जेव्हा गौतम बुद्धाला विचारलं की माणसाचा आयुष्यातला सर्वात मोठा गैरसमज कोणता? बुद्धांनी उत्तर दिलं, माणसाची सर्वात मोठी चुक म्हणजे तो गृहित धरतो की त्याच्यापाशी वेळ आहे, वेळ फुकट आहे पण अमुल्य आहे….
आपण तिचे मालक बनु शकत नाही, पण तिच्यामुळेच आपण, आपल्याला हवे ते प्राप्त करुन कशाचेही मालक बनु शकतो.
आपण वेळ साठवुन ठेवु शकत नाही पण आपण तिचा योग्य वापर करु शकतो.
एकदा गमवलेला क्षण पुन्हा वापस येत नाही.
माणुस सरासरी तब्बल अष्ठ्याहत्तर वर्षे जगतो. त्यापैकी आपली अठ्ठावीस वर्षे झोपण्यात जातात. म्हणजे आपलं तीस टक्के किंवा एक तृतीयांश आयुष्य झोपण्यात किंवा झोप यावी म्हणुन तळमळण्यात जातं.🙄
आपण एकुण आयुष्याच्या दहा वर्षे वेळ कामाच्या ठिकाणी घालवतो. पण गंमत म्हणजे आपल्यापैकी पन्नास टक्के लोकांना करत असलेले काम मुळीच आवडत नाही.
‘मजबुरी का नाम’ म्हणत आपली गाडी रखडत रखडत चालत असते.
बरं! वेळ पैशापेक्षा जास्त मौल्यवान आहे, कारण तुम्ही पैसा अजुन कमवु शकता, वेळ कमवायची कला अजुन तरी माणसाला गवसलेली नाही.
तरीही आपल्या आयुष्यातला नऊ वर्षांचा मौल्यवान काळ आपण टी. व्ही. बघण्यात आणि सोशल मिडीयावर घालवतो. रोजच्या दैनंदिन कामामध्ये सहा वर्ष, खाण्यापिण्यामध्ये चार वर्ष, साडेतीन वर्ष शिक्षणामध्ये, अडीच वर्ष तयार होण्यामध्ये, आणि अडीच वर्ष खरेदी करण्यात आपण खर्च करतो. आपलं दिड वर्ष प्रवासात संपतं, आणि दिड वर्ष बाळांना सांभाळण्यात.
आयुष्याच्या ह्या बेरीज वजाबाकीत, आपल्या स्वतःसाठी उरली, फक्त नऊ वर्षांची वेळ! ही आपली हक्काची वेळ! स्वतःसाठी जगण्याची वेळ! स्वप्नं पुर्ण करण्यासाठीची वेळ! पाहीजे तसं जगण्याची वेळ!
माझ्याकडे तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे आणि एक खराब बातमी आहे. वाईट बातमी ही आहे की विमान, हेलिकॉप्टरसारखी, वेळही भुर्र्कन उडुन जात आहे, आणि चांगली बातमी ही आहे की त्याचे पायलट तुम्ही स्वतःच आहात.
कल्पना करा, रोज सकाळी तुम्ही उठता आणि प्रत्येक दिवशी तुमच्या खात्यात 86,400 रु. भरले जात आहेत आणि दिवसाच्या शेवटापर्यंत तुम्हाला ते कशात ना कशात खर्च करावेच लागतील, नाहीतर आपोआप ते बाद होतील, जुन्या हजार पाचशेच्या नोटांसारखे!…
आणि पुढच्या दिवशी तुमच्या खात्यात अजुन 86,400 रु. पुन्हा भरले जातील, ह्या रुपयांचा वापर तुम्ही कसा करता?
अगदी तसंच प्रत्येक दिवशी 86,400 सेकंद तुमच्या आयुष्याच्या खात्यात भरले जात आहेत.
जर आपण एक पैसाही विनाकारण खर्च करत नाही तर मग त्यापेक्षा अमुल्य असलेली वेळ आपण वाया का घालवतो? पैसे अजुन कमवता येतील, वेळ नाही!
तुम्हाला जर वाटत असेल की लोक तुमचा वेळ वाया घालवतायत, तर सॉरी! तुम्ही चुकीचे आहात, तुम्ही त्यांना आपला वेळ वाया घालवण्याची परवानगी देता, म्हणुन असे होते.
आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये दोन प्रकारचे आवाज आहेत.
एक आवाज आहे, तो तुम्हाला चांगलं काम करण्यासाठी सतत प्रोत्साहन देतोय, तो तुम्हाला ह्या जगावर प्रेम करण्यासाठी प्रेरणा देतोय, तो तुम्हाला भव्य दिव्य कल्पना आणि मोठी मोठी स्वप्नं दाखवुन त्या दिशेनं जाण्यासाठी खुणावतयं,
आणि त्यासोबतच एक दुसरा आवाजही आहे,
हा आवाज तुम्हाला सतत मागे खेचतोय, तो तुम्हाला आळशी बनवतोय, कोणतंही काम करण्यापासुन परावृत्त करतोय. आपल्या क्षमता जगासमोर येण्यापासुन हा आवाज आपल्याला रोखतोय.
प्रत्येक दिवशी, दररोज सकाळी डोळे उघडल्यापासुन, रात्री डोळे मिटेपर्यंत, आपल्या आतमध्ये, ह्या दोन आवाजांचं युद्ध निरंतर सुरुच आहे. आणि माहीतीये, यापैकी कोणता आवाज जिंकतो?
ज्याचं आपण ऐकतो, तोच आवाज जिंकतो. ज्याला आपण पुष्ट करतो, तो जिंकतो, ज्याला आपण खरं मानतो आणि त्याच्या सुरात बोलु लागतो, तो आवाज जिंकतो.
आपल्या वेळेचा वापर कसा करायचा ही निवड आपली स्वतःची असते, इथे विल्यम्स शेक्सपिअरच्या ओळी सांगाव्याशा वाटतात,
कशाची तरी वाट बघताना वेळ खुप संथ गतिने जात असते,
जेव्हा आपल्याला कशाची तरी भिती वाटते तेव्हा खुप जलद गतीने धावते,
वेळ अजिबात कटत नाही, जेव्हा तुम्ही कसल्यातरी कारणाने खुप उदास असता,
आणि उत्सव साजरा करणार्यांसाठी वेळ नेहमीच अपुरा असतो,
जे प्रेम करतात, त्यांच्यासाठी मात्र वेळ ‘अनंत आणि अमर्याद’ असते!…
मनःपुर्वक आभार!..
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.