खिडकीतून समोरच्या वडाची पूजा करणाऱ्या सुहासिनींना ती लक्ष देऊन पाहत होत. या दिवशी ती घराबाहेर पडत नव्हती. आजूबाजूंच्या स्त्रियांच्या नजरा ती टाळू शकत नव्हती तिचा आणि त्याचा फारसा संबंधच नाही आला. एक तडजोड म्हणून ते लग्न होते……..दोघांसाठी.
तेव्हा ती तारुण्याच्या मस्तीत होती. प्रेम करावे बघून असे म्हणत एकाच्या प्रेमात पडली मग वाहवत गेली आणि पाळी चुकल्यावर भानावर आली. अगदी हिंदी चित्रपट असल्याप्रमाणे. अर्थात त्याला समजल्यावर तो पळून गेला आणि तिला घरून शिव्या आणि मारहाण…. एबॉर्शन करायला गेली तेव्हा तिथूनही नकार आला. हताश होऊन खाली असलेल्या हॉटेलमध्ये कॉफी प्यायला शिरली तेव्हा समोरच हा येऊन बसला.
तिच्याकडे बघून हसताच एक तिरस्कारयुक्त नजर तिने त्याच्याकडे टाकली. त्याने हसूनच ती परतावली. “स्वतःला सती सावित्री समजू नका हो .. कुठून आलात ते माहितीय मला…” तो छद्मीपणे म्हणाला. ती संतापून काही बोलणार तेव्हा त्याने हात उंचावून थांबविले. “मला शिव्या देऊन तुमचा प्रॉब्लेम सुटणार असेल तर दिवसभर शिव्या घाला मला ..” ती शांत बसली. खरेच पुढे पुढे खूप त्रास होणार मला मग ह्याला बोलून काय उपयोग..???
“माफ करा… पण तुमची अवस्था माहीत आहे मला. तो डॉक्टर माझा मित्र आहे. माझी एक ट्रीटमेंट चालू आहे त्यानिमित्ताने मी याच्याशी चर्चा करायला येतो. आज तुम्हाला पाहिले. आवडला तुम्ही मला. तुमची केस फारच पुढे गेलीय ते कळले मला. यावर उपाय काय तुमच्याकडे …??? आत्महत्या की कुमारी माता..? बरे माता झाल्यावर पुढे काय.. ?? नोकरी आहे का ??? घर आहे का ..?? की आजचा दिवस माझा या तत्वाने जगणार …” आता तिलाही त्याचे बोलणे हवेहवेसे वाटू लागले. खरेच पुढे काय ते तिला माहीत नव्हते. आत्महत्या करायची तिच्यात हिम्मत नव्हती. घरातून या जन्मात तरी माफ करणार नव्हतेच.
“मग तुम्ही लग्न करणार का माझ्याशी…??” तिने तिरकसपणे विचारले.
“का नाही ..?? तुमची इच्छा असेल तर नक्की ..” तोही त्याच टोनमध्ये बोलला. तिचा रागाने फुललेला चेहरा पाहून त्याने परत हात वर केले. “एक डील करू …विचार करा … मला कॅन्सर आहे. काही वर्षाचाच सोबती आहे मी. चांगली नोकरी आहे पण या आजारामुळे कोणीही माझ्याशी लग्न करायला तयार नाही. कोण करेल माझ्याशी लग्न …. ??? तुम्ही माझ्याशी लग्न कराल…”?. त्याचा गोळीसारखा प्रश्न अंगावर येताच ती हादरली.
“काहीतरीच काय …..?? ती उत्तरली.
” का….. ? मी चांगला शिकलेला आहे. चांगली नोकरी आहे. शिकलेला आहे. मुख्य म्हणजे माझ्याशी लग्न करून तुम्हाला घर मिळेल. होणाऱ्या बाळाला नाव मिळेल आणि माझ्या मृत्यूनंतर तुम्हाला नोकरीही मिळेल” त्याने सहजपणे सांगितले.
” हा सर्व माझा फायदा झाला ..पण त्यातून तुला काय मिळेल….?? माझ्यावर हे उपकार का ..”?? तिने नजर रोखुन विचारले.
” च्यायला….. वाटलेच हे प्रश्न येणार ….हे बघ.. मी मरणारच आहे हे नक्की. मग मारणापूर्वी संसारातील सुख उपभोगून का जाऊ नये. माझाही संसार असावा, तडजोड करून संसार करणारी बायको असावी असे का वाटू नये मला. पण कोणतरी अडचणीत असणारिच माझ्याशी लग्न करेल. मी अश्याच मुलीच्या शोधात होतो. तुझा फॉर्म चोरून वाचला.. मुलाला जन्म देण्याखेरीज तुझ्याकडे पर्याय नाही. म्हणूनच मी विचारले तुला. नवरा बायको म्हणून नाही तर मित्र म्हणून राहू. तुझ्या बाळाला नाव, तुला स्थर्य, मला संसार मिळेल. बघू किती वर्षे टिकतो ते…” असे बोलून त्याने हात पुढे केला. तिने क्षणभर विचार करून त्याच्या हाती हात दिला.
त्यांचे लग्न दोन्हीकडे पचनी पडले नाही. पण त्याची कल्पना असल्यामुळे त्याने आधीच दुसरी रूम घेऊन ठेवली होती. त्यामुळे फारसा त्रास झालाच नाही. मग काही महिन्यांनी सोनूलीचा जन्म झाला. आपलीच मुलगी असल्यासारखा त्याने सगळीकडे बर्फी वाटून आनंद साजरा केला. त्यानंतर ती त्याच्या जवळ कधी गेली हे तिलाच कळले नाही. दोन वर्षांनी त्याच्या आजाराच्या खुणा शरीरावर दिसू लागल्या तेव्हा ती हादरली. सत्य माहीत असूनही ते स्वीकारणे जड गेले तिला. पण आता तिची पाळी होती. कंबर कसून तिने त्याची काळजी घेण्यास सुरुवात केली. शेवटी सहा महिन्यातच तो गेला. पण शब्द दिल्याप्रमाणे आपली नोकरी आणि घर तिला देऊन गेला. तो जिवंत असे पर्यंत तिला कधी वट पौर्णिमेचे व्रत करायची गरज भासली नव्हती पण आता वाटू लागले की हाच पती पुढच्या सात जन्मी का लाभू नये …??
ती उठली मनाशी काहीतरी ठाम निर्णय घेऊन समोरील वडाच्या दिशेने निघाली.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.