कधीतरी उचकी लागणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे, आपल्याला उचकी लागते आणि काही वेळात ती आपोआप थांबते देखील.
ही अगदी सर्वसामान्य गोष्ट आहे. परंतु काही लोकांना मात्र वारंवार उचकी लागण्याचा त्रास होतो.
काही गर्भवती स्त्रियांमध्ये सुद्धा वारंवार उचकी लागण्याचा त्रास होतो.
अश्या वेळी पटकन पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
पण त्यामुळे उचकी थांबेलच असं नाही. आज आपण उचकी थांबवण्याचे इतर घरगुती उपाय जाणून घेऊया.
त्याकरता आपण उचकी म्हणजे काय, उचकीचे निरनिराळे प्रकार आणि ती लागण्याची कारणे जाणून घेऊया.
उचकी म्हणजे नक्की काय
उचकीला हिक्का देखील म्हटले जाते.
वात आणि कफा च्या असंतुलनामुळे वारंवार उचकी लागण्याचा त्रास होतो असे आयुर्वेदात सांगितले आहे.
उचकी ही फक्त श्वसनाशी च नव्हे तर व्यक्तीच्या पाचनशक्तीशी देखील निगडीत आहे.
आपल्या छाती आणि पोटाच्या मध्ये असणाऱ्या मांसल पडद्यास डायफ्राम असे म्हणतात.
श्वसन प्रक्रियेत डायफ्राम महत्वाची भूमिका बजावतो.
जर डायफ्राम आकुंचन पावला किंवा त्यावर दाब आला तर स्वरयंत्रावर ताण पडून घशातून ‘हिक’ असा आवाज येतो. ह्यालाच उचकी लागणे असे म्हणतात.
उचकी थांबवण्यासाठी घरगुती उपाय करणेच श्रेयस्कर.
उचकीचे प्रकार
आयुर्वेदात उचकीचे पाच प्रकार सांगितले आहेत.
1. महाहिक्का- खूप जोरात येणाऱ्या उचकीस महाहिक्का असे म्हणतात.
2. महा-गंभीरा – मोठा, गंभीर आवाज येणाऱ्या उचकीस महा- गंभीरा असे म्हणतात.
3. व्येपता हिक्का- सलग न येता थांबून थांबून येणाऱ्या उचकीस व्येपता हिक्का असे म्हणतात.
4. क्षुद्र हिक्का- अगदी थोड्या वेळाकरता लागणाऱ्या उचकीस क्षुद्र हिक्का असे म्हणतात.
5. अन्नजा हिक्का – आधी शिंक येऊन पाठोपाठ सुरू होणाऱ्या उचकीस अन्नजा हिक्का असे म्हणतात.
ही पाणी पिण्यामुळे किंवा काही खाल्ल्यामुळे लगेच थांबते.
उचकी का लागते
उचकी लागण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते.
उचकी लागण्याच्या प्रक्रियेत डायफ्राम हा पडदा महत्वाची भूमिका बजावतो.
फ्रेनिक नसा डायफ्रामची गती नियंत्रित करतात.
ह्या नसांना काही इजा झाली तर डायफ्राम वर दबाव येतो व epiglottis अचानक बंद होते व उचकी येण्यास सुरुवात होते.
खूप तिखट, मसालेदार किंवा खूप जास्त प्रमाणात काही खाल्ले तर उचकी लागते, घाईने पाणी प्यायले तरी उचकी लागू शकते.
उचकी लागण्याची कारणे खालीलप्रमाणे
1. खूप तिखट, मसालेदार भोजन करणे
2. पोट भरलेले असताना किंवा अपचन झालेले असताना देखील पुन्हा भोजन करणे.
3. खूप गार अन्न सेवन करणे
4. घाईघाईने जेवणे किंवा खाताखाता बोलणे.
5. घशात धूर किंवा धूळ जाणे
6. कार्बोनेटेड पेय पिणे
7. मद्यपान करणे
8. खूप जास्त तणावाखाली असणे किंवा उत्तेजित असणे
9. सलग खूप वेळ मोठ्याने हसणे.
10. निद्रनाशाचा विकार असणे
ह्या सर्व कारणामुळे वारंवार उचकी लागू शकते.
गर्भवती महिलांमध्ये उचकी लागण्याचे प्रमाण जास्त असते.
त्याची कारणे खालीलप्रमाणे
1. गर्भवती स्त्रियाना जास्त प्रमाणात ऑक्सिजन ची गरज असते.
त्यामुळे गर्भाला ऑक्सिजन चा पुरवठा होतो.
अश्या वेळी जर काही कारणाने श्वास घेण्यास त्रास झाला, दम लागला तर डायफ्रामवर दाब येऊन उचकी लागते.
2. भरभर काही खाल्ले किंवा घाईघाईने पाणी प्यायले तरी उचकी लागू शकते.
3. गर्भार अवस्थेत पोटावर दाब आलेला असतो त्यामुळे ऍसिड रिफ्लक्सचा त्रास होतो. अशा वेळी देखील उचकी लागते.
म्हणून गर्भवती स्त्रियांनी सावकाश जेवावे, सावकाश व बसून पाणी प्यावे तसेच तणावमुक्त व आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.
म्हणजे उचकी लागण्याचा त्रास उद्भवणार नाही.
उचकी थांबवण्याचे घरगुती उपाय
1. आवळा चूर्ण व खडीसाखर- आवळा चूर्ण व सुंठ प्रत्येकी 1 ग्राम घेऊन त्यात खडीसाखर मिसळून खाल्ली असता उचकी थांबते.
2. पिप्पली चूर्ण व खडीसाखर – पिप्पली चूर्ण आणि खडीसाखर ह्यांचे मिश्रण सेवन केले असता उचकी थांबते.
3. लिंबू आणि मीठ- कोमट पाण्यात लिंबाचा रस, चिमूटभर मीठ आणि काही पुदिन्याची पाने मिसळून ते पाणी पिण्यामुळे उचकी थांबते.
4. सुंठ व हिरडा- सुंठ आणि हिरडा ह्यांचे चूर्ण सम प्रमाणात घेऊन ते पाण्यात विघळवून पिण्यामुळे उचकी थांबते.
5. हिंग आणि लोणी – पाव चमचा हिंग पावडर आणि पाव चमचा लोणी मिसळून खाल्ले असता उचकी थांबते.
याशिवाय उचकी थांबवण्याचे आणखी काही उपाय आहेत ते खालीलप्रमाणे
1. उचकी पटकन थांबण्यासाठी लिंबाची फोड चोखावी. त्याने उचकी थांबते.
2. 2/3 वेलदोडे पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यामुळे उचकी थांबते.
3. ग्लासभर पाण्यात एक चमचा मध घालून ते पाणी प्यायल्यामुळे उचकी थांबते.
4. एक चमचा साखर चघळून वर पाणी प्यायले असता उचकी थांबते.
5. कुळीथाचे वरण किंवा सूप उचकी थांबवण्यास मदत करते.
6. लहान मुलांना उचकी लागली तर मध चाटवावा.
सहसा उचकी लागणे ही काही गंभीर गोष्ट नाही, पाणी पिण्यामुळे किंवा उचकीचे प्रमाण जास्त असेल तर वर सांगितलेल्या उपायांमुळे उचकी थांबते.
परंतु जर उचकी 2 दिवसंपर्यंत गेली नाही, वर दिलेले उपाय करूनही जर ती थांबली नाही तर मात्र डॉक्टर कडे जाणे आवश्यक आहे कारण मग ह्याचा संबंध आपल्या nervous system शी असू शकतो.
अश्या वेळी तज्ञांचा सल्ला आवश्यक ठरतो.
तर आज आपण पाहिले की उचकी लागली की ती घरच्याघरी सहज कशी बरी करता येते. ह्या उपायांचा जरूर लाभ घ्या. स्वस्थ रहा. आनंदी रहा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.