“आधी सगळं तपासून घ्यायला काय झालं होतं? तरी मी सांगत होते गॅरेजमध्ये गाडी नेऊन आण. इतकी जुनी गाडी घेऊन असा लांबचा प्रवास करणं हाच मुळात एक मूर्खपणा….” पूनमने तिची टेप सुरू केली होती.
गाडी बंद पडल्याच्या दुसऱ्या क्षणी मला हे अपेक्षित होतंच. मी एव्हाना ऐकायचं सोडून दिलं होतं. माझं माझ्या गाडीवर उगीच प्रेम नव्हतं…. बंद पण ऐन घाटात, एका नागमोडी वळणावर पडली होती.
पावसाळी वातावरण होतं आणि नेमकी समोर चहाची टपरी. आता दोन चहा, ग्लास मधून आणि त्याबरोबर त्या टपरीवरच्या बरणीतली बिस्किटं एवढंच माझ्या मनात होतं. चहा पोटात गेला की पुढचं बघता येईल अशा विचारात असतानाच माझ्या हातावर दोन तीन फटके मारून “अरे तुझं लक्ष आहे का? काहीतरी कर आणि प्लिज माझ्यावर कृपा कर, प्लिज आत्ता चहा नाही.” काहीच प्रतिक्रिया न देता पुढची पाच मिनिटं मी फोटो काढण्यात घालवली पूनमने एकदोन फोन लावले, आणि पर्स गाडीत ठेऊन माझ्याकडे बघत उभी राहिली.
मी तिच्याकडे बघून किंचित हसलो आणि काढलेल्या फोटोंवरुन एक नजर फिरवली. अपेक्षेप्रमाणे हिने एव्हाना रस्ता ओलांडला होता आणि आता चहा टपरीच्या शेजारी उभी होती. पहिले कटकट आणि शेवटी मला हवं तेच नाईलाजाने का होईना करणं अशी तिची सवयच होती. दोन मिनिटांपूर्वी चहावरून हिनेच बडबड केली का? असा विचार करून काहीच न बोलता मी तिकडे गेलो. तशी बरीच गर्दी होती. ऐन ठिकाणी टपरी टाकल्यामुळे सगळेच फोटो काढायला, चहाची तल्लफ भागवायला, पाय मोकळे करायला किंवा काहीच न करता निवांत बसायला इथे थांबत असावेत.
“भाऊ, आणि ही जरा बिस्किटं घेतोय एक कागद द्या की आणि एक प्लेट भजी पण करा”
माझ्या डोक्यात ही सेम ऑर्डर होती, आपल्याच आधी आपल्या सारखी ऑर्डर देणारा हा कोण बघायला मी थांबलो. एक साधा माणूस आणि त्याच्या मागे अर्धी लपलेली त्याची बायको. पांढरा ड्रेस, मोठाली हिरवी ओढणी, लांब केस. दोघेही एका ग्लास मधून चहा पितील की काय असा चावट विचार मनाला शिवून जातंच होता तितक्यात तिने वळून त्याच्याकडे पाठ केली, हाताची घडी घातली आणि तावातावाने काहीतरी बडबड करायला लागली. का कोणास ठाऊक तिची बडबड ओळखीची वाटली, मग लक्षात आलं आपल्या शेजारी आपली बायको पण अशीच बडबड करते आहे. बायकोच्या बडबडीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत ह्या जोडप्यावर लक्ष देत चहा पीत होतो तरीही अस्पष्ट शब्द कानावर पडतच होते माझ्या. दोघींचेही.
माझ्या बायकोकडे मी बघतच नव्हतो आणि त्याची बायको अजून ही पाठमोरी त्याच्यामागे अर्धी लपलेली. मधूनच वाऱ्यावर हिरवी ओढणी उडताना दिसत होती, आणि मग एक नाजूक हात जणू वाऱ्याला झुंज देतोय आशा थाटात ती सावरून खांद्यावर ठेवत होता. आता माझ्या एकटक बघण्याने त्या माणसाला मात्र अस्वस्थ वाटलं असावं, त्याने वळून माझ्याकडे पाहिलं. थोडासा अवघडून मी वळून पूनमकडे बघणार इतक्यात तो जरासा हलला, काही कळायच्या आत माझ्याकडे बघून अस्पष्ट हसला, दोघेही एकाच वेदनेने ग्रासले गेलो होतो ह्याची दखल घेत असावा कदाचित. मी ही हसलो. तो किंचित हलल्यामुळे त्याची बायको आता अर्धवट लपलेली नव्हती आणि एका बाजूने मला ती दिसत होती. मी स्तब्ध. तीच ओळखीची मोठी टिकली, कपाळावर पडणारे कुरळे केस. नाजूक हात तोच.. कित्येक वेळा तरी माझ्या हातात गुंफलेला. मी कसा ओळखला नाही? मन भूतकाळात गेलं.
आम्ही दोघे कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होतो, पुण्यात. दोघेही बीएला होतो. ती, म्हणजे मधुरा पुण्याचीच होती. आई, बाबा, धाकटी बहीण, काका, काकू, दोन चुलत भाऊ आणि आजी आजोबा असं मोठं कुटुंब. मी मात्र शिक्षणासाठी गावातून येऊन एकटा राहत होतो. पहिल्या वर्षाला फक्त तोंडओळख होती. त्यावेळेस मी कॉलेजच्याच हॉस्टेलला राहत होतो पण मला काही ते नियम झेपले नाहीत शिवाय तिथल्या मुलांशी सुद्धा विशेष पटलं नाही म्हणून मी बाहेर खोली शोधत होतो. मधुराच्या मोठ्या घराच्या टेरेसवर एक खोली बांधली होती आणि ती रिकामी होती असं एका मित्राने सांगितलं. ही बातमी खरी का खोटी ह्याची शहानिशा करायला मी पहिल्यांदा मधुराशी बोललो. त्यादिवशी ती मला तिच्या गाडीवर मागे बसवूनच घरी घेऊन गेली होती. खोली तर आवडलीच मला पण त्यापेक्षा ही मनमोकळी मधुरा जास्त आवडली म्हणून परवडत नसताना ही मी एकट्याने ती खोली घ्यायची ठरवली. घरून येणारे पैसे पुरणार नव्हते म्हणून एका हॉटेलमधे वेटरचं काम धरलं.
“आपण दोन टोकं आहोत रे, आपलं लग्न नाही होऊ शकत. मला प्रॅक्टिकल नवरा आणि तुला स्वप्नाळू बायको मिळाली तरंच आपली नाव स्थिर होईल”
आठवणींबरोबर एका वेदनेची कळ जावी तसे काहीच वर्षांपूर्वीचे तिचे शब्द माझ्या कानात वाजायला लागले आणि दोहांच्याही नशिबावर हसू आलं. काहीच वर्षांपूर्वी भिन्न स्वभावांच निमित्त होऊन आमचं नातं फिस्कटलं होतं. तिचं मोकळं पण तरी ही प्रॅक्टिकल वागणं, जबाबदारीची प्रचंड जाण असणं आणि माझा आला दिवस पुढे ढकलणं, आजचा दिवस सुखात घालवून उद्याची पर्वा न करणं, किंवा ऐपत नसलेली स्वप्न बघत बसणं अशा अनेक गोष्टी होत्या. त्यातलीच ही नियोजन नसणे, वाटेल तेव्हा वाटेल ते करणे ह्या गोष्टीही होत्याच. गोष्ट तशी फार जुनी नाही.
बीएच्या त्या दुसऱ्या वर्षी आमची छान मैत्री जमली. तिच्या घरच्यांशी ही माझं अगदी उत्तम जमलं. तिचे चुलत भाऊ शाळेतले होते. त्यांना ट्युशन द्यायचं काम आम्हा दोघांकडे होतं. त्याबद्दल माझ्या भाड्यातून ५० रुपये कमी व्हायचे आणि मधुराला ५० रुपये खर्चाला जास्त मिळायचे. मला ह्या वाचणाऱ्या पैशातून पुस्तकं घ्यायची असायची. मी महिन्याला एक पुस्तक घ्यायचो पण मधुराने मात्र बँकेत खात उघडलं होतं. एरवी खर्चाला मिळणारे पैसे तिला पुरायचे त्यामुळे हे जास्तीचे पैसे ती गुंतवून ठेवायची. आमच्यातल्या ह्या विरोधाभासाचं हसू यायचं मला पण तिचं ते अगदी प्रॅक्टिकल असणं मला आवडायचं. एकमेकांना पूरक असल्यासारखं वाटायचं. अभ्यासात आम्ही दोघे सारखेच होतो. तिच्या घरात लहान मुलं असल्याने ती बऱ्याचदा वर माझ्या खोलीत यायची अभ्यासाला. आमचा एकत्र अभ्यास छान व्हायचा, ह्या निमित्ताने आम्ही अजून चांगले मित्र ही झालो पण हळूहळू आमचं नातं मैत्रीपलीकडे जायला लागलं.
एकत्र वेळ हा फक्त अभ्यासापुरता मर्यादित राहिला नव्हता. दोघांच कॉलेज, विषय एकच शिवाय घर सुद्धा. कधी काही न बोलता, न सांगता आम्ही जवळ येत गेलो. मला सांगायची गरज वाटली नाही आणि कदाचित तिला हे सांगणं-बोलणं अपेक्षितच नसावं. अशाच धुंदीत दोन वर्ष गेली. नाही म्हणायला आम्ही भांडायचो ही भरपूर. माझा अव्यवस्थितपणा तिला खुपायचाच पण माझी वेटरची नोकरी सुद्धा तिला आवडायची नाही म्हणून ती ही मी फार काळ केली नाही. जास्त खर्चासाठी मग तिच्या भावांबरोबर अजून मुलांच्या शिकवण्या सुरु केल्या. खरंतर मला वेटरचं काम आवडायचं, शिकवण्या घ्यायला आवडायचं नाही असं नाही पण मला वेगळे अनुभव घेऊन बघायची इच्छा होती आणि तिला मात्र ते काम पटलं नाही. ज्या कामातून आपल्याला ठोस अनुभव मिळत नाही अशी कामं करू नयेत असं तिचं म्हणणं होतं. अशाच काहीबाही गोष्टींवरून आमचे खटके उडायचे पण मग त्या संध्याकाळी अभ्यासानंतर ती जरा जास्त वेळ माझ्या खोलीत थांबायची, काही काळापुरतं का होईना, माझं सगळं ऐकायची आणि मग मी सगळं विसरून जायचो. ती म्हणेल ते ऐकायचो. हळू हळू माझे मित्र दुरावत होते, माझ्या सगळ्या दिवसांवर जणू मधुराचाच हक्क होता. माझा मला वेळ सुद्धा मिळेनासा झाला होता. मग मधुरा बरोबर असताना मी उगीच हरवल्यासारखा असायचो, माझ्याच विश्वात बुडालेला असायचो. तिला ते सहन व्हायचं नाही आणि ती भांडणाचे विषय उकरून काढायची, माझं लक्ष वेधून घेण्यासाठी. असाच एक विषय आमचं नातं संपवायला कारणीभूत ठरला. बीएनंतर एमए आणि त्यानंतर स्पर्धापरीक्षा देऊन प्रोफेसरची नोकरी असं मधुराचं नियोजन होतं, आम्हा दोघांसाठी. मला मात्र बीए करता करता कंटाळा आला होता. मी अभ्यासात कमी होतो असं नाही पण काही काळ मला आराम हवा होता. अर्थातच ही गोष्ट तिला पटण्यासारखी नव्हती. ह्याच मुद्याचा धागा शेवटी ओढून ताणून एकदाचा तुटला.
“तुला आयुष्याचं गांभीर्य येईल तेव्हा खूप उशीर झाला असेल. मला तुझ्यातलं मूल सांभाळून कंटाळा येईल असं वाटतंय. तुला तुझ्यासारखी बायको आणि मला माझ्यासारखा नवरा मिळायला हवा नाहीतर आयुष्यभर फक्त भांडत बसावं लागेल.”
परीक्षेनंतर मी घरी जाण्यासाठी बॅग भरत होतो. खोली सुद्धा खाली केली नव्हती मी. रिजल्ट लागला की एक वर्ष नोकरी करून एमएला प्रवेश घ्यायचा आणि दोन वर्षांनी रीतसर मधुराला लग्नासाठी विचारायचं अशी माझी इच्छा होती. पण इतकंच बोलून मला बोलायची संधी ही न देता निघून गेली ती…..
खूप जवळीक झाली की काहीवेळा अशा गोष्टी होतात, हा त्यातलाच प्रकार आणि दोन महिन्याच्या सुट्टीनंतर सगळं मार्गी लागेल असा आपला समज करून मी गावी निघून गेलो. यथावकाश आमचा निकाल लागला. एक वर्ष नोकरी करायची माझी अट घरी ही मान्य झाली. मी परत मधुराकडे आलो. दोघे उत्तम मार्कांनी पास झालो म्हणून ती खुश असणार असं मला वाटत होतं पण तिच्या घरी पोहोचलो आणि मला समजलं की तिने दिल्लीला एमएसाठी प्रवेश मिळवला होता आणि मी येण्याअगोदरच्याच आठवड्यात तिचे बाबा तिला पोहचवून आले होते. आता मात्र पुण्यात मला खूप एकटं वाटायला लागलं. दोन वर्षात मित्रांसह फार संबंध न ठेवल्याचं वाईट वाटत होतं. मला नोकरी मिळाली पण दोन महिन्यातच मी ती सोडून गावी परत गेलो. पुढचे चार महिने घरीच होतो. मुलाचं लक्षण काही ठीक दिसत नाही म्हणून साधारण जे आया करतात ते माझ्या आईनेही केलं, लग्नासाठी ती मुली शोधायला लागली.
मधुराशी काहीच संपर्क नव्हता, पुणे सुटलं तसं ती खोली सुद्धा सुटली. अधूनमधून तिच्या आईवडिलांना फोन करायचो पण ते क्वचितच मधुराचा उल्लेख करायचे. त्यांना काही कल्पना होती का मला माहीत नाही पण त्यांचे कधीच फोन यायचे नाहीत. ह्या गोष्टीचं इतकं नवल नाही पण मुलांना माझा खूप लळा लागला होता, त्यांच्याकडून ही एक सुद्धा फोन नाही म्हटल्यावर मी काय ते समजून चुकलो. मला मधुराचा भयाण राग आला होता, वापरलो गेल्याची भावना सारखी खुपत होती. तिच्यावरचा राग म्हणून किंवा काय, मी सुद्धा मुली बघायला लागलो. असं असताना जबाबदारीने वागणं मला भाग होतं. त्यामुळे मिळाली ती पहिली नोकरी धरली आणि परत पुण्याला आलो.
राहायला कम्पनीचे क्वार्टर होते. मधुराच्या घरी जाईन ती लग्नाची पत्रिका घेऊनच असं खूळ डोक्यात होतं. अशातच पूनमचं स्थळ आलं. ती ही एकटी पुण्यात राहत होती, बँकेत नोकरीला होती. मधुराची जिरवायची हा एकच हेतू असावा कदाचित, माहीत नाही पण मी चटकन पूनमला होकार दिला. तिला खरंतर अजून वेळ हवा होता. अनायसे एका शहरात होतो त्यामुळे तिचं म्हणणं होतं भेटू, बोलू आणि थोडे फिरू पण मी ऐकायच्या कोणत्याच मनःस्तिथीत नव्हतो, त्याच संध्याकाळी आईला फोन करून मी माझा होकार कळवला. मुलगा आणि मुलाकडचे तयार आहेत म्हटल्यावर पूनमचं काही चाललं नाही आणि महिन्याभरातच आमचा साखरपुडा पार पडला आणि तीन महिन्यांनी लग्न. खरंतर ह्या चार महिन्यांच्या काळात मला कळलं होतं की आमचे स्वभाव खूप वेगळे आहेत. मी पूनमच्या आणि ती माझ्या मानसिक अपेक्षा पूर्ण करू शकणार नव्हतो. तिच्या मनात तेंव्हा काय होतं मला ठाऊक नाही पण साखरपुड्यापासून मला कळलं होतं की तिने आहे ते स्वीकारलं आहे. तिच्या डोळ्यात मला प्रेम दिसायचं, मधुराचे डोळे मला असे कधीच दिसले नव्हते. पूनमला माझ्या डोळ्यात काय दिसायचं माहीत नाही पण तिचे डोळे बदलले नाहीत.
यथावकाश संसाराला लागून तीन वर्ष झाली, म्हणायला सगळं चांगलं होतं. दोघांच्या नोकऱ्या उत्तम होत्या, भांडणं होत होतीच पण खूप गोष्टींमध्ये तुझं तू, माझं मी बघत जाऊ ह्या निष्कर्षाला आम्ही पोहोचलो होतो. कधीतरी एकमेकांच्या पायात पाय घालून मीच अशी वेळ ओढवून घ्यायचो पण ते तेवढ्यापुरतं. अशावेळेला आळीपाळीने आम्ही समजूतदारपणे वागत असू. सहवासाने किंवा समजूतदारपणाने मी पूनमवर आणि पूनम माझ्यावर प्रेम करतच होतो. तक्रारी होत्या पण त्यापेक्षा समाधान जास्त होतं.
क्षणभर ह्याच समाधानाची खात्री करायला मी पूनमकडे बघितलं आणि माझी नजर लगेच परत मधुराकडे गेली. तिच्या चेहऱ्यावर मला कुठलंच समाधान दिसलं नाही. मनातून मी क्षणभर सुखावलो आणि दुसऱ्या क्षणाला लगेच वाईट वाटलं. तिचा राग निवळला होता पण चेहरा अगदी रडवेला झाला होता. तिचा नवरा आता लांब जाऊन ऐकत उभा होता आणि ही ओढणीशी चाळा करत उभी होती. पूनमला एव्हाना कळलं होतं की इथे खरंच छान वातावरण आहे, मगाशी केलेल्या चिडचिडीचा पश्चाताप केल्यासारखी ती हळूच येऊन मला बिलगली. ही तिची सॉरी म्हणायची पद्धत होती. मी ही हळूच तिला गाडी न तपासल्याबद्दल सॉरी म्हटलो.
तरी माझं अर्ध लक्ष अजून समोर होतंच. मला फक्त मधुराने माझ्याकडे बघणं हवं होतं. ती बघे-पर्यंत मी कसलीच तमा न बाळगता तिच्याकडे बघत राहिलो, शेवटी गेलीच तिची नजर माझ्याकडे आणि मागासपासून अडवून धरलेल्या अश्रूंना जणू वाहून जायला अजून एक कारणच मिळालं. तिला अजून हिणवायला मी तिच्या नवऱ्याच्या दिशेने मान हलवत पूनमच्या हातात माझा हात गुंफला आणि दुसऱ्या हाताने तिला हात दाखवला. मला त्या वेळेला काय वाटलं नक्की सांगता येणार नाही, पण आनंद झाला, कदाचित तसाच आनंद जसा मला न सांगता दिल्लीला जाऊन तिला काही वर्षांपूर्वी झाला असेल. हा आनंद बरोबर की चूक ह्यात जसं मला पडायचं नव्हतं तसंच मला जास्त वेळ ह्या आनंदात ही राहायचं नव्हतं. चहावाल्याला पैसे देऊन मी तसाच पूनमच्या हातात हात घालून गाडीच्या दिशेने चालायला लागलो, एकतर घडलेलं सगळं तिला सांगायचं होतं, आनंद झाल्याचा अपराध कबूल करायचा होता आणि बंद गाडीसाठी गॅरेजवाल्याला ही फोन करायचा होता.
लेखन: मुग्धा
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.