ना शिक्षणाच्या नावानेच शिंका मारणारा, पण रस्त्याने जाणाऱ्या सावित्रीच्या लेकीच्या मागे टवाळी करणारा, तूच आहेस ” ना?मर्द” !
नजरेच्या घृणास्पद कटाक्षानेच तिला सरस्वतीचा आधार छातीशी घेऊन चालायला भाग पडणारा, रस्त्याने जाताना काही अघटित घडेल काय? याची भीती तिच्या मनात रुजवणारा, तूच आहेस ” ना?मर्द” !
मुलींना पूर्ण कपडे परिधान करण्याचे ज्ञान देणारा, परंतु स्वतःच्या नग्न मानसिकतेला आवर न घालता येणारा, तूच आहेस ” ना?मर्द” !
नवरात्रीच्या वेळी देवीसाठी नऊ दिवस कडक उपवास पकडणारा, पण गरबा खेळणाऱ्या मुलींमध्ये एखादी कडक “आयटम” शोधणारा, तूच आहेस ” ना?मर्द” !
सरकारी शौचालयाप्रमाणे सांस्कृतिक वारस्यावरही अश्लील मजकूर लिहिणारा, अन् व्हॅलेन्टाईन डे ला हातात झेंडे घेऊन संस्कृतीचे भाषण देणारा, तूच आहेस ” ना?मर्द” !
महापुरुषांच्या जयंतीनिमित्त डीजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचणारा, परंतु त्यांच्या संघर्ष व त्यागाची जाणीव नसणारा, तूच आहेस ” ना?मर्द” !
कर्णकर्कश्श आवाजाचे भोंगे वाजवत मुलीच्या मागे दुचाकीवरून चकाट्या पिटणारा, रस्त्यात तिची वाट अडवून शारीरिक क्षमतेच्या बळावर माझीच हो म्हणणारा, तूच आहेस ” ना?मर्द” !
तिने दिलेल्या नकारात्मक उत्तराला अपमान समजणारा, “माझी नाही तर कुणाचीच नाही” या प्रवृत्तीपायी ऍसिडफेक व बलात्कारासारखे षंढ हल्ले करणारा, तूच आहेस ” ना?मर्द” !
पुरुषार्थ शारीरिक क्षमतेच्या जोरावर मोजणारा, स्वतःची आईबहिण सोडून इतर सर्व स्त्रियांना जात, पात, वर्ण, धर्म, वय न पाहता एकाच सावजाच्या (भक्ष्याच्या) तराजूत तोलणारा, तूच आहेस ” ना?मर्द” !
स्वतःच्या कलंकित चारित्र्याला सदैव झाकणारा, लग्नासाठी चारित्र्यवान मुलगी शोधणारा, तूच आहेस ” ना?मर्द” !
बेरोजगारीपायी राजकारणी जत्रेमागे हिंडणारा, इतर प्रांतातील मुले सरकारी पदावर रुजू होत असताना कोणत्यातरी फालतू संघटनेचं युवानेतृत्व होणारा, तूच आहेस ” ना?मर्द” !
सत्ताधाऱ्यांच्या हातातील कळसूत्री बाहुली बनून जीवन सार्थकी लावू पाहणारा, त्यांच्या फायद्यासाठी लावलेल्या दंगलीच्या (जातीय,धार्मिक) आगीत स्वतःचे अस्तित्व खाक करणारा, तूच आहेस “ना?मर्द” !
विविधरंगी झेंड्यांच्या तकलादू स्वाभिमानासाठी आपल्याच बंधुत्वाला तिलांजली देणारा, परिणामी स्वरूपात तिरंग्याला दुय्यम स्थान देणारा, तूच आहेस ” ना?मर्द” !
तूच आहेस ” ना?मर्द” !
तूच आहेस ” ना?मर्द” !
वाचता वाचताच समीरला थांबवत…….
विष्णू : बास्स भावा बास ! चुकलो मी माफ कर मला!
विष्णू कानावर हात ठेवून ओरडला.
समर : मला काही तुला दुखवायचं नव्हतं. पण अविचाराने तू तुझाच घात करून घेतला असतास. म्हणून तुला कानाखाली द्यावी लागली. त्याबद्दल खरंच क्षमा कर.
विष्णू : काय भाऊ ? तू थांबवलं नसतं तर आज काहीतरी अनर्थ केला असता मी! खूप धन्यवाद तुझे! आता फक्त एकच गोष्ट राहिलीय! तू येशील का माझ्याबरोबर?
समर : कुठं ?
विष्णू : नेहाची क्षमा नको मागायला ?
समर : मनातलं बोललास ! चल जाऊया ! तू तिची क्षमा मागणार हे ऐकून खुश झालो मी ! तू जर हे पाऊल उचलले नसते तर मी माझ्या मित्राला गमावून बसलो असतो!
विष्णू : हो ना सर्व पुरुष सारखेच अस म्हणणाऱ्या स्त्रियांसमोर आणखी एक चुकीचे उदाहरण उभे राहिले असते ! चूक मी केली असती पण भोगावे मात्र सर्वच पुरुषांना लागले असते !
समर : तसं नाही रे मित्रा ! पण तुला एक सांगू का? चांगली वाईट माणसे ही लिंग, जात, धर्म या किंवा आणखी कोणत्याही अनुषंगाने ठरवली जाऊ शकत नाहीत! चांगली माणसे जितकी आहेत तितकीच वाईट माणसेही आहेत ! पण याचा अर्थ असा तर मुळीच नाही की फक्त पुरुष वाईट आणि फक्त स्त्रिया चांगल्या! काही पुरुषही चांगले असतात अन् काही स्त्रीयादेखील वाईट असतात! ही दोन्हीही समाजाचं प्रतिनिधित्व करणारी दोन मूलभूत घटक आहेत ! एकाला गुण आणि दुसऱ्याला दोष दिला तर समाजाचे अस्तित्व धोक्यात येईल !
विष्णू : खरं आहे तुझं! एखादी गोष्ट स्त्रीला जितकी लागू पडते पुरुषालाही तितकीच लागू पडते! फक्त स्त्रीचं किंवा फक्त पुरुषचं असे करून चालणार नाही! दोघेही एकमेकांस परस्परपूरक आहेत! एकमेकांशी निगडित आहेत! हेही तितकंच खरं आहे!
समर : हं… पण प्रत्येकजण समजून घेईल का ? हाच तर मोठा प्रश्न आहे! गरज आहे ती फक्त दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा एकमेकांना जाणून घेण्याची! आपल्यातील कुप्रवृत्तींना आळा घालण्याची! परस्परांचे महत्व जाणून घेण्याची!
पण एकाच लेखाने तुझ्यात एवढा बदल ?? आश्चर्य वाटले !
विष्णू : भावा!! तेव्हा मी रागात होतो ना! पण त्या लेखाने खरंच वास्तविकता जाणवली समाजाची! एक पुरुष चुकला काय किंवा एक स्त्री चुकली काय चुकीचा परिणाम तर समाजमनावरच होत असतो ना!
समर : नशीब आमचं लवकर कळलं! चला आता नेहाकडे!
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.