उरी:- द सर्जिकल स्ट्राईक बघून आपल्याला सैनिक नक्कीच कळेल

उरी:- द सर्जिकल स्ट्राईक

उरी:- द सर्जिकल स्ट्राईक ह्या चित्रपटाने सध्या बॉलीवूड मध्ये धुमाकूळ घातला आहे. अवघ्या दहा दिवसात १०० कोटी पलीकडे ह्या चित्रपटाने गल्ला गोळा केला आहे. अजूनही हा चित्रपट लोकांच्या पसंतीला उतरत आहे. चित्रपट बघून चित्रपटगृहातून बाहेर येणारा प्रत्येकजण देशभक्तीने भारावून जात आहे. आपल्या सैनिकांच्याप्रती असलेला आदरभाव म्हणा किंवा त्यांची जाणिव झाल्याची भावना सगळ्यांची आहे. पण हे भारावणं किती काळासाठी आहे? हा चित्रपट बघून नक्की आपल्याला सैनिक कळला का? चित्रपटाच्या कथेत मला जायचं नाही पण तो बघून घरी परत जाताना आपण सैनिकाला समजू शकलो का? हा प्रश्न प्रत्येक भारतीयाने स्वतःला आज विचारण्याची गरज आहे.

भारतीय सेनेत जेव्हा कोणताही जवान, अधिकारी आणि प्रत्येक सैनिक प्रवेश घेतो तेव्हा तो आपल्या हातात बंदूक घेतो समोरच्या प्रत्येक शत्रूवर ती गोळी चालवण्यासाठी आणि समोरून येणारी प्रत्येक गोळी आपल्या छातीवर झेलण्याची. एका न फेडता येणाऱ्या कर्जात स्वतःला अडकवून घेतो. वय वर्ष २० ते ३० जेव्हा सगळी स्वप्न सुरु होतात तेव्हाच आपला आत्मा त्याने देशासाठी दिलेला असतो. तुमचं, आमचं सर्वांच रक्षण करण्याची जबाबदारी उचललेली असते. कोणाला मारणं काय असते? ह्याची कल्पना तरी तुम्ही, आम्ही सो कॉल्ड प्रगल्भ लोक , सुशिक्षित समाज आणि त्यातले सगळेच करू शकतो का? हातात बंदूक असली म्हणून गोळी चालवायला ट्रिगर दाबावा लागतो. समोर असलेल्या माणसाच्या छाताडातून ती गोळी आरपार घालवण्याचं धारिष्ट्य शिकावं लागतं.

शहीद ह्या शब्दाचा अर्थ आपण किती सोप्पा करून टाकला आहे. कारण कोणासाठी तरी मरण ह्यातला कोण ह्याची व्याप्ती पूर्ण देश असतो तेव्हा ते मरण आपल्याला कधी कळलेच नसते. युद्धात आपल्या साथीदाराला गोळ्या लागताना बघणं, त्या ते वेदनांनी व्हीवळणं ते त्याचा मृत्यू बघताना त्या सैनिकाच्या मनात काय होत असेल ह्याची साधी कल्पना पण आपण करू शकत नाही. असं म्हंटल जाते,

You don’t come back from war, the same way you went.

ह्या वाक्याचा अर्थ खूप मोठा आहे. परत येताना त्या युद्धातून शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळीवर प्रत्येक सैनिक खूप काहीतरी घेऊन परत येतो. ते सोप्प असतं का? ते काही पिकनिक ला नाही जात? न कोणत्या रिसोर्ट वर जात? शत्रूच्या प्रदेशात शिरून त्याच्या ठिकाणावर हल्ला करताना पुढल्या क्षणी काय होईल ह्याची पुसटशी कल्पना नसते. पुढलं पाउल कदाचित आपलं शेवटचं असेल, काय माहित! पुढला श्वास कदाचित आपला अखेरचा असेल. समोरून येणारी कोणती गोळी आपल्या शरीराच्या कोणत्या भागाचा वेध घेईल ह्याचा काही अंदाज नसताना टाकलं गेलेलं प्रत्येक पाउल हे फक्त आपल्याला दिलेलं उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी असतं. आपला तिरंगा जेव्हा डौलाने तिकडे फडकवू किंवा त्याच्यावर वाकडी नजर टाकणाऱ्या प्रत्येकाला जेव्हा नेस्तानाबूत करेन तेव्हाच ते मिशन यशस्वी होते. तेव्हाच तो सर्जिकल स्ट्राईक यशस्वी होतो. अर्थात चित्रपट बघताना किती जणांना ह्याचा अंदाज आला असेल हा मोठा प्रश्न आहे.

घरापासून लांब कुठेतरी जंगलात जेव्हा समोरून येणारी गोळी आपल्याला जखमी करते. तेव्हा तिकडचा प्रत्येक साथीदार आपल्याला सांगत असतो कि “You will make it………” अजून थोडावेळ थांब जीव सोडू नकोस. त्या जखमांच्या होणाऱ्या वेदनांपेक्षा मरण सुखावह वाटत असते. पण माझा प्रत्येक साथीदार त्या धुमश्चक्रीमध्ये पण मला सुरक्षित नेण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता ते मला खांद्यावर उचलून घेतात. कारण युद्धात प्रत्येक सैनिक महत्वाचा

“No one left behind”

जेव्हा सगळे आपल्या मनात एकच लक्ष्य ठरवतात, एकाच लक्ष्याकडे वाटचाल करतात, ते लक्ष्य पूर्ण करून त्या तिरंग्याच मान, सन्मान राखण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीत तेव्हा सर्जिकल स्ट्राईक यशस्वी होतात.

कदाचित आज चित्रपट बघताना आपल्याला नाविन्य वाटेल पण भारतीय सैनिकासाठी हे रोजचं आयुष्य आहे. युद्धातून परत आल्यावर त्या आठवणींच ओझ, त्याचे व्रण मानसिक आणि शारीरिक दोन्ही पातळीवर घेऊन जगण किती कठीण असेल ह्याची पुसटशी कल्पना पण आपल्याला नाही. कारण सीमेवर किती गेले काय? किंवा किती जखमी झाले काय? आपल्या सारखी सामान्य माणस कुठे ठेवणार त्याचे हिशोब? सैनिक शहीद झाला तर काय? अहो, असे रोजचं होतं असतात. पण त्याच आम्हाला काय?

प्रश्न चित्रपटाचा नाही तर प्रश्न आहे कि नक्की आपण काय घेऊन बाहेर पडलो. चित्रपट देशभक्ती तर आणि सैनिकांन विषयी आदर नक्कीच निर्माण करत असेल कारण अनेकांनी ते लिहिलं आहे. पण ते कुठवर? आज जाणवलेला सैनिक, त्याच बलिदान, त्याच न उमगलेलं आयुष्य आज समजलं नाही तर उरी द सर्जिकल स्ट्राईक हा २०१९ मधेच संपून जाईल. पण दोन क्षण जर चित्रपटाचा वेगळ्या पद्धतीने विचार केला तर सैनिक नक्कीच कळेल.

असं म्हणतात,

You have not lived until you have almost died.

उरी:- द सर्जिकल स्ट्राईक चित्रपट बघताना एकदा सैनिक होऊन ते आयुष्य जगून बघा कदाचित गोष्टी खूप वेगळ्या जाणवतील.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।