पान खाणं, हे तितकंसं चांगलं नाही, किंवा ते एक अतिशय वाईट व्यसन आहे हे तुम्हाला वाटत असेल तर हे पूर्ण शेवट्पर्यंत वाचा.
विड्याचे पान (ताम्बूल) आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहे. संपूर्ण भारतभर विड्याचे पान खाल्ले जाते.
तसेच विड्याचे पान विविध प्रकारच्या पूजा करताना देखील वापरले जाते. विड्याचे पान शुभ मानले जाते.
हे सारे तर आपल्याला माहीतच आहे, पण आपल्याला हे माहीत आहे का की विड्याच्या पानात खूप औषधी गुणधर्म आहेत आणि आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे ते अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार म्हणून वापरले जाते.
कसे ते आजच्या ह्या लेखात विस्ताराने जाणून घेऊया.
विड्याचे पान म्हणजे काय
विड्याचे पान म्हणजेच खाऊचे पान किंवा नागवेलीचे पान (तांबूल) हे आपल्या देशात अनेकानेक वर्षांपासून मुखशुद्धी म्हणून, तोंडाचा स्वाद वाढवण्यासाठी म्हणून खाल्ले जाते.
तसेच अनेक प्रकारच्या पूजा किंवा शुभ प्रसंगी देखील ते वापरले जाते. विड्याचे पान वेलीवर वाढते.
ह्याची नाजुक वेल असते जी दुसऱ्या एखाद्या मोठ्या झाडाच्या आधाराने वाढते. बारीक असली तरी ही वेल मजबूत असते आणि ह्या वेलीला मोठी तळव्याच्या आकाराची पाने येतात.
पिंपळाच्या पानांसारखीच विड्याची पाने देखील रुंद आणि मोठी असतात. पानांचा रंग गडद हिरवा असतो.
अनेक ठिकाणची विड्याची पाने प्रसिद्ध असली तरी बनारस चे पान हे सर्वोत्तम मानले जाते.
आज आपण विडयाच्या पानाचे फायदे, तोटे सहज सोप्या भाषेत जाणून घेऊया.
विडयाच्या पानाचे औषधी गुणधर्म
विडयाचे पान उष्ण प्रवृत्तीचे असते. पान मधुर चवीचे, क्षारयुक्त, किंचित तिखट, चरचरीत आणि वात कारक असते.
पिकलेले किंवा जुन पान अत्यंत रसदार, स्वादिष्ट, सुगंधी, पाचक, बलकारक आणि कामोत्तेजक असते.
पिकलेले पान मुखशुद्धीसाठी योग्य असते. कोवळे किंवा नवे पान तितके गुणकारी नसते.
विविध आजारांवर पानाचे औषधी उपयोग
१. डोकेदुखी– डोक्याला कानभोवती सगळीकडून विड्याची पाने बांधून ठेवली असता डोके दुखणे कमी होते.
२. डोळ्यांचे आजार/ इन्फेक्शन– विड्याच्या पानाचा रस काढून त्यात समप्रमाणात मध मिसळून ते मिश्रण काजळाप्रमाणे डोळ्यात घातले असता डोळ्याच्या काही आजारांवर उपयोग होतो.
ह्यासाठी आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. विड्याच्या पानाचा २ ते ३ थेंब रस डोळ्यात घातला असता रातांधळेपणा कमी होण्यास मदत होते.
३. कानदुखी- विड्याच्या पानाचा २ ते ३ थेंब रस कानात घातल्यामुळे कान दुखणे कमी होते.
४. दातदुख- प्रत्येकी ३ ग्रा. रुमी मस्तगी , सुपारी, आणि खादीर घेऊन ते विड्याचे पान घालून वाटून घ्यावे. ते मिश्रण पेस्ट प्रमाणे दातावर घासले असता दातदुखी, हिरड्यांना येणारी सूज इत्यादि बरे होते.
५. लहान मुलांची सर्दी – लहान मुलांना झालेली सर्दी विड्याची पाने गरम करून एरंडेल तेलात बुडवून मुलांच्या छातीवर बांधली असता खूप उपयोग होतो.
६. सर्दी/खोकला – सर्दी/ खोकल्यासाठी सर्वांनाच विड्याच्या पानांचा उपयोग होतो. देठासकट पान वाटून घेऊन ते मधाबरोबर घेतले असता सर्दी खोकला बरा होतो.
७. डांग्या खोकला – डांग्या खोकला झाला असता विड्याच्या पानाचा रस घेण्यामुळे घश्याला आलेली सूज कमी होण्यास मदत होते. तसेच कोरडा खोकला बरा होण्यास देखील मदत होते.
८. दमा- विड्याची पाने गरम करून छातीला बांधली असता दमा बरा होण्यास मदत होते. लागणारा दम कमी होऊन श्वास घेण्यास होणारा त्रास कमी होतो.
९. हृदय विकार – विड्याच्या पानाचे सरबत करून प्यायल्याने हृदयाची शक्ति वाढते.
१०. जखम भरून येण्यासाठी – झालेल्या जखमा भरुन येण्यासाठी पानाचा उपयोग होतो. जखमेवर विड्याचे पान बांधून पट्टी लावली असता जखम लवकर भरून येते.
११. सूज कमी होते- शरीराला आलेल्या सुजेच्या जागी पान गरम करून बांधले असता सूज व त्यामुळे होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते.
१२. ताप येणे- ताप येण्यावर देखील विड्याच्या पानाचा रस घेणे गुणकारी आहे.
विड्याच्या पानाचे सर्व भाग म्हणजेच पाने, देठ, फळे आणि विड्याच्या पानाचे तेल हे सर्व गुणकारी आहे.
तर हे आहेत पानाचे औषधी गुणधर्म. ह्यांचा जरूर लाभ घ्या.
परंतु हेही लक्षात घेतले पाहिजे की अति प्रमाणात पान खाणे हे व्यसन होऊ शकते, खूप जास्त प्रमाणात पान खाणे हे शरीरासाठी घातक आहे.
त्यामुळे प्रमाणात पान खा आणि त्याच्या औषधीय गुणांचा लाभ घ्या.
स्वस्थ रहा, आनंदी रहा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.