शीर्षक वाचून एखाद्या सिनेमाची स्टोरी वाचायला मिळते की काय असंच वाटेल तुम्हाला. जे प्रसंग आपल्या आजूबाजूला सहसा घडत नाहीत ते सिनेमात काल्पनिक म्हणून दाखवतात.
आणि अशीच एखादी गोष्ट प्रत्यक्ष घडली आहे, हे जर तुम्हाला सांगितलं तर???
हो अशीच एक गोष्ट आपण पाहुया. या गोष्टीतला नायक हमखास आपलं लक्ष वेधून घेतो.
निश्चयी आणि महत्वाकांक्षी स्वभावाचा, कष्टाची तयारी असणारा हा नायक म्हणजे बी. एम. बालकृष्णा.
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील संकरायाल पेटा गावात बालकृष्णाचा जन्म झाला. वडिलांचा व्यवसाय शेती आणि आई अंगणवाडी शिक्षिका होती आणि शिवणकाम करायची.
सहा वेळा गणितात नापास होऊनही बालकृष्णाने कसंबसं आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं.
शाळेत असल्यापासूनच लहान सहान कामं करण्याची आवड असल्याने त्याने तसं घरी सांगितलं. दरमहा तीनशे रूपये पगार घेऊन एका फोन बूथवर काम करण्याची त्याची इच्छा होती.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने नेल्लोर येथे जाऊन ऑटोमोबाईल डिप्लोमा पूर्ण केला.
या काळात खरं तर मेसचे पैसे देणंही त्याच्या आई वडिलांना परवडणारं नव्हतं. कुटुंबातील आर्थिक अडचण बालकृष्णाला कळत होती.
त्यामुळे वेळेचा अपव्यय न करता लवकरात लवकर काम सुरू करण्याची त्याची इच्छा होती.
काही झालं तरी आई वडिलांच्या कष्टाचं चीज करायचं हा ध्यास त्याने घेतला होता. जिद्दीने अभ्यास करून परीक्षेत त्याने चांगले गुण मिळवले.
त्याचं आई वडिलांना खूप कौतुक वाटलं. मुलानं आजून चांगलं शिक्षण घ्यावं असं त्यांना वाटायचं.
पण आई वडिलांचे कष्ट कमी करायचे म्हणून बालकृष्णाने नोकरी शोधायला सुरुवात केली. मुलाला मोठ्या शहरात चांगली नोकरी मिळावी म्हणून आईने १००० रूपये दिले आणि बंगळुरूमध्ये जाऊन नोकरी शोधायला सांगितलं.
बालकृष्णाने बंगळुरूमध्ये सगळ्या ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये अर्ज केले. पण काही केल्या यश मिळेना.
हळूहळू उत्साह मावळायला लागला. शेवटी मिळेल ती नोकरी स्वीकारायची असं त्याने ठरवलं. शेवटी कार धुवायची एक नोकरी मिळाली आणि पगार होता दरमहा केवळ पाचशे रुपये.
दरम्यान दुसरं एक काम मिळालं. शिक्षणाच्या मानाने हे काम वेगळं होतं पण दोन हजार रुपये पगार मिळणार होता.
त्यातून कुटुंबाला हातभार लावता येणार होता. मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदावर ही नोकरी त्याने जवळपास चौदा वर्ष केली. कामाचा ताण सहन होईना म्हणून तीही नोकरी सोडली.
२०१० ला मिळालेल्या प्रॉविडंट फंडातून त्याने अक्वापॉट नावाचा स्वतःचा वॉटर प्युरिफायरचा ब्रँड सुरू केला. यातही पुष्कळ अडचणी आल्या.
जवळच्या लोकांनीच त्याला विरोध केला. तरीही न डगमगता त्याने आपलं काम मोजक्या लोकांच्या मदतीने सुरू ठेवलं.
ग्राहकांशी, इतर लोकांशी चांगले संबंध ठेवायचे ही त्याची जमेची बाजू होती. हळूहळू ग्राहक वाढत गेले तसा बिझनेस वाढला. मग होलसेल बिझनेस सुरू केला.
वेगवेगळ्या पद्धतीने बिझनेसचं भरपूर मार्केटिंग केलं आणि यशच मिळत गेलं.
देशातल्या सर्वोत्तम वीस वॉटर प्युरिफायरमध्ये अक्वापॉटचं नाव आलं. सध्या या कंपनीचा वार्षिक टर्न ओव्हर २५ करोड रुपये असून हैद्राबाद, बंगळुरू, विजयवाडा, तिरुपती, हुबळी येथे शाखा आहेत.
न थकता, न कंटाळता अथक परिश्रम करून बालकृष्णाने हे यश मिळवलं. कष्ट आणि इमानदारी यावर विश्वास ठेवला तर काहीही अशक्य नाही हे त्याने दाखवून दिलं.
रातोरात कोणी श्रीमंत होत नाही हे खरं आहे. रात्रीचा दिवस करून, घाम गाळून, सचोटीने जो काम करतो त्याला मिळणारं फळ हे गोडच असतं.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.