एका संध्याकाळी आकाश निरभ्र असताना अचानक मळभ भरून येतं. मग हळूहळू काळोख होतो. इतका वेळ शांत असणारं सगळं काही अचानक आपला सूर बदलतं.
आकाश काळ्या ढगांनी भरून जातं. वाऱ्याचा जोर वाढतो.
अचानक निसर्ग कुस बदलून एका वेगळ्या रंगात येतो. वारा आता सरळ न वाहता चक्राकार वहायला लागतो. धुळीचे छोटे भोवरे अचानक निसर्गाच्या ह्या उधाणात पिंगा घालू लागतात.
आकाशाच्या त्या काळ्या नभातून मग विजेचा खेळ सुरु होतो. कडाडणारा आवाज आणि चिरत जाणारा प्रकाश हे दोन्ही वातावरणात एक भय निर्माण करतात. मग काही क्षणात जलधारा कोसळतात ते त्या जमिनीला तृप्त करण्यासाठीच.
त्या जलधारांचा आवेग वाढत जातो क्षणाक्षणाला आधी छोटे वाटणारे थेंब टपोरे होतात आणि मग त्याचं रुपांतर होतं ते गारांमध्ये. अचानक गरम असलेल्या त्या वातावरणात गारांचा पसारा निसर्गाचा पूर्ण रंग एका क्षणात बदलवून टाकतो.
सगळीकडे पांढरी चादर ओढली जात आहे असं वाटतानाच अचानक सगळं थांबतं. पाउस, हवा सगळं एका क्षणात शांत होते. तो आवेग कुठेतरी संपून जातो.
काळ्या नभांनी भरलेलं ते आकाश पुन्हा एकदा निरभ्र होते. आकाशात ते काळे मेघ पुढे जात असतात. आपल्याला काही देऊन जाताना आपल्यातलं जणू काहीतरी घेऊन जात आहेत असा भास होतो.
निसर्गात होणारा काही क्षणांचा बदल पण तो त्या धरणीचं रूपच बदलवून जातो.
आयुष्यात एका अनोळखी वळणावर येणारं प्रेम पण असचं असतं नाही का? आपलं सगळं आयुष्य सुरळीत सुरु असतं. काही कमी नसते.
पण अचानक काही नसताना ती व्यक्ती समोर येते. कुस बदललेल्या निसर्गासारखी…. शांत असलेलं मन मग कुठेतरी अशांत होतं. काहीतरी वेगळं होतं आहे ह्याची जाणिव होई पर्यंत हातातून काहीतरी निसटलेलं असतं.
पण ते सगळंच आवडत असतं. क्षणभर भीती तर वाटतेच. आपल्याला वाटणाऱ्या भावना जेव्हा आपल्या आयुष्याच्या चौकटीत बसवण्याचा आपण विचार करतो तेव्हा चुकल्यासारखं वाटतंच.
पण ती ओढ तरीसुद्धा हवीहवीशी वाटते. हे सगळं चालू असताना अचानक जेव्हा भावना शब्द घेऊन बाहेर येतात तेव्हा त्यात धुंद होण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही.
अगदी काही क्षण असेच बेधुंद करणारे असतात त्या गारांप्रमाणे. सगळीकडे जशी पांढरी चादर पसरते त्या प्रमाणे त्या क्षणांच्या आठवणीत आपण सगळचं विसरून जातो.
कुठेतरी काहीतरी आपल्याला ओढत असते. सगळी बंधनं तोडून टाकण्यासाठी. हेच ते जे मला हवं होतं, हीच ती व्यक्ती जिच्यामुळे मी संपूर्ण होतो.
असचं वाटत असताना अचानक सगळं थांबतं. काही क्षण सर्वस्व वाटणारी व्यक्ती दूर जाते. कारण काही असो पण ते जाणं मनाला चटका लावून जातं.
जाणारे मेघ जसे जाताना मागे वळून बघत नाही तसेच ती व्यक्ती पण मागे वळून बघत नाही. येताना रिकामी आलेली व्यक्ती जाताना मात्र आपल्यातलं खूप काही घेऊन जाते.
पण त्या सोबत खूप काही देऊन पण जाते. भकास असलेलं आयुष्य अचानक त्या वळवाच्या पावसात नाहून निघालेल्या माती सारखं सुंदर होते.
त्याचा सुगंध पूर्ण आसमंतात दरवळायला लागतो. त्यात अनेक नवीन गोष्टींचे अंकुर फुटतात. पावसाचा शिडकावा झाल्यावर नकोशी वाटणारी जमीन आता सुंदर वाटायला लागते.
आपल्या बाबतीत ही तेच होते नाही का? ज्यांची कधी नजर पण आपल्यावर पडत नव्हती त्यांना आपल्यात झालेले बदल सुखावणारे असतात.
अचानक काय झालं? ह्याची जाणीव जशी जमिनीला होतं नाही तशी आपल्याला काय झालं हे आपलं आपल्यालाच माहित असतं.
वळवाचा पाउस जसा अनेक प्रश्न निर्माण करून पुढे जातो तशी अनेक उत्तरे हि देऊन जातो. एका पाण्याला तरसलेल्या जमिनीला हा वळवाचा पाउस जसं एक वेगळंच आयुष्य देतो तसचं वळवाच प्रेम.
अचानक आयुष्याच्या वाटेवर ते कधी कोणाकडून मिळेल काही माहित नसते. अचानक कोण कसं आपल्या आयुष्यात प्रवेश करतं हेच आपल्याला कळत नाही.
जोवर कळायला लागते तोवर ते निघून पण गेलेलं असते एक असीम आनंदाचा शिडकावा करून. ज्याचा सुगंध येणारे कित्येक क्षण आपल्याला आपल्या आतच भिजवत राहतात.
जाताना खूप सारे प्रश्न निर्माण करून जाणारं हे प्रेम अनेक उत्तर हि देऊन जातं. आयुष्य म्हणजे गणित नाही. सगळचं जमा खर्चात बसवता येतं नाही.
कोण कशासाठी आपल्या आयुष्यात येते? किती काळासाठी? आणि का? ह्याची उत्तरं कधीच मिळत नाहीत.
फक्त मिळतात ते वळवाच्या पावसाचे क्षण जे आपल्या मनाच्या कुपीत फक्त वेचायचे त्या पडलेल्या गारांसारखे कारण पुन्हा कधी वळवाचा पाउस येईल हे न निसर्गाला माहित असते न आपल्याला…
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
सुंदर लेख.
सुंदर… वाचताना डोळ्यासमोर बरेच काही तरळत होते..
खरचं खुपच छान. शब्दशृगांरानी सजलेला हा लेख मनाला भावला…., मनाला शिवलासुद्धा.
वळवाच्या पाण्यासारखचं वळवाचं प्रेमही संजीवनीच बनुन जाते.
वळवाचं प्रेम प्रत्येकांच्या आखुष्यात अगदी चोरपावलाने येतं. येताना इतकं काही घेउन येतो की, गगनात मावत नाही.जातानाही मात्र दामदुप्पट देउन जातो. जे मनात मावत नाही आठवण्यांची खजान.
चांगल्या आठवणी मनाला प्रेरणा देणार्या ठरतात. तर…, नको असणार्या आठवणी मात्र मनाला निराशेच्या भयाण डोहात बुडवतात.म्हणुनच आमचे कवी केशवसुत म्हणतात,
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं….,
मातीमध्ये उगवुनसुद्धा
मेघापर्यंत पोहचलेलं.
खूप छान… लेख मनापासून वाचला हे लिहिण्याचं सार्थक…👍
Nice 😊
Very nice 👌😊