ह्या क्षणाला आपण वाचत असताना ११ युनायटेड शांतता मिशन मध्ये तब्बल ६८९१ भारतीय सैनिक पाठवले असून ७८२ पोलीस सुद्धा त्यांच्या जोडीला जगात शांतता आणि सुव्यवस्था राहावी म्हणून आपल्या जीवाची पर्वा न करता देशाचं नाव जगात उज्वल करत आहेत.
भारतीय सेना असं नाव घेताच आपल्याला एक आदर वाटतो. भारतीय सीमांच रक्षण आपल्या अतुलनीय शौर्याने आणि पराक्रमाने करताना आपण त्यांना नेहमीच बघत आलो आहोत. पण आपल्या सिमांशिवायहि जगभर आपल्या सेनेने आपल्या पराक्रमाचे झेंडे रोवले आहेत. त्या बद्दल मात्र आपण एक सामान्य नागरिक म्हणून खूप लांब असतो.
भारत हा युनायटेड नेशन चा ३० ओक्टोबर १९४५ पासून सदस्य आहे. सदस्य झाल्यापासून भारताने युनायटेड नेशन च्या माध्यमातून आत्तापर्यंत ४३ शांतता मिशन मध्ये भाग घेतला असून जवळपास १८०,००० सैनिक ह्यासाठी पाठवले आहेत. ह्या क्षणाला आपण वाचत असताना ११ युनायटेड शांतता मिशन मध्ये तब्बल ६८९१ भारतीय सैनिक पाठवले असून ७८२ पोलीस सुद्धा त्यांच्या जोडीला जगात शांतता आणि सुव्यवस्था राहावी म्हणून आपल्या जीवाची पर्वा न करता देशाचं नाव जगात उज्वल करत आहेत.
मोनिस्को मिशन हे कांगो मध्ये असून ह्यात २६६४ भारतीय सैनिक काम करत आहेत. भारतीय ब्रिगेड कडे ४३,७०० चौरस किलोमीटर च्या भूभागाच्या रक्षणाची जबाबदारी असून ह्यात ९४८ गाव ४२ कॅम्पस आहेत. जवळपास १,८०,००० विखरलेल्या लोकांची जबाबदारी भारतीय सैन्याकडे आहे. आपल्या अतुलनीय शौर्याने शत्रूला पाणी पाजणाऱ्या भारतीय सैन्यावर युनायटेड नेशन चा किती विश्वास आहे हे ह्यातून दिसून येते. ह्या हि पुढे जाऊन युनायटेड नेशन ने भारतीय सैन्याच्या वर्तनावर केलेल्या विधाना वरून दिसून येते. गेल्या वर्षात ५० पेक्षा जास्त केसेस युनायटेड नेशन च्या सैनिकांनी स्त्रियांवर केलेल्या बलात्कार किंवा अत्याचाराच्या दाखल झाल्या आहेत. पण ह्यातील एकाही केस मध्ये भारतीय सैन्याच्या नावाला कुठे डाग लागलेला नाही. आपल्या शिस्ती सोबत मानवतेचं उदाहरण भारतीय सैन्याने कांगो मध्ये दिल आहे. शांततेच्या काळात शाळा, इंग्रजी शिक्षण तसेच फुटबॉल आणि तिथल्या मुलांना बाहेरच्या जगाशी जोडण्यात दिलेल योगदान हे शब्दांपलीकडे आहे. २००७ मध्ये भारताने जगातील पहिलं पूर्ण स्त्रिया असलेल पोलीस युनिट लायबेरिया इथल्या मिशन साठी पाठवल होत. ह्यात १०५ पोलीस महिला होत्या.
भारतातील लोकांना ह्याबद्दल मिडिया कधीच सांगणार नाही. अटकेपार झेंडे काय असतात ते आमच्या सेनेकडून शिकाव. आपल्या पराक्रमासोबत आपल्या संस्कृतीचं दर्शन पूर्ण जगाला दाखवणारे आपले सैनिक “वसुधैव कुटुंबकम” हि उक्ती आपल्या वागणुकीने पूर्ण जगाला दाखवत आहेत. कांगो चे नागरिक जिकडे आपल्या सैनिकांना आशीर्वाद देताना थकत नाहीत. तिकडे आपले भारतीय नागरिक तर ह्या बद्दल अनभिज्ञ आहेत. मिडियाला तर कोणी कुठले कपडे घातले आणि कोणाचा मुलगा कुठे पहिल्यांदा शिकला ह्यातून वेळ मिळाला तर ते लक्ष देतील. आपल्या समोर इतक्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने समोर येतात कि नक्की खरं काय हे आपण ओळखू शकत नाही. जे सैनिक आपला प्राण तळहातावर घेऊन देशापलीकडे लोकांच रक्षण त्याच सैनिकी वृत्तीने करताना आपल्या मधील एक बाप, एक मुलगा, एक भारतीय हि ओळख हि जिवंत ठेवतात. त्याचं कौतुक तर सोडाच पण त्याची जाणीव पण सामान्य भारतीयांना नाही हि शोकांतिका आहे.
अटकेपार झेंडे हे फक्त लढाई करून लावता येतात असं नाही. लढाई सोबत आपल्या वागणुकीने हि अटकेपार झेंडे लावता येतात. त्याची जाणीव एक सामान्य भारतीय नागरिक म्हणून आपल्याला असायलाच हवी. ज्या आवडीने आपण राजकारणात भाग घेतो. अनेक न्यूज साठी २४ तास चॅनल बघतो. पण ज्यांच्यामुळे हे सर्व शक्य होते त्या सैनिकांना आपण सोयीस्करपणे विसरतो हीच खंत आहे. कांगो सारख्या देशात तिथल्या सामान्य नागरीकांच रक्षण करताना ज्यांना वीरमरण आले त्यांना माझी मानवंदना. जे आजही डोळ्यात तेल घालून निष्पाप नागरिकांची काळजी घेत आहेत. त्या सैनिकांना माझा सॅल्यूट!!
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.