भाजीपालाच नाही तर, स्वतःची वीज सुद्धा निर्माण करणारी ठाण्याची सोसायटी

ठाण्याच्या या विजय गार्डन सोसायटीने स्वतःचा भाजीपालाच नाही तर वीज सुद्धा निर्माण करायला कशी सुरुवात केली ते वाचा या लेखात.

निसर्गाकडे आपल्याला द्यायला खूप असतं पण आपल्यालाच बऱ्याचदा निसर्ग आपल्याला काय देऊ पाहतोय हे समजत नसतं.

निसर्ग या ना त्या रूपाने सतत आपली मदत करायला बघत असतो, फक्त आपल्याला कधी ते समजतच नाही, तर कधी उशिरा समजतं.

आहे त्या परिस्थितीकडे नीट बघितलं, त्यातून होणाऱ्या त्रासाकडे थोडं दुर्लक्ष केलं आणि त्यातून आपण चांगलं काय घेऊ शकतो याचा विचार केला तर खरंच निसर्गाने आपल्या पदरात बऱ्याचदा वरदानच दिलेलं असतं, आपल्याला फक्त ते डोळे उघडे ठेऊन ओळखायचं असतं.

मग ते उशिराने लक्षात आलं तरी त्या संधीचं आपण सोनं करू शकतो.

अशीच गोष्ट ठाण्यातील एका सोसायटीची आहे, सतत पावसात होणाऱ्या नुकसानाला वैतागून शेवटी त्यांनी तो फक्त तोच प्रश्न निकालात काढला नाही, तर त्या नुकसानातून चक्क स्वतःचा फायदा करून घेतला.

ठाण्याच्या ‘विजय गार्डन सोसायटी’मध्ये दर पावसाळ्यात पावसामुळे काहिना काहीतरी नुकसान व्हायचे.

२०१७ मध्ये झालेल्या मुसळधार पावसात मात्र या सोसायटीची पार्किंगच्या कंपाउंडची चक्क एक भिंतच कोसळली.

त्यामुळे सगळ्या पार्किंगमध्ये पाणी आणि चिखल झाला होता. साहजिकच सोसायटीमधले रहिवासी प्रचंड वैतागले असणार.

दर वर्षीच्या त्रासाला सगळेच कंटाळले होते, मात्र या वेळेस चिखल, पाणी स्वच्छ करून घ्यायला त्यांनी महानगरपालिकेच्या लोकांची वाट बघायची नाही असा निर्णय घेतला आणि पुढच्या काहीच दिवसात हा निर्णय कसा योग्य होता हे सर्वांना कळले.

असं नेमकं काय केलं या सोसायटीच्या रहिवाशांनी?

भिंत कोसळल्यावर रेनी वर्गीस यांच्या सकट बिल्डिंगमधल्या काही लोकांनी, रंगाचे असतात तसे मोठे रिकामे डबे गोळा करून आणले आणि स्वतः त्यात सोसायटीच्या आवारात साचलेली माती/चिखल भरायला सुरुवात केली.

भिंत पडल्यावर इतकं नुकसान आणि चिखल मातीचा खच झाला होता की हे काम सुरु करून अवघ्या तासाभरातच सुमारे दीडशे डबे चिखलाने भरले.

साफसफाई झाली होती, बिल्डिंगचं कम्पाऊंड परत होतं तसं झालं.

पण हे उत्साही लोक फक्त इतक्यातच समाधानी होऊन थांबले नाहीत. त्यांना त्यातून सुद्धा काहीतरी चांगलं होऊ शकतं असं वाटलं आणि ते लगेचच कामाला लागले.

त्यांनी ते सगळे डबे बिल्डिंगच्या टेरेसवर नेले.. त्यामागचं त्यांचं प्रयोजन म्हणलं तर साधं पण खरंच कौतुकास पात्र असं होतं, ते म्हणजे, ‘बिया रुजवून झाडे लावणे.’

विजय गार्डन सोसायटीचे सेक्रेटरी नेल्सन डीमेलो याबद्दल माहिती देताना सांगतात, की त्यांच्या बिल्डिंगचं नुकतंच नूतनीकरण झालं होतं त्यामुळे खूप रिकामे रंगाचे डबे शिल्लक होते. त्यांची ही विल्हेवाट लावायचीच होती. त्यामुळे सगळा चिखल या डब्यात भरून तो वरती गच्चीवर काही फळभाज्या आणि पालेभाजीच्या बिया रुजवण्यासाठी न्यायची कल्पना सुचली.

विजय गार्डन सोसायटी ठाणे

आता या सोसायटीच्या गच्चीत वांगी, पालक, भेंडी, टोमॅटो, ब्रोकोली, टरबूज, मिरच्या अशा अनेक भाज्यांचे पिक निघते.

सुरुवातीला अगदी दोन चार कुटुंबांनी यात पुढाकार घेतला पण आता सोसायटीच्या जवळजवळ सगळ्याच सदस्यांसाठी बागकाम हा एक उत्तम विरंगुळा झालेला आहे.

सगळेच आपापल्या रुटीन आयुष्यात व्यस्त असताना या बागेच्या माध्यमातून त्यांना चार विरंगुळ्याचे क्षण मिळतात.

बागेत काम करणं म्हणजे सगळ्यांचाच छंद झाला आहे.

या सोसायटीने आणखी एक अभिनव कल्पना राबवली आहे.

सोलर पॅनलच्या माध्यमातून वीज निर्माण करून ते चक्क ‘महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कम्पनी लिमिटेड’ला वीज विकतात!

वाचून आश्चर्य वाटेल पण यामुळे त्यांना महिन्याला चक्क चाळीस हजार रुपये मिळतात.

ऊन सगळीकडेच असतं, पण त्याचा असा वापर करून इतका फायदा करून घ्यायला अशी कल्पनाशक्ती तर हवीच पण या कल्पना फक्त कल्पना राहू न देता अमलात आणायला प्रचंड इच्छाशक्ती सुद्धा हवी.

या सोसायटीच्या सदस्यांनी इतके कष्ट घेऊन हे सगळं साकारलं त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. यातून आपल्याला सुद्धा शिकण्यासारखं भरपूर आहे.

हे सगळं वाचून पुढे काय, बागेतून मिळणाऱ्या फळांचं, भाज्यांचं ते काय करत असतील असा प्रश्न पडतो ना? तर मग पुढे वाचा.

दर चार दिवसांनी दीडशे कुंड्यांमधून एका तरी भाजीचं किंवा फळाचं पिक निघतंच.

सोसायटीचे मेम्बर्स मग हे आपापसात वाटून घेतात. एकदा पिक आलं की ते साधारण एका घराला पुरेल इतकं येतं, आपापसात ठरवून मग एका आड एक प्रत्येक फ्लॅटला पिक मिळेल असं नियोजन यांनी केलं आहे.

या बागेतून मिळणाऱ्या फळांचा किंवा भाज्यांचा फक्त विचार असतो असं नाही तर सोसायटीमधले सदस्य आपापल्या घर, ऑफिसमध्ये कितीही व्यस्त असले तरी दिवसातून एक तास बागेत खतपाणी करण्यासाठी काढतातच.

घरी बाग असावी, बागेत चार क्षण घालवून दिवसभराचा ताण, थकवा दूर करावा आणि दारात आलेल्या भाजीची वेगळीच गोडी चाखावी असं आपल्याला सगळ्यांना वाटतं पण सगळ्यांच्याच घरी अशी सोय, जागा असेलच असं नाही शिवाय रोज बागेचा इतका मोठा व्याप सगळ्यांनाच झेपेल असं नाही.

अशावेळेस मग या सोसायटीचा आदर्श ठेऊन आपणही असा एखादा उपक्रम राबवण्याचा विचार करू शकतो.

एकमेकांच्या मदतीने अशी एखादी बाग फुलवून त्यातून निखळ आनंद मिळवायची ही कल्पना खरंच अनुकरणीय आहे. या सोसायटीबद्दल कौतुक वाटतंय ना?

आता हे सगळं करण्यासाठीचं, आर्थिक नियोजन संभाळण्यातलं सोसायटीचे सेक्रेटरी नेल्सन यांचं कसब महत्त्वाचं.

नेल्सन याच्या प्रयत्नातून जो तीस किलोवॅटचा सोलर पॅनल बसवला गेला त्याची किंमत वीस लाख रुपये आहे, पण सोसायटीच्या एकही सदस्याने एक रुपया सुद्धा यासाठी भरला नाही.

विजय गार्डन सोसायटी ठाणे

मग हे कसं झालं? तर नेल्सन यांनी SKS GLOCHEM या कम्पनीबरोबर एक आगळावेगळा करार केला.

सात वर्ष सोसायटीवर बसवलेल्या सोलर पॅनलची मालकी SKS GLOCHEM या कम्पनीची असेल. यातून निर्माण होणारी वीज, हि MSEDCL ला ‘महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कम्पनी लिमिटेड’ विकली जाईल.

अर्थात विज विकून मिळणारे पैसे हे सोसायटीला न येता थेट कम्पनीला जातील आणि काही वर्षातच सोलर पॅनल बसवायची किंमत वसूल होईल. असा हा करार आहे का नाही कौतुकास्पद?

SKS GLOCHEM या कंपनीचे को फॉऊंडर, गोपाळकृष्णन अय्यर यांनी अशी माहिती दिली की, त्यांना लोकांमध्ये सोलर बद्दल जागृती तर निर्माण करायचीच आहे पण लोकांचा असा जो एक गैरसमज असतो की या गोष्टी करायला प्रचंड पैसे गुंतवावे लागतात तो दूर करायचा होता.

एकही पैसे खिशातून न घालता या सोसायटीने सोलर पॅनल बसवले त्यामुळे हा गैरसमज दूर व्हायला निदान सुरुवात झालीये असं समजायला हरकत नाही.

२०१७ मध्ये बसवलेला प्लॅन्ट सात वर्ष कम्पनीच्या मालकीचा आणि एकदा का पैसे वसूल झाले की सोसायटीला त्यातून आजन्म फायदाच फायदा.

ठाण्यासारख्या शहरात असा बागकामाचा आनंद घेता येईल असं कोणालाच वाटलं नसेल. पण पावसाने केलेल्या उत्पाताला वैतागून न जाता, त्यातून काय करता येईल असा विचार करून ही बाग फुलवली गेली.

रोजच्या व्यस्त आयुष्यात, कामाच्या व्यापामुळे कंटाळलेल्या सदस्यांना नवीन छंद मिळाला आणि या सगळ्यात, चेरी ऑन द केक म्हणजे कोणतेही रसायन न वापरता आलेल्या ऑरगॅनिक भाज्या या सोसायटीच्या सदस्यांना मिळतात..

करायचं काय? तर फक्त समस्या दिसली की त्यात संधी शोधायची आणि त्या संधीला मूर्त रूप देण्यासाठी लोकांना एकत्र आणून कष्ट करायचे.. कष्टाचं गोड फळ हे मिळणारच!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।