हल्लीच्या कशाला, पूर्वीपासून सासू सुनेचं नातं कसं असतं हे अख्या विश्वाला ठाऊक आहे, म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना अशाप्रकारचं काहीतरी, अगदी सौम्य वादापासून तीव्र वादापर्यंत हे नातं ताणलं जाऊ शकतं, पण तुटत नाही कितीही झालं तरी, बहुतांशी नातं जुळताना आधीच ताक फुंकून प्यायची सवय लागते आणि त्यातून गैरसमज आणि मग नात्यात आलेलं मळभ, आपल्या आयुष्यात आपण काय सहन केलं तेच तश्याच प्रकारचं सर्व आपल्या सुनेनी सहन केलं तर काय बिघडलं अश्या प्रकारची मानसिकता, माझा विषय सासू सुनेच्या नातेसंबंधावर नाही तर ते नातं टिकवण्याकरता केलेल्या व्यवहारावर आहे, उदाहरणादाखल एक छोटासा व्यवहार सासू सून करत असतात का कधी ह्याबध्दल कुतूहल….
नव्याचे नऊ दिवस संपले की जगाचे व्यवहार सुरु होतात आणि घरामध्ये इवल्याश्या पाऊलांचे धावणे सुरु होते आणि मग सुरु होतात व्यावहारिक अडचणी, मग हेवेदावे, आम्ही कसं केलं वगैरे, मग सुनेची दमछाक, नवऱ्याचा जीव कासावीस होणं, मग मुलाला टोमणे ऐकायला लागणं हे सर्व सुरु होतं आणि त्यातून नातेसंबंध ताणले जातात…..
मुलं ज्या वेळेस पायावर उभे राहायला शिकतात त्यावेळेस खरी जबाबदारी सुरु होते अगदी हागण्यामुतण्यापासून आजारपण काढणे हा फार मोठा कारभार असतो आणि हा कारभार निदान पाच वर्ष तरी अव्याहत सुरु असतो आणि त्यातून होते घरातल्या सर्वांची घालमेल, कदाचित ह्यातून अविचार जन्माला येऊन घरं तुटली जातात म्हणजे नव्या जीवाला घरातले नातेसंबंध समजण्याआधीच त्याला दुसरीकडे जावे लागते.
साधारणतः हल्ली नवरा बायको दोघेही नोकरी करत असतात आणि त्यामुळे मुलाला सांभाळायचे कोणी हे मोठं प्रश्नचिन्ह असते, हल्ली ह्या अडचणीचा फायदा घेऊन अनेक पाळणाघरं उभी राहिल्येत त्यात काही जेनुइनली काम करणारी असतात तर काही फक्त पैसे कमावण्याकरता आणि त्यातूनच लहान मुलांचे नुकसान होऊ शकते कदाचित.
घरात सासू असून मुलाला बाहेर ठेवावे लागते ह्यात अव्यवहारी पणा वाटत नाही का? बाहेर पाळणाघरात हजारो रुपये मोजून त्या मुलाची काळजी करत बसण्याशिवाय गत्यंतर नसते असा भास हल्ली निर्माण झालाय कारण नातेसांबांधातील बिघाड.
बाहेर मुलांना ठेवताना त्या पाळणाघराची फी, त्यांचं खाणं पिणं आणि त्यांची ने आण ह्यात हजारो रुपये खर्च होत असतात आणि मानसिक त्रासही होत असतो शिवाय मुलं घरच्या वातावरणाला मुकतात ते वेगळंच आणि कदाचित मुलांवर काही अनाठायी प्रसंगही येऊ शकतात ह्या काळात.
असं होऊ शकत नाही का? म्हणजे आपण जे हजारो रुपये काही वर्ष बाहेर पाळणाघरात खर्च करत असतो तेच पैसे आपल्या घरातील वडीलधारी मंडळींना मग ती सासू असू दे अथवा अन्य कोणी व्यक्ती दिले तर ते पैसे घरातच राहू शकतात, शिवाय ते पैसे वडीलधारी मंडळी आपल्या मुलांवरच खर्च करतील कदाचित आणि मुलं संभाळल्याबद्धल झालेल्या कमाईचा आनंद, मुलांनासुद्धा घराच्या वातावरणाचा लाभ, बाहेरील अन्य धोक्यांपासून मुक्तता आणि घरातील वडीलधारी मंडळींचं प्रेम आणि धाक ह्या सर्वांचा लाभ होणार नाही का? हा व्यवहार असला तरी प्रेमाचा व्यवहार होऊ शकतो, आपण घरात इतर व्यवहार करतच असतो म्हणजे मालमत्तेच्या संदर्भात वगैरे मग हा सासू सुनेचा व्यवहार करायला काय हरकत आहे?
ह्यातून वयामुळे बोचणारं रिकामपण आणि आपल्या क्षमतेविषयीचा न्यूनगंड कदाचित अश्या व्यवहारातून वयस्कर माणसांमधून कमी होऊ शकतो, शिवाय आपलं मूल घरीच आहे ह्या भावनेतून चिंतीत होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं, मुलांना प्रेम /शिस्त /घरपण ह्याचा लाभ होऊ शकतो आणि घरात वाढणारी मुलं मानसिक दृष्ट्या सुधृढ होत असतात कदाचित……
व्यवहार ह्या भौतिक जगात कोणाला चुकलाय? मग असा प्रेमाचा व्यवहार करायला काय हरकत आहे? जर आपलं जन्म आपलं अस्तित्व टिकवण्याकरता झाला आहे आणि पुरुत्पत्तीकरता झाला आहे मग येणाऱ्या नवीन जनुकांना सांभाळणे आणि त्यांच्यात उत्क्रांती करणे हे आपलं कर्तव्य नव्हे काय?……स्वर्वसाधारण मत व्यक्त केले आहे, ह्यात वैयक्तिक असे काही नाही…. बघा पटतंय का?
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.